भगवान गोपालकृष्ण - अध्याय ५ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण नम: परम मंगल । वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: ।
लौकीकार्थाचे शिक्षण । महाराजांनी केले पूर्ण । कुठें आणि कैसें ते कथन । केलें मी गत अध्यायी ॥१॥
आत्या एक महाराजांच्या पैठण क्षेत्रानजिकच्या । “पिंपळ्गाव” नांवाच्या । ग्रांमात होत्या राहत ॥२॥
केशवप्रभू कांही दिवस । आले तिकडे राहावयास । वाटला मनीं संतोष । हात मायेचा फिरतां पाठीवरी ॥३॥
इथेच पांडुरंग दीक्षित । धार्मिक आणि सच्छील गृहस्थ । यांचाहि कृपाहस्त । राहिला स्कंधी तयांच्या ॥४॥
या द्वयींच्या आशिर्वादें । श्रीस्वामी केशवांचे । दिन गेले सुखाचे । ज्ञानार्जन-पथ आक्रमीतां ॥५॥
वैराग्य वृत्तीचा उद्गम । इथेच झाला सुगम । परमार्थाचे गूढ वर्म । याच गांवी आकळिलें ॥६॥
विधि    लिखीतानुसार । नव्हता ऐहिक संसार । मुद्रित तयांच्या भालावर । संकेत राखोनी वेगळा ॥७॥
रजतमाचा परिहार । सात्विकतेचा स्वीकार । भूतमात्रा आदर । हाच संसार तयांचा ॥८॥
दुरिताचें दु:ख हरावें । स्व-हितासी विसरावे । वोखटे सकल विवरावे । हाच जीवनार्थ तयांचा ॥९॥
लक्ष चौर्‍याऐशी जन्मगती । घेतां नरजन्माची प्राप्ति । म्हणोनी तयाची महती । जाणा म्हणती संतजन ॥१०॥
अपूर्व ही मानव कुडी । जन्मा न ये घडीघडी । ठेवणें हे सुरवडी । चित्तीं साधका सदैव ॥११॥
याच देहीं नराचा । होतो नारायण साचा । मिळे प्रकाश कैवल्याचा । परमार्थ ज्ञानां गिंवसिता ॥१२॥
जन्ममरणाची येरझार । चुकणें अति दुष्कर । परी साधका ती सुकर । होई, ज्ञानदीप उजळीता ॥१३॥
उचित आपुले कर्म । आचरावे निष्काम । प्रभुपदी जाणोनि सुमन । अर्पावे नि:संग वृत्तीनें ॥१४॥
इंद्रियें राखोनी हातीं । सेवका जैसे राबविती । ते कर्मयोगी यथामती । मोक्षास पावती अढळ ॥१५॥
महाराज हे जन्मजात । होते परम ईशभक्त । या कारणें त्याचें चित्त । ठाके न ऐहिक प्रबंधी ॥१६॥
दीन जनासी आस्था । भूतमात्रासी समानता । सौजन्य तैसी निर्भीडता । गुण येरे अलौकिक ॥१७॥
लेऊन ऐसी खेवणे । स्थितप्रज्ञाची लक्षणें । देश आणि धर्माकारणें । जन्म यांनी घेतला ॥१८॥
निजकार्याची रूपरेषा । करोनिया स्पष्ट दिशा । केला तयांनी श्रीगणेशा । घेऊनी दर्शन सिध्दाचे ॥१९॥
हेच ते परम प्रख्यात । सद्गुरु श्रीशिवदत्त । ज्याच्या कृपेचा वरदहस्त । राहिला मस्तकी तयाच्या ॥२०॥
पांचाळेश्वर नामे सुरेख । आहे एक पवित्र क्षेत्र । तेथेच तयांचा सहवास । झाला भक्तवर केशवासी ॥२१॥
नयनासी मिळता नयन । अंतरीची जाणली खूण । प्रेमाचे अमूप उधाण । आले हृदयी दोघांच्या ॥२२॥
ठेविता तयाचे चरणीं । भाल आपुलें केशवांनी । अश्रू आले उभय नयनीं । गंगा-यमुना प्रितीच्या ॥२३॥
सद्गतित होऊन म्हणाले । आज आमुचें चांगभलें । तेणे मज लाभले । पाय आपुले कृपाळा ॥२४॥
आपुल्या चरणी निरंतर । राहावे मनी गुरुवर । अंतरिची इच्छा प्रखर । फळा यावी दयानिधे ॥२५॥
नरजन्माचे सार्थक । न व्हावे कधीं निरर्थक । मनी घेऊनी संकेत । आलो तव पदीं गुरुवरा ॥२६॥
व्हावा मज आपुला अनुग्रह । निरसावे मनीचे विग्रह । कामक्रोधादि मायामोह । परिहार व्हावा तयांचा ॥२७॥
भूतमात्रासी राहावी प्रीती । सत्कर्मी वाढावी रती । देहास या मिळावी अंती । मुक्ति तव पदीं गुरुराया ॥२८॥
ऐकोनी ऐसी विनवणी । शिवदत्त म्हणाले हांसोनी । ज्ञानदीपास कां ज्योतीनी । याचना करावी प्रभेची ॥२९॥
तूं प्रत्यक्ष ज्ञानवंत । निरवधीचा प्रज्ञावंत । कैवल्यानंदि निभ्रांत । केशवदत्त त्रिगुणात्मक ॥३०॥
विवेक वैराग्याची केयुरे । लेऊनी आलासी आदरे । पायीं भक्तिची घुंगुरे । स्वयें गोपाळे बांधिली ॥३१॥
तो श्यामसुंदर मुरारीं । गोपीमन रमण गिरिधारी । तव हृदयीं निर्धारी । वास करी अखंड ॥३२॥
तव मानसीचे इप्सित । होईल सफल निश्चित । राहिल माझा वरदहस्त । अभयाचा मस्तकी ॥३३॥
शिवदत्तांची ही अमृतवाणी । ऐकोनी केशव प्रभूनी । कृतकृतार्थ मग होऊनी । चुंबिली पदांबुजे तयांची ॥३४॥
उठवोनी मग तयांसी । लाविले त्यांनी हृदयासी । बैसविले आपुल्या पायाशीं । ‘कल्याणमस्तु’ म्हणाले ॥३५॥
हे विटेवर कुलोत्पन्न । सकल विद्यासंपन्न । म्हणतील तुम्हां सकलजन ‘केशवदत्त’ यापुढे ॥३६॥
अज्ञानाचे तिमिर । दूर करील हा संतवर । भागवत धर्माचा प्रचार । करील लोकसंग्रही ॥३७॥
शिवदत्तांचा सहवास । लाभला श्रीस कित्येक दिवस । पूर्व सुकृताचे सुयश । मूर्तीमंत आले होऊनी ॥३८॥
योगयोगादि जपध्यान । आध्यात्माचे विवेचन । भागवतादि ग्रंथाचे वाचन । केले सन्निध तयांच्या ॥३९॥
या पवित्र पांचाळेश्वरी । वाहुं लागले सरोभरी । कासार भरले दुथडी । भक्ति-ज्ञान-वैराग्याचे ॥४०॥
एक पंजाबी महात्मे । ज्यांच्या अपूर्व समागमे । शिकले योग-योगासने । केशवदत्तमहाराज ॥४१॥
नाथषष्ठीच्या उत्सवांत । रमले असतां आनंदात । भेटले तयास हे महंत । शिवदत्तांच्या कृपेनें ॥४२॥
हरिद्वाराचे हे रहिवासी । प्राक्तने आले पांचाळेश्वरासी । ध्यानमार्ग शिकविण्यासी । केशवदत्त प्रभूंना ॥४३॥
ध्यानधारणेचे धडे । शिकले केशवदत्त यांजकडे । स्वानंदाचे अमृतघडे । यांनीच दिले तया हातीं ॥४४॥
करूनी ही विद्या आत्मसात । महाराज रमले आनंदात । समाधिस्थिति आणि चिंतनात । काळ गेला सुखाचा ॥४५॥
तोंच ऐके सुवर्ण दिनीं । सिध्द पुरुष शिवदत्तांनी । महाराजांसी बोलावूनी । बैसविले जवळ आपुल्या ॥४६॥
सद्गदित होऊन शिवदत्त । म्हणाले ‘बा केशवदत्त’ । तुज भेटेल एक महासंत । भविष्यांत नजिकच्या ॥४७॥
याच महापुरुषाचा । होशील तूं शिष्य साचा । असत्य न ही माम वाचा । बोलिले शिवदत्त केशवांसी ॥४८॥
ऐकतां ही अमृतवाणी । आले केशवांच्या नयनीं पाणी । रोमांच उठले तत्क्षणी । अंगी त्यांच्या प्रेमभरें ॥४९॥
धन्य धन्य म्हणाले आज । पाहिला दिन गुरुराज । राहतील आपुले पदाबुंज ।हृदयीं माझ्या अखंडीत ॥५०॥
शिवदत्तांची आज्ञा प्रमाण । शिरोधार्य मग मानून । पांचाळेश्वरासी ठेविले प्रस्थान । तीर्थ-यात्रा कारणें ॥५१॥
घेऊनी निरोप सकलांचा । संतसज्जन सहृदांचा । मुक्काम पांचाळेश्वराचा । हलविला प्रभु केशवांनी ॥५२॥
पांचाळेश्वराचे सीमोल्लंघन । करोनि हे आनंदघन । ध्वजा भक्तीची घेवोन । आले मग आळंदिसी ॥५३॥
आळंदी क्षेत्र महान । जेथें संत सकलादि जन । नित्य घेती दर्शन । ज्ञानदेव माऊलीचे ॥५४॥
इंद्रायणीचे कांठी । प्रत्यक्ष येऊनी जगजेठी । प्रेमे मारिती मिठी । ज्ञानराज माऊलीस ॥५५॥
सिध्दबेट, अजानुद्रुम । सोनियांचा पिंपळ सुवर्म । माऊलीचे तपोवन । अलंकापुरीची केयुरें ॥५६॥
पाहतां ही अति आदरे । नयनांची फिटति पारणे । जननमरणाकारणें । पुनरपी येणे घडेना ॥५७॥
निरंजन समाधिवरी । ठेवितां मस्तक क्षणभरी । भवभार होतसे दुरी । ज्ञानप्रकाशे निश्चित ॥५८॥
ज्ञानाचिया हा ज्ञानेशु । भक्तभाविकांचा हृषीकेशु । प्रत्यक्ष भगवान विष्णु । वास करी येथे अशेख ॥५९॥
याच तपोभूमींत । चालविली निर्जीव भिंत । विनम्र झाले बलवंत । चांगदेव महामुनी ॥६०॥
माय मराठी भूमीची । रत्नें अनेक संतांची । आभूषणें श्रीहरिची । इथेच भेटली एकमेकां ॥६१॥
इथेच त्यांनी साधिल्या । चारही मुक्ती भल्या । इतरां कारणें ठेविल्या । पदमुद्रा दर्शनासी ॥६२॥
संतसज्जनांची मांदियाळी । इथेच सांजसकाळीं । हरपली नामकल्लोळी । रामकृष्णहरी गर्जतां ॥६३॥
आळंदीत येऊन । इंद्रायणीचे केले स्नान । मग समाधिचे दर्शन । घेतले प्रभू केशवांनी ॥६४॥
घालतां साष्टांग नमन । हृदय आलें भरून । झाले अंतरी समाधान । मायमाऊली भेटीचे ॥६५॥
चित्त करून एकाग्र । अंतरीचे भाव समग्र । एकरूपे केल विनम्र । समाधिवरी माऊलीच्या ॥६६॥
अनुरागें भरलें ऊर । येऊनी दुथडी पूर । वोसंडले हृदयमंदिर । अमृतधारा शांतीच्या ॥६७॥
याच अलंकापुरीत । वास केला दिस बहूत । अध्यात्मोन्नतीनिमित्त । केशवदत्त गुरुंनी ॥६८॥
स्नानसंध्या जपजाप्य । इंद्रायणीतीरी करावें नित्य । समाधित बसावें ध्यानस्थ । नियम रोज तयांचा ॥६९॥
एकनाथी भागवताची । पारायणें करावी नित्याची । कथाकीर्तनें सुविचारांची । श्रवण करावी एकाग्रे ॥७०॥
ज्ञानेश्वरीचे वाचन । मनन आणि आचरण । कल्पतरुतळी अजान । केले तयांनी सुखैवे ॥७१॥
ओवी ओवीतील अमृत । होऊन साकार शब्दार्थ । हृदयीं साठविला भावार्थ । यथार्थ रूपे केशवांनी ॥७२॥
शास्त्रग्रंथाचे परिशीलन । ज्ञानेश्वरीचे अध्ययन । वादविवाद विवेचन । विपुल केले तयांनी ॥७३॥
ज्ञानभांडारीची मौक्तिकें । वेचिलीं अति विवेकें । अथाव अर्थ कौतुके । दिव्य दृष्टीनें धुंडाळिले ॥७४॥
ज्ञानरूपी अमृत । प्राशूनी अति उत्कट । ज्ञानची झाले बहुश्रुत । ज्ञानेश्वरी-हृदय प्रत्यक्ष ॥७५॥
भावार्थदीपिकेचा प्रकाश । घेऊनी सवें सहर्ष । श्रीसद्गुरु केशवदत्त । निरोप घेती आळंदीचा ॥७६॥
आळंदीहून पुण्यनगरी । तेथून मग पंढरपूरी । वस्तीस राहिले भीमातीरी । भक्तिवीणा छेडीत ॥७७॥
तुकयाचे गोड अभंग । गावे होऊनी नि:संग । निजानंदी व्हावे दंग । विठठल भजनीं रमावे ॥७८॥
रूप प्रभुचे सगुण । नयनी घ्यावे साठवून । अंतर्यामी मग निर्गुण । पहावे अंत:चक्षूनी ॥७९॥
प्रात:काली गंगास्नान । काकडारती भजनपूजन । धूपारती कथाकीर्तन । दिनक्रम ऐसा चालतसे ॥८०॥
रूप पहावे लोचनी । प्रेमाश्रू यावे नयनीं । चित्त व्हावे उन्मनी । लागोनी लय प्रभूपदी ॥८१॥
नामयाचा पांडुरंग । जनाईचा श्रीरंग । राहिला इथे अखंड । उभा भक्तकाजासी ॥८२॥
इथेच दुमदुमले वैकुंठ । भक्तीरस प्याले आकंठ । महाराष्ट्राचे परम संत । विठठल विठठल गर्जुनी ॥८३॥
या अवघ्या संताची । भेट भाव-भक्तीची । घडली अपूर्व साची । वाङ्ग्मरूपें केशवांसी ॥८४॥
राहूनी तयी पंढरीसी । रिझविले श्रीहरीसी । नामघोषे दिननिशीं । केशवदत्त गुरुनीं ॥८५॥
सगुणाचा साक्षात्कार । झाला तया सत्वर । राहिले वनमाळी निरंतर । हृदयीं इथेच तयांच्या ॥८६॥
संतपदांची भूषण । प्रसन्न होऊनी श्रीहरीने । चढविली स्वहितानें । अंगावरी तयांच्या ॥८७॥
परब्रह्माचा वरदहस्त । मस्तकी घेवोनी संतश्रेष्ठ । निघाले होऊन संतुष्ट । उत्तर यात्रेकारणें ॥८८॥
भक्ती ज्ञानाची शिदोरी । घेवोनी स्वयें बरोबरी । आले तंव यमुना तीरीं । वृंदावनी महाराज ॥८९॥
तेज:पूंज गौरवर्ण । कांती जणूं सुवर्ण । रूप अति मनोरम । देखोने धाले ब्रिजवासी ॥९०॥
याच यमुनेच्या तीरीं । वाजवितो श्रीहरी । पावा धरोनी अधरी । भक्त-काम कल्पद्रुम ॥९१॥
वृदांवन हें आनंदवन । भूलोकीचें नंदनवन । स्मरता तो नंदनवन । रोमांच उठती सुखावह ॥९२॥
प्रभुलीला गायनी तल्लीन । दिसतील येथील भक्तजन । वैकुंठीचे परब्रह्म । प्रेमास्तव इथे प्रकटले ॥९३॥
वृंदावनीचे जंगल । लता, वेली, वृक्ष सफल । सुखद आणि परम मंगल । प्रत्यक्ष वैकुंठ भूवरी ॥९४॥
श्रीवृंदावन धाम । लोचनीं पाहतां सशर्म । तयाचे परम कल्याण । होईल निश्चित जाण पा ॥९५॥
या वचनाची अनुभूती । गोपाळ आजही कथिती । धेनू राखितां ऐकती । मंजूळ ध्वनी मुरलीचा ॥९६॥
सव्रेंद्रियें कृष्णापायी । ठेऊनी चारिती गाई । मधुर आनंद प्रत्यही । सेविती नित्य गोपाळ ॥९७॥
उन वा तहानेने अति । गुराखी जव मुर्च्छित होती । जागृती देतो तयाप्रती । सुखस्पर्शें श्रीरंग ॥९८॥
कदंब वृक्षाखाली श्यामसुंदर वनमाळी । उभा राहोनी मुखी घाली । नवनीत त्यांच्या सौरसे ॥९९॥
भगवंताचें मनोरम । रूप देखणे बघून । साक्षात्कार सगुण । निजानंदे अनुभवती ॥१००॥
कररूपी सुपात्रांत । भक्तांच्या जेवतो भगवंत । घालूनी घांस मुखांत । एकमेकां सानंदे ॥१०१॥
प्रात:काली यमुनातीरी । भूषणांकृत पितांबरधारी । गोप बैसला निर्धारी । श्यामसुंदर पाहावया ॥२॥
तेणे गोपीसी झाला संभ्रम । पाहुनी या मनोरम । हाच का वारिज भूषाभरण । प्रकाश-सुंदर श्रीहरी ॥३॥
दर्शनोत्सुक निर्धारी । उध्दवावीण आजवरी । कोण असेल अंतरी । व्याकुल भक्त एवढा! ॥४॥
यासाठीं श्रीहरीने । दिधली आपुलीं आभूषणें । वस्त्रें तैसी प्रावर्णे । निजभक्त उध्दवासी ॥५॥
भक्तासी होतो एकरूप । मेघश्याम सुस्वरूप । तई ईश आणि ईशभक्त । द्वैतभाव उरेचि ना ॥६॥
वृंदानवीचे वृक्षवर्म । जाणेल जो सुगम । दिसेल त्यास मेघ:श्याम । पानापानांत अन् शाखेवरी ॥७॥
वाजवून पावा मंजूळ । संमोहिले जयाने विश्व सकल । तो हा प्रभू निर्मल । दिसेल वृंदावनी शोधिल्या ॥८॥
उध्दवासारखा भक्त । हरीसी प्रिय अत्यंत । त्यासाठी निज वैकुंठ । सोडोनी येतो अवनिवरी ॥९॥
व्रजवासीयां देण्या आनंद । उध्दवासी पाठवी गोविंद । पाहुनी भक्तराज सानंद । हर्षले गोपगोपी मानसी ॥११०॥
प्रभूच्या विरहाची हुरहूर । भक्तराजाच्या दर्शनें दूर । झाली संपूर्ण निराहार । किंतु मनीचा निमाला ॥११॥
उध्दवाचे अंतरात । वास करी भगवंत । तेणे परी पडे भ्रांत । कृष्ण-उध्दव कोणता? ॥१२॥
पुन: पुन्हा उध्दवाला । निरखोनी जरी पाहिला । गोपगोपीस वाटला । पितांबरधारी श्रीकृष्ण ॥१३॥
होऊनी गोळा सभोवतीं । नम्रपणें उध्दवास म्हणती । हे प्रभो कमलापती सांग तूं कोन आहेस? ॥१४॥
तंव उध्दव म्हणे हांसोन । करावया तुमचे सांत्वन । नंदयशोदेचे समाधान । पाठविले मज मुकुंदे ॥१५॥
मग गोपी पुसती उध्दवाप्रत । ठेवावया मस्तकी हस्त । येईल केव्हा अच्युत । अधीर आम्ही भक्तवरा ॥१६॥
श्रीकृष्ण दर्शनाचे औस्तुक्य । गोपगोपींचे तादात्म्य । पाहून उध्दव प्रत्यक्ष । प्रेमांतच गेला विरोनी ॥१७॥
धन्य तुम्ही गोपगोपी । धन्य तुमची अनुरक्ती । अनुपम तुमची कृष्णाप्रिति । कृतकृत्य तुम्ही भाग्यवंत ॥१८॥
मृदुचित द्रुतचित । ऐसे  असती जे भक्त । तयासीच कैवल्य नवनीत । स्वयंज्योति भगवंत देतसे ॥१९॥
भाव वा प्रेम साक्षात्कार । घेती सगुण आकार । सर्व सुखाचे आगर । वृंदावन गोकुळ भूतळीचे ॥१२०॥
याच वृदांवनी । सद्गुरु केशवदत्तांनी । ब्रह्मानंदी निमग्न होऊनी । कांही काळ घालविला ॥२१॥
इति श्रीयशोधनविरचित । श्रीसद्गुरु केशव चरित । भक्तभाविका होवो सुखद । अध्याय पांचवा संपूर्ण ॥२२॥
॥ इति पंचमोऽध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP