मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्रीशितलादेवीचें पद

श्रीशितलादेवीचें पद

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


शीतला देवि तूं घाल शीतळ वारा ग्, तुजविण आह्मां कोण रक्षिल या संसारा ग् ॥धृ०॥
या रोगांतुनी संरक्षुनि दे पदिं थारा ग्, निज बाळकांला पाजिं शीतळ अमृतधारा ग् । शीतळेचा परिपूर्ण पुरवीं चारा ग्, त्रिजगीं नाहीं तुज ऐसी अन्य उदारा ग् ॥शी०॥१॥
स्कंदालागी शिव सांगे महिमा तूझा ग्, विस्फोटक हा तुज वांचुनि नरहरी दूजा ग् । कीं उदकामधीं निज मूर्ति चिंतुनि पूजा ग्, ह्मणउनि सांगे निज पूजन स्तवन नीरुजा ग् ॥शी०॥२॥
अगणित घडती अपराध तुझ्या पायीं ग्, सहस्र वदनीं वर्णवेल शेषा कायी ग् । या जगताची तूं केवल जनक आई ग्, कृपा कटाक्षें आह्मांसि निरंतर पाहीं ग् । या जगताची तूं केवल जनक आई ग्, कृपा कटाक्षें आह्मांसि निरंतर पाहीं ग् ॥शी०॥३॥
शीतला शीतला जे स्मरतिल तुज या नामीं ग्, त्यां ज्वर दग्धां करी शीतळ अंतर्यामीं ग् । आह्मां सवेकां दृढ धैर्य आपुलें स्वामी ग्, विवेकें पहातां सुखदात्री तूं पारिणामीं ग् ॥शी०॥४॥
निज सत्तेनें जगिं आश्चर्यें तूं खेळें ग्, बहु तकमकती ज्वर दाहें आपुलीं बाळें ग् । श्रमती पाहें विस्फोटक रोग उन्हाळें ग्, संभाळावीं या बाळां त्रिजगत्पाळे ग् ॥शी०॥५॥
बाई विस्फोट किति अंगीं या विस्तारीं ग्, संकट ऐसें कोण तुज विरहित निस्तारीं ग् । मिथ्या बंधातुनि लवकरीं मजला तारीं ग् । देवी शितले तुज विरहित निस्तारीं ग् ॥शी०॥६॥
पूर्ण ब्रह्म चैतन्य आपण ऐसी ग् जरि अवतरली तरि अद्वैता स्वरुपेंसी ग् । स्वस्वरुपाची कधीं विस्मृति नां तुज तैसी ग्, आत्म सुखातें निज भजकां हृदयीं देसी ग् ॥शी०॥७॥
ऐसें करिती निजध्यान सज्जन योगी ग्, नेणुनि तुज म्या लोभ धरिला विषय भोगीं ग् । त्या पापाचें फळ कीं विस्फोटक रोगीं ग्, अंतर्ब्राह्य तकमक झालों सर्वांगीं ग् ॥शी०॥८॥
प्रियकर ऐश्या रासभीं आरूढ व्हावें ग्, स्वामिणी शितळे सद्वैदिणी त्वां यावें ग् । निज मात्रेचें शीतळ औषध द्यावें ग्, अनाथ आह्मीं या संकट काळीं पावें ग् ॥शी०॥९॥
सर्वां हृदयीं तूं सूक्ष्मरूपें आहे ग्, तुज माजी हें जग उद्भवलें तूं पाहें ग् । दृश्य द्रष्टा दर्शन गिळुनीं राहें ग्, सहज स्थितिची करिं मजवरि पूर्ण कृपा ग् ॥शी०॥१०॥
वैष्णव सद्गुरु पदपंकज भ्रमरा लागीं ग्, भ्रांती न पडो या द्वैताची निजांगीं ग् कृष्ण जगन्नाथपणाची निरसुनि पांगी ग्, अद्वय भावें मज लीन करिं चिद्रांगीं ग् ॥शीतला देवी तूं घाल शीतळ वारा ग्॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP