मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे ८०१ ते ८५०

करुणासागर - पदे ८०१ ते ८५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


तुझी अतर्क्य करणी । याच वेळे याच क्षणीं ॥ काय एक न करिसी चक्रपाणी । महासमर्था सर्वज्ञा ॥१॥
आतां त्वरा करावी । मातें भिक्षा घालावी ॥ आशा माझी पुरवावी । देऊनि भेटी ॥२॥
सद्गुरूराया वारंवार । साष्टांग करितों नमस्कार ॥ आतां कांहींच उशीर । लावूं नको दयाळा ॥३॥
शरीर झुरणीस लागलें । नाना रोगें व्यापिलें ॥ आयुष्यही सरत आलें । दीनबंधो ॥४॥
चोर मांग गवाशन । यांचेंही द्रवतें अंतःकरण ॥ करुणाघनातें आलों शरण । दुर्दशा माझी न करावी ॥५॥
जरी मातें अत्यंत छळिलें । गांजगांजून रडविलें ॥ तुझे हातीं काय आलें । ऐसी करितां विटंबना ॥६॥
रानोरानीं फिरविलें । अथवा उपवासीं मारिलें ॥ जरी माझे प्राण गेले । लाभ कोणता झाला तुज ॥७॥
एक दिवस मरण आहे । तेथें उपाय करिसी काय ॥ वंदित असतां तुझे पाय । चक्र कैसें हाणिसी ॥८॥
निजकर्मेंचि भोगितों व्यथा । परी तुज शरण आलों त्रैलोक्यनाथा ॥ तुझे पायीं ठेवितो माथा । दुःख माझें निरसावें ॥९॥
जें काय मातें दुःख आहे । तें तूंचि जाणसी पाहें ॥ तुज सामर्थ्यही आहे । दुःख निरसावयाचें ॥८१०॥
दुःखाचें करावे निरसन । सद्गुरू तूतें आलों शरण ॥ दुःखाचि दाविसी दारुण । सर्वज्ञ समर्थ असतांही ॥११॥
जैसा माझा हेतू आहे । तैसा आतांचि पुरवीं पाहें ॥ विलंब लावितां वृथा होय । ब्रीदावळी स्वामीची ॥१२॥
व्हावें तैसें अभय आतां । जरी न देसी रमानाथा ॥ जरी देसी काळांतरीं तत्वता । तरी ब्रीद हें व्यर्थ ॥१३॥
व्हावें तैसें आतांच न दिलें । ऐसेंच माझें शरीर गेलें ॥ तुझें वहावलें । सकळ ब्रीद ॥१४॥
तुझें अपार ब्रीद गाजलें नसतें । तरी कोण तूतें शरण येतें ॥ मग भोगिलेंचि असतें । स्वकर्म ॥१५॥
जिवंत असता दुःख देणें । मारूनि वैकुंठीं नेणें ॥ जळो ऐसें अभय देणें । आश्रिता अमरपदा ॥१६॥
तूं सकळकळा - सामर्थ्यपूर्ण । आहेसि म्हणोनि आलों शरण ॥ नमन करितां दुःख दारुण । कैसें दाविसी सर्वज्ञा ॥१७॥
वारंवार हांक मारितों । म्हणोनि मीच तुझें डोळ्य़ांत खुपतों ॥ माझा नाश करूं पाहतो । एवढा समर्थ समदर्शी ॥१८॥
जरी मातें अत्यंत छळिसी । तरी तूंचि माझी गती अससी ॥ माझी विश्रांति हृषीकेशी । तुझेचि पायीं ॥१९॥
मातें कोठेंचि ठाव नाहीं । म्हणोनि पडतों तुझे पायीं ॥ धांव घालीं माझे आई । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥८२०॥
चघळपणें वाचाळपणें । वात्रटपणें मूर्खपणें ॥ बोलिलों जें अधीक उणें । क्षमा करीं सद्गुरो ॥२१॥
मी जडमूढ अज्ञान । पामर खोटा गुणविहीन ॥ कैसा तरी नारायण । तुझाचि असें ॥२२॥
लुब्ध कुश्चळ चावट । क्षुद्र कामी उद्धट ॥ तुजचि दावितों पाटपोट । दीनपणें दयाळो ॥२३॥
कोणापुढें बोलावें । हितगुज कोणा सांगावें । तुझा आहे जीवेंभावें । म्हणोनि बोलें तुजपाशीं ॥२४॥
तूं दयावंत गुणराशी । सर्व माझें पोटीं घालिसी ॥ माझा अंगिकार करिसी । अभय देशी आतांचि तूं ॥२५॥
नमस्कार करितों याची लाज । धरोनि आतां रक्षीं मज ॥ अंजुळी पसरिली सद्गुरो तुज । भिक्षा घालीं उदारा ॥२६॥
काय करूं कोठें जाऊं । कैसा राहूं कोठें पाहूं ॥ कैसें आतां हृदय दावूं । वारंवार उकलोनी ॥२७॥
जपतपादि साधन । पाठपूजा अनुष्ठान ॥ कांहीं न करवे नारायण । सर्व जाणसी अंतर तूं ॥२८॥
मज आणीक कांहीं करवेना । कोणती करावी योजना ॥ नमस्कार करितों दयाघना । दत्तात्रेया धांव तूं ॥२९॥
उगीच बैसलों आहें । भरंवसा धरोनि वाट पाहें ॥ धांव आतां लवलाहें । शरणागतवत्सल तूं ॥८३०॥
माझा आतां हाचि उपाय । भावें वंदितों तुझे पाय ॥ धांव सद्गुरु दत्तात्रेय । प्रणत - क्लेश - विनाशका ॥३१॥
अभय द्यावयाची वेळा । हीच आहे परमदयाळा ॥ सद्गुरु येऊं दे कळवळा । पूर्णब्रह्म सनातना ॥३२॥
आपुले घरचें श्वान । त्याचा शोध घेती जन ॥ त्यातें दुःख होतां जाण । उपचार करिती ॥३३॥
तुझिये घरींचा मी श्वान । माझा समाचार घे नारायण ॥ सद्गुरू घालितों लोटांगण । तुझे चरणीं ॥३४॥
तूं निरुपाधी निःसंग खरा । तूतें नाहीं कर्तव्यपसारा ॥ पूर्णकाम आनंदनिर्भरा । काज नाहीं कोणासी ॥३५॥
यद्यपि ऐसें आहे । मी तथापि तुझी वाट पाहें ॥ तुझे बोलिल्याचा आहे । विश्वास मज ॥३६॥
जो मातें येईल शरण । त्यातें देतों अभयदान ॥ बोलिलासी सत्य वचन । नाना ग्रंथीं पुराणीं ॥३७॥
तुझिये वचनाचा विश्वास । धरोनि धरिली तुझी कास ॥ आतां मजविषयीं उदास । होऊं नको दयाळा ॥३८॥
आतां कितीक वेळ लाविसी । कधीं येवोनि अभय देसी ॥ वाट पाहें मी उपवासी । जेवूं घालीं गुरु माये ॥३९॥
न करीं आतां टाळाटाळी । माझी अति अवस्था झाली ॥ आतां माझी आशा पुरविली । पाहिजे देवा ॥८४०॥
आतांचि येईं देवा आज । येऊनि अभय देईं मज ॥ माझें आपुलें अंतरीचें गुज । ऐकावें सांगावें ॥४१॥
स्वामीगौरवाचा सोहळा । पाहीन आपुले डोळां ॥ ऐसें आतां त्रैलोक्यपाळा । करीं वेगें समर्था ॥४२॥
अतिसुलभा कोमळहृदया । निःशंका निर्गुणा निर्भया ॥ अनादिपुरुषा दत्तात्रेया । पाव आतां सर्वज्ञा ॥४३॥
धांव शरणागतप्रियकरा । धांव करुणेच्या सागरा ॥ धांव भक्तांच्या परमाधारा । दत्तात्रेया सद्गुरो ॥४४॥
धांव संकष्ट - नाशका । धांव प्रपन्नरक्षका ॥ धांव ब्रह्मांडनायका । दत्तात्रेया सद्गुरो ॥४५॥
तुझ्या भक्ताचा मनोरथ । तोच तुझा निजस्वार्थ ॥ नाना कौतुकें भक्तार्थ । करिसी तूं ॥४६॥
जरी मी खोटा भक्त । तथापि तुझाचि म्हणवितों व्यक्त ॥ हीच लज्जा धरोनि पक्षपात । करीं माझा सद्गुरो ॥४७॥
तूं खोट्याही दासांचा मान । खरा राखिसी नारायण ॥ तुझा स्वभावशीलगुण । कोण वर्णी अनंता ॥४८॥
मी खोटा तरी दयाळो । तुझा होऊनि वागलों ॥ तुझेचि नांवें विकलों । एवढी लज्जा रक्षावी ॥४९॥
अपराध फार केले । वंदितों तुझीं पाऊलें ॥ सर्व माझे क्षमा केले । पाहिजे क्षमावंता ॥८५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP