मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १७५१ ते १८००

करुणासागर - पदे १७५१ ते १८००

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


आतां कुपुत्र आहें जरी । अपवित्रता अंगीं खरी ॥ तथापि आहें सहजाधिकारी । सद्गुरू तुझे दर्शनाचा ॥५१॥
सर्वज्ञ देवा तुझा आहें । समर्था तुझे वंदितों पाये । समदर्शीतें शरण आहें । सद्गुरूतें मी सत्य ॥५२॥
आतां जरी साधन नोहे । नाना कुकर्में माथां वाहे ॥ तथापि मातें अधिकार आहे । सहज तुझे दर्शनाचा ॥५३॥
जेवीं राजबाळ तें पांगुळें । अमंगळ अपवित्र जरी असलें ॥ तथापि राजअंकीं सहज लोळे । निःशंक निर्भय अनायासें ॥५४॥
तेवीं मी सर्व साधनहीन । अपवित्र आळसी गुणविहीन ॥ तथापि घालीन लोळण । प्रत्यक्ष अंकीं सद्गुरूचे ॥५५॥
जैसें राजबाळक जाण । सहज घेतें राजदर्शन ॥ तैसें दत्तात्रेयाचें प्रत्यक्ष दर्शन । अनायासें घेईन मी ॥५६॥
नित्य अपराध करितों । नित्य दोषच आचरतों ॥ तथापि देवा पाहतों । वाट तुझी सर्वज्ञा ॥५७॥
राजबाळ खोड्या करी । केश श्मश्रू हातीं धरी ॥ तथापि राजा हृदयीं धरी । कौतुकें आपुले बाळातें ॥५८॥
मी वधार्ह अपराध करितों । त्यागार्ह पापें आचरतों ॥ आळस येतां स्वस्थ निजतों । अपवित्र दोषी ठायींचा ॥५९॥
ऐसें असतां सद्गुरू । दत्तात्रेया करुणासागरू ॥ दर्शन देईल अंगिकारू । करील माझा आतांचि ॥१७६०॥
आतां उगा बैसलों आहें । कधीं येशील वाट पाहें ॥ धांव घालीं सद्गुरू माये । दत्ता दयाळा सर्वज्ञा ॥६१॥
काय अंतरातूनि बाहेर येसी । अथवा बाहेरूनि धांवोनि येसी ॥ किंवा सन्मुखचि प्रगट होसी । सर्व तुतें शक्य असे ॥६२॥
तूं सर्व कळावंत अससी । न कळे कोणता प्रकार करिसी ॥ दत्तात्रेया चिद्विलासी । विलंब आतां न लावीं ॥६३॥
आतां कैसा तरी येऊं शरण । कैसें तरी करूं नमन ॥ कैसी विनंति नाराय । करूं आतां सर्वज्ञा ॥६४॥
सत्य तुतें नारायण । शरण आहें तुझी आण ॥ करावें तैसें तुतें नमन । केलें देवा सर्वज्ञा ॥६५॥
जैसी होती माझी मती । तैसी केली मी विनंती ॥ यावा तैसा काकूळती । आलों तुतें सर्वज्ञा ॥६६॥
जैसी भाकावी करुणा । तैसी भाकिली दयाघना ॥ अजूनि कैसें द्रवेना । अंतर तुझें दयाळा ॥६७॥
आतां कोणता उपाय करूं । कैसा तुतें हांका मारूं ॥ कैसा देवा धीर धरूं । सद्गुरूराया सर्वज्ञा ॥६८॥
आतांच येऊं दे करुणा । तुझा आहें नारायणा ॥ धांव घालीं दयाघना । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥६९॥
तूं मनवाणीतें अगम्य । तथापि भक्तिगम्य ज्ञानगम्य ॥ आहेसी देवा भावगम्य । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥१७७०॥
यांतूनि देवा माझे ठायीं । दत्तात्रेया कांहींच नाहीं ॥ तथापि देवा पडतों पायीं । भेट देईं मज आतां ॥७१॥
तुझे योग्य आवडते । जरी भक्तिभाव असते ॥ तरी आजपर्यंत मातें । भेटला असता तूं ॥७२॥
मी सर्व प्रकारें हीन । आजच इच्छितों दर्शन ॥ तूंच माझी आशा पूर्ण । करीं देवा दयाळा ॥७३॥
मी आपला अधिकार न पाहिला । तुझे दर्शनाचा मनोरथ धरला ॥ आतां समर्था पुरविला । पाहिजे दयाळा ॥७४॥
मी निंद्य पापी अत्यंत मलिन । तूं दिव्यमूर्ती चैतन्यघन ॥ आजच देणें दर्शन । शंका न धरीं गुरुगंगे ॥७५॥
तूं देवादिकांतें अदृश्य । मी चर्मचक्षु तुझा शिष्य ॥ आजच होईं मातें दृश्य । समर्था दयालो सर्वज्ञा ॥७६॥
मज भेटावया कांहीं । लज्जा न धरीं सद्गुरू आई ॥ शरण आहें पडतों पायीं । आजच देईं दर्शन ॥७७॥
सद्गुरू आपले वरदहस्तें । आजच हृदयीं धरीं मातें ॥ चाळवूं नको शरण तुतें । सर्वभावें आहें मी ॥७८॥
आतां कोणती अवधी पाहसी । तुझाच आहें समदर्शी ॥ समर्थ असतां उपवासी । कासया मारिसी दयाळा ॥७९॥
नवमास वागविलें उदरीं । बाळक अमंगळ झालें जरी ॥ माता त्यातें अंगिकारी । जगज्जनका सर्वज्ञा ॥१७८०॥
तूंच माझा जननी जनक । मी कैसेंतरी तुझें बाळक ॥ देवा माझें कौतुक । आतां अंगें करिसी तूं ॥८१॥
कष्टें काळ हा लोटतों । तुतें कैसा पाहवतो ॥ धांव हांका मारितों । व्यापक दयाळा सर्वज्ञा ॥८२॥
दयावंता आलों शरण । तुझे वंदित असतां चरण ॥ समर्थ असतां दारुण । दुःख कैसें दाखविसी ॥८३॥
जेवीं मशकाचें पिलूं । थोड्याच दुःखें होय व्याकुळू ॥ मक्षिकेसी प्रळयकाळू । वन्ही कासया पाहिजे ॥८४॥
जें गजेंद्रा सोसवेना दुःख । तें पिपीलिकेसी दाविसी देख ॥ हाहा ! लक्ष्मीनायक । उचित नाहीं दयाळा ॥८५॥
मातें एक दोन दिवस । आणीक जरी दाविले त्रास ॥ तरी कांहीं जग्गनिवास । सामर्थ्य तुझें वाढेना ॥८६॥
मजला त्रास दाखविला । तेणें तुझा मनोरथ पुरला ॥ अथवा तुतें पुरुषार्थ घडला । ऐसें नाहीं दयाळा ॥८७॥
तुझे हातीं हृषीकेशी । हात दिधले समदर्शी ॥ जैसा मातें नाचविसी । तैसा देवा नाचतों ॥८८॥
तुझीं नमितों पाउलें । तूंचि छलन आरंभिलें ॥ येथें कोणाचें काय चाले । सर्वज्ञ देवा दयाळा ॥८९॥
आतां कैसी करूं विनवणी । कैसा येऊं लोटांगणी ॥ अजूनि कैसी चक्रपाणी । करुणा तुतें येईना ॥१७९०॥
देवें शरणागत त्यागिला । ऐसा नाहीं आयकिला ॥ मजविषयींच कैसा झाला । दयाळू असतां वज्ररूप ॥९१॥
नमन करितों तुझें पायीं । आतां येईं दर्शन देईं ॥ दत्तात्रेया सद्गुरू आई । दुःख नाशीं सर्वज्ञा ॥९२॥
तुजवीण माझें कोणी नाहीं । तूंच माझा बाप आई ॥ आतांच येऊनि समाचार घेईं । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥९३॥
फार कष्टी होत आहें । लळपळ तुझी वाट पाहें ॥ आतांच येसी सद्गुरू माये । तुझें आहें बाळ मी ॥९४॥
देवा आपले बाळासाठीं । उडी घालीं उठाउठी ॥ दत्तात्रेया आतांच भेटी । देईं मातें सर्वज्ञा ॥९५॥
ज्यातें सुईची वेदना । झाली असतां सोसवेना ॥ त्यातें कुठार दयाघना । काय हाणिसी धर्मज्ञा ॥९६॥
शरणागतानें दुःखी व्हावें । आपण अंगें पहावें ॥ ऐसी हौस सर्वज्ञ देवें । धरिली नाहीं कधींही ॥९७॥
दुःख जावें दयाळो । म्हणोनि तुतें शरण आलों ॥ देवा फार दुःखी झालों । याची लज्जा असों दे ॥९८॥
कोटी विप्रांचें हनन । करोनि येईल मातें शरण ॥ त्याचा त्याग न करीं जाण । ऐसें स्वमुखें बोलिला तूं ॥९९॥
समर्थातें शरण येती । त्यातें जे कां त्यागिती ॥ तो तों पापी मंदमती । ऐसें स्वमुखें बोलिला तूं ॥१८००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP