यशवंतराय महाकाव्य - सर्ग अकरावा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


दिल्लिरखान यशवंतरायास ठार मारण्याकरितां बादल या नांवाच्या भिल्लास पाठवितो - तो भिल्ल यशवंतरायास गांठतो - द्वंद्व युद्ध - बादल जखमी लागून पडतो - तो मरतांना कृतकर्माबद्द्ल पश्चात्तप दाखवितो - जुनी ओळख - यशवंतराय भिल्लास आश्वासन देतो - प्राणोत्क्रमण - विलक्षण मसलत - दिल्लिरखानास ठार मारण्याकरितां यशवंतराय बरोबर कांहीं निवडक लोक घेऊन निघतो - चांदण्या रात्रीचें वर्णन - मराठ्यांच्या छावणींत प्रवेश - दिल्लिरखानाचा वध - मोगलांची धांदल.

श्लोक
कोटापुराभोंवतिं नित्य यापरी । मल्हार तो युद्ध हळू हळू करी ॥
वार्ता घडे एक पुरांत अद्भुत । पौराग्रणी शौर्य जयांत दावित ॥१॥
सारून रात्रीं यशवंत भोजन । आला महालीं अपुल्या जिन्यांतुन ॥
टाकी हळू तो पद हिंडतो सुखें । स्तोत्रें पवित्रें म्हणतो तिथे मुखें ॥२॥
होता दिवा एकच टांगला वरी । जो भोंवतीं अंधकशी प्रभा करी ।
तींतून चाले यशवंतराय तों । येतां तिथे एक मनुष्य पाहतो ॥३॥
होती जया उंच भयाण आकृती । नेत्रीं हिरे कीं जणु दोन शोभती ॥
अंगें कठोरे बहु - शक्ति - संयुत । कोणी असा दुष्ट मनुष्य भासत ॥४॥
आला पुढें तो तरवार सांवरी । मुद्रा तयाची दिसण्यांत बावरी ॥
बोले कठोर - स्वर काय भाषण । आश्चर्य दावी यशवंत ऐकुन ॥५॥
“ आयुष्य - तंतू तुटणार या स्थळीं । मी हा तुझा नाश करीतसे बळी ॥
रक्षावया देवहि होय न क्षण । जाशील कोठें न करांतुनी मम ॥६॥
आयुष्य कांहीं क्षण शिष्ट राहिलें । तूं ईश्वराचीं स्मर त्यांत पावलें ॥
जो बुद्धि देतो मजला करावया । हें कर्म कीं प्राण तुझे हरावया ” ॥७॥
बोलूनियां दृष्ट पुढेंच धांवला । अत्यंत कोपा यशवंत पावला ॥
“ माझ्याच हातें मरणें तुवां असें । दुष्टा कपाळीं लिहिलें तुझ्या असे ” ॥८॥
उड्डाण मारी वर हात ठेवुन । तो जागच्याजागिं उभाच राहुन ॥
जी गुप्त होती तुळईंत ठेविली । एका क्षणीं ती तरवार काढिली ॥९॥
बोले - “ तुझा नाशक मी असें उभा । ये तूं पुढें पूर्ण तुला असे मुभा ॥
त्वत्तुल्य आले जरि वैर ते दहा । मी लोळवीतों इतक्यांतही पहा ॥१०॥
पाणी दिलें या तरवारिला नवें । त्याची परीक्षा करण्यास आठवे ॥
चाले शरीरीं तव चांगली जरी । कारागिरा देइन मोल मी तरी ! ” ॥११॥
ते दोनही मंडळ घेउं लागती । संधी कराया मग वार पाहती ॥
जैशा विजा त्या तरवारि नाचती । होतो तिथे शब्द खणाखणा किती ॥१२॥
संक्षेप विक्षेप शरीर - दृष्टिला । प्रक्षेप शास्त्रां चिर तेथ चालला ॥
क्रोधामधें ते मणिबंध चावितो । आकाशपृथ्वी करूं एक पाहती ॥१३॥
जों जों घडे चापल शस्त्र - संगरीं । प्रत्येक उत्साह मनीं नवा धरी ॥
प्रत्येक ते अद्भुत डाव दाविती । आलाच हातींनिज शत्रु भाविती ॥१४॥
जें आवडे शस्त्र तया तया मिळे । दोघांस होतीं बहु योग्यशीं स्थळें ॥
प्रत्येक मोठा आपणास मानितो । झाला चमत्कार कथील कोण तो ! ॥१५॥
त्या काळिं कोट्यामधिं खङ्ग घेइल । दावील मोठें कमला - सुता बळ ॥
होता न कोणी नर धन्य यापरी । ज्यापास्नी तो यशवंत भी धरी ॥१६॥
तेव्हां चमत्कार मनास वाटला । धास्तीहि कांहीं यशवंत पावला ॥
आहे तरी कोण उभा पुढें असा । जो घात पाहे करण्यास काळसा ॥१७॥
तारूण्य उत्साह सुहस्त - कौशल । अंगांतलें थोरहि मूळचें बळ ॥
तें जागच्या जागिंच सर्व राहिलें । येऊन हें संकट थोर कोसळे ॥१८॥
द्यायस धापा यशवंत लागला । शक्ती गळूं लागलि फार भागला ॥
बिंदू कपाळावर घाम सांठुन । व्यायाम तो हस्तपदांस होय न ॥१९॥
बोलावुं कोणास सहाय काय मी ? । झालों असें या समयास मी श्रमी ॥
वाटे असें मान - धनास त्या पुन्हा । तो एकटा साह्य नसोच आपणा ॥२०॥
अंगी पुन्हा हिंमत एकदा धरी । चालून गेला मग तो अरीवरी ॥
ऐसा करी एकच वार कीं बळें । जेणें जणो डोंगर वैरि कोसळे ॥२१॥
मारेकरी तो पडला महीवर । येऊन मूर्च्छा पसरूनियां कर ॥
डावे कुशी वार असाध्य जाहला । त्यांतून तों रक्त पडे भळाभळा ॥२२॥
पौरेश आश्चर्यभरें बघे पुढें । मारेकरी दृष्टिस त्याचिया पडे ॥
ठेवून खङ्गावर हात ओणवे । पोटीं दया पाहुन शत्रु जाणवे ॥२३॥
धांवून आलीं वर कांहिं माणसें । तों त्यांस मूर्च्छागत वैरि तो दिसे ॥
राहे न्यहाळीत तया उभा धनी । आश्चर्य हें पाहुन होतसे मनीं ॥२४॥
बोले दयार्द्रांतर काय चाकरां । “ व्हाहो पुढें सावध त्याजला करा ! ॥
त्या बापुड्या कांहिं असेल बोलणें । बोलो सुखें त्यास न यांत वांचणें ॥२५॥
जाणावया उत्सुकता असे जरी । दुष्टास या प्रेषण कोण तो करी ? ॥
जाणाल तेंही पुरवाच हेतु हा । होईल तो सावध कीं पहा पहा ! ” ॥२६॥
हळू हळू सावध दुष्ट जाहला । स्वनेत्र पाहूं उघडून लागला ॥
मुखांतुनी अस्फुट शब्द काढितो । बघून दैन्यें जल पूर्विं मागतो ॥२७॥
जाऊन बैसे जवळी धरी कर । बोले हळू तो यशवंत सुस्वर ॥
“ मीं काय केला अपराध थोरसा । आलास घ्याया जणु सूड तूं असा ” ॥२८॥
मारेकरी तो करि नेत्र खालते । काढी प्रयत्नें मग खोल शब्द ते ॥
“ मी क्रूर - कर्मा अति दुष्ट बादल । घ्याया नसें योग्य तुझ्या घरीं जल ॥२९॥
दिल्लीर धाडी मज मारण्या तुला । आलों मनीं दुष्ट धरून हेतुला ॥
भिल्लांतला नायक मीच बादल । ज्याचे भयें ऐकुन कांपती बळ ” ॥३०॥
हे ऐकतां विस्मय फार जाहला । मोठ्या स्वरानें यशवंत बोलला ॥
“ तूं काय तो बादल ? नांव ऐकुनी । होतें पहावें तुजला असें मनी ॥३१॥
भिल्लामधें नायक तूंच काय तो ? । कीर्ती जयाची जन सर्व जाणतो ॥
राजे हि होते तुज भीत बापुड्या ! । आलास कर्मेंच दशेस येवढ्या ॥३२॥
तू वाटमार्‍या बसणार काननीं । पांथस्त लोकां लुटणार हाणुनी ॥
या देशिं कोणी नव्हता तुझा अरी । जो खङ्ग - युद्धास तुझ्या सवें करी ॥३३॥
अंगीं असोनी गुण ते सहस्रशा । कामांत आला नसतास तूं अशा ॥
होतास मोठा चढतास योग्यते । आयुष्य गेलें तव व्यर्थ वाटते ! ॥३४॥
जगन्नियंत्या परमेश्वरास हें । नराधमा ! कर्म तुझें कसें सहे ? ॥
म्हणोन मेलास करींच माझिया । पराभवातें वरिताय कासया ? ॥३५॥
शत्रुत्व संपादुनि दिल्लिरासवें जो लाजवी होळकरा पराभवें ॥
आहें अस अमी तुज हेंच ठाउक । मी कोण ही देइन आज ओळख ॥३६॥
चोवीस वर्षे घडलीं कथेस या । तो काळ तूं आठव टाकुनी भया ॥
होतास तेव्हां मद - मत्त यौवनें । हत्तीपरी हिंडत घोर तीं वनें ॥३७॥
क्रूरा ! तुझें शौर्य अचाट संगरीं । नाहीं दयेचा परि लेश अंतरीं ॥
घेसी जनांचीं लुटुनी धनें किती ! । तूं मारिसी जीव तयां नसे मिती ॥३८॥
एका प्रसंगीं निज सेवकांसह । जातां पथीं भोगित दुःख दुस्सह ॥
कोणी अशी स्त्री कमलाख्य सुंदरी । ती बापुडी सांपडली तुझ्या करीं ॥३९॥
हा लाभ मोठा तुज वाटला खरा । होतास तूं जात पळून तस्करा ॥
तों वीर आला जगदेव सद्गुणी । तो सोडवी तीस तुझ्या करांतुनी ॥४०॥
युद्धांत मेले बहु भिल्ल सोबती । तेव्हां तुला वार हि फार लागती ॥
झाले न तेव्हां परिपूर्ण शासन । आला असे हा म्हणुनीच कीं दिन ? ॥४१॥
माझा पिता तो जगदेव सन्मती । माता हि माझी कमला महासती ॥
ती गांजिली त्वां अबला म्हणूनियां । मी पुत्र तीचा तव शत्रु निर्दया ” ॥४२॥
बोले तदा स्फुंदत बादल स्वयें । “ माझी तुला काय म्हणून कींव ये ? ॥
पापी जगीं हा परिणाम पावलों । दुष्कीर्तितें संतत पात्र जाहलों ॥४३॥
औदार्यशाली स्वजनांत तूं हिरा । रक्षावया पाहसि या पुरा बरा ॥
द्यावें तुला साह्य म्हणून घ्यां जरी । दुर्मार्ग दावी धनलोभ हा तरी ॥४४॥
आलों जरी मी नसतो पुरांत या । देतों तुला संधि न सूड घ्यावया ॥
यावा मला मृत्यु इथे तुझ्या करें । हें ईश्वरें इच्छित वाटते खरें ॥४५॥
पाहून देवा ! गहना तुझ्या कृती । वाटे मना विस्मय गुंगते मनी ॥
जो पातकी घातक मातला खळ । दंडावया त्या तुज मार्ग पुष्कळ ! ” ॥४६॥
ऐसें वदे श्वासहि टाकि दीर्घसा । लावी वरी बादल दृष्टिला तसा ॥
दुःखांत मोठ्या गत - गोष्टि आठवी । तो जन्म - भूमीप्रत चित्त पाठवी ॥४७॥
आयुष्य हा मार्गच थोर चालुन । विश्रांति घेणार इथेच जाणुन ॥
मागें बघे तों स्वचरित्र चित्रसे । राह एपुढें त्या भिववीतसे जसें ॥४८॥
लक्षावधी लोक भिकेस लागले । याच्याच हातें किति मृत्यु पावलें ॥
मूर्ती तयांच्या दिसतात येउन । भीती उरीं जाय तदा धडाडुन ॥४९॥
जो स्वर्ग या भूमि - तलावरी खरा । त्या सौख्यदायी स्मरतो मनीं घरा ॥
भार्या सुगात्री तरुणी धरी मनीं । तो बाळ ही सुंदर धाकुटा गुणी ॥५०॥
आणून अश्रू नयनांत बोलत । आर्त स्वरें तो कमला - सुताप्रत ॥
“ कोपानळीं मी तव दग्ध जाहलों । जें कर्म केलें फळ नीट पावलों ॥५१॥
विज्ञापना यास्तव नम्र मी करीं । आहेत जीं कीं मम माणसें घरीं ।
त्या दुर्बळीं आग नकोच पाखडूं । घेईन मी सूड असें नको वदूं ” ॥५२॥
पौरेश बोले “ भलतीच कल्पना । कां बादला येत असे तुझ्या मना ? ॥
या वेळिं तूं होउन शांत चिंतणें । श्रीशंकराचींच पदें सुपावनें ” ॥५३॥
तेव्हां वदे बादल काय भाषण । आतां असे निर्मळ शांत मन्मन ॥
‘ हे राम ! हे राम ! ’ वदेन मी मुखें । सोडून जाईन महीतळा सुखें ” ॥५४॥
नाडी हळू चालुन बंद राहिली । बर्फाप्रमाणें तनु गार जाहली ॥
तों प्राण ही सोडि तनूस नश्वर । गेला असा बादल तो भयंकर ॥५५॥
ये आंत तों धांवत वीर दोहन । द्वारांतुनी बोलत लोक - मोहन ॥
“ मित्रा ! उदारा ! भय थोर येतसे । आला पुरीं बादल ऐकिलें असें ॥५६॥
वृत्तांत माझे मज दूत सांगती । घ्याया तुझा प्राण पठाण पाहती ॥
त्यांनींच हा बादल धाडिला पुरीं । जीवांस जो दुष्ट असंख्य संहरी ” ॥५७॥
मित्रास तेव्हां यशवंत बोलला । “ ये हा पुढें बादल पाहिं पाडिला ॥
माझ्याच हातें अति नीच तो मरे । हें मेळवीलें यश थोर मत्करें ” ॥५८॥
ऐकून हें दोहन धांवतो पुढें । आश्चर्य - दृष्टी बघतो तयाकडे ॥
हा बादलाचा बघुनी पराभव । तो थोर  मानी यशवंत - वैभव ॥५९॥
कृत्यें खळाच्या बहु कोपला भला । पौराधिकारी यशवंत बोलला ॥
“ दिल्लीर हा दुष्ट मदांध सर्पसा । नाशूं अम्हांला न बघेल तो कसा? ॥६०॥
हा खान राहील जिवंत जोंवर । विश्रांति चित्ता नच आमुच्या तर ॥
मारावया यास सुयुक्ति काढिजे । हा पूर्ण झाला मम हेतु पाहिजे ” ॥६१॥
प्रत्युत्तरा दोहनसिंग देतसे । त्याच्या मनीं एक विचार येतसे ॥
तो साम्य साधारण पाहतो बळी । आकार उंची यशवंतबादलीं ॥६२॥
“ शौर्याकरा ! नागर - लोक - संमता ! । घेशील याचा जरि वेष तूं स्वतां ॥
गोटांत जाऊं अरिच्या सुसावध । दिल्लीरखाना ठकवूं करूं वध ” ॥६३॥
ती युक्ति या मानवली बरें म्हणे । “ साधीन मी वेष असा पहा पणें ॥
पोषाक काळा तनु वर्ण सांवळा । डोकीवरी मंडिल यास हा निळा ॥६४॥
दाढी मिशा थोर मुखासभोंवतीं । गालीं कपाळावर वार दीसती ॥
हें सर्व साधेल अशाचसारखें । होईन मी बादल सांगतों निकें ॥६५॥
दिल्लीर घातास नसेल शंकत । भेटूं तया आपणही अकल्पित ॥
ही रात्र आहे उमंगूं न आपण । श्वानास मारूं चल जाउं ओढुन ॥६६॥
तूं शौर्यशाली भट मान सागर । वेषांतरें आज चला बरोबर ॥
पन्नास घेऊं जन साहसी सवें । ज्यां भीति ऐशा समयीं न जाणवे ॥६७॥
ते छावणीपासुनियां उभे भले । होतील कीं दोन हजार पावले ॥
ठेवूं उभे एक हजार नागर । नानास्थळीं सावध अंतरावर ” ॥६८॥
झाली तयारी घटकेंत चांगली । मार्गास ते लागति उत्सवें बळी ॥
वेशींतुनी बाहिर येति जों पहा । तो रात्र झाली घटका तिथे दहा ॥६९॥
भासे नभा निर्मळ रंग सांवळा । कीं घोंटुनी साफच केलि हे शिळा ॥
शोभे मधें सुंदर रात्रि - नायक । कांती तयाची अति हर्ष - दायक ॥७०॥
मोडी करी जो भुवना क्षणामधीं । दुग्धांबुधी तो घुसळी स्वयें विधी ॥
हा ठेवितो काढुन यत्न - पूर्वक । आकाश - पात्रीं नवनीत - गोलक ॥७१॥
या बंदुका घेउन सुंदरा अशा । खेळे विलासें जणु पूर्व ती दिशा ॥
क्रीडेंत हा आपटतां जमीनिला । आकाश - मार्गी वर नीट चालला ॥७२॥
फांके मही मंडळिं शुभ्र चांदणें । दुग्धेंचा जें सारवितें जगा क्षणें ॥
मैदान झाडें अणि टेंकड्या धरें । दृष्टीस येतात पदार्थ पांढरें ॥७३॥
पाटांतुनी निर्मळ पाणि वाहते । त्यांतून चंद्र - प्रतिबिंब शोभतें ॥
डोळ्यावरी अद्भुत तेज तों पडे । पाराच हा लोळत चालला पुढें ॥७४॥
मैदानही शांत समस्त भासतें । वारा सुटे गार हळू हळू तिथे ॥
पानें फुलें हालति वृक्षिंचीं हळू । भीतात येईल कुणा जणो कळूं ॥७५॥
वेळीं अशा तो यशवंत चालला । सर्वांपुढें, सत्वर टाकि पावलां ॥
घालूनियां मान उगाच खालती । नानापरी आंत विचार चालती ॥७६॥
क्रूराकृती बादल - युद्ध त्यासवें - । तो जिंकिला वैरि सुवीर्य - गौरवें ॥
तोंडांतुनी जें वच त्याचिया पडे । तें राहिलें सर्व अनुक्रमें पुढें ॥७७॥
या वेळपर्यंत जशीं महाभयें । आलीं बळानें तरलों तयां स्वयें ॥
सर्व स्वकार्यें सुरळीत चाललीं । शक्ति स्वशत्रूंप्रत पूर्ण दाविली ॥७८॥
होणार कैसें न कळे पुढें परी । विश्वास या साहींस कोण तो धरी ? ॥
मारीन मी दिल्लीरखान काय तो ? । कीं मृत्यु येतो मज ? कोण जाणतो ? ॥७९॥
जों जों पुढें जाति बघून छावणी । तों कर्णमार्गीं पडतो महा - ध्वनी ॥
तंबूंतला नीट उजेडही दिसे । तीं स्पष्ट येती नजरेस माणसें ॥८०॥
मागें स्ववीरां यशवंत ठेवुन । संगें तिघेही सरदार घेउन ॥
चाले पुढें किंचित थांबुनी तसा । ऐके बघे भोंवति सावकाशसा ॥८१॥
रात्रीं मराठे करणार रक्षण । तेथें उभे जे न विसंबती क्षण ॥
दृष्टी चुकावूनच संकटा तरे । रस्त्यांत एका शिरला पुढें सरे ॥८२॥
पाहे किती बैसुन चांदण्यामधें । जेवीत होते सुख तेंच त्यांस दे ॥
गोष्टी किती सांगति हांसती तिथे । स्वच्छंद ते खेळति नाचती कुठे ॥८३॥
तंबू तयाला मग एक दीसला । येऊन दारीं क्षण एक थांबला ॥
होते उभे अंगणि शस्त्रधारक । त्या दिल्लिराचे बहु सज्ज सेवक ॥८४॥
एकास बोले यशवंत सादर । “ जागा असे आंतच काय दिल्लिर ? ॥
सांगा तया बादल मी इथे असें । इच्छा मनीं त्यास पहावया वसे ” ॥८५॥
तो बोलला “ बादल शौर्य - सागर । येवो सुखें दाविन वाट सत्वर ॥
माझा धनी उत्सुक त्या पहावया । आधीं पुढें जाउन सांगतों तया ” ॥८६॥
आला क्षणें हात धरून नेतसे । निर्धास्त मागें यशवंत जातसे ॥
ते दोहनादी थबकून राहती । लावूनियां सावध कान ऐकती ॥८७॥
कोंचावरी खान खुशाल बैसला । हुक्का मुखा लावुन ओढितो भला ॥
तोंडीं धुराचे धरि लोळ सोडितो । जातां वरी देउन चित्त पहातो ॥८८॥
तों मद्य - पानें बहु धुंद दिल्लिर । पाहे पुढें बादल जोडुनी कर ॥
जायास सांगे स्वजनांस बाहिर । हा एकटा मात्र असो बरोबर ॥८९॥
बोले - “ प्रिया ! संगर - धीर बादला ! । दे सौख्य वृत्तांत कथून आपुला ॥
तो सांपडे काय तुझ्या करीं अरी ? । आलास तूं साधुन कार्य कीं पुरीं ? ” ॥९०॥
प्रत्युत्तरा कृत्रिम - बादलें दिलें । “ मोठ्या प्रयत्नें तव कार्य साधिले ॥
गेलों तिथे जाउन गुप्त बैसलों । चिंतेंत मी पाहत संधि राहिलों ॥९१॥
त्याच्या घरीं जाउन गांठिलें तया । झालों पुढें टाकुन मी भया दया ॥
खंजीर पोटीं खुपसून पाडिला । स्वर्गास वेगें यशवंत धाडिला ” ॥९२॥
ऐकून हें खान मदांध बोलतो । रंगांत येऊन खुशाल डोलतो ॥
“ कां आणिलें नाहिंस शत्रु चें शिर ? । झालें मला जें असतें सुखाकर ॥९३॥
स्वच्छंद मी त्यावर वा न नाचलों । नाहीं स्वलोकीं स्तुति - पात्र जाहलों ॥
मीं पाठवीलें असतें तया शिरा । भाल्यास टोंचून सुखें दिगंतरा ! ” ॥९४॥
हें ऐकुनी क्रोध मनांत नावरे । डोळे करी तो यशवंत बावरे ॥
मारी उडी सिंहासमान दिल्लिरा । पाडूनियां लावि कट्यार तो उरा ॥९५॥
दाबूनियां तोंड उरावरी बसे । दिल्लीर या वेळिं सुटूं पाहतसे ॥
पौरेश शस्त्रें दुसर्‍या क्षणीं करी । निर्जीव दिल्लीर बलाढ्य तो अरी ॥९६॥
बाहेर तेव्हां यशवंत धांवला । एका क्षणीं मित्रजनांत पावला ॥
बाहेर गोटांतुनि धांवती बळें । वाटे न वारा इतुक्या जवें पळे ॥९७॥
मारेकरी येउन आंत शीरले । मारून खानास पळून चालले ॥
वार्ता अशी सर्व जनास ठाउक । झाली क्षणें फारचि भीति - दायक ॥९८॥
‘ अल्लारहीम बिसमिल्ला ’ असा करिति गिल्ला समस्त यवन ।
मल्लां चढे स्फुरण हल्ला करूं म्हणति कल्लाच जाय उडुन ॥
सल्लालन - प्रमति - बल्लाळ - भूप - भल्लांस घालिति कर ।
सल्लाभ मानुनिच सल्ला विचारिति न मल्हार घे पथकर ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP