मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
६१ ते ७०

अभंग - ६१ ते ७०

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


६१
सर्वार्थि मज एक आपण विसावा । सच्चित्सुख आत्म वियोग नसावा ॥१॥
आत्म पदीं हेचि विनंति परिसावी । आत्म प्रेमें आत्म भक्ति मज असावी ॥२॥
मना लागों तूझें सगुण मुर्ति ध्यान । आत्म विवरण ऐको माझे कान ॥३॥
डोळां पाहेन सुंदर अवतार । मंद हसित मुख सुखकर फार ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा निज भेटी । जन्मजन्मांतरिचीं नुरविं दुःखें कोटी ॥५॥

६२
अनंत जन्मांतरिंचें पुण्य उदया आलें । आपुलें दर्शन मज झालें ॥१॥
सारी वृत्तीची तळमळ माझी गेली । हृदयिं निजात्म दर्शन स्फूर्ति उदेली ॥२॥
अवघा आनंद आनंद । आपण आनंद आनंद सुखकंद ॥३॥
ऐसा आत्म लाभ मातें । तुज विसरूं कसा रामातें ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तूंचि आठवसि येतां जातां ॥५॥

६३
तुज पहातां श्री रघुवीरा । चित्त वृत्ती झाल्या स्थिरा ॥१॥
नाही या परतें साधन । कळला आपण आनंदघन ॥२॥
माझें जीवींचें जीवन । नाहीं आन तुजवीण ॥३॥
हेतू पूर्ण केला माझा । आत्म दर्शनें रघुराजा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । भेटला तूं सिताकांता ॥५॥

६४
आणिक देव येति जाती । आपण हृदयस्थ सांगाती ॥१॥
तुज पाहतां सन्मुख । वृत्ती होती अंतर्मुख ॥२॥
नुरे संसारींचें दुःख । अधिकाधिक वाढे सुख ॥३॥
ऐसें कळलें माझ्या मना । तुज न सोडीं जगजीवना ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुज नेदी जाऊं आतां ॥५॥

६५
कळे त्या निज दर्शन सुख । वृत्ति ज्याची अंतर्मुख ॥१॥
कळलें आपण एकचि सार । मिथ्यामय हा दृश्य पसारा ॥२॥
तुज कथिला प्रत्यय माझा । अनंतघना राघव राजा ॥३॥
आत्म भजनाची आवडी । मोठी देह बुद्धी खोडी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । स्वसुखानुभवचि घोंटिन आतां ॥५॥

६६
कोणि काइ ह्मणो आतां । तुज मी न सोडीं सर्वथा ॥१॥
लोकांपाशीं माझें काय । सुखकर मज आत्म ठाय ॥२॥
नाहीं आणिकांची गोडी । अखंड आपुली मज आवडी ॥३॥
तुज पाहुनि प्रेमा दाटे । विश्व आपण मुखमय वाटे ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । मुखें वर्णिन निज गुण गाथा ॥५॥

६७
धन्य माझीं मातापिता । निज भेटीनें सिताकांता ॥१॥
धन्य माझी हे नर काया । आपण भेटला रामराया ॥२॥
धन्य माझे दोनीकर । तुज करिती नमस्कार ॥३॥
धन्य धन्य माझे डोळे । तुज निरखिति वेळों वेळे ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ । मुखें वर्णिन निजगुणगाथा ॥५॥

६८
ऐसा दर्शन सुख सोहळा । कैसा मिळता मज घननीळा ॥१॥
तुवां केला ऊपकार । दिला मनुष्याचा आकार ॥२॥
आत्मदर्शन साक्षात्कार । केला तुज माझा नमस्कार ॥३॥
गुण गाईन वारंवार । पुरवीं मज हेतू हा फार ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । उदया आला तूं हृदयस्था ॥५॥

६९
तुज सम ना त्रिजगीं कोणी । रामा पाहिलें धुंडोनी ॥१॥
ब्रह्मेद्रादी निज किंकर । गातो नाम तुझें शंकर ॥२॥
तो तूं सांपडला मज । आपण सुखरूप सहज ॥३॥
तुज ऐकत होतों कानीं । आजि पाहिला नयनीं ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । कृपा सिंधु तूं तत्वता ॥५॥

७०
माझी विनवणि तुह्मां संतां । मज भेटवा सीताकांता ॥१॥
मजविषयींच्या गोष्टी चार । सांगुनि पाठवा करा उपकार ॥२॥
घालुनी तुमची थोर भीड । त्यासी येउं न द्या माझी तीड ॥३॥
युक्ति प्रयुक्तिनें पाठवावा । दास तुमचा मी आठवावा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । आवडती भक्तकथा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP