भगवान गोपालकृष्ण - अध्याय २२ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: । षष्ठादी समारंभ नंतर । श्रीकेशवदत्त गुरुवर । धुळ्यासी आले सत्वर । ज्ञानेश्वर जयंती निमित्तें ॥१॥
या समयी महाराजांनी । रुपये पंधराशें जमवूनी । देणगी दिली स्वहस्तांनी । ज्ञानेश्वरीच्या प्रसारार्थ ॥२॥
महाराजांचे शिष्योत्तम । सद्गुरु श्रीमधुसूदन । यांसी दोंडाईस पाठवून । आणविली ही रक्कम माऊलीनें ॥३॥
गोपालभाई गुजराथी । पावसकर, करमरकर प्रभृती । यांनी वर्गणी जमविण्याप्रति । सहाय्य केले केशवांना ॥४॥
पुढें नित्यनियमानुसार । महाराज निघाले फिरतीवर । पुणे, मुंबई, पंढरपूर । क्षेम कुशलार्थ भक्तांच्या ॥५॥
या वेळीं माऊलीनें । पंढरी दर्शनास आनंदानें । पाठविलें स्वखर्चाने बटु आणि आनंदा भिल्लासी ॥६॥
राष्ट्रीय सेवक संघाचा । मेळावा अति उत्साहाचा । भिवंडीत झाला साचा । अध्यक्षतेखाली माऊलीच्या ॥७॥
गीताजयंतीच्या उत्सवास । पुन्हां माऊली आली धुळ्यास । भक्त जनांच्या तई सौख्यास । उधाण आले पुनवेचे ॥८॥
या जयंतीच्या प्रीत्यर्थ । प्रवचनें, व्याख्यानें, विख्यात । झाली बहु विचार परिलुप्त । गोरे, जोहरे प्रभृतिंची ॥९॥
उत्साहमूर्ती पटवर्धन । वकील धुळ्याचे ख्यातनाम । राबले मित्रासह रात्रंदिन । पार पाडण्या कार्य हें ॥१०॥
सातार्‍याच्या धर्मसभेने । याच वेळीं कीर्तने प्रवचनें । योजिली माऊलीची आदरानें । सुप्रसिध्द शहरीं या ॥११॥
श्रीस्वामी करपात्रजींची । भेट बहुत सुखाची । झाली येथेच माऊलीची । भक्ती संगम अपूर्व ॥१२॥
या वर्षाच्या अखेरीस । स्वाहाकार झाला अमरावतीस । मग केशवदत्त सोनगिरीस । परतले नित्याप्रमाणें ॥१३॥
अठराशें बहात्तराच्या आरंभास । महाराज गेले औदुंबर दर्शनास । दर्शन घेऊन निजकार्यास ।
आरंभ केला माऊलीनें ॥१४॥
संत वाङ्मय ग्रंथालयाची । स्थापना करून मोलाची । श्रीसद्गुरु केशवांची । स्वारी आली भिवंडीस ॥१५॥
भिवंडीच्या मुक्कामांत । होमहवनादि अर्चनेंत । श्रीसद्गुरु केशवदत्त । कार्यमग्न झाले काही दिनीं ॥१६॥
ब्रह्मपुरी, नंदुरबार । येथेंही केले स्वाहाकार । वर्ष शके त्र्याहात्तर । गाजले ऐशा कार्यक्रमे ॥१७॥
यज्ञ, याग, प्रवचनें । कीर्तनें, कथा संमेलने । आयोजुनी माऊलीनें । जनजागृती साधिली ॥१८॥
भिल्लादि वन्य जमातीत । राहूनी त्यांच्या समवेत । धर्मश्रध्देची दिव्य ज्योत । प्रज्वलीत केली अखंड ॥१९॥
कार्य ऐसे हे महान । सातत्ये परिश्रम घेऊन । उसंत न घेता एक दिन । केले केशवांनी तीन तपें ॥२०॥
रात्रंदिनी जनसेवेत । राबले हे महासंत । दीनजनांच्या कल्याणार्थ । स्वदेहासी विसरोनी ॥२१॥
“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।
देह कष्टविती उपकारे ॥तुकाराम॥
तुकोबांची ही उक्ती । महाराजांनी स्वत:पुरती । सार्थ केली, ही प्रचिती । कार्य त्यांचे देईल ॥२२॥
लोकोत्तर या पुरुषावर । प्रिती जनतेची अपार । गांवोगांवीचे भक्तावर । तिष्ठती त्यांच्या दर्शना ॥२३॥
समाज वा धर्मकार्यासी । अगत्ये बोलवावे माऊलीसी । भक्त धरूनी आस ऐसी । उभे ठाकती सोनगिरी ॥२४॥
माऊलीविना कार्यक्रम । यज्ञ याग होम हवन । वाटे तयांना रसहिन । रिझवी न मन तयांचे ॥२५॥
तत्वता जरी धर्मप्रचार । उद्दिष्ट माऊलीचे महत्तर । परी राजकारणाचा आधार । अवश्य असावा म्हणती ते ॥२६॥
या कारणे केशवदत्त । विचार आपुले तर्कशुध्द । निर्भिडपणें मांडित । राजकारणासंबधी ॥२७॥
संतवाङ्मय, भगवतभक्ती । या दोन आदिशक्ती । नेतील भारता अभ्युदयाप्रती । श्रध्दा होती तयांची ॥२८॥
भगवंताचे अधिष्ठान । हेच कार्य-यश-विधान । संतवाक्य हे प्रमाण । मानावे म्हणती केशव ॥२९॥
श्रीकृष्ण भक्तीचा उपदेश । केला केशवांनी अवघ्यांस । तीच भक्ती पुनरुस्थानास । येईल कामी धर्माच्या ॥३०॥
म्हणोनी प्रभु केशवदत्त । बोधिताती सकलांप्रत । मुखें म्हणारे संतत । गोविंद राधे गोविंद ॥३१॥
भारत आपुली जन्मभूमी । संतसज्जनांची सुवर्णखनी । पूर्वसुकृते म्हणोनी । जन्मलो येथे दैववशे ॥३२॥
कीर्तिपताका हिच दिगंत । उभवावी त्रिभुवनांत । आर्य धर्म हाच शाश्वत । एकपणे जाणावा ॥३३॥
याच सूत्राकारणे केशवांनी । महाराष्ट्र अवघा फिरोनी । जागृती केली जनमनीं । अमोघ आपुल्या वक्तृत्वें ॥३४॥
नामघोष कथाकीर्तनें । भजनें मेळावे प्रवचनें । हीच प्रबोधनाची साधने । योजिली प्रामुख्ये प्रभूंनी ॥३५॥
भगवत भक्तीने ओतप्रोत । प्रवचने तयांची सुश्रुत । भक्त भाविकांच्या अंतरात । राहिली अखंड पूर्णत्वें ॥३६॥
यज्ञयागाकडे प्रवृत्ती । माऊलीची जरी विशेषे होती । तरी सर्वसामान्याप्रती । भक्तीमार्ग म्हणती आचरावा ॥३७॥
व्यवहारी या जगात । आग्रही म्हणती केशवदत्त । भक्तीमार्गा व्यतिरिक्त । अन्य न मार्ग मोक्षाचा ॥३८॥
जे जे आपले विहित कर्म । ते ते कारणें निष्काम । हेच जीवनाचे वर्म । जाणा म्हणती केशव ॥३९॥
निजकायीं असता निमग्न । प्रभूचे जो करी चिंतन । ऐहिक तयाचे बंधन । तुटेल अक्षय निश्चये ॥४०॥
मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ । संतसज्जनांनी दाविला स्वयंभ । तो आचरा रे प्रसभ । सांगती केशव पुन: पुन्हा ॥४१॥
संत साहित्याच्या सागरात । डुंबा डुंबा रे संतत । तेणे तुमची सकल भ्रांत । जाईल पुरी विरोनी ॥४२॥
ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी । वा तुकयाची अभंग वैखरी । नेईल तुम्हां पैलतीरी । उल्लंघोनि भवसागर ॥४३॥
माऊलीने ही शिकवण । वारकरी भजने आयोजून । रुजविली अंत:करणातून । सहस्त्रावधी जनतेच्या ॥४४॥
द्रव्य या निमित्ते जे जे । प्रभु केशवांना मिळाले निके । जनकल्याणार्थ ते ते । खर्च केले तयांनी ॥४५॥
वस्त्र वा अन्नदान । औषधे वा विद्यादान । केले याच निधितून । माऊलीने गरिबासी ॥४६॥
ये रिती या पुरुषोत्तमे । पस्तीस वर्षे निरलसपणे । जन जागृती सातत्याने । केली निखळ रात्रंदिन ॥४७॥
माऊलीचे हे उपकार । अगणित किती आम्हावर । जाणीव तयांची निरंतर । हृदयी राहो आमुच्या ॥४८॥
संतवाङ्मयाचा प्रसार । प्रकर्षे व्हावा घरोघर । यासाठीच हे संतवर । महाराष्ट्री जणू अवतरले ॥४९॥
सकल उपनिषदांचे । नवनीता काढूनी साचे । दिले जगासी दिव्यत्वाचे । गीतारूपे प्रभूनी ॥५०॥
हीच गीता तुम्हासी । होईल साधका मार्गदर्शी । नेईल अंती मोक्षासी । ज्ञान भक्ति वा कर्मयोगे ॥५१॥
म्हणोनी गीतेच्या अभ्यासार्थ । श्रीसद्गुरु केशवदत्त । गीता तत्वज्ञान मंडळ धुळ्यात । स्थापन करिते झाले ॥५२॥
फलाशा न धरावी अणूही । स्वकर्म अक्षयी । तेणे आत्मोन्नति लवलाही । होईल केशव ॥५३॥
माऊलीने ही शिकवण । स्वये तत्वत: आचरून । दिली सकल जनां लागून । जीवनी आपुल्या अशेष ॥५४॥
असो आता श्रोतेजन । अनुज्ञा तुमची अपेक्षून । कथा माझीच स्वये कथीन । भेट माऊलीच्या प्रसंगाची ॥५५॥
एकोणीश्शे सत्तेचाळीसांत । माऊली सद्गुरु केशवदत्त । वास्तव्यास होती मुंबईत । कार्तिक मासी दादरला ॥५६॥
ज्ञानेश्वरी उत्सवा प्रित्यर्थ । प्रवचने त्यांची आयोजित । ब्राह्मण साहाय्यक संघात । केली ज्ञानेश्वरसेवा मंडळाने ॥५७॥
माऊलीच्या निरुपणावर । श्रोते लुब्ध होते अपार । संघाच्या आवाराबाहेर । होतसे दाटी भाविकांची ॥५८॥
नित्यनेमे प्रवचनासी । येती भाविक बहुसंख्येनिसी । परि मज पामरासी । न वाटले कधी जावेसे ॥५९॥
त्या काळी आस्मादिक । होते किंबहुना नास्तिक । धर्मश्रध्दा आध्यात्मिक । वावडे होते तयासी ॥६०॥
सीताबाई नामे एक । अक्कलकोट स्वामींच्या अलौकिक । भक्त होत्या विख्यात । रहिवासी दादरच्या ॥६१॥
या चरित्र लेखकाचे । आणि त्या बाईंचे नाते होते निकटचे । सासू आणि जामात ॥६२॥
सीताबाई नियमितपणे । प्रभुकेशवांची प्रवचने । जात ऐकण्या श्रध्देने । ब्राह्मण साहाय्यक संघात ॥६३॥
गोडी या प्रवचनांची । केवळ जणू अमृताची । घ्या एकदा तरी साची । आर्जवे म्हणती आम्हाला ॥६४॥
परि चंद्रबिंब अंधासी । सप्तसूर बहिरटासी । कवित्व जैसे अरसिकासी । होतो आम्ही तैसेच ॥६५॥
प्रवचनाच्या सप्ताहास । नाही गेलो एकही दिस । अहंमन्यता मूढास । कैसी सोडील जाण पा ॥६६॥
पुढे माऊली केशवदत्त । अन्य कार्यक्रमानिमित्त । काही दिवस मुंबईत । राहिली खोपकरांकडे ॥६७॥
पुनरपि सीताबाईंनी । आग्रहे मज विनवुनी । म्हणाल्या दर्शन या घेऊनी । महान या विभूतीचे ॥६८॥
परि आम्ही खट्याळ । अप्रबुध्द अनिर्मळ । विनंती त्यांची सोज्वळ । मानावी केवी सहजपणे ॥६९॥
बाईंनीच मग एके दिनी । स्वये मज हस्ते धरोनी । दर्शनासी नेले निक्षूनी । संत प्रभु केशवांच्या ॥७०॥
ते समयी केशवदत्त । बसले होते निवांत । आसनावरी स्वस्थचित्त । अर्धोन्मिलित नेत्रांनी ॥७१॥
पाहता आम्हा दोघांसी । हर्ष झाला तयांसी । पुसती मग बाईसी । कोण श्रीमान तुमच्या सवे? ॥७२॥
तव आमुच्या सासूबाई । म्हणाल्या माझे हे जावई । दर्शनास आपुल्या लवलाही । आणिले आग्रहे धरोनी ॥७३॥
अग सद्गुरु केशवदत्त । करोनी एक मंदस्मित । पुसते झाले मजप्रत । नांव, गांव, काम-धंदा ॥७४॥
मी बैसल्या बैठकीवरून । म्हणालो नांव माझे यशोधन । सरकारी नोकरी हे साधन । उपजिविकेचे असे माझ्या ॥७५॥
गोष्टी तई इतर । झाल्या बहुत विषयावर । तव माऊली गुरुवर । विचारी प्रश्न एक मिस्किलपणे ॥७६॥
ईश्वराचे अस्तित्व । नसाल तुम्ही मानित । बुध्दिवादी तार्किक । कर्ते स्वयमेव सृष्टीचे ॥७७॥
महाराजांच्या प्रश्नाची । खोच जाणून साची । म्हणालो या विषयाची । गती नाही मज फारशी ॥७८॥
ईश्वराचे अस्तित्व । माझ्या पुरते मानितो सत्य । परि व्यक्तीपूजेबाबत । आहे मी पूर्ण विरोधी ॥७९॥
यावरी प्रभुकेशवदत्त । व्याजोक्तिने म्हणाले मजप्रत । स्पष्टवक्ते आपण सत्यवंत । रामशास्त्र्या सारिखे ॥८०॥
माऊलीचे हे उद्गार । भेदून गेले मम अंतर । मग अनाहुतपणे नमस्कार । घातला पायी तयांच्या ॥८१॥
कृतीची ही नवलाई । पाहोनी माम सासुबाई । विस्मित झाल्या लवलाही । अघटीत कसे घडले हे ॥८२॥
घेवोनि निरोप तयांचा । परतलो मी घरी साचा । स्फुल्लिंग एक विचाराचा । लेऊन अंतरी विशोधित ॥८३॥
दुसरेच दिवशी केशवदत्त । अचानक आमुच्या दारांत । येऊन म्हणाले मजप्रत । येता का आम्हासवे बाहेरी? ॥८४॥
वेळ होती सकाळची । बहुदा साखर निद्रेची । त्या कारणे अस्मादिकांची । शान गेली बिघडोनी ॥८५॥
परि आमुच्या सौभाग्यवतींनी । घेतली वेळ सांभाळूनी । महाराजांना आदरे बसवूनी । पिटाळले मज स्नानासी ॥८६॥
केशवगुरु त्या दिवशी । घेऊन गेले मजसी । मोडकांच्या गृहासी । अभियंते प्रसिध्द मुंबईचे ॥८७॥
दुसरे दिवशी केशवदत्त । अचानक पुन्हा दारांत । येऊनी म्हणाले मजप्रत । येता का मजसवे बाहेरी? ॥८८॥
होऊन पुनरपि नाखुष । म्हणालो रागाने माऊलीस । येतो करोनी स्नानास । बसा आपण खुर्चीवरी ॥८९॥
श्रीस होते त्या दिनी । निमंत्रण दिलेले दांडेकरानीं । उद्यमीं एक ख्यातनामी । कॅमलिन कंपनीचे ॥९०॥
तिसरे दिवशीही तोच प्रकार । पाहून चिडलो अनावर । परि विवेके घातला आवर । मनासी मोठया प्रयत्ने ॥९१॥
येणे रिती दिवस सात । गेलो माऊलीच्या समवेत । मनाविरुध्द सतत । नेतील त्या ठिकाणी ॥९२॥
वास्तविक एका संतांचा । लाभला होता भाग्याचा । सहवास आम्हां सुखाचा । दैववशे करोनी ॥९३॥
परि अज्ञान अंध:कार । अधिष्ठीत होता मजवर । आकळिला नाही अधिकार । संत श्रेष्ठींचा त्यामुळे ॥९४॥
लाज वाटे बहु मजसी । माऊलीसवे फिरावयासी । अनागरी बावळीशी । पाहून त्यांची वेशभूषा ॥९५॥
सातवे दिवशी रात्रीस । म्हणालो मी कुंटुंबास । नकार देईन माऊलीस । सोबतीस उद्या सकाळी ॥९६॥
परंतु अपेक्षेप्रमाणे । केशवांचे नाही झाले येणे । स्वस्थ चित्त राहिलो तेणे । मिटून डोळे पलंगावरी ॥९७॥
रात्री आठाच्या सुमारास । माऊली येऊन आम्हांस । म्हणाली आजचा दिवस । यावे आम्हासंगे शेवटचे ॥९८॥
पुनरपी आम्ही तुम्हास । नाही देणार सायास । वेळ नागरांचा खास । फुकट का घालवावा ॥९९॥
माऊलीचे हे शब्द । घेऊन माझ्या मनीचा वेध । मनकवडेपणा त्यांचा निस्संदिग्ध । दाविला त्यांनी मजप्रती ॥१००॥
कपडे करून त्वरित । निघालो श्रींच्या सोबत । कुठे जावयाचा त्यांचा हेत । पुसले न मी मुळीही ॥१०१॥
दादरच्या वैद्य पथावर । आलो तेव्हा दूरवर । गर्दी लोकांची अपार । संघमंदिरा समिप पाहिली ॥१०२॥
महाराज म्हणाले मजसी । आज आहे आपणासी । जावयाचे प्रवचनासी । त्याच गर्दीत मिळोनी ॥१०३॥
महाराजांचे हे शब्द । ऐकून झालो पुरा सर्द । प्रवचनाची ही ब्याद । कुठून आली नशिबी ॥१०४॥
इतुक्यात एका पोलिसाने । पाहूनी माऊलीस सौजन्याने । गर्दी हटवूनी त्वरेने । मार्ग दिला आंत जाण्यासी ॥१०५॥
संघाच्या सभागृहात । श्रोते असंख्य शांतचित्त । दाटीवाटीने होते ऐकत । प्रवचन रसाळ वाणीचे ॥१०६॥
तंव व्यासपीठावरून । अकस्मात शब्द आले सदगदित । श्रोते क्षमा असावी मजप्रत ।
थांबवितो प्रवचन क्षणभरी ॥१०७॥
भाग्ये आपुले बहुथोर । म्हणून एक संतवर ।  आले आज येथवर । दर्शन द्यावया आपणासी ॥१०८॥
राखावया तयांचा आदर । उभे रहावे सकलांनी क्षणभर । माऊलीस आणावे स्टेजवर । स्वयंसेवकासी अज्ञापिले ॥१०९॥
संबोधणारी ही व्यक्ती । होती करवीरमठाधिपती । शंकराचार्य कुर्तकोटी । बुध्दिसागर धर्ममणी ॥११०॥
ही प्रत्यक्ष गुरुमाऊली । जन्मजन्मांतरीची साऊली । आज माझ्या निरूपणा आली । भाग्य म्हणाले आमुचे ॥१११॥
मग सद्गुरु माऊलीसी । आदरे धरोनी हातासी । कार्यकर्त्यांनी नेले स्टेजपासी । आसनस्थ व्हावया ॥११२॥
मी मागेच रेंगाळत । राहिलो मध्येच तिष्ठत । होऊनी अति विस्मित । अधिकार पाहूनी केशवांचा ॥११३॥
तव देखिले एक अघटित । माऊली सद्गुरु केशवदत्त । बोलावित होती मजप्रत । स्टेजवरी बैसावया ॥११४॥
दिव्य दोन विभूती महान । झाल्या होत्या विराजमान । व्यासपीठावर समसमान । रवी चंद्र जणू तेजस्वी ॥११५॥
तेथेच एक आसन । ठेविले होते अधिच आणून । कुणा अभ्यागतासाठी राखून । शेजारीच या सुभंगाच्या ॥११६॥
मग केशवदत्त गुरुवर । म्हणाले मज सत्वर । “या बसा” ह्या आसनावर । विलंब नको प्रवचनी ॥११७॥
माऊलीचे ऐकून हे उद्गार । मन माझे झाले सैरभैर । होऊनी बधीर । कापरे सुटले अंगासी ॥११८॥
कुठे हे प्रज्ञावंत ज्ञानसिंधू । कुठे मी पामर अज्ञबिंदू । कुठे हे वीतरागी आनंदकंदू । पद्महस्ती महाजन ॥११९॥
हे ज्ञाननभीचे भास्कर । नीती भक्तीचे आगर । किंबहुना प्रत्यक्ष ईश्वर । ठाकले माझ्या समोरी ॥१२०॥
या महाभागांबरोबर । कैसा बैसू मी पामर । बैसल्यास माझी कदर । काय होईल जाण पां ॥१२१॥
जे हिमनगाची उत्तुंगता । सकल सरितांची पवित्रता । चंद्रकलेची धवलता । शांति सुख परब्रह्म ॥१२२॥
त्यांच्या समवेत बैसण्याची । योग्यता नव्हती खास आमुची । जाणून पायरी स्वत:ची ।
बैसलो मग पायी माऊलीच्या ॥१२३॥
नयनी अश्रू घळघळा । लागेल वाहूं ते वेळा । अत्यानंदे दाटला गळा । पाहुनी अनुराग केशवांचा ॥१२४॥
माऊलीस लेखुनी सामान्य । वागलो तयांसी फटकून । अनादर दाविला उपेक्षून । कर्म करंट्या सारिखा ॥१२५॥
परि माऊलीने मजवरी । विसरून प्रमाद झडकरी । वर्षाव कृपेचा सरोभरी । केला जणू जाहिरपणे ॥१२६॥
शंकराचार्य आणि केशवदत्त । यांच्या एकत्र सान्निध्यात । बैसण्याचा मान खचित । शुभंकर मज लाभला ॥१२७॥
या अद्वितीय क्षणापासून । अनुतापे दग्ध होऊन । झालो केशवांच्या पायी लीन । भक्त म्हणून तयांचा ॥१२८॥
पुढे सद्गुरु केशवदत्त । ज्या ज्या वेळी मुंबईस येत । त्या त्या वेळी समवेत । अवश्य मी राहतसे ॥१२९॥
माऊलीचा कृपाहस्त । राहिला मस्तकी आमुच्या सतत । दिवस आजचे हे सुखद । आशीर्वाद केवळ तयांचा ॥१३०॥
श्रीसद्गुरु केशवांची । आणि या चरित्र लेखकाची । भेट झाली अखेरची । व्यासांच्या घरी मुंबईला ॥१३१॥
श्रीसद्गुरु केशवदत्त । एकोणीसशे बावन्नात । आले होते मुंबईत । उपचारासाठी कॅन्सरच्या ॥१३२॥
भक्त त्यांच्या दर्शनास । येत होते रात्रंदिस । परंतु त्यांच्या भेटीस । मनाई होती डॉक्टरांची ॥१३३॥
परि भाग्य या लेखकाचे । असावे कांही अनन्य साचे । तेणे गुरु माऊलीचे । लाभले मज पददर्शन ॥१३४॥
पाहोनी मला उभा दारांत । व्यासांना म्हणाले केशवदत्त । सोडा या माणसाला आंत । भेटावया मजलागी ॥१३६॥
खूणनेच मज दर्शवून । घेतले जवळी बसवून । पलंगावरी समीप आसन । होते त्यावरी माऊलीचे ॥१३७॥
मग प्रभू केशवांनी । हस्त आपुला उचलोनी । मम मस्तकी ठेवोनी घर्षण केले कुंतलांचे ॥१३८॥
आम्हा उभयता नयानांत । अश्रू होते अखंड वाहात । कसले आणि कशाचे ज्ञात । झाले नाही कुणाला ॥१३९॥
काहीं क्षण मी भान रहित । विसरून माझे अस्तित्व । केशवांच्या पदी राहिलो रत । अनुभूती एक आगळी ॥१४०॥
हाच समजून प्रसाद । होऊन मी सद्गद । माऊलीचा निरोप हृद्य । घेतला तोच अखेरचा ॥१४१॥
केशवांचा कृपा आधार । राहिला मजपाठी निरंतर । त्या कारणे मी पामर । चरित्र लेखक झालो तयांचा ॥१४२॥
बिज्ञाप्ति तुम्हां श्रोतेजन । नका मानू हे निवेदन । आत्मस्तुती वा आत्मकथन । कृपळू मज होऊनी ॥१४३॥
केशवदेवे कृपा केली । सकळ कामना फळा आली । चरित्र रुपे आता माऊली । करो साऊली तुम्हा आम्हा ॥१४४॥
इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । बाविसावा अध्याय संपूर्ण ॥९७॥
॥ इति द्वाविंशतितमो‌ऽध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 03, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP