भगवान गोपालकृष्ण - अध्याय २ रा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम् कल्याण नम: परम् मंगल । वासुदेवाय शांताय यदूनाम पतये नम: ॥
आंता श्रोते सज्जन । करोनी तुम्हा पुन्हा नमन । केशवदत्त प्रबंध कथीन । दुसरा अध्याय जयाचा । अ.२रा
महाराष्ट्र देश निर्मळ । जैसे पवित्र गंगाजळ । जेथे भक्तिनीतिचे निखळ । वाहती झरे पीयुषांचे ॥१॥
याच भूमीत अमूप । संतसज्जनाचे आले पिक । ज्ञान वैराग्य विवेक । फळें बहरली गोमटी ॥२॥
इथेच गर्जते पंढरी । जयजय रामकृष्ण हरी । पताका घेवून स्कंधावरी । वैष्णव भागवत धर्माची ॥३॥
याच प्रसारार्थ । संत उदेले उथार्थ । जीवन आमचे कृतार्थ । केले पाजुनी बोधामृत  ॥४॥
म्हणोनी सोनगीर भाग्यंवत । वास करिती जेथें महासंत । किर्ती तयाची दिंगत । पसरली सौरभासारखी ॥५॥
गांवोगांवीचे अनेक । भक्तजन आणि भाविक । मुमुक्षु तैसे तार्किक । येऊं लागले सोनगीरी ॥६॥
चंद्रकले जैसे वर्धमान । झाले सोनगीर कैवल्यधाम । महाराज पूर्ण चंद्रासमान । ज्ञानचंद्रिका वर्षती ॥७॥
साईनाथा कारणें शिर्डीस । आले महत्व त्या ग्रामास । तैसेच बाबजी परमहंस । वाढविती महत्त्व सोनगीरीचे ॥८॥
पूजाअर्चादि दिनक्रम । चालला होता नित्यप्रेम । भक्तवृंद सकाम निष्काम । दर्शना येई सांजसकाळीं ॥९॥
महाराजांचे उपकार । अनंत झाले गांवावर । उतराई त्यांचे सादर । व्हावें कैसे प्रश्न उभा ॥१०॥
या प्रश्नाचा विचार । कसा न ये आजवर । खंत झाले भक्तवर । म्हणती कांही तरी केले पाहिजे ॥११॥
मग महाराजातर्फे कमेटी । पंच नेमूनी केली नेटकी । किसनसिंगादीप्रभृती । सामील केल्या तीयेंत ॥१२॥
शेट गुजराती काशीदास । तुळशीराम देशमुख । भोकन शिंपी, फुंदीलाल । इत्यादि पंच नेमिले ॥१३॥
आनंदा तुकाराम वाणी । रामजी पांडू भक्त नामी । यांचीहि नावे आवर्जूनी । सांगितली पाहिजेत ॥१४॥
श्रावण वद्य षष्ठीपासून । महाराजांचा उत्सव योजून । द्वादशीपर्यंत संपूर्ण । आयोजीत केला तयांनी ॥१५॥
उत्सवाचा पहिला दिवस । थाळनेरचे सुप्रसिध्द । व्यापारी शिवलालशेट । साजरा करिती स्वखर्चे ॥१६॥
याशिवाय जामनेरकर । लोटू पाटील बध्दपरिकर । श्रीमंत काकसाहेब गरुड । अती उत्साहे भाग घेती ॥१७॥
गावोगांवीचे हरिदास । आग्रहें येती उत्सवास । महाराज उत्राणकर खास । पुराणिक हजेरी लाविती ॥१८॥
विष्णुबुवा गुढेकर । नामवंत किर्तनकार । सेवा प्रभूच्या पुढें सादर । करिती अत्यंत मनोभावें ॥१९॥
यांचे किर्तन बहुरसाळ । श्रोते विसरती काळवेळ । हरिनामाचा अखंड कल्लोळ । जय जय रामकृष्ण हरि ॥२०॥
प्रत्यक्ष गुरुगोविंद । कीर्तनांत होती दंग । एकरूप होऊनी सानंद डोलती । फणींद्रासारिखे ॥२१॥
आज्ञा करिती सकळजनां । जे वांच्छिती स्वकल्याणां । सोडूं नका नामसंकीर्तना । “नाम गावो नाम बोलो” ॥२२॥
गुरुचरित्राचे पारायण । श्रीमद्भागवताचे पठण । अभिषेक आणि वारकरी भजन । टाळमृदंग ध्वनी घुमे ॥२३॥
हा सप्तदिनीचा उत्सव । वर्णनातीत जयाचे लाघव । प्रत्यक्ष प्रभू सावयव । जनता रूपें प्रकटेल ॥२४॥
एकादशीस अभ्यंगस्नान । श्रीस घालिती भक्तजन । पुजा आरती द्रव्य दान । षोडषोपचारे होत असे ॥२५॥
श्रीच्या पादुका आणि भागवत । पालखीत ठेऊन सुशोभित । सोनगीरीच्या प्रमुख रस्त्यांत ।
मिरवणूक निघे सवाद्यें ॥२६॥
पालखीच्या बरोबर । चार पावलें अंतर । स्वयें चालती गुरुवर । मग परतती मंदिरा ॥२७॥
पालखीचा सोहळा । जे पाहती स्वडोळां । त्या भक्तगणा सकळा । दिवस सोनियाचा लाभला ॥२८॥
पालखी निघे सकाळीं । ती परते सायंकाळीं । टाळमृदुंग भजन मंडळी । गर्जती विठठल श्रीविठ्ठल ॥२९॥
राधेगोविंद राधेगोविंद । लागो मना हाच छंद । उदंड ऐसा स्वानंद । म्हणती देई गा गुरुवरा ॥३०॥
शेवटच्या दिवशी भंडारा । भक्त फिरती माघारा । नयनीं येती अश्रुधारा । ठेविता मस्तक गुरुपदी ॥३१॥
या उत्सवाची परंपरा । आजही दिसेल रसिकवरा । जातां प्रतिवर्षी सोनगीरा । ज्येष्ठ वद्य षष्ठिस ॥३२॥
महाराजासी जाता शरण । कृपा तयांची अनन्य साधारण । होईल जैसी पखरण । करी माता तान्हुल्यावरी ॥३३॥
पाटील नामें एक भक्त । म्हणती चलावे भगवंत । सिंहस्थास नासिकाप्रत । स्नानास जाऊ गंगेच्या ॥३४॥
महाराज तया म्हणती । तुम्हीं व्हावें त्वरें पुढती । आम्ही आलोच मागुती । पर्वणी वाया दवडू नका ॥३५॥
तैसे त्वरीत पाटिल । गेले नासिकासी लगोलग । वाटलें त्यास मागोमाग । स्वामी येतील निश्चयें ॥३६॥
नासिक येथें आल्यावरी । पाटिल गेले गंगेवरी । तोंच रामकुंडावरी । पाहिले प्रत्यक्ष स्वामींना ॥३७॥
पाहूनी गुरुगोविंद । पाटलासी झाला अत्यानंद । वंदन करूनी सहृद । विचारी “महाराज केव्हां आला” ॥३८॥
महाराज उद्गारले तेधवा । आलो आम्हीं कधी केव्हां । याची उठाठेव कां तुवां । वचनपूर्ती झाली ना ॥३९॥
येवढे बोलून महाराज । क्षणांत झाले अंतर्धान । पाटिल अवाक् होऊन । शोध घेती सर्वत्र ॥४०॥
तैं पाटिल माघारा आले । समस्तासी कथन केलें । महाराज गोदातीरी भेटले । स्नान भागिरथीचे करितांना ॥४१॥
सर्वांस वाटलें नवल । हें अतर्क्य कैसे घडेल? । सांगति जे पाटिल । तथ्य त्यांत कांही नसे ॥४२॥
महाराज एकही दिवस । नव्हते गेले या सुमारास । सोडून सोनगीरीस । दिवास्वप्न पाहती पाटील ॥४३॥
तैं महाराज म्हणाले प्रत्यक्ष । पाटिल सांगती ते सत्य । आम्ही होतो नासिकास । स्नानास दोघे गंगेवरी ॥४४॥
महाराजांचे ऐकून उत्तर । भक्त उमजले सत्त्वर । हा अलौलिक चमत्कार । असे गुरुगोविंदाचा ॥४५॥
पाटलाचे मन गहिंवरले । नयनीं अश्रू दाटले । पाय प्रभूंचे भिजवीले । घालून साष्टांग प्रणिपात ॥४६॥
असतां महाराज सोनगीरी । प्रत्यक्षांत दिसले गोदातीरीं । लीला अगम्य ही परी । सिध्द एकच करूं जाणे ॥४७॥
रावेरकर नामें एक भक्त । पूर्वी प्राक्तनें तयास दिसली । व्यक्ती एक तेजस्वी भली । डोळे दिपले तयाचे ॥४८॥
एकोणीसशें दोनसाली । पूर्व प्राक्तनें तयास दिसली । व्यक्ती एक तेजस्वी भली । डोळे दिपले तयाचे ॥४९॥
मग हे रावेरकर । आले हळुहळु मार्गावर । भक्ति नीति सदविचार । सुचूं लागले तयासी ॥५०॥
करूं लागले चिंतन मनन । समर्थांचे ग्रंथवाचन । झाले त्यांचे प्रबोधन । रामीं रामदास अभ्यासतां ॥५१॥
दिनकरस्वामींचे भाग्य । आपणांस कां व्हावे अलभ्य । समर्थांचे दर्शन सुभग । इच्छा मनीं प्रगटली ॥५२॥
लावून बसले अंतर्ध्यान । करीत आत्मचिंतन । तोंच नयनीं देदिप्यमान । मूर्ती तेज:पुंज पाहिली ॥५३॥
झाली आठवण तयाप्रती । पाहिली होती मूर्ती । प्रत्यक्ष तीच आतां प्रतीती । सोळा वर्षानी जाहली ॥५४॥
झाला साक्षात्कार तेधवां । सोनगीरीस यावे तुवां । विचार अन्य न  करावा । समर्थ आणि मी एकची ॥५५॥
सोनगीरीस आले रावेरकर । विनम्र होती गुरुचरणांवर । तोंच महाराज बोलती सत्वर ।“अकेले क्यूं न आया तूं”॥५६॥
महाराजांचा प्रश्नार्थ । उमजले रावेरकर सार्थ ॥ आशा तृष्णा ऐहिक । नाहीं सुटल्या आपल्या ॥५७॥
गोष्ट होती तत्वतां खरी । आरोप होता त्यांचेवरी । केली होती मारामारी । कोर्टात केस चालू असे ॥५८॥
मानसीची ही कुरकुर । घेऊन आले बरोबर । त्यासंबंधी गुरुवर । वरील उद्गार बोलले ॥५९॥
रावेरकर म्हणती गुरुराया । तवपदीं वाहिली मी काया । संकट माझें निवायावया । तुम्हीच आतां समर्थ ॥६०॥
महाराज हांसले क्षणैक । म्हणती जा होईल सारें ठीक । पहा संताचें कवतुक । अनुभवा येईल लवकरी ॥६१॥
महाराजांनी एक कागद । लिहून त्यावरी  कांही शब्द । उदी लावूनी तोच प्रसाद । घातला ओंजळीत तयांच्या ॥६२॥
पुढें आपलिचें निकालात । सुटले हे गृहस्थ हातोहात । गेलेली नोकरीही त्वरित । मिळाली त्याच हुद्यावरी ॥६३॥
संतकृपेकारणें हा पुरुष । पहा कसा सुटला निर्दोष । म्हणोनी साधका । विशेष । संतसंग जोडावा ॥६४॥
रघुनाथ धोंडो भागवत । चार्वे गांवचे एक गृहस्थ । सच्छिल आणि देवभक्त । गेले बद्रीनारायण यात्रेसी ॥६५॥
यात्रा करूनी सुखद । परतले घेऊनी गंगोदक । दृष्टान्त तयासी झाला देख । गंगा आणावी सोनगीरी ॥६६॥
सोनगीरीचे महंत । महाराज श्रीगोविंद । यांचे चरणी हें तीर्थ । अर्पण करावें यात्रिका ॥६७॥
या दृष्टान्ताप्रमाणें । भागवत आले त्वरेनें । स्नान घातलें स्वच्छेने । गुरुगोविंदा गंगोदकें ॥६८॥
स्नान घातले ज्या दिवशी । होती वद्य श्रावण एकादशी । निघते पालखी याच दिवशी । गोविंद गुरुच्या उत्सवा ॥६९॥
कैसा पहा हा सुयोग । आपैसे आला सुभग । भागवंताचे सदभाग्य । पर्वणी अपूर्व साधीली ॥७०॥
कुठले गोविंद कुठले सोनगीर । नव्हते ज्ञात आजवर । परि भागवत चार्वेकर । पूनीत झाले आनंदवनीं ॥७१॥
कोटली गांवचे सज्जन । नांव जयांचे पाटील मदन । आले घ्यावया दर्शन । सोनगीरी एकदां ॥७२॥
वेळ माध्यानिची दुपार । धुवून पाय विहीरीवर । आले गुरुंच्या ओसरीवर । साष्टांग दंडवत घातले ॥७३॥
तोंच जोडल्या करावर । केला गुरुगोविंदे प्रहार । दंडयानें हातीच्या प्रखर । हात दुखवला पाटलांचा ॥७४॥
पाटील झाले मूर्च्छित । पडले तंव भूमीलगत । नेलें तयांस गांवात । करावया योग्य उपचार ॥७५॥
पाटलांसी झाल्या वेदना अती । रात्रभर झोंपच नव्हती । नाना विचार मनीं येती । दर्शना पुन्हां जाणें नको ॥७६॥
प्रात:काली लवकर उठून । तालुक्याचे गांवीं जाऊन । दाखवाया आलेला सुजून । हात, प्रसिध्द हाडवैद्यां ॥७७॥
उठले सकाळीं पाटील । उरकले प्रातर्विधी सकल । तोंच त्यांचे मनीं बदल । झाला तात्काळ ते वेळीं ॥७८॥
दर्शन घेतल्यावीण गुरुचें । जावे रागानें पैं साचे ।  हें लक्षण नव्हे सदशिष्याचें । पाटील मनीं वरमलें ॥७९॥
आले तसेच आनंदवनी । ओघळती तयाच्या अश्रु नयनीं । प्रश्न विचारिला महाराजांनी ।
क्यूं मुह बताने आया तूं ॥८०॥
विकल्पें ग्रासिले जे मन । ते आपैसे जाणती संतजन । आपण मात्र मूढ अज्ञान । भलत्या मार्गे धांव घेतो ॥८१॥
पाटील ऐसा विचार करीती । तोंच त्याच्या हातावरती । पुन्हां तडाखा स्वामी मारिती । कालच्याच सारिखा ॥८२॥
तों काय जाहलें ऐका वृत्त । श्रोतें भाविक समस्त । हात झाला त्यांचा पूर्ववत । सूजही उतरली ते बळीं ॥८३॥
अश्रू आले घळघळा । म्हणती पाटील स्नेहाळा । नाहीं ओळखिले कृपाळा । क्षमा आतां करावी ॥८४॥
पाटलाचें अंत:करण । काठोकांठ आले भरून । होऊन स्वामीचरण लीन । भक्त अशेख जाहले ॥८५॥
विष्णू नीलकंठ काळे । प्रथम सोनगीरीस आले । जयासी होते फोजदार नेमिले । सन एकोणीसशे सात सालीं ॥८६॥
सोनगीरीसी असतांना । येती नित्यनेमें दर्शना । श्रध्दा आणि अध्यात्मभावना । अंगी तयांच्या बहूत ॥८७॥
महाराजांच्या लीला अनेक । भाग्यें पाहिल्या प्रत्यक्ष । अनुभवाची एक साक्ष । कथीतो त्यांच्या मुखेंच मी ॥८८॥
धुळें येथें राहणारे । नांव जयाचे पुरंदरे । आले एक दिनीं आदरें । स्वामी दर्शनार्थ सोनगीरी ॥८९॥
हे म्युनिसीपालटीचे नोकर । नेटका तयांचा संसार । परि होते चिंतातूर । भूतबाधे ग्रासिले ॥९०॥
महाराजासी केले निवेदन । होऊनी तयापुढे हीनदीन । तई महाराज कृपाधन । म्हणाले “भृत निकालेंगे” ॥९१॥
मग महाराजे आणविली । एक लहानशी बाटली । शेंदूर, लिंबे उडीद, चुनडी । साहित्य जमा करविले ॥९२॥
शेंदूराचे काढोनी रिंगण । मध्ये पुरंदर्‍यासी बसवून । लिंबे चराचरा कापून । पिशाच्च उठविलें तयांनी ॥९३॥
संचार करितां अंगी भूत । पुरंदरे झाले अस्वस्थ । त्या क्षणीं त्या बाटलीत । कोंडिले भूत गुरुराये ॥९४॥
म्हणाले आतां उठवा ही शीशी । गाडून टाका तलावापाशी । या पुढें पुरंदर्‍यासी । झोंबले ना भूत कधीं ॥९५॥
तंव बाटली उचलावयासी । मी झालो पुढे चटदिशी । बापूशेट कासारानिशी । दुसरे दोघे स्वामीभक्त ॥९६॥
बाटली ती काय वीतभर । जड झाली परि खंडीभर । हालेना ही तसुभर । आम्हां चौघा जणांसी ॥९७॥
महाराज ही गंमत । पाहात होते सस्मित । म्हणाले कां संचित । नेट लावा एकीचा ॥९८॥
चौघांनी आम्ही कसेबसे । उचलोनीं हें महापिसे । तलावासमीप खासे । गाडीलें चरांत सहाफूटी ॥९९॥
पुरंदर्‍यासी नंतर । झाला न कधीं भूतसंचार । स्वामीचे हे उपकार । फेडीले भंडारा करोनी ॥१००॥
महाराजांची ही कथा । नाहीं केवळ लोककथा । सरकारी अधिकारी जी तत्वंता । सांगती स्वमुखें सकलांसी ॥१०१॥
बापू रावजी जोशी पातोडयाचे रहिवासी । म्हणाले आपुल्या बंधूशी । जावे दर्शना सोनगीरी ॥१०२॥
धुळ्याचे वाटेवर गुरुगोविंदाचे मुक्तद्वार । खानदेशीचे संतवर । आशिर्वाद घे तयांचा ॥१०३॥
ठेव रुपया तयापुढें । मग जा धुळ्याकडे । काम कैसें रोकडे । होईल पहा निर्विघ्न ॥१०४॥
येणेप्रमाणे प्रल्हादराव । उतरले नरढाणे स्टेशनावर । टांगा करून लवकर । आले गुरुगोविंदा भेटावया ॥१०५॥
नम्र होऊनी चरणासी । हात घातला खिशासी । ठेवण्या रुपया पायाशीं । सद्गुरु गोविंद प्रभूंच्या ॥१०६॥
तोंच हातास आला पैसा । ठेऊ लागले पुढेच तैसा । तंई महाराज म्हणाले, कैसा । कंजुष भक्त पहा हो ॥१०७॥
अरे तुम्हास घरसे । बोलाथा भाई तुमसे । एक रुपया हमसे । अर्पन करना न भुले ॥१०८॥
महाराजांची वरील वाणी । प्रल्हाद जोशी मनीं जाणोनी । शरमिंदा होऊनी गुरुचरणीं । केली विनवणी क्षमेची ॥१०९॥
महाराजांनी योगवले । पहा कैसे हें जाणीलें आश्वर्य सकळां वाटले । म्हणती महाराज सर्वज्ञ ॥११०॥
पुढें हे प्रल्हादराव जोशी । अकस्मात पडले मृत्युमुखीं । माता तयांची बहुदु:खी । पुत्रशोक आवरेना ॥१११॥
आली मनासी उध्दिगता । म्हणाली गुरुगोविंदनाथा । मत् पुत्र तव भक्त असतां । प्रसंग मजवरी कां ऐसा ॥११२॥
तंव तीयेसी झाला दृष्टान्त । दु:खे आपुली दैवजात । भोगणे ती क्रम:प्राप्त । चुकले नाहीं देव ही ॥११३॥
असो महाराजांच्या लीला ऐशा । सांगाव्या किती आणि कैशा । वानगीदाखल किंचितशा ।
वर्णिल्या श्रोते तुम्हांप्रती ॥११४॥
गोविंद-चरित्र अगाध । लीलाही तयांच्या विविध । संपूर्णपणें विशद । करणे सामान्य काम नोहे ॥११५॥
खद्योतें गभस्तिस । टिटवीनें अगस्तिस । वा दंवबिंदुने मेघास । कानडी इर्षा कैसी धरावी ॥११६॥
महाराजांचे भक्त अनेक । त्यां सर्वांचा उल्लेख । करणें येथे दुरापास्त । श्रोते क्षमा करावी ॥११७॥
मोतीराम आबा कासार । भिकाजीराव जमादार । केळकर आणि चिकेरूकर । भक्त महाराजांचे परम ॥११८॥
अनंत महादेव जोशी । इचलकरंजीचे निवासी । दिपचंद पितांबर शिंपी । नांवे कैक सांगावी ॥११९॥
चौधरी भादू देवाजी । मोतीलाल माणिकचंद शेटजी । अण्णाजी यादव, गुरुजी । भक्त श्रध्दाळू भाविक ॥१२०॥
डॉक्टर चाटी अक्कलकोटचे । महाराजांचे भक्त साचे । माधवराव फाटक चित्रकलेचे । ख्यातनाम कलावंत ॥१२१॥
ऐशी भक्तांची सुमनांजली । आदरे म्या ओंविली । भाग्यें वाहाया पद्मकमलीं । गुरुगोविंद प्रभूंच्या ॥१२२॥
इति श्रीयशोधनविरचित । श्रीसद्गुरु केशवदत्तचरित । अनुसंधे गोविंदलीलामृत । अध्याय दुसरा संपूर्ण ॥१२३॥
॥ इति द्वितीयोऽध्याय: समाप्त॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP