अध्याय १४ वा - श्लोक ७ ते ९

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गुणात्मनस्तेऽपि गुणान्विमातुं हितावतीर्णस्य क ईशिरेऽस्य ।
कालेन यैर्वा विमिताः सुकल्पैर्भृपासवः खे मिहिकाद्युभासः ॥७॥

अचिंत्य अनंतगुणपरिपूर्ण । तो तूं गुणात्मा गुणाधिष्ठान । त्या तव गुणांचें संख्यागणन । करूं कोण शकतील ॥५८॥
कैसें प्रकारींचा तूं सगुण । मादृश देखोनि अज्ञान । त्याच्या हितार्थ अवतरोन । अनंतगुणप्रकाशक ॥५९॥
विश्वस्थितिसंस्थापन । तेथ होतां प्रमादविघ्न । ते ते ठायीं अवतरोन । हितावतीर्ण म्हणविसी ॥२६०॥
बहुधा रूपें अवतरोन । बहुधा विश्वाचें पाळण । बहुधा करिसी ते तवगुण । शकती कोण गणावया ॥६१॥
प्रेमें मित्रें त्रासें हट्टें । द्वेषें रोषें तोषें कोठें । छेदूनि दासांचीं दुर्घटें । लाविसी वाटे स्वहिताचे ॥६२॥
संख्या नलगे अवगणीं गणितां । गुणगणनेची कायसी कथा । म्हणों जरी कळेल बुद्धिमंता । तरी हें अनंता अघटित ॥६३॥
कल्प म्हणिजे आयुष्मान । सुष्ठु सुकृत बहुल जाण । ऐशीं अनेक जन्में पूर्ण । आयुष्मान् धीमंत ॥६४॥
बहुवचन मुळींचे पदीं । बहळ जन्मातें प्रतिपादी । सुष्ठु अव्ययें कुशाग्रबुद्धि । सुकृतसिद्धि चिरायु ॥२६५॥
ऐशिया कुशलां चिरायुवंतां । अनेक जन्म गणना करिताम । भूमिपमाणु परमितां । काळें महता करवेल ॥६६॥
अथवा हिमाचे परमाणु । आकाशभरी ही शकती गणूं । द्युभास म्हणिजे तारागणु । शकती उमाणूं मोकळे ॥६७॥
अथवा तारादि चंद्रकिरणा । माजील परमाणूंची गणना । करूं शकवे विचक्षणा । परी सगुण तवगुणां न गणवे ॥६८॥
ऐसें निर्गुणाहोनी सगुण । तारतम्यें दुर्बोध गहन । भक्तिमार्गाचें सुलभपण । बोले द्रुहिण तें ऐका ॥६९॥

तत्तेऽनुकंपां सुसमीक्षमाणो भुंजान एवाऽऽत्मकृतं विपाकम् ।
हृद्वाग्वपुर्भिर्विदधन्नमस्ते जीवेत यो मुक्तिपदे स दायभाक् ॥८॥

ब्रह्मा म्हणे जी विषाणधरा । तुझी अप्राप्ति साधकां इतरां । तस्मात सोपा भक्तनिकरा । भजनपरां निष्कामां ॥२७०॥
जतक लक्षिती जलद अपा । किंवा चकोर जैसे उडुपा । जननीसंगम जेविं स्तनपा । तेवीं तव कृपा वांछिती ॥७१॥
वृष्टि वांछिजे अवर्षणीं । कीं नौका जेंवि सागरमग्नीं । अन्न वांछी बुभुक्षु प्राणी । किंवा रुग्णीं नीरुजत्व ॥७२॥
तेंवि कृपाकटाक्ष तुझा । केव्हां होईल बरवे वोजा । ऐसे साकांक्ष गरुडध्वजा । पदांबुजा चिंतिती ॥७३॥
यावेगळा अन्यकाम । ज्यासि वाटे वांतीसम । अनासक्त परिपक्ककर्म । विगतकर्म भोगितां ॥७४॥
न करी कृच्छ्रें चांद्रायणें । मासोपवासादि निरशनें । गुणकीर्तनकथाश्रवणें । नामस्मरणें संतुष्ट ॥२७५॥
ज्यासी फावला परमरस । तो न सेवी विषयबाकस । अवगमलिया भक्तिरहस्य । ठेलीं फोस तपतीर्थें ॥७६॥
यावज्जीव ऐसा जाला । तो मुक्तीचा विभागी झाला । पितृदायविभाग आला । जेंवी पुत्राला न जोडतां ॥७७॥
जंववरी देहाची असे व्यक्ति । तंव क्रियारूपें प्रकटे भक्ति । देह पडतां अभेदमुक्ति । असे आइती जोडली ॥७८॥
निजात्मविसरें मायाभ्रम । भोगवी जन्ममरणादि श्रम । तेथ तरणोपाय सुगम । भक्तिप्रेम हरि वदला ॥७९॥
मामेव ये प्रपद्यंते । मायामेतां तरंति ते । ऐसें स्वमुखें श्रीअनंतें । अर्जुनातें बोधिलें ॥२८०॥
भक्त्या मामभिजानाति । ऐसा सिद्धांत श्रीपति । प्रबोधूनी अर्जुनाप्रति । मोहभ्रांति निरसिली ॥८१॥
शुक म्हणे गा परीक्षिती । तैशी ब्रह्मयाची हे स्तुति । जो जोभजे अभेदभक्ति । तो तव मुक्ति विभागी ॥८२॥
दाय म्हणिजे पितृसंपत्ति । तरीमी जो कां अखिलपति । स्वर्गादि ब्रह्मलोकावाप्ति । दायबिभक्ति हे म्हणसी ॥८३॥
तरी मी सर्वलोकां मुकुटीं । त्या मज ब्रह्मयाची हे रहाटी । क्षमापनार्थ परमेष्ठी । तेचि गोष्ठी निवेदी ॥८४॥
मुख्य माझीच अनार्यमति । कायसी ब्रह्मलोकाची प्राप्ति । म्हणोनि सद्भक्त नेच्छिति । अभेदभक्ती वांचुनी ॥२८५॥

पश्येश मेऽनार्यमनंत आद्ये परात्मनि त्वय्यपि मायिमायिनि ।
मायां वितत्येक्षितुमात्मवैभवं ह्यहं कियानैच्छमिवार्चिरग्नौ ॥९॥

ऐकें स्वामी परमनाथा । मी निवेदीं क्षमापनार्था । माझिया दुर्जनत्वाची कथा । ते समर्था पर्येसीं ॥८६॥
ब्राह्मी रौद्री ऐंद्री दैवी । यांचे प्रवर्तक ते मायावी । त्या मायिकांलागीं जो भुलवी । तो गोसावी अखिलाद्य ॥८७॥
त्या तुझे ठायीं आपुली माया । पसरूनि ऐश्वर्य प्रकटावया । इच्छी तंव ते गेली लया । कुरंगतोया सारिखी ॥८८॥
तूं मायावी अगाध सिंधु । त्यामाजी मी किंमात्र बिंदु । मी स्फुलिंग तूं जातवेदु । महाप्रळयकाळींचा ॥८९॥
तुजप्रति माझी माया किती । फिरोनि मजची पडली भ्रांति । स्फुलिंगजळा प्रळयज्योती । न लपे गभस्ति खद्योतें ॥२९०॥
मुख्य माझें हें औद्धत्य । तुझें ऐश्वर्य नित्य सत्य । तेथ गौणमायाकृत्य । धरी सामर्थ्य प्रकटावया ॥९१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP