यशवंतराय महाकाव्य - सर्ग तिसरा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


यशवंतराय दोहनसिंगाच्या घरास जाण्याकरितां निघतो - मध्यरात्रीचे वर्णन - दोहनसिंगाचें भाषण - रजपूत लोक यशवंतरायास आपणांमध्यें मुख्य नेमितात - यशवंतरायाचें भाषण - बंडाची तयारी - आठ दिवसांत मोंगलांशी युद्ध सुरू करण्याची तयारी करण्यास यशवंतराय कोट्यांतील लोकांस हुकूम करितो.

श्लोक
मातृ - पाद यशवंत नमोनि घे । धीट दोहन - गृहास तदा निघे ॥
हो जयी कुशल - संयुत बाळका ! । ती वदे स्मर चराचर - पाळका ॥१॥
कृष्ण - वर्ण धरि वेष महाबळी । घे कट्यार तरवार सवें भली ॥
माय आर्जव करी बहु तो परी । घे न चाकर हि एक बरोबरी ॥२॥
सामसूम जिकडे तिकडे गमे । स्वच्छ पाहुन नभाप्रत तो रमे ॥
तारका चमकती नभ - मंडळीं । कांति राजप्थिं त्यांचि फांकली ॥३॥
पारिजात फुलले सुर - काननीं । हीं फुलें विलसती गमलें मनीं ॥
कीं हिरेजडित सुंदर सुंदरी । भूषणें विमल - कांति निशा धरी ॥४॥
शांतता त्रिभुवनास लाभली । प्राणिमात्र निजले निजस्थलीं ॥
पाहुनी कृपण काढि निर्भय । आपुला गगन रत्न - संचय ॥५॥
उंचसा गगन - मंडप थोर हा । बांधुनी रुचिर आवडिनें पहा ॥
रात्र पाजळुन दीपक तारका । वाट पाहि पतिची अति उत्सुका ॥६॥
दोन बाजुस उभे अचल - स्थिति । राक्षसांसम भयंकर दीसती ॥
राज - मार्ग - गत वस्तुंस पाहती । हर्म्य कान जणु देउन ऐकती ॥७॥
जें दिनीं गजबजाट करी महा । शांत या समयिं पूर्ण दिसे अहा ! ॥
अंधकार - जलधी पसरे वरी । कीं बुडे सकल सृष्टि तदंतरीं ॥८॥
श्वान कारण नसून हि भुंकती । भीरू मार्ग - गत लोक चपापती ॥
शब्द जो करितसे पद आपुलें । तो भयें श्रवुन अंग थरारलें ॥९॥
ज्यांस नाहिं घरदार असे जन । दीन अंध पडतात पथांतुन ॥
थंडिनें प्रखर विव्हळ जाहलीं । इंद्रियें, उदरिं भूक धडाडली ॥१०॥
व्यर्थ हारविति यौवन ही धन । जातसे वय झरून दिनोदिन ॥
तें गणून न मदांध सुखी जन । खेळतात गणिका - सदनांतुन ॥११॥
सारमंडळ सतार हि ताउस । वाजतात खुलतो पहिला रस ॥
गोड वार - युवती - गृहिं गायन । चाललें परिसतात पथीं जन ॥१२॥
यापरी बघत ऐकत चालला । दोहनालय बघे मग थांबला ॥
निश्चितार्थ करुनी मग एकदा । ठेवि आंत यशवंत पदा तदा ॥१३॥
स्वागता करिति पाहुन आगत । त्यास ते जय - रवें जन गर्जत ॥
“ ये सख्या ! पळविं आमुचि काळजी । वाट पाहत असों बसलों तुझी ” ॥१४॥
त्यांस दक्ष कमला - सुत पाहुन । विस्मयें स्मित करी मग आपण ॥
दिल्लिरें छळियलें अति यास्तव । सूड घेउं जमले नर - पुंगव ॥१५॥
द्वेष पूर्व विसरून मनांतले । एक देश - रिपु - वारणिं जाहले ॥
निश्चया धरिति संकट ये जरी । घोर, सोडिल कुणी न कुणा तरी ॥१६॥
पूर्वजीं श्रम करून मिळीविली । वंशजांसहि अबाधित चालली ॥
खान घे वतनवाडि हिरावुनी । कोप यास्तव किती धरिती मनीं ॥१७॥
भोगिले अमित भोग परोपरी । संपदा विपुल ती असतां घरीं ॥
घान घे लुटुन दीन करी जयां । येति तेथ किति रोष चढे तयां ॥१८॥
हिंदु आणि यवनांत सुदुस्तर । जाहला कलह थोर भयंकर ॥
पक्षपात करि त्यांत हि दिल्लिर । द्वेष यास्तव कितींस अनावर ॥१९॥
आप्त इष्ट जन बाटवुनी मदें । तत्कुलां सतत खान अकीर्ति दे ॥
दुःख रात्र्दिन अंतरिं जाचतें । सांगण्यास जमले किति जाच ते ॥२०॥
घेतल्या हरून रूपवती सुना । कन्यकाहि कितिंच्या अणि अंगना ॥
तत्पती श्वशुर बाप तिथें तसे । येति कीं दुखविले जणु सर्पसे ॥२१॥
धीर - मानस उदार दयाकुल । संपदा अतुल थोर जया बल ॥
देश मुक्त करूं इच्छिति जे भले । दोहनालयिं किती जण पातले ॥२२॥
जाहलीं विपुल ज्यांप्रत कारणें । यावयास, सकलां रिपु वारणें ॥
त्या जनास कमला - प्रिय - नंदन । बोलतो करूनियां मग वंदन ॥२३॥
“ पाहतों सुदिन आज विलोचनीं । थ्रो हें सुख उचंबळतें मनीं ॥
एक होउन करूं कट हा जरी । सत्य देइल यशास तरी हरी ” ॥२४॥
भाषण - क्रम करी मग दोहन । मान्य नागरजनां मनमोहन ॥
“ मी तुला वदतसें वच तत्वतां । मित्र - संमत सख्या कमला - सुता ॥२५॥
हें मनास गमलें अमुच्या तरी । साहसी समर धीर तुझ्या परी ॥
एकही क्षण बसेल न मागुती । धीर येइल पुढें धरूनी धृती ॥२६॥
न्याय - मार्ग चिर आपण आचरी । काळजी करून रक्षि परोपरी ॥
जो प्रजा - जन - हितास्तव भागला । लोक - नाथ म्हणती बुध त्याजला ॥२७॥
त्याविरुद्ध जरि आचरिते प्रजा । आपदा वरिल ती प्रभु - कोप - जा ॥
पुण्य - शील नृपतीस अशा जन । ताप देति तरि युक्तचि दंडन ॥२८॥
मान्य होय जरि तत्पर रक्षणीं । दिल्लिनाथ तरि तो अमुचा धनी ॥
मार्ग तो त्यजुनियां छळणा करी । बंधन त्यजुन आम्हि सरूं दुरी ॥२९॥
क्रूर हा विसरला नय दिल्लिर । त्रास यास्तव पुरास अनावर ॥
आजपासुन तया अरि मानितों । कृत्य हें सकल - संमत जाणतों ॥३०॥
थोर जाणुन तुझ्या सकला कृती । सर्व लोक तुज नायक नेमिती ॥
तूं कुशाग्रमति शूर गुणी भला । नांव योग्य यशवंत असो तुला ” ॥३१॥
यावरी वदतसे कमला - सुत । लोक होउन समुत्सुक ऐकत ॥
व्यक्त विस्तृत रसाळ सरस्वती । धन्य होय वदनांतुन वाहती ॥३२॥
“ देश - बांधव तुम्ही सगळे मम । देश - मुक्तिकरितां करितां श्रम ॥
हेंच पुण्यकर युक्त तुम्हां असे । यास पूर्ण मम संमति येतसे ॥३३॥
ज्ञान होय इतिहास - निरीक्षणें । पूर्विचीं भरत - भूमिमधें धनें ॥
याच दुष्ट यवनीं हरिलीं वृकीं । एक देशहि न ठेवियला सुखी ॥३४॥
आपुले प्रबळ वैरि पठाण जे । लांडग्यांचिच जयां उपमा सजे ॥
कां जुलूम करिते विविधापरी ? । साहतों प्रथम तो न भयें जरी ॥३५॥
कां आम्हांस अपमान दरिद्रता । क्लेशदुःख अपकीर्तिहि दीनता ॥
मूळ मालक असून जमीनिचे । कां न रक्षण करूं शकलों तिचें ? ॥३६॥
आळशी बसुन शांत गृहांतरीं । झोंप ही धरिली आज दिनावरी ॥
मान आपण च शत्रु करीं दिली । युक्ति एक सुटण्यास न पाहिली ॥३७॥
थोर सुंदर गृहें सुख - वाहनें । वैभवीं डुलत संतत राहणें ॥
भोगितो सकळ दिल्लिर कां असें ? । मान थोरपण कोठून या असे ? ॥३८॥
दिल्लिरेंकपट दुस्तर दाविलें । पाशि या दृढतरीं जन गोंविलें ॥
भासली न परतंत्रपणा बिडी । दे अतां परम कष्ट घडोघडी ॥३९॥
वाटतें परि सुदैवच हें मला । शत्रु कोण तुमचा झणि जाणिला ॥
तन्निवारण - पथाप्रत लागलां । योग्य शूरसम संकटिं वागलां ॥४०॥
लाभ यांत भलताहि न योजिला । कार्य हें परि पवित्र गमे मला ॥
आसनीं शयनि भोजनि तत्वतां । देश - मूमि - हित होइन चिंतिता ॥४१॥
एक होउन उठूं न बसूं क्षण । मारूनी अरि करूं पुर - रक्षण ॥
पूर्वजीं कृत पराक्रम आठवूं । दिल्लिला परत दिल्लिर पाठवूं ॥४२॥
संकटांतरिं सुखांत रणामधीं । द्याल सोडुन मला न तुम्ही कधीं ॥
खातरी करून द्या मजला धरा । जान्हवी - जळ करें शपथा करा ” ॥४३॥
या श्रवून यशवंत - वचा तिथें । इच्छिते गमन संमत सत्पथें ॥
तत्क्षणींच करिती शपथा करें । घेउनी जल सुपावन जें खरें ॥४४॥
“ रक्त - बिंदुहि तनूंत उरेल या । जाउं जोंवरि अम्ही न पुरे लया ॥
तोंवरी तुजसवें करूं राहणें । अर्पिली तनु धनें अणखी मनें ” ॥४५॥
यावरी पुसतसे कमला - सुत । दोहनास हत - शत्रु - यशाप्रत ॥
साधनें किति करूं शकतां जर । प्राप्त होय यवनांसह संगर ॥४६॥
तो बोले “ भट पंचवीस शत जे पायीं रणा चालते ।
तैसे आठ सहस्र शिक्षित हयी कोणा भया नेणते ॥
आणूं आज घडे जरी रण तयां दुष्टांसवें तुंबळ ।
आम्हीं दुर्मद दिल्लिरास अमुचें युद्धांत दावूं बळ ॥४७॥
हा कोटापुरिं बेत सात महिन्यांपूर्वींच झाला सुरू ।
मी माझे प्रियमित्र पूर्ण झटलों साहित्य - सिद्धी करूं ॥
‘ सेना द्रव्य अवश्य होय तितुकें मी तें तुम्हां देइन ’ ।
ऐसें जोधपुराधिपें हि दिधलें आम्हांस आश्वासन ॥४८॥
शेजारचे ही रजपूत राजे । कीर्ती जयांची भुवनीं विराजे ॥
देतील धांवून अम्हांस साह्य । आलें जरी संकट दुर्निवार्य ॥४९॥
भाट, जोशि, हरिदास, पुराणिक, । धर्मशास्त्र कथणार, सुमांत्रिक ॥
धर्म - युद्ध करण्यास्तव पावन । जाउनी उठवितील जवें जन ॥५०॥
आहे पहाडीं अजमीर दुर्ग । नेऊं तिथें स्त्रीजन आप्त - वर्ग ॥
दुर्गाधिकारी मम मित्र राहे । तो या कटाला अनुकूळ आहे ” ॥५१॥
बोले तयास यशवंत सुधी उदार ।
जो दूरसा करितसे हृदयीं विचार ॥
हा खान दिल्लिर भपाकुल जाहलाहे ।
राहे म्हणून सुख - जेय गमे मला हें ॥५२॥
साह्यास यास जरि येइल राजसेना ।
जिंकावयामग उपाय तया दिसेना ॥
येईल लौकर तसा म्हणुनीच आणूं ।
युद्ध - प्रसंग पुर घेउं अरींस हाणूं ॥५३॥
सवे सैन्य घेऊन जाऊं रणांत । व्यवस्था अशी आठ व्हावी दिनांत ॥
म्हणोनी तयासी कराया निघावें । तुम्हीं सर्व ही आपुल्या स्थानिं जावें ॥५४॥
परिसुन वच त्याचें जाहला हर्ष फार ।
अरिस म्हणति शस्त्रें दाखवूं एकवार ॥
कितिक दिन असा हा इच्छिताहों प्रसंग ।
चिरतर सुख पावूं खेळुनी रक्त - रंग ॥५५॥
दंग्यापासुन खान दीन अपुलें लागे करूं रक्षण ।
पश्चात्ताप तया भयातुर मन स्थानी वसे न क्षण ॥
तन्नाशा वळले मनीं खवळले क्रोधानळें पेटले ।
ऐसे पौर पराक्रमी निज - गृहां जाया पथीं पातले ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP