मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे ११५१ ते १२००

करुणासागर - पदे ११५१ ते १२००

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


देशीं विदेशीं रहावें । भोगें प्रारब्ध सारावें ॥ सद्गुरूतें भजावें । नित्य नेमें ॥५१॥
मिथ्या दृश्याची प्रतीति । दृढ असावी आत्मस्थिती ॥ तुतें कैंची गती अगती । अलिप्तातें ॥५२॥
ऐसी जीवन्मुक्ती वरिष्ठ । तुतें दिधली मीच स्पष्ट ॥ अजून म्हणसी भोगितों कष्ट । हें नवल वाटे ॥५३॥
तूं आपलें स्वरूप भोगावें । आनंदरूप असावें ॥ किंवा पोरपण करावें । पिशासारिखें ॥५४॥
माझी भक्ती पूर्ण आहे । स्वरूपही भोगिसी पाहें ॥ तुतें काय उणें आहे । सांग बापा ॥५५॥
तूं निःशंक निर्भय विज्ञानघन । कृतकृत्य कर्तव्यहीन ॥ प्रत्यक्ष ऐसें असतां जाण । दुःख तुजला कायसें ॥५६॥
मी तुझे अंतर्बाह्य असें । प्रत्यक्ष तुतें दृष्टी दिसे ॥ तुझा माझा वियोग नसे । काळत्रयीं ॥५७॥
तूं सदां निःसंदेहो । तुतें नाहीं देह विदेहो ॥ आतांच पडो अथवा राहो । कलेवर मिथ्या ॥५८॥
तूं परमानंदघन । अनादि परिपूर्ण ॥ मजहूनि वेगळेपण । असेचि ना ॥५९॥
मीच तूं अससी जाणसी । कासया वनोवनीं हिंडसी ॥ कष्टी होसी विदेशीं । किन्निमित्त ॥११६०॥
तूं आनंद्पूर निवासी । व्यर्थ हाका मारिसी ॥ तुझेच सारिखा विलासी । कोणीच नाहीं ॥६१॥
आतां सुखी रहावें । निजस्वरूप भोगावें ॥ दीन जन उद्धरावे । कृपाळूपणें ॥६२॥
तूं सुखरूपचि अससी । मातें तरी काय म्हणसी ॥ व्यर्थ कां बा श्रमी होसी । सांग मज ॥६३॥
बारे तुतें कांहीं । सर्वथा उणें नाहीं ॥ आतां खुशालं राहीं । जेथें तेथें ॥६४॥
मी जें जें बोलिलों हें । तें तें सर्व तैसेंच आहे ॥ यांत कांहीं अन्यथा नोहे । सर्व सत्य ॥६५॥
याचक पडतां दृष्टी । न द्यावयाच्या शंभर गोष्टी ॥ नाना चातुर्य शब्दवृष्टी । करिती अदाते ॥६६॥
मी तों आलों भिक्षार्थी शरण । न देतां मातें अभयदान ॥ कैसें करिसी समाधान । शुष्क गोष्टी सांगोनी ॥६७॥
कोठें माझें लघु मोल । कोठें तुझे दिव्य बोल ॥ तुझा भाव सखोल । तूंच जाणसी ॥६८॥
तूं बोलिला तैसा । प्रकार असता जगदीशा ॥ तरी ऐसी माझी दशा । कासया होती ॥६९॥
आपण जें जें बोलिलां । हा मजवर अनुग्रह केला ॥ आपल्याहून मज वेगळा । लेखिला नाहीं ॥११७०॥
आत्मदृष्टी आपली । सर्वत्र समान समरसली ॥ म्हणोनि वचनोक्ति आपली । विरुद्ध नाहीं ॥७१॥
आपली दृष्टी तैशीच आहे । परी माझी अवस्था शोधूनि पाहे ॥ प्राण माझा जाऊं पाहे । जाणसी तूं ॥७२॥
जरी म्हणसी दयाळा । इतके दिवस कैसा राहिला ॥ हेंही सर्व सद्गुरूला । ठाउकच आहे ॥७३॥
प्राणी गर्भीं राहती । नरकांतही निवास करिती ॥ त्यांचेही दिवस जाती । निघोनियां ॥७४॥
दुःखी कष्टी प्राण राहिले । यांत कोण सार्थक झालें ॥ तुझी वंदितां पाउलें । ऐसें नसावें ॥७५॥
जरी ऐसें बोलसी । कीं आपलें प्रारब्ध भोगिसी ॥ मज काय म्हणसी वारंवार ॥७६॥
देवा माझा प्रारब्धभोग । सुख दुःख नाना रोग ॥ भोगीन परंतु तुझा वियोग । साहणार नाहीं ॥७७॥
मज द्रव्य दारा नलगे । संपत् सिद्धी न मागें ॥ राहीन म्हणतों तुझ्या संगें । सर्वज्ञ देवा ॥७८॥
माझें सुख संपत् सर्व कांहीं । देवा तूंच अससी पाहीं ॥ तुझ्या व्यतिरिक्त दुसरें कांहीं । सर्वथा नलगे मज रामा ॥७९॥
तुतें सर्वथा रुजू आहें । तुझे पायीं पडलों पाहें ॥ सर्व जाणसी सद्गुरूमाये । सर्वज्ञ देवा ॥११८०॥
माझे माय बाप धन धाम । सुख तुज वेगळें काय मागूं । व्यर्थ कासया भागूं ॥ सर्वज्ञासी कैसें सांगूं । वारंवार ॥८२॥
परंतु मातें चैन नाहीं । याचा उपाय करीं पाहीं ॥ सर्वज्ञ देवा पडतों पायीं । दत्तात्रेया सद्गुरो ॥८३॥
यद्यपि तुम्हीं सर्व कांहीं । मज उणें केलें नाहीं ॥ तथापि मातें चैन नाहीं । कैसें करूं मी समर्था ॥८४॥
ऐसें असतां तुझे पायीं । वारंवार ठेवितों डोई ॥ दत्तात्रेया आतांच येईं । तुझा आहें सर्वथा ॥८५॥
दत्तात्रेया आतांच येणें । मज व्हावें तैसें समाधान करणें ॥ हेंच माझें मागणें । हाच माझा हेतू असे ॥८६॥
हेतू गुंतला तुझे चरणीं । कष्टी न करीं चक्रपाणी ॥ आतांच येईं धांवोनि । सद्गुरुस्वामी सर्वज्ञा ॥८७॥
प्रस्तुत वेळा ऐसीच आली । सद्गुरुराया धांव घालीं ॥ सर्व तुतें कळों आली । अवस्था माझी दयाळा ॥८८॥
सर्वथा माझें समाधान नाहीं । उपाय मातें न सुचे कांहीं ॥ प्राणांतवेळा आली पाहीं । काय करूं मी सर्वज्ञा ॥८९॥
मज सर्वथा राहवेना । फार झाल्या यातना ॥ सर्व जाणसी अंतरखुणा । द्रष्टेपणें तूं ॥११९०॥
मी उगीच धांवा करितों । किंवा खराच कासावीस होतों ॥ तुझ्याच प्रत्ययास येतो । भाव माझा ॥९१॥
तुशीं करील जो प्रतरणा । त्यास कोठेंच नाहीं ठिकाणा ॥ जो सर्व जाणे अंतरखुणा । त्यास चोरिलें काय असे ॥९२॥
पतीनें पाहिली सर्व काया । त्यास काय चोरील जाया ॥ माझें हृदय सद्गुरुराया । सर्व तुतें ठाउकें ॥९३॥
चहूंकडे अग्नी लागला । दास तुझा घाबिरा झाला ॥ धांव आतां दयाळा । सद्गुरूराज ॥९४॥
तुझे भक्त जीवन्मुक्त । मीच कैसा जीवन्मृत ॥ आतां माझी दया त्वरित । येऊं देईं दयाळा ॥९५॥
कोणते प्रकारें आळवूं । कैसा तरी शरण येऊं ॥ भिकारी मी काय देऊं । नित्यतृप्तासी ॥९६॥
हा प्रसंग ऐसाच आला । प्राण कंठीं उरला ॥ कांहीं सुचेनासा झाला । प्रकार देवा ॥९७॥
जीत मेल्या गती नाहीं । तुतें कळलें सर्व कांहीं ॥ चिंतानदीच्या प्रवाहीं । वाहवलों मी ॥९८॥
तुतें मारितों हाका । धांव धांव लक्ष्मीनायका ॥ आतां माझा त्राता सखा । तूंच अससी ॥९९॥
जरी माझे प्राण गेले । तरी तुझें ब्रीद बुडालें ॥ शरणागतातें उपेक्षिलें । हें निंद्य कर्म ॥१२००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP