मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १७०१ ते १७५०

करुणासागर - पदे १७०१ ते १७५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


देवा आतांच धांवोनि येसी । जरी मातें दर्शन देसी ॥ तरी तुझी समदर्शी । हानी नाहीं सर्वज्ञा ॥१॥
आजच दाविसी पाय । तरी तुतें अशक्य काय ॥ दत्तात्रेया वंदितों पाय । आजच पावें सर्वज्ञा ॥२॥
दत्तात्रेया शरण आहें । तुझाच असतां छळिसी काये ॥ धांव घालीं सद्गुरू माये । विलंब आतां न लावीं ॥३॥
माझ्या अंगीं धैर्य नाहीं । नको छळूं तूं सद्गुरू आई ॥ एथें माझें कोण पाहीं । असे देवा तुजविण ॥४॥
दुःखी कष्टी शरण आलों । दुःखचि भोगूनि जरी मेलों ॥ तरी तुजविण दयालो । करुणा कोणा भाकूं मी ॥५॥
शरण आहें नारायणा । धांव घालीं नमितों चरणा ॥ दुर्दशा माझी दयाघना । न करीं आतां सर्वज्ञा ॥६॥
जरी देवा तूं म्हणसी । कीं आपलें कर्म भोगिसी ॥ मरसी अथवा वांचसी । मातें म्हणसी काय तूं ॥७॥
तूं म्हणसी तें सत्य आहे । आपलें कर्म भोगिसी पाहें ॥ परंतु तुतें शरण आहें । याची लज्जा धरावी ॥८॥
जैसे नाना लोक असती । ते आपले प्रकारें प्रारब्ध भोगिती ॥ तुतें कांहीं न म्हणती । येईं देवा सोडवीं ॥९॥
जरी इतर लोकांसारिखा । मीही असतों पारखा ॥ तरी भोगिलें असतें देखा । लोकांपरी कर्म मी ॥१७१०॥
मी तों तुझा शिष्य आहें । तूंच माझा बाप माये ॥ प्राणसखा तूं दत्तात्रेया । सद्गुरू माझा आत्मा तूं ॥११॥
मी दारुण दुःख भोगावें । तूं समर्थ असतां पहावें ॥ शेवटीं मातें मारावें । उपाशी देवा हें काय ॥१२॥
मी तों तुझा अंकित आहें । शरण असतां छळिसी काये ॥ आतां वंदितों तुझे पाये । धांव सद्गुरो सर्वज्ञा ॥१३॥
तप नाहीं साधन नाहीं । लघु हीन अपवित्र देही ॥ माझी लज्जा सद्गुरू आई । रक्षीं आतां अंगें तूं ॥१४॥
योगी तुतें शरण येती । नाना साधनें तपें करिती ॥ उग्र तपें आचरती । तुझेसाठीं सद्गुरू ॥१५॥
कोणी नाना व्रतें करिती । कोणी नाना नेम धरिती ॥ यथाशास्त्र आवरती । स्नानसंध्या योग ते ॥१६॥
अंतःशुद्धी बाह्यशुद्धी । तुझे ठायीं निश्चल बुद्धी ॥ त्रिकाळ स्नान समाधी । साधिती धन्य ॥१७॥
शीतोषाण्दि नाना कष्ट । भोगोनि राहती संतुष्ट ॥ वेदवेत्ते मुनी वरिष्ट । भजती तुतें दयाळा ॥१८॥
एक धैर्याचे डोंगर । कोणी सत्त्वाचे सागर ॥ त्यांचा करिसी अंगिकार । निज अंगें तूं समदर्शी ॥१९॥
ध्रुव पंच वर्षांचें बाळ । साधन त्यानें केलें प्रबळ ॥ आली त्याची कलवळ । पाय दाविले सर्वज्ञा ॥१७२०॥
सद्गुरू देवा माझे ठायीं । साधनांपैकीं कांहींच नाहीं ॥ आतां कैसें सद्गुरू आई । लज्जा माझी रक्षिसी ॥२१॥
साधन अंगीं कांहींच नाहीं । आशा मोठी धरिली पाहीं । आतां माझे सद्गुरू आई । तुझें आहें बाळ मी ॥२२॥
यद्यपी माझी क्षुद्र करणी । साधनहीन अपवित्र खाणी ॥ परंतु दोनी जोडोनि पाणी । नमन करितों सर्वज्ञा ॥२३॥
तुझा आहें तुतें शरण । तुझे चरणीं करितों नमन ॥ देवा तुझेंच करितों स्मरण । यथाशक्ति होय तें ॥२४॥
आपला जाणोनि माझी लज्जा । रक्षी आतां सर्वज्ञ राजा ॥ कैसा तरी आहें तुझा । दोषी दुर्बळ हीन मी ॥२५॥
आहें तैसा तुझा आहें । आतां मातें त्यागूं नये ॥ शरण आहें आतां काये । गुणदोष माझे पाहसी ॥२६॥
चक्रवर्तीचें दर्शन । घ्यावया करिती यत्न जन ॥ नाना उपाय नाना साधन । सायास करिती ॥२७॥
नाना यत्नें उपासना । नाना वस्त्रें भूषणें नाना ॥ योग साधूनि जन । दर्शन इच्छिती ॥२८॥
ऐसें असतां कोणातें । दर्शन होतें न होतें ॥ परंतु राजपुत्रातें । अशक्य नाहीं दर्शन ॥२९॥
अपवित्र असतां जरी । कुरूप मूर्ख अनधिकारी ॥ तथापि राजा अंगिकारी । पुत्र आपला म्हणोनि ॥१७३०॥
त्यातें नलगे कांहीं कारण । नाना साधन उपायन ॥ चक्रवर्तीचें दर्शन । सहज आहे तयातें ॥३१॥
तैसा मी अत्यंत अपवित्र । साधनहीन कुपात्र ॥ माझा पिता तूं स्वतंत्र । दत्तात्रेया सद्गुरो ॥३२॥
असतां कुपुत्र कुमती । त्याचा राजे त्याग करिती ॥ न्याय रीती रक्षिती । धार्मिक ते ॥३३॥
तैसा मी कुपुत्र म्हणोनी । मातें त्यागिसी चक्रपाणी ॥ परंतु तुतें ऐसी करणी । योग्य नाहीं दयाळा ॥३४॥
तुझे पोटीं कुपुत्र झालों । हा तुझा दुर्लौकिक दयाळो ॥ तूं समर्थ असतां राहिलों । कुपुत्र कैसा ॥३५॥
देव कुपुत्र कैसा व्याला । देवें शहाणा कां न केला ॥ लोकीं पुत्र कुपात्र झाला । हा दोष बापाचा ॥३६॥
समर्थाचा कुपात्र सुत । हेंच आदीं अनुचित ॥ तथापि झालों निश्चित । आळसें तुझ्या ॥३७॥
देवें आळसाखालें घेतलें । म्हणोनि मातें कुपत्र केलें ॥ यांतचि तुझें नांव गेलें । जगज्जनका सर्वज्ञा ॥३८॥
ऐसें असतां प्राण घेसी । अथवा माझा त्याग करिसी ॥ येणें तुझी हृषीकेशी । फार होईल दुष्कीर्ती ॥३९॥
देवें कुपुत्र कां केला । पुनः त्याचा त्याग केला ॥ हें सर्वज्ञ समर्थ दयाळूला । योग्य नाहीं सर्वथा ॥१७४०॥
ऐसें त्रैलोक्याभीतरीं । दुर्यश होईल तुझें हरी ॥ म्हणोनि आतां आपले घरीं । ठेवीं मातें दयाळा ॥४१॥
देवा दृष्टांतमिसें सांगावें । कैसें तरी समजावें ॥ म्हणोनि आतां सर्वज्ञ देवें । सर्व कांहीं जाणावें ॥४२॥
कोठें राजा सार्वभौम । कोठें दयाळू परब्रह्म ॥ सर्व समर्थ आत्माराम । समदर्शी तूं सर्वज्ञा ॥४३॥
क्षुद्र सार्वभौमाची क्षमा । क्षुद्र सार्वभौमाचा महिमा ॥ तुशीं त्यासीं आत्मारामा । साम्यता न घडे सर्वज्ञा ॥४४॥
त्याचें अंगीं सामर्थ्य नाहीं । म्हणोनि कुपुत्रातें त्यागितो पाहीं ॥ क्षमा दया समत्व पाहीं । नाहीं त्यातें सर्वज्ञा ॥४५॥
तूं क्षमेचा सागर । तूं करुणेचा जलधर ॥ सामर्थ्येंही भरपूर । तसाच अससी समर्था ॥४६॥
तूं शरणागताचा रक्षक । प्रणताचा दुःखनाशक ॥ पतितातें तारक । तूंच अससी समदर्शी ॥४७॥
तुज पुत्र असती अनेक । परी तुतें सर्व समान देख ॥ एकाचाही रमानायक । वीट नाहीं तुज देवा ॥४८॥
कुपुत्र अथवा सुपुत्र । पवित्र अथवा अपवित्र ॥ समान तुतें एकत्र । ठेविसी तूं सर्वोतें ॥४९॥
पुरे आतां विस्तार । तुतें करितों नमस्कार ॥ तुझें पायीं ठेविलें शिर । क्षमावंता सर्वज्ञा ॥१७५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP