मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री नागेशाचीं पदें

श्री नागेशाचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
शरण तुला मी नागेश महारुद्रा आत्मत्वें ॥श०॥धृ०॥
मरण जनन हर चरण दाउनि परमेश्वर शरण तुला । करुणा सिंधु वत्सला सत्य आठवति हृदयीं निज मंद हास्य मुद्रा पार्वति हितकर सर्वकाल शशि शेखर ॥श०॥१॥
नंदि वहान तुज वंदिन हा मज छंद अखंड मनाला । नुरविं अज्ञान निद्रा व्याघ्रांबरधर त्वद् ग्राह्य सुखीं मिळवि मला शिवशंकर ॥श०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथ मज मी पण सहित न आवडे । विषय वासना क्षुद्रा त्रिनयन पंचानन गिरिजावर जोडुनि विनवितसें कर ॥शरण तुला मी नागेश महारुद्रा आत्मत्वें॥३॥

पद २ रें -
श्री नागेश सदैव अखंडित आत्म स्वरुपिं मन लागों रे ॥धृ०॥
पुरे पुरे हा प्रपंच भोगुनि दमला रात्र दिवस जिव चिंतुनि विषयीं रे । स्वसेवका या सच्चित्सौख्य वराया कळविं पदोपदिं मागों रे ॥श्री०॥१॥
करुणा सिंधो कृपा कटाक्षें मजला पाहुनि ये हृदयीं साक्षी उदया रे । हरुनि अपायां दाखविं दिव्य पायां विनउनि हें तुज सांगों रे ॥श्री०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथाची आवडि पुरविसि आत्मत्वें करुनि दया रे । न जाऊं वाया क्षणभंगुर हे काया नवविध भजनीं लागों रे ॥श्री०॥३॥

पद ३ रें -
महारुद्र नागेश कृपाकर शिवशंकर माय बापारे ॥धृ०॥
मंद हसित मुख दाउनि नयनीं । सुख करुनि हरि त्रिविध तापारे ॥मं०॥१॥
स्मरणि लाउनि निज अलक्ष लक्षविं मज । काळ लागला आयुष्य मापारे ॥मं०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथाचें । नुरविं मीपण सह पापारे ॥मं०॥३॥

पद ४ थें -
नमन तुज नागेशा सदया ॥धृ०॥
सच्चित्सुख पद भेटउनि हरिसी । विस्मृति सहित भया ॥न०॥१॥
आत्म भजक संभाळिसि येउनि । भक्ति पथें उदया ॥न०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथाची । कळ कळ निज हृदया ॥नमन तुज नागेशा सदया॥३॥

पद ५ वें -
सदय हृदय नागेश प्रगटला भक्तजनास्तव साचा । सच्चित्सुख मय त्रिजगद्रूपें वाटे उदय जयाचा ॥स०॥धृ०॥
अनन्य भावें भजतां देतो सौख्य अखंड जनाला । पार्वति हितकर शिवहर शंकर लंपट निज भजनाला ॥स०॥१॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा बहु प्रेम अखंड शिवाचा । सदैव जे सद्भक्ति पथें या करुं उद्धार जिवाचा ॥स०॥२॥

पद ६ वें -
वंदिन पद श्री नागेशाचे ॥धृ०॥
नंदि वहान आनंद करि सदा, प्रेम देउनि भजनाचें ॥वं०॥१॥
मदन दहन सुख सदनचि केवळ, जीवन होय जिवाचें ॥वं०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा प्रिय, ध्यान सदैव शिवाचें ॥वंदन पद श्री नागेशाचे॥३॥

पद ७ वें -
नागेशाचे पायीं मन लागों ऐसें साधूं । मागेल तें देइल सर्व साक्षित्वें असाधू ॥धृ०॥
मागें पुढें रंक्षी ऐसा देव दुजा नाहीं । जागेन तद्रुपिं अलक्ष लक्षुनि ठायिं ठायीं ॥ना०॥१॥
राम विष्णू कृष्ण जगन्नथ शिव गातां । काम पूर्ण करी भक्तजनाचा नाम स्मरणें त्राता ॥ना०॥२॥

पद ८ वें -
तुजविण कोणा शरण मी जाऊं, गाऊं गुण कवणाचे, श्री नागेशा सदया वद मज ॥धृ०॥
मायबाप तूं काय पहासि, वय जाय प्रपंचीं हाय करुनि जरि, नायकसी तरि अपाय समज ॥तु०॥१॥
नागभूषणा दूषण कवणा लागत, शिव शिव मागत यास्तव, भागतसे किति नसुनि उमज ॥तु०॥२॥
मंद हसित मुख नंदी वहान अति, मंद बुद्धि परि छंद भजनिं, आनंद मला दाखविं पद निज ॥तु०॥३॥
हास्य रुचिर तव दास्य करिन, पंचास्य तूंचि कृष्णोपास्य या जनीं, भास्य भ्रमाचें परि हरि बिज ॥तु०॥४॥

पद ९ वें -
पहा सुखदाय श्री नागेश हा मना ॥धृ०॥
किति शिकवूं तुज उमज न घेतां । पंच विषय सेविसि निर्भय भुलुनियां जना ॥प०॥१॥
खूळपणें निज मूळ न सोडीं । खुळ तुला बहु जन्मीची उठवि कामना ॥प०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मजयाची । वृत्ति जडो आत्म पदाला म्हणुनि याचना ॥प०॥३॥

पद १० वें -
अघलेश नुरविं मत्क्लेश हरुनि निजदेश दाउनि नागेश तारिं ॥धृ०॥
दास्य करिन पंचास्य आवडे, हास्य वदन नयनासि भारिं ॥अ०॥१॥
वंदुनि त्वत्पद इंदु शंकरा, नंदुनि राहिन निरहंकारें ॥अं०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथ तुझा, संरक्षिसि गिरिजा विहारी ॥अं०॥३॥

पद ११ वें -
मंद मति मी बहु नंदि वहान प्रभु वंदि तुला नागेश कृपा करिं ॥धृ०॥
मदन दहन सुख सदन घडविं आंगें, पद दाउनियां मज प्रिय हृदयावरि ॥मं०॥१॥
बंध हरुनि स्वछंद करुनि, आनंद स्वरुपें फिरविं चराचरीं ॥मं०॥२॥
अद्वय सकल सृष्टि ऐसी देउनि आत्म दृष्टीं, वैष्णव कृष्ण जगन्नाथ मीपण हरीं ॥मं०॥३॥

पद १२ वें -
मंद हसित सुख सुंदर श्री नागेश दयानिधि पाहूं ॥धृ०॥
भय निरसिल अद्वय सुख देउनि वय हें सार्थकिं लाऊं । अलक्ष लक्षुनि अंतरसाक्षी तन्मय होउनि राहूं ॥मं०॥१॥
नंदि वहान आनंदित चित्तें वंदुनि वदनीं गाऊं । नाम स्मरणें काम पुरविं आराम अखंडित लाहूं ॥मं०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथाचें देह अहंपण जाऊं । जाणुनि ज्ञानाग्नीनें अंतरिं शिवहा रामचि पाहूं ॥मं०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP