अध्याय १४ वा - श्लोक १० ते १३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अतः क्षमस्वाच्युत मे रजोभुवो ह्यजानतस्त्वत्पृथगीशमानिनः ।
अजाऽवलेपांधतमोंऽधचक्षुष एषोऽनुकंप्यो मयि नाथवानिति ॥१०॥

ऐसा अपराध माझा हरि । तो तूं आतां क्षमा करीं । भ्रांत नोहें मी यावरी । हें मुरारी प्रार्थितों ॥९२॥
रजोगुणीं माझे जन्म । तेथ नियुक्त सृजनकर्म । तेणें बहळ अज्ञानतम । ऐकें वर्म तयाचें ॥९३॥
सृष्टिकर्ता मी ईश्वर । अजत्वाचा अहंकार । तेणें मदें झांकले नेत्र । पडला अंधार मूढत्वें ॥९४॥
ऐसा झालों अज्ञानपात्र । भंगोनि गेलें स्मरणसूत्र । जगत्कर्ता सर्वेश्वर । तो मी स्वतंत्र सर्वाद्य ॥२९५॥
पृथक्पदाभिमानेंकरून । येथ करूं आलों छळण । तो अपराध क्षमा करून । किंकरजन रक्षावा ॥९६॥
ऐकें सर्वज्ञचूडामणि । आतां ऐसें मज तूं मानीं । माझेनि सनाथ किंकरगणीं । असतां मूर्ध्नि मी तुझे ॥९७॥
शिरीं असतां मी हृषीकेश । केवळ ब्रह्मा सनाथ दास । अर्ह मानी अनुकंपेस । कृतागस न म्हणूनी ॥९८॥
झणें तूं म्हणसी कमलापति । तूंही ब्रह्मा ब्रह्मांडमूर्ति । क्षमापनीं कां करिसी विनति । तरी यादर्थीं परिसावें ॥९९॥

क्काहं तमोमहदहंखचराग्निवार्भूसंवेष्टितांडघटसप्तवितस्तिकायः ।
क्केदृग्विधाविगणितांडपराणुचर्यावाताध्वरोमविवरस्य च ते महित्वम् ॥११॥

अव्याकृत बोलिजे तम । महत् हिरण्यगर्भा जाण । अहंकार तो त्रिगुणोद्गम । विराट परम बोलिजे ॥३००॥
ख तें नभ चर तो अनिळ । अग्नि स्पष्ट वारि सलिल । भू ते धरणिच केवळ । ब्रह्मांड गोळ अष्टधा ॥१॥
अष्टधाप्रकृतिवेष्टित घट । स्वमानें सात वितीच प्रकट । माझा काय अति लघिष्ट । कोठें फलकट मेरूसी ॥२॥
तुझें महित्व कोणीकडे । ऐशीं अगणितें ब्रह्माडें । परमाणु मांदियाचेनि पाडें । भ्रमणीं पडे धुळोरा ॥३॥
रोमकूपाच्या वातायनीं । ऐशा फिरती ब्रह्मांडश्रेणी । माझी गणना कोणे स्थानीं । चक्रपाणि ते ठायीं ॥४॥
तुच्छाहूनि तुच्छतर । कृतागस लघु किंकर । जाणोनि कृपार्ह अनुचर । अंगीकार करावा ॥३०५॥
किमर्थ करणें अनार्यक्षमा । ऐसें न म्हणावें परमात्मा । स्वगर्भस्थां जाणोनि आम्हां । सोढव्यमहिमा प्रकटावी ॥६॥

उत्क्षेपणं गर्भगतस्य पादयोः किं कल्पते मातुरधोऽक्षजागसे ।
किमस्तिनास्तिव्यपदेशभूषितं तवास्ति कुक्षेः कियदप्यनन्तः ॥१२॥

प्रत्यक्ष पाहें अधोक्षजा । लौकिका ही जननी प्रजा । गर्भीं वाहतां बरवे वोजा । साहती सहजा जोजारा ॥७॥
गर्भगताचे पादोत्क्षेप । मातृक्रोधासि कारणरूप । होती ऐसा हा विकल्प । कोणी अल्प जल्पती ॥८॥
हें काय घडे जी मुरारि । मा आम्ही तो तुझिये उदरीं । गर्भगतचि सचराचरीं । पैं निर्धारीं असिजेत ॥९॥
अस्ति नास्ति उभय भाग । नित्यानित्यात्मक जें जग । भावाभाव द्विविध आंग । वसती चांग तव कुक्षीं ॥३१०॥
अवघें स्थूळसूक्ष्मादिक । कार्यकारण पृथक् एक । भूतभविष्य स्थित प्रमुख । ज्ञानाज्ञान वाच्यादि ॥११॥
इत्यादि शब्दीं जें अभिहित । वेदशास्त्रीं प्रभूषित । कृत्स्न तें तव कुक्षिगत । कीं अए किंचित बाहेरी ॥१२॥
सर्वही तुझ्या अभ्यंतरीं । नुरे कांहींच बाहेरी । स्वगर्भस्था माझेनि हरि । क्षमा करीं अपराध ॥१३॥
एवं गर्भगतत्व आपुलें । सामान्यत्वें प्रतिपादिलें । आतां पुत्रत्व विशेष आलें । प्रकट केलें ते ऐका ॥१४॥

जगत्त्रयांतोदधिसंप्लवोदे नारायणस्योदरनाभिनालात् ।
विनिर्गतोऽजस्विति वाङ् न वै मृषा किंत्वीश्वर त्वन्न विनिर्गतोऽस्मि ॥१३॥

ब्रह्मा म्हणे जगदीश्वरा । आपले पोटींचिया लेंकरा । सर्वान्याय क्षमा करा । हें दातारा प्रार्थितों ॥३१५॥
जगत्त्रयाचे प्रलयकाळीं । फुटोनि सर्व समुद्रपाळी । तैं एकार्णवाचिये जळीं । ब्रह्मांडढेपुळी विघरली ॥१६॥
मग ते केवळ प्रळयसलिलीं । नारायणाचे नाभिकमळीं । अज जन्मला हे श्रुतीची बोली । मिथ्या केली नवचे कीं ॥१७॥
परमेश्वरा ऐशिये वोज । तुजपासोनि जन्म माझा । हें काय लटिकें गरुडध्वजा । मी पुत्र तुझा निश्चयें ॥१८॥
तुजचिपासूनि मी उत्पन्न । तव तंत्रेंचि चेष्टें पूर्ण । भ्रमलों धरूनि पदाभिमान । क्षमा आपण करावी ॥१९॥
म्हणसी नारायणापासून । तुझें झालें असेल जनन । तो संबंध मज लागून । काय म्हणून लाविसी ॥३२०॥
ऐसें न म्हणावें श्रीहरि । नारायणचि तूं निर्धारीं । भक्तानुग्रहें नानापरी । निर्विकारी अवतरसी ॥२१॥
तोचि तूं हा पशुपांगज । दृष्टनिग्रह देवताकाज । भक्तानुग्रहें विग्रहवोज । हें निजगुज मी जाणें ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP