शाहीर हैबती - चारचंद्र

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


चारचंद्र
( चढ )
तुम्ही कवि सुज्ञान आतां कळेल प्रसंगीं ज्ञान ॥ध्रु०॥
सर्व शास्त्र जाणता थोरले कविराज ब्रिदवाले ।
मुखोत्तरें ऐकाया पंडित बैसलेत भवताले ।
ऐकत होतों नांव फार फार दिसानें दर्शन झालें ।
अर्थ आठवला सहज मजला । तोच पुसतो
तुजला मति आहे अज्ञान ॥१॥
एक अचंबा असा दिसाचे चंद्र पाहिले चार ।
चारी चंद्र सारखे सारखा नामाचा उच्चार ।
चार चंद्र कोणते तयाचा करा मनीं विचार ।
आहे सत्य नव्हे असत्य । वाल्मिक मुनिचे
कृत्य कथिलें भविष्य स्वतःनं ॥२॥
आणिक एक वितरीत अयोध्या नाथ जवळ असतांना ।
सीता सति पतिव्रता ह्रदयी धरिती लंकेचा राणा ।
दिसते विपरीत कसा तो अर्य मनासी आणा ।
शोध पहावा ठिकाण लावा । प्रत्यय तो यावा ।
वाहवा म्हणतील गुणी सुज्ञान ॥३॥
कोण संवत्सर मास कोणता कोण वार तिथि बोला ।
शास्त्र युक्तिचें उत्तर बोलुन कवि मतामधें डोला ।
सुचेना शब्द तरी मग आहे अब्रुला धोका ।
बराच कविला अर्थ सेविला । नाथ हैबती
कविला प्रसन्न देता मति वरदाना ॥४॥

१३
चार चंद्र
( उत्तर )
चारी चंद्र सारखे देखिलें एक दिशीं नयनीं ।
जरी म्हणाल विपरित तरी परीसा अन्वय श्रवणीं ॥ध्रु०॥
लंकापति रावण वधिला पाहा श्रीरामानीं ।
ही रामायणी कथा असें कथिला वाल्मिकानीं ।
सीता सह निर्जर बंदीचे सोडवले त्यांनीं ।
ब्रह्मा शिव आदि करून सुवेळा स्थानीं ।
दिव्य सीतेने घ्यावें ऐसे सर्वांचे वदनी ॥१॥
चेतवून महा अग्नी टाकिली उडी कुंडामाजी ।
निघे अग्निंतुन तेव्हां पडली आप शब्दांची मांजी ।
इंद्र चंद्र साक्षीस कोटी तेहतीस त्या समाजीं ।
धन्य धन्य ते सीता माय म्हणती सर्व नामाजी ।
चार चंद्र त्या वेळीं जमले असें ग्रंथ कथनीं ॥२॥
रामचंद्र तो एक, सीता मुखचंद्र दुजा जाण ।
शिव मस्तकीं तिजा, अत्रीनंदन चवथा जाण ।
सीता हृदयीं धरा रवण तेव्हां कैसे जाण ।
विपरीतच अर्थ दिसतो परी तिथेंच संधान ।
आंचळ नाम जो पदर तोचि रावण पहा मननीं ॥३॥
लज्जित होऊनी सीता सावरून पदर हृदयीं धरला ।
तेहतीस कोटी सुरांसहित संशय साग हरला ।
जयजयकारें गर्जता आनंद ब्रह्मांडी भरला ।
रामराम अती मधुरध्वना हा नादची एक सरला ।
कविराज हैबती मती देतसे नाथ कवनीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP