मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
वृषोत्सर्ग

वृषोत्सर्ग

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


वृषोत्सर्ग घरीं करूं नये. गोठ्यांत किंवा इतर ठिकाणीं करावा.
कर्त्यानें आचमन व प्राणायाम करून देशकालाचा उच्चार केल्यावर अपसव्य करावें व प्रेताचें प्रेतत्व जाऊन उत्तम लोक प्राप्त होण्यासाठीं वृषोत्सर्ग करतों ’ असा संकल्प करावा. नंतर यथाविधि स्थंडिल करून त्यावर अध्वर नांवाचा अग्नि स्थापन करावा. व रुद्र, सोम व इंद्र यांत भात, खीर व सातूंचे पिठाच्या आहुति - “ अत्यंत प्रज्ञाशील, अतिशय उदार, अतिशय बलवान् व हृदयास अत्यंत आनंद देणारा, असा जो रुद्र त्याचे प्रीत्यर्थ स्तोत्र, आह्मीं केव्हां म्हणावें बरें ? ” (ऋ. १-३-२५) या मंत्रानें रुद्रास,
“ जो ह्यास ( सोमास ) हविर्भाग देतो, त्यास सोम धेनूंचा लाभ घडवितो, चपळ अश्व देतो, आणि स्वकर्माविषयीं दक्ष, घरादाराची काळजी घेणारा, यज्ञकर्म चुकूं न देणारा, समाजांत प्रतिष्ठितपणें वागणारा, आपल्या पित्याची कीर्ति वाढविणारा व शूर असा पुत्र देतो ” ( ऋ. १-५-२२). या मंत्रानें सोमास, व “ सर्व लोकांपासून तुमच्यासाठीं आम्ही इंद्राला बोलावितों. तो इंद्र केवळ आमचाच पक्षपाती असो. ” ( ऋ. १-१-१४).
या मंत्रानें इंद्रास; याप्रमाणें तीन आहुती द्याव्या. नंतर स्विष्टकृत् आहुति द्यावी. नंतर जिचीं वासरें जिवंत आहेत अशा गाईचा एक किंवा दोन वर्षांचा खोंड ( शक्य असेल तर निळ्या रंगाचा ) आणून त्याबरोबर चार, दोन, किंवा एक कालवड ( वासरी ) एक वर्षावरील वयाची, आणून तिचेसह त्या खोंडावर “ हे उदकांनों, तुम्हीं सुख देणारीं आहां; तुम्ही आम्हांला अन्न, व उत्तम आणि आल्हादकारक ज्ञान द्या. ”
“ जशी आई पुत्राचें कल्याण इच्छिते त्याप्रमाणें तुम्हीं, तुमचा जो अत्यंत सुखदायक रस आहे त्याचे भोक्ते आम्हांस करा. ”
“ आमचें पाप नाहीसें करून तुम्ही आम्हांला संतुष्ट करितां, यासाठी आम्ही तुमच्याकडे सत्वर येतों. हे उदकांनों तुम्ही आमची वंशवृद्धि करा. ( ऋ. ७-६-५).
“ पूजा करण्यास योग्य, व नित्य वृद्धि पावणारा असा हा आमचा मित्र जो इंद्र, तो कोणत्या तर्पणानें व कोणत्या ज्ञानयुक्त कृत्यानें आम्हाला अनुकूल होईल ? ”
“ सत्य, पूजनीय व आल्हादकारक असा सोमाचा कोणता बरें रस, माझ्या शत्रूचे शक्तिमान धनाचा नाश करण्याचें सामर्थ्य तुला देईल ? ”
“ हे इंद्रा, आम्ही तुझे मित्र, व स्तवन करणारे आहोंत. यासाठीं तूं शेकडों प्रकारांनीं आमचें रक्षण करून कृपा कर. ”
या मंत्रांनी अभिषेक करावा. व कालवडीसह त्यास वस्त्र, गंध, अक्षता इत्यादिकांनी अलंकृत करून नमस्कार करावा. व “ हे इंद्रा, आमच्यासारख्या लोकांत आम्हांला बैलासारखे बलवान् कर, व आमच्या कुळांतील जे आम्हांला विरोधी आहेत, अशांचा पराभव करण्याला व इतर शत्रूंचा नाश करण्याला आम्हांस सामर्थ्य दे. आणि आम्हांस पुष्कळ खिल्लारांचे श्रीमंत स्वामी कर. ”
“ मला कधींही इजा झाली नाहीं व मला कधीं कोणीं घायाळ केलें नाहीं. इंद्राप्रमाणें मी शत्रूंचा नाश केला आहे. माझे सर्व शत्रु माझ्या पायाखालीं तुडविले जावोत. ”
“ हे शत्रूंनो, दोरीनें धनुष्याची दोन्ही अग्रें जशी बांधतात, त्याप्रमाणें मी तुम्हांस येथेंच बांधून टाकतों. हे वाचस्पते, ह्या शत्रूंचा निषेध कर, जेणेंकरून ते माझ्याशीं नम्रतेनें बोलतील. ”
“ हे शत्रूंनों, कोणतेही काम करावयास समर्थ अशा तेजासह मी तुमचा पराभव करण्यास आलों आहें. मी तुमचें चित्त, व्रत व ऐक्य यांचें हरण करतों. ”
“ हे शत्रूंनों, तुमच्या योगक्षेमाचें हरण करून मी श्रेष्ठ होतों व तुमच्या मस्तकावर पाय देतों; मग तुम्हीं पावसाचे पाण्यांतील बेडकाप्रमाणें ओरडत रहा. ” ( ऋ. ८-८-२४).
या पांच ऋचांनीं हात जोडून जप करावा. नंतर त्या खोंडास कालवडीसह प्रदक्षिणा करून अग्नीसमीप आणावें. आणि त्या खोंडाचे पुढील उजवे पायाचे मुळांत ( फर्‍यावर ) भस्मानें त्रिशूलाकार, व डावीकडील पुढील पायावर चक्राकार मुद्रा काढून त्यावर तापवलेल्या लोखंडानें डागावें. नंतर त्यास सोडून
“ हे गाईनों, हा तरुण वृषभ मी तुम्हांस देतों, त्या प्रिय वृषभाबरोबर क्रीडा करून तुम्ही सुखानें फिरा. जन्मापासून आनंदी अशा तुम्हीं आम्हांला इजा करूं नका. अन्न, व धनसंपत्ति यांसह आम्हांस आनंद प्राप्त होवो. ” ( तै. सं. ३-३-९)
“ तुला पृथिवी शान्ति देवो, अन्तरिक्ष तुझें कल्याण करो, व दीप्तिमानू आकाश तुला अभय देवो. दिशा व उप - दिशा तुला मंगलकारक असोत, व तेजस्वी जलें चोहोंकडून तुझें रक्षण करोत. ” ( पा. गृ. सू. ३-३-६, आश्व गृ. प. १-३-१८)
हें मंत्र म्हणून त्यास “ वाटेल तिकडे जा ” असें म्हणावें. नंतर खोंडास कालवडीसह पूर्वाभिमुख उभें करून,
“ अत्यंत प्रज्ञाशील, अतिशय उदार, अतिशय बलवान्, व हृदयास अत्यंत आनंद देणारा, असा जो रुद्र त्याचेप्रीत्यर्थ स्तोत्र आम्हीं केव्हां म्हणावें बरें ? ”
“ जेणेंकरून अदिति ( भूमि ) आमच्या लोकांवर, मुलांवर, व गुराम्वर रुद्राची कृपा करवील. ”
“ आणि जेणेंकरून मित्र, वरुण, रुद्र व सर्व देव आमच्यावर सारखें प्रेम करून आमची ओळख ठेवितील. ”
“ स्तोत्रांचा व यज्ञांचा स्वामी, व जलौषधींचा प्रभु असा जो रुद्र त्याचे जवळ स्वकल्याणेच्छु भक्त जें धन मागतो, त्याच धनाची आम्ही याचना करितों. ”
“ हा रुद्र, देवांचें श्रेष्ठ वैभव असून, यचें तेज देदीप्यमान् सूर्याप्रमाणें व कांति सुवर्णाप्रमाणें आहे; तो आमचें कल्याण करो. ”
“ तसेंच हा आमचा मेंढा, मेंढी, पुरुष, स्त्रिया, गाई आणि गुरें या सर्वांचें कल्याण करो. ”
“ हे सोमा, शंकर माणसाला पुरेल इतकी संपत्ति व पौष्टिक असें पुष्कळसें अन्न आम्हाला दे. ”
“ सोमास त्रास देणारे अथवा आमच्याशी शत्रुत्व करणारे लोक आम्हांस उपद्रव न करोत. हे इंद्रा, आम्हांस अन्न दे. ”
“ हे सोमा, तूं अमर आहेस. तूं उत्तम स्थानीं राहतोस. तुझी प्रजा यज्ञशालेमध्यें तुला अलंकृत करीत असतां तूं त्यांचा मुख्य होत्साता त्यांस पाहतोस. यासाठी तूं त्यांच्यावर कृपा कर. ” ( ऋ. १-३-२६)
हे नऊ मंत्र म्हणावे. नंतर वृषास दक्षिणाभिमुख उभा करून
“ जो प्रत्यक्ष पराक्रमच आहे, जो जटाभारानें मंडित आहे, व ज्याचा आश्रय अखिल वीर करीत असतात, अशा रुद्रदेवास आम्हीं ह्या स्तुति अर्पण करीत आहोंत. ह्या योगानें आमच्या सर्व द्विपाद व चतुष्पाद प्राण्यांचें कल्याण होईल. व ह्या गांवांतील सर्व जन अभिवृद्दि पावून त्रासांतून मुक्त होतील. ”
“ हे रुद्रा, आम्हांस सौख्य दे, व आम्हांस आनंद होईल असें कर. ज्या तुझा सर्व शूर पुरुष आश्रय करितात, त्या तुला वन्दन करून आम्ही तुझी सेवा करूं. तुझा आश्रय करणार्‍या भक्तांस प्राप्त होण्यास योग्य जशा ज्या कल्याणाची इच्छा केली तें, हे रुएद्रा, तुझ्यामुळेंच आम्हांस प्राप्त होईल. ”
“ हे उदार रुद्रा, ज्याचा आश्रय सर्व वीर पुरुष शोधतात, अशा तुझ्या कृपेचा लाभ आम्हांस देवांची उपासना केल्यामुळेंच प्राप्त होईल. आमच्या माणसांकरितां उत्तम उत्तम वैभवें तूं घेऊन ये. आमचे शूर लोक सुखी राहतील व आम्ही तुला हविर्भाव अर्पण करूं. ”
“ त्वेषयुक्त, यज्ञ सिद्धीस नेणारा, वक्रगतीनें मंडित व प्रज्ञाशील अशा रुद्रास आम्ही आमचे रक्षणाकरितां बोलावतों. तो आम्हांवरील देवाचा कोप दूर घालवो. त्याच्या कृपेचीच आम्ही इच्छा करीत आहोंत ”
“ दैदीप्यमान्, जटाधारी व त्वेषयुक्त रूप धारण करणार्‍या अशा त्या स्वर्गलोकांतील वराहास वंदन करून आम्ही बोलावीत आहोंत. तो वृद्धिंगत होणारीं औषधें हातांत धारण करून आम्हांस सौख्य, अभय व सुरक्षितपणा देवो. ” ( ऋ. १-८-५).
“ अतिशय मधुर असें हें स्तोत्र आम्हीं तेजस्वी मरुतांचा पिता जो रुद्र त्याकरितां गातों. म्हणून हे अमर देवा, तूं आम्हां मानवांस भोग्य अशा पोषणाच्या वस्तू दे व आमच्या मुलांबाळांस सौख्य दे. ”
“ हे रुद्रा, आमच्यांतील जे थोर असतील, अथवा लहान बालक असतील, अथवा मोठे झाले असतील, त्यांपैकीं कोणासही इजा पोचूं देऊं नकोस. आमचे मातापितरांस मारूं नकोस; तसेंच आम्हांस प्रिय जी आमची शरीरें त्यांनांही इजा पोंचूं देऊं नकोस. ”
“ आमच्या मुलांबाळांस, नोकरांस, गाईंस, आणि घोड्यांस इजा पोंचूं देऊं नकोस. हे रुद्रा, तूं रागावून आमच्या शूर पुरुषांस मारू नकोस. आम्ही हवि अर्पण करून सदैव तुझें पूजन करीत असतों. ”
“ ज्याप्रमाणें गुराखी गुरें एकत्र करितो, त्याप्रमाणें मी तुझ्या सन्मानार्थ अनेक स्तोत्रें एकत्र करीत आहें. आहे मरुतांच्या पित्या, तूं आम्हांस उत्कृष्ट वैभव दे; तुझी कृपा सुखदायक व मंगलप्रद आहे. मी तुझ्या केवळ कृपाप्रसादाचीच याचना करितों. ”
“ धेनु व पुरुष यांचा वध करणारें शत्र दूर राहो; वीर पुरुषांनां आश्रयभूत असणारे देवा, तुझ्याजवळील उत्कृष्ट वैभव मात्र आम्हांकरतां असो. हे देवा, तूं आम्हांस सौख्य दे; व आमचा कैवार घेऊन बोल. आणि तूं अतिबलवान् असल्यामुळें आम्हांस सुरक्षितपणा दे. ”
“ आम्ही आमचे रक्षणाची इच्छा बाळगून हें नमस्कृतिपूर्ण स्तोत्र गाइलें आहे, म्हणून तो रुद्र, मरुतांसहवर्तमान आमची हाक ऐको. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र, वरुण, त्याप्रमाणेंच अदिति, सिन्धु पृथिवी आणि द्युलोक हेही अनुमोदन देवोत. ”
हे मंत्र म्हणावेत. नंतर पश्चिमेस वृषाचें तोंड करून “ हे मरुतांच्या पित्या, तुझा आनंदमय प्रसाद आमच्याकडे येऊं दे सूर्याच्या दर्शनाचा आणि आमचा वियोग तूं करूं नको. जे अत्यंत नीच आहेत त्यांच्यांशीं वागतांनां आमचा शूर पुत्र धिमेपणानें वागो. आणि आमच्या प्रजेसहवर्तमान आमची अभिवृद्धि होवो. ”
“ हे रुद्रा, तूं कृपाळू होऊन आम्हांस जीं सुखकारक औषधें दिलींस त्यांच्यायोगानें आम्ही शंभर वर्षे आयुष्याचा उपभोग घेऊं असें कर. तूं आमच्यातील द्वेषबुद्धि अगदी नाहींशी कर, पातकें विलयास ने आणि सर्वसंचारा रोगांचें उच्चाटण कर. ”
“ हे रुद्रा, उत्पन्न झालेल्या सर्वांमध्यें तूंच आपल्या प्रतापाच्या वैभवानें श्रेष्ठ आहेस. तुझे बाहु वज्राप्रमाणें सुदृढ आहेत, तेव्हां बलवान् पुरुषांतही तूंच बलिष्ठ आहेस. यासाठीं आम्हांस सर्व संकटांतून पार पाड आणि पातकी दुष्टांकडुन जे जे हल्ले येतील, ते ते तूं त्यांशी युद्ध करून दूर कर. ”
“ हे रुद्रा, आम्हीं तुला कसा तरी प्रणिपात केला म्हणून तूं रागावूं नको. हे वृषभदेवा, तुझें स्तवन बरोबर केलें नाहीं म्हणून, किंवा भलत्याच बरोबर तुला हांक मारली म्हणून, तूं आमचेवर रागावूं नको. औषधीच्या योगानें तूं आमच्या वीरांना बरें कर. कारण वैद्यांचाही तूं वैद्य आहेस, अशी तुझी कीर्ति मी ऐकत आहे. ”
“ स्तोत्र म्हणून व हवि अर्पण करून ज्याची करुणा भाकीत असतात, तो रुद्र या स्तवनांनीं मला प्रसन्न करून घेतां येवो. अन्तःकरण अतिशय कोमल असून भक्तांच्या हांकेकडे त्याचें लक्ष त्वरित वेधतें. तो गौरवर्ण, व प्रकाशमय किरीट धारण करणारा रुद्र, मला या दुर्वासनेच्या आधीन खचित होऊं देणार नाही. ”
“ मी त्याची प्रार्थना केली, तेव्हां सर्व मनोरथ पूर्ण करणारा मरुतांचा पिता जो रुद्र, त्यानें ऐन उमेदांचें तारुण्य दिल्यानें मला पराकाष्ठेचा आनंद झाला आहे. परंतु ऊन रखरखीत पडलें असतां त्याठिकाणीं शीतल छायेचें सुख मिळावें त्याप्रमाणें, मीं पापमुक्त होऊन तुझें आनंदपद मिळवीन व त्याचा उपभोग घेईन असें कर. ”
“ हे रुद्रा, तो तुझा औषधियुक्त हस्त कोठें आहे ? कांही अदृष्ट कारणांनीं जे जे दोष आमच्या ठिकाणी जडले आहेत, ते ते दोष तुझा हातच नाहीसे करील; तर हे वृषभदेवा, तूं आम्हाला क्षमा कर. ”
“ वीरश्रेष्ठ आनि गौरवर्ण अशा रुद्राला उत्तमांत उत्तम अशी सर्वोत्कृष्ट स्तुति मी अर्पण करतों. उज्ज्वल व कांतिमान् रुद्राचे नमस्कारपूर्वक स्तवन करून त्याच्या जाज्वल्य प्रतापाची महतीही आम्ही गात आहों. ”
“ नानारूपें धारण करणारा, उग्र व जगाचा आधार अशा रुद्राच्या शरीराची काठी मजबूत असून त्या आपल्या शुभ्र, तेजस्वी, सुवर्णवर्ण स्वरूपानें तो फार शोभिवंत दिसतो. प्रभु व सर्व भुवनांची समृद्धि अशा या रुद्रापासून त्याचें ईश्वरी सामर्थ्य दूर झालें, असें कधीच होत नाही. ”
“ हे रुद्रा, तूं हातांत धनुष्यबाण घेतले आहेस ते तुला शोभतात. तर्‍हेतर्‍हेचे शुभ्र व पवित्र पुष्पहार तूं घातलेले आहेस तेही तुलाच शोभतात. विश्व एवढें अवाढव्य व भयंकर आहे, परंतु त्यावर तूं दया करतोस ही तुझीच थोरवी आहे. हे रुद्रा, तेजस्वीपणांत तुझ्यापेक्षां वरचढ कोणीच आढळणार नाहीं. ” ( ऋ. १-८-१७).
“ विख्यत, सिंहासनाधिष्ठित, तारुण्ययुक्त, सिंहाप्रमाणें भयंकर व उग्र आणि दुष्टांचा निःपात करणारा जो रुद्र, त्याचें स्तवन कर. हे रुद्रा, भक्त तुझी स्तुति करीत आहेत. त्यांजवर तूं कृपा कर, आणि आमच्याहून निराळे ( अर्थात् दुष्ट ) आहेत, त्यांच्यावर तुझे बाण जाऊन ते त्यांचा निःपात करोत. ”
“ आपल्या वंद्य पित्याला जसा पुत्र नमस्कार करितो तसा, हे रुद्रा, तुला, तूं जवळ येत आहेस असें पाहिल्याबरोबर मी नमस्कार केला. सर्व समृद्धीचा दाता आणि सर्व सज्जनांचा प्रभु अशा ह्या रुद्राचे स्तवन करणें माझें कर्तव्य आहे, तर आमच्या स्तुतींचा स्वीकार करून आपली दिव्यौषधें आम्हांस दे. ”
“ हे मरुतांनों, तुमचीं जीं औषधें पवित्र, मंगलकारक, व कल्याणप्रद आहेत, ती आम्हा मानवांचा पिता जो मनु राजा त्यानें तुम्हांपासून संपादन केलीं. त्याच दिव्यौषधींची याचना आम्ही सर्वांच्या सुखासाठी व कल्याणासाठी रुद्रापाशीं करीत आहों. ”
“ रुद्राची अस्त्रें आम्हांला वगळून दुसरीकडे जावोत. त्यांचा दुर्धर व भयंकर आवेशसुद्धां इतरांकडे ( दुष्टांकडे ) वळो. दानशूर यजमानाच्या कल्याणाकरितां तूं आपल्या अक्षय धनुष्याची दोरी अंमळ सैल कर; आणि अभीष्ट सिद्धीच वर्षाव करणार्‍या देवा, आमच्या पुत्रपौत्रांवर दया कर. ”
“ हे जगद्धारक वीरश्रेष्ठ, सर्वज्ञ देवा, तूं आमच्यावर रागावणार नाहींस व आम्हांस मारणार नाहीस असें आश्वासन दे. आमचा धावा तुझे कानी ताबडतोब पडावा, अशाकरितां, हे रुद्रा, तूं आमचा हो. आणि आम्ही आमच्या वीरपुरुषांसहवर्तमान यज्ञसभेंत तुझा महिमा वर्णन करीत राहूं असें कर. ” ( ऋ. २-७-१८) हे पंधरा मंत्र म्हणावे. नंतर वृषास उत्तराभिमुख उभा करून -
“ ज्यांचें धनुष्य मजबूत आहे, व बाण वेगवान् आहेत, आणि जो अन्नाचा स्वामी आहे, तसेंच ज्याचा कोणींही पराभव केला नाही, परंतु ज्यानें शत्रूंचा पराभव केला आहे; ज्यनें सृष्टि निर्माण केली; ज्याचीं आयुधें तीक्ष्ण आहेत; अशा रुद्राची स्तुति करा. तो आमची स्तुति ऐको. ”
“ पृथिवीवरील व स्वर्गांतील लोकांवर ज्याचें साम्राज्य आहे, त्या तुझी आम्ही स्तुति करितों. यासाठीं तूं आमचें पालन कर, व आमच्या गह्री येऊन आमच्या मुलांबाळांस आरोग्य दे. ”
“ वायूंना शांत करणार्‍या हे देवा, आकाशांतून टाकलेलें तुझें तेजस्वी वज्र पृथिवीवर संचार करीत आहे. तें आम्हांस स्पर्श न करो. तुझ्या हजारों औषधी तूं आम्हांस दे, व आमच्या मुलांबाळांस इजा करूं नको. ”
“ हे रुद्रा, तूं आमचा वध करूं नको; व आमचा त्यागही करूं नको. तुझ्या क्रोधाच्या बंधनांत आम्ही कधीही सांपडू नये. प्राणिमात्र ज्याची प्रशंसा करितात, असा यज्ञ आमचे हातून होवो. तुम्ही सर्वदा आशीर्वादांनीं आमचें रक्षण करा. ” ( ऋ. ५-४-१३).
हे चार मंत्र म्हणावे. दरेक दिशेस म्हणण्याचे मंत्राचे शेवटी ‘ या कालवडींबरोबर, गवत खा, पाणी पी, व यथेच्छ विहार कर ’ असें म्हणावें. वृष सोडल्यावर यथाविधि परिस्तरण विसर्जनादि प्रायश्चिन्तान्त कर्म करून होमाची समाप्ति करावी. व रुद्र, सोम, आणि इंद्र यांचे उद्देशानें आमान्न व दक्षिणा द्यावी. तसेंच वृषोत्सर्गाच्या सांगतेसाठी वस्त्र तिल, कुंभ, गाय, दक्षिणा वगैरे यथाशक्ति दान करावें व वृषोत्सर्गसमाप्तीचें उदक सोडावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP