मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे ५५१ ते ६००

करुणासागर - पदे ५५१ ते ६००

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


मी तों ठायींचा आळसी । भयाभीत अधैर्यराशी ॥ माझा अंत काय पाहसी । दीनदयाळा सर्वज्ञा ॥५१॥
जैसा तैसा तरी तुझा । सांभाळ करीं वेगें माझा ॥ शरण आलों माझी लज्जा । तुझे हातीं सद्गुरो ॥५२॥
आतां माझें जीवन । सद्गुरो तुझेच अधीन ॥ करुणा भाकितों येऊनि शरण । विलंब आतां न लावीं ॥५३॥
तुम्हीं सर्वज्ञ गोसावी । आतां माझी कींव यावी ॥ माझी लज्जा सांभाळावी । शरण आलों म्हणोनि ॥५४॥
शरण आलियाची लज्जा । बाळगावी सर्वज्ञ राजा ॥ दत्तात्रेया आहें तुझा । कैसा तरी शिष्य मी ॥५५॥
घडली नाहीं तुझी सेवा । म्हणोनि माझा वीट न यावा ॥ आतां प्रतिपाळचि करावा । इच्छितों तैसा सर्वज्ञा ॥५६॥
माझें अत्यंत सामान्यपण । नको पाहूं दयाघन ॥ शरण येऊनि तुझे चरण । वंदितों मी सद्गुरो ॥५७॥
धरीं माझा अभिमान । हातीं घेईम धनुष्यबाण ॥ सद्गुरूराया निवांण । माझें आतां न पहावें ॥५८॥
देवा तूतें वारंवार । हात जोडोनि नमस्कार ॥ करितों माझा समाचार । घेईं आतां दयाळा ॥५९॥
आतां द्रवूं दे अंतर । मागुती करितों नमस्कार ॥ धांव आई सत्वर । दत्तात्रेया सद्गुरो ॥५६०॥
देवा उणें अथवा आगळें । यथामतीनें आळविलें ॥ गोड करोनि घेतलें । पाहिजे सर्व ॥६१॥
जैसी माझी मती । तैसें आळवितों श्रीपती ॥ अधीक कोठोनि कृपामूर्ती । आणूं आतां ॥६२॥
आतां स्वामींनीं संतुष्ट रहावें । माझें समाधान करावें ॥ शरण आलों जीवें भावें । आस स्वामीचरणाची ॥६३॥
मातें दुसरा आधार नसे । देवा सर्वथा तुझाच असें ॥ मिथ्या जरी बोलतसें । तरी कल्पकोटी नरक घडो ॥६४॥
देवा तुझीच आशा धरोनी । वाट पाहें दीनवाणी ॥ आतां माझी हांक तुझे कानीं । पडों देईं सर्वज्ञा ॥६५॥
तूतें भाकीत असतां करुणा । कैशा भोगविसी यातना ॥ माझिया जीवींच्या खुणा । जाणतोसी दयाळा ॥६६॥
येईं करुणेंच्या जळधरा । धांव कृपेच्या सागरा ॥ पाव मुक्तीच्या माहेरा । दत्तात्रेया ॥६७॥
माझी कठीण वेळा आली । वेगें येईं गुरुमाउली ॥ करीं कृपेची साउली । सखया रामा ॥६८॥
पायीं घातलें लोटांगण । आतां न पाहीं निर्वाण ॥ सद्गुरूराया आपुले चरण । दाविलेच पाहिजे ॥६९॥
माझे अपराध सर्व कांहीं । क्षमा करीं पडतों पायीं ॥ दत्तात्रेया अनंत उपायीं । सांभाळ माझा अंगें करीं ॥५७०॥
तुझें हृदय अत्यंत कोमळ । मातें गांची विपरीत काळ ॥ सद्गुरू स्वामी आतां वेळ । लावूं नको दयाळा ॥७१॥
माझे सारिखा निलाजिरा । कोडगा बेशरम खरा ॥ कानकोंडा गुरुवरा । तुझे पुढें ॥७२॥
पाहूं नये माझे मुखा । एवढा अपराधी आहें देखा ॥ परंतु तूतें लक्ष्मीनायका । शरण आलों ॥७३॥
जैसें माझें सामर्थ्य होतें । तैसी करुणा भाकिली तूतें ॥ कैसें करूं देवा मातें । आतां कांहीं सुचेना ॥७४॥
मी तों तुझें अधीन असें । तुजविण माझा प्राण जातसे ॥ सद्गुरूराया तुझें पिसें । लागलें मज ॥७५॥
शून्य वाटे त्रिलोकीं तुझिये मुखाकडे अवलोकीं ॥ माझी दुर्दशा भूलोकीं । सद्गुरू आतां न करावी ॥७६॥
आतां सद्गुरू पूर्ण कृपा । कधीं करशील ब्रह्मरूपा ॥ विश्वजनाच्या मायबापा । दत्तात्रेया ॥७७॥
अनंतबळा अनंतभूजा । अनंतगुणा सर्वज्ञराजा ॥ आतां अंगिकार माझा । वेगें करीं ॥७८॥
मजला आतां नको छळूं । तुजहूनि कोणता कृपाळू ॥ धांवोनि येईं, हळूहळू । चालूं नको दयाळा ॥७९॥
तुझे हातीं सर्व आहे । कृपादृष्टीं मजकडे पाहें ॥ आतां मातें न साहे । वियोग स्वामीचा ॥५८०॥
माझें हृदय परम कठीण । आजपर्यंत राहिला प्राण ॥ तेच क्षणीं निर्वाण । व्हावें तुझ्या वियोगें ॥८१॥
तुझा वियोग साहिला । धिःकार माझे दास्थत्वाला ॥ माझे शिरीं कां न झाला । वज्रपात ॥८२॥
माझा प्राणही जाईना । सद्गुरूवांचोनि राहवेना ॥ हेतू आशा वासना । सद्गुरूचरणीं गुंतली ॥८३॥
आतां माझा वृत्तांत कळावा । माझा अंत न पहावा ॥ वेगें येईं सद्गुरू देवा । कृपा करोनी आलिंगीं ॥८४॥
भयंकर व्याघ्रें वधिली गाय । देवा सोडवीं दावूनि पाय ॥ माझेसाठीं अनंत उपाय । करीं आतां सद्गुरो ॥८५॥
अनादि देवा विश्वंभरा । अप्रमेया परात्परा ॥ नमो कूटस्था अक्षरा । दत्तात्रेया सद्गुरो ॥८६॥
परमेश्वरा पुरुषोत्तमा । नित्यनिरंजना परमात्मा ॥ अनामरूपा परब्रह्मा । दत्तात्रेया तुज नमो ॥८७॥
रामकृष्णा भार्गवा । नृसिंह वामन हयग्रीवा ॥ मत्स्य कूर्म वराह देवा । दत्तात्रेया तुज नमो ॥८८॥
ब्रह्मा विष्णू महेश्वरा । वासुदेवा रमावरा ॥ शूळपाणी चक्रधरा । दत्तात्रेया तुज नमो ॥८९॥
सूर्या भास्करा चंडकिरणा । वक्रतुंडा गजानना ॥ सर्वरूपा सर्वाधिष्ठाना । दत्तात्रेया तुज नमो ॥५९०॥
लक्ष्मी सरस्वती काली । गिरिजा पार्वती महाकाली ॥ सिंहवाहिनी भद्रकाली । दत्तात्रेया तुज नमो ॥९१॥
शेषा अनंता वेदव्यासा । यज्ञर्षभा आदिहंसा ॥ कपिलदेवा रघूत्तंसा । दत्तात्रेया तुज नमो ॥९२॥
रमेशा उमेशा वागीशा । सिद्धेशा विद्येशा सर्वशा ॥ जीवेशा परेशा आदीशा दत्तात्रेया तुज नमो ॥९३॥
एका अनेका एकत्वरहिता । त्राता भ्राता पिता माता । सगुण अगुण गुणातीता । दत्तात्रेया तुज नमो ॥९४॥
नमूं शेषा अशेषा । नमूं विशेषा निर्दोषा ॥ परावरेशा निःशेषा । दत्तात्रेया तुज नमो ॥९५॥
नमो विरूपा सुरूपा । नमो अरूपा स्वरूपा ॥ सृष्टीसमष्टी - व्यष्टी - रूपा । दत्तात्रेया तुज नमो ॥९६॥
सीतापते राधिकारमणा । रुक्मिणीनाथा जानकीजीवना ॥ कंसनाशका रावनमर्दना । दत्तात्रेया तुज नमो ॥९७॥
अयोद्फ़्ह्यापते मथुराधीशा । गोपीरमणा जानकीशा ॥ गोपवल्लभा कपीशा । दत्तात्रेया तुज नमो ॥९८॥
त्रैलोक्यपते वैकुंठपते । पार्वतीपते कैलासपते ॥ लक्ष्मीपते कैवल्यपते दत्तात्रेया तुज नमो ॥९९॥
कर्मज्ञा तत्त्वज्ञा सर्वज्ञा । धर्मज्ञा मर्मज्ञा मनोज्ञा ॥ शरणागत भावाभिज्ञा । दत्तात्रेया तुज नमो ॥६००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP