मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय सोळावा

आदिपर्व - अध्याय सोळावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


धृतराष्ट्र, पांडु, विदुर भ्राते, सूर्येंदुवन्हि जेंवि, हित
झाले प्रजांसि; करिती सर्व सुखें कर्म, ज्यांसि जें विहित. ॥१॥
‘ द्वापर कृतयुग झालें, ’ आलें यांतचि समृद्धिचें कथन.
ज्ञातज्ञेय तिघेही; करि त्यांचें यशचि शत्रुचें मथन. ॥२॥
धृतराष्ट्र अंध, शूद्रीसुत विदुर, म्हणोनि राहिले दोघे.
भीष्में केला राजा पांडु; तदाज्ञाबळेंचि पद तो घे. ॥३॥
एका समयीं हर्षें भीष्म म्हणे, स्वाशिवाद्रिच्या भिदुरा,
‘ साधो ! धर्मरहस्यज्ञाननिधे ! वासरा ! सख्या ! विदुरा ! ॥४॥
हें कुळ सत्यवतीनें, व्यासानें, म्यांःइ रक्षिलें कुरुचें;
कुळयश वाढवुनि, तुम्हीं सुखवा मन या कुळाचिया गुरुचें. ॥५॥
म्यां ऐकिलें असें कीं, यदुकुळजा कुंतिभोजनृपकन्या,
सुबळसुता, मद्रेश्वरतनया, या सुकुळजा वधू धन्या. ॥६॥
संतानार्थ कुळाच्या, भार्या तव अग्रजांसि त्या उचिता;
अस्मत्संबंधी ते नृप; त्यांची विदित मज असे शुचिता. ॥७॥
आल्या मनासि माझ्या; तूं सांग स्वमत; वृद्धिला गोत्र
म्यां त्वांहि पाववावें; योग्यचि तूं, हें नव्हे वृथा स्तोत्र. ’ ॥८॥
विदुर म्हणे, ‘ शिशु आम्हीं; तूं माता, तात, गुरु; करीं हित तें.
स्वकुळकथा काय ? मुदित जग केलें बा ! तुझ्या यशें विततें. ’ ॥९॥
विप्रमुखें भीष्माला कळलें, आराधुनि स्मरहरातें,
गांधारी सुबळसुता झालीसे पात्र शतसुतवरातें. ॥१०॥
धृतराष्ट्रार्थ वराया गांधारीतें, नदीसुतें जवन
त्या गांधारपतिकडे पाठविला दूतवर, जसा पवन. ॥११॥
वर अंध ह्मणुनि कांहीं पहिली पडली विचारणा; परि तो
आला मना. कळंक न चंद्राच्या गुणगणा वृथा करितो. ॥१२॥
गांधारी स्ववराच्या जाणुनि नेत्रांत अंधकारा, ती
बांधीं निजनयनांतें; भावी अंधाहि अंधकाराती. ॥१३॥
नागपुरीं भगिनीचें शकुनी पूजूनि सूरि, दान करी.
नगरपथांतें पंकिल करिती तद्दत्त भूरिदान करी. ॥१४॥
गांधारीनें स्वगुणें गुरुजन, पति, पोष्यवर्ग तोषविले.
नाहींच घेतलें परपुरुषांचें नाम परि न रोषविले. ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP