मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १६०१ ते १६५०

करुणासागर - पदे १६०१ ते १६५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


तूं सर्वाचा अधिपती । तुझा महिमा सर्व गाती ॥ म्हणोनि तुतें विनंती । करितों देवा सर्वज्ञा ॥१॥
शरणागतातें रक्षावें । प्रणतपालन करावें ॥ पतितातें उद्धरावें । क्षमावंता सर्वज्ञा ॥२॥
आतां कोणता प्रकार करूं । कोठें राहूं कोठें फिरूं । सद्गुरू करितों नमस्कारू । धांव आतां सर्वज्ञा ॥३॥
क्षमा करोनि अन्याय । देवा दावीं निजपाय ॥ किती आतां दत्तात्रेय । छळिसी तुझा असें मी ॥४॥
तुझी भेटी घ्यावी । तुझी वाणी आयकावी ॥ ही वार्ता असावी । बहुधा गुप्त ॥५॥
ऐसें असतां प्रसिद्ध झाली । मीही लोकीं चाउटी केली ॥ सर्व आतां शेवटा नेली । पाहिजे देवा ॥६॥
समर्थाचे धरिले पाय । आतां लोकांची भीती काय ॥ माझा सद्गुरु दत्तात्रेय । प्रसिद्ध व्हावी हे कीर्ति ॥७॥
आतां लोकांचा दरारा । कासया बाळगूं क्षमासागरा ॥ माझा सद्गुरू भक्त - आधारा । तूंच अससी ॥८॥
गुरुशिष्याचें नातें । त्रैलोक्याचें साजे तुतें ॥ माझें विशेष तूंच मातें । सर्व कांहीं उपदेशिलें ॥९॥
आतां चोरी कायसी । कासयाची शंका करिसी ॥ दत्तात्रेया समदर्शी । येईं आता सर्वज्ञा ॥१६१०॥
आतां मातें त्यागिलें । तरी तुझेंच नांव गेलें ॥ म्हणोनि आतां पाउलें । दावीं देवा सर्वज्ञा ॥११॥
तुज व्हावें तैसें नारायण । घडवीं आतां मजकडोन ॥ मी तों आलों सर्वथा शरण । हातीं धरोनि वागवीं ॥१२॥
आतां देश नाहीं मातें । मी तों शरण आहें तुतें ॥ एक नमस्कारापरतें । कांहीं न घडे मनवस्तु ॥१३॥
माझ्या आर्ताच्या कल्पना । नानातर्‍हेच्या योजना ॥ पाहोनि देवा नारायणा । विलंब आतां न लावीं ॥१४॥
तुझेसाठीं कल्पना करितों । तुतें सर्वथा शरण येतों ॥ आतां माझे काय पहातो । अंतरींचे तरंग ॥१५॥
नाना योजना योजितों । बहुतेकांचे पाय धरितों ॥ अंतरीं बहूत झुरतों । तुझे साठीं सर्वज्ञा ॥१६॥
कैसा तरी भेटो सद्गुरू । म्हणोनि करितों नाना विचारू ॥ जाणत असतां उशिरू । नको लावूं सर्वज्ञा ॥१७॥
कल्पनादि दयाळा । पाहोनि विलंब लाविला ॥ तरी माझा घात झाला । सद्गुरू देवा ॥१८॥
मी त्वदाश्रयचि असें पाहें । तुतें सर्वथा शरण आहें ॥ जाणत असतां विलंब काये । लाविसी समर्था सर्वज्ञा ॥१९॥
मी तों सर्वथा शरण आहें । तुझे पायीं पडिलों पाहें ॥ आतां सर्व कांहीं उपाये । करणें तुतें सर्वज्ञा ॥१६२०॥
पूर्वींपासोनि तुतें पाहीं । शरण नव्हतों ऐसि नाहीं ॥ पहिल्यापासोनि तुझे पायीं । शरण आहें सर्वज्ञा ॥२१॥
नवीन मागुती शरण । कैसा येऊं नारायण ॥ जैसा यावा तैसा शरण । आहें तुतें अनादि ॥२२॥
सत्य सर्वथा आहें तुझा । आतां सांभाळ करीं माझा ॥ धांव आतां सर्वज्ञ राजा । दत्तात्रेया दयाळा ॥२३॥
आतां दिवस सरले । घडी पळही भरले ॥ कंठीं प्राण उरले । सर्वज्ञ देवा ॥२४॥
लोक सांगती प्रकार नाना । परी न येती माझे मना ॥ तुझें माझें विटेना । प्रेम देवा कालत्रयीं ॥२५॥
कोणी सांगों काई । परी माझें प्रेम तुझे पायीं ॥ तुझे करितां प्राणही । गेला तरी पुरवला ॥२६॥
तुझें माझें प्रेम पूर्ण । जरी होईल किंचिन्न्यून ॥ तरी देवा पावेन पतन । दत्तात्रेया सद्गुरो ॥२७॥
पहावे दत्तात्रेयाचे चरण । हाच माझा कुळधर्म पूर्ण ॥ माझी गती आम्हां पूर्ण । दत्तात्रेयचि असे ॥२८॥
अनेक आचरोनि दोष । धरोनि बैसलों तुझी आस ॥ धांव आतां जगदीश । दत्तात्रेया सद्गुरो ॥२९॥
आतां काय सांगावें । सर्व कांहीं जाणावें ॥ आतांच धांवणें धांवावें । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥१६३०॥
माझी तों मति गेली । ऐसें म्हणतोसि वनमाळी ॥ परी सद्गुरु माउली । जाणसी तूं अंतर ॥३१॥
हिताहित समजावें । तारतम्य जाणावें ॥ तेंही सर्व देवें । सांगितलें मज ॥३२॥
तथापि मातें राहवेना । कैसी करूं मी योजना ॥ काबू कांहीं नारायणा । माझा नाहीं सर्वज्ञा ॥३३॥
कंठीं घालोनियां फासी । पारधी ओढी मृगासी ॥ तैसी अवस्था हृषीकेशी । झाली माझी सर्वथा ॥३४॥
माझा नाहीं दुराग्रह । माझा नाहीं निग्रह ॥ हा तुझाच अनुग्रह । आहे सत्य ॥३५॥
सर्वज्ञ देवा सद्गुरू आई । माथा ठेविला तुझे पायीं ॥ तुझे हातीं हात दोहीं । दिधले मग ॥३६॥
आतां पाहिजे तैसें करीं । मारीं अवस्था तारीं ॥ सर्वथा आतां सर्वज्ञ हरी । तुझाच आहें समर्था ॥३७॥
तूंच काळाचा काळ । तुझें सारें बुद्धिबळ ॥ मी तों तुझा दुर्बळ । काय मजकडे लाविसी ॥३८॥
तूं निग्रहानुग्रह करिसी । तैसी त्यातें बुद्धि देसी ॥ तूंचि एक स्वतंत्र अससी । त्रैलोक्याचा धनी तूं ॥३९॥
तुतें सह्रण आहें । तुझी चाट पाहें ॥ पाहिजे तैसें सद्गुरू माये । करीं मारीं तारीं तूं ॥१६४०॥
तुतें आहें सर्वथा शरण । तुतें करितों वंदन ॥ आतां यातें नारायण ॥ पाहिजे तें म्हणावें ॥४१॥
कोणी म्हणती पोरपण । कोणी म्हणती मूर्खपण ॥ कोणी म्हणती पिशाचपण । करितो मंद ॥४२॥
कोणी म्हणती अविवेक करितो । कोणी म्हणती उगाच फिरतो ॥ कोणी म्हणती अविचार करितो । मूढ आहे ॥४३॥
कोणी म्हणती साहस करिसी । कोणी म्हणती वृथा मरसी ॥ कोणी म्हणती कां दवडिसी । नरदेहरत्न ॥४४॥
देवा जैसी ज्याची मती । तैसा मातें बोध करिती ॥ परंतु माझी अंतरस्थिती । आहे तैसी जाणसी तूं ॥४५॥
पाहती वरला प्रकार । परी कोणी जाणेना अंतर ॥ विचार अथवा अविचार । जाणसी तूं सर्वज्ञा ॥४६॥
मी तों आहें तूतें शरण । सर्व कांहीं तुझें करुण ॥ ऐसें असतां दूषण । लाविती त्या लावावे ॥४७॥
लोक करिती भूषण । माझें हें तों दूषण ॥ तुझें दूषण भूषण । होय देवा समर्था ॥४८॥
माझेकडे कांहींच नाहीं । मीं तों पडलों तुझें पायीं ॥ पाहिजे तैसें करोनि घेईं । शरण आहें म्हणोनी ॥४९॥
आतांच येऊं दे करुणा । नमन करितों नारायणा ॥ धांव आतां दयाघना । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥१६५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP