निरंजनपर ओव्या

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


वंदोनिया सद्गुरूसी । शुद्ध विवेकाची राशी । सांगतों मी श्रोतियांसी । ऐकोनि घ्यावी ॥१॥
निजवर्णाश्रमधर्म । आचरोनि किर्याकर्म । भगवंतीं सदा प्रेम । असूं द्यावें. ॥२॥
नित्य आत्मा परिपूर्ण । अनित्य हे सर्वजन । ऐसें मनीं विवेचन । करिता जावें ॥३॥
सर्व त्रैलोक्यामाझारीं । उपभोग नानापरी । तुच्छ मानावे अंतरी ।  विष्ठेसम ॥४॥
शमदमादि साधन । हळुहळू संपादून । मोक्षहेतूलागी मन । उदित व्हावें ॥५॥
जगामाजी सदाचारी । ब्रह्मनिष्ठा परोपकारी । ऐशा गुरूंतें सत्वरी । शरण जावें ॥६॥
मग ते अधिकार पाहून । सांगतील तुजला ज्ञान । जेणें होय समाधान । अक्षयीं तुझें ॥७॥
सोडवुनी देहबुद्धी । लाविती आत्मसमाधि । ऐक आतां त्याचा विधी । सांगतों तुज ॥८॥
नव्हेसी तूं स्थूळदेह । तुजला तो दृश्य होय । तैसाचि तो लिंगदेह । नोहेसी तूं ॥९॥
स्वरूपाचें जें अज्ञान । दोन्ही देहांसी कारण । तोहि नोहेसी तूं जाण । द्रष्टा तूं त्याचा. ॥१०॥
तिन्ही देहांचें लक्षण । जाणसी तूं जेणें गुण । तो तूं महाकारण । नोहेसीबा ! ॥११॥
चहूं देहां विलक्षण । साक्षी याचा तूं चिद्धन । त्वंपदाचें शोधन । ऐसें करी. ॥१२॥
आतां तत्पदशोधन । ऐक स्थिरावुनि मन । विराट पंचभूत जाण । सोडोनि द्यावा. ॥१३॥
इंद्रचंद्रादि सुरगण । हिरण्यगर्भ येणें गुण । अव्यक्त अज्ञान । सोडावेंची. ॥१४॥
चवथा देह मूळमाया । भासविली जगत्रया । तेहि समजोनि वायां । सांडावी पां. ॥१५॥
चारीदेहांपरता । परमात्मा निरुता । त्यासी तुशीं अभेदता । पाहे पां बरी. ॥१६॥
घटीं मठीं गगन । असे जैसें एकपण । पिंड ब्रह्मांडीं चिद्गगन । तैसें पाहीं. ॥१७॥
पिंड ब्रह्मांड उपाधी । सोडोनियां शुद्धबुद्धि । चिदाकाश निरवधि । पाहे पां सर्व. ॥१८॥
शुद्ध नभ जें सपुर । जया नाहीं अंतपार । तेंचि ब्रह्म निर्विकार । जाणें बापा ! ॥१९॥
तेंचि निर्मळ निराधार । अखंडित निराकार निश्चित पारावार - । रहित जें कां. ॥२०॥
सदा चिद्धनानंद । तें हें जाणें असिपद । देशकाळवस्तुभेद । नाहीं जेथें. ॥२१॥
करीं तयाचें चिंतन । एकांतासीं बैसून । समकाय दृढासन । करोनियां. ॥२२॥
सोडोनि विषयध्यान । माघारीं फिरवीं मन । हृदयीं चिद्रगन । पाहें पां बरें. ॥२३॥
तेथें न रहातां स्थिर । धावुनि जाईल विषयावर । त्यासी आणूनि वारंवार । स्वरूपीं ठेवीं. ॥२४॥
ऐसा करितां अभ्यास । स्थिरावेल दिवसंदिवस । संकल्पविकल्पास । सांडोनिया. ॥२५॥
जावोनिया विलयासीं । सर्व दु:खाचिया राशी । मोद प्रमोदानंदेसी । सुखिया तेथें. ॥२६॥
दृश्य द्रष्टा दर्शन । त्रिपुटी हे होय क्षीण । तेथें आपुला आपण । दुसरा नाहीं. ॥२७॥
नाहीं सृष्टीचा व्यापार । ब्रह्मा विष्णु महेश्वर । इंद्रादिक सुरवर । नसती तेथें. ॥२८॥
तेव्हां स्फूर्ति स्फूरण । हेंहि जाय वितळून । न म्हणतां एकजण । जैसें तैसें. ॥२९॥
ऐसें निर्विकारपण । सृष्टीपूर्वीं ब्रह्मजाण । तेथें अहं ऐसें स्फुरण । होतें जालें. ॥३०॥
तिचें नांव मूळमाया । चिद्विवर्त गा सखया ! प्रसवली गुणवया । अहंकारासी. ॥३१॥
तया अहंकारापासून । जन्म अवकाशालागून । त्याचें पोटीं झाला पवन । अग्नी तेथें. ॥३२॥
अग्नीपोटी जालें जळ । जळ अवनीचें तें मूळ । पृथ्वी वनस्पती सकळ । प्रसवली. ॥३३॥
वनस्पतीयोगें रेत । रेताचिनि प्राणी होत । ऐसा मायेचा संकेत । प्रगटला. ॥३४॥
शुद्धस्वरूपीं स्फुरण । तया मायेमाजी जाण । व्यापक जें चैतन्य । ईश्वर तो. ॥३५॥
तेणें मायेच्या योगानें । केलें सृष्टिविस्तारण । पिंडब्रह्मांड रचून । व्याप्त जाला. ॥३६॥
तोचि अविद्या घेउनि । पिंडामाजी प्रवेशोनि । मिथ्या सृष्टी जीवपणीं । मानिली सत्य ॥३७॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । होवोनियां तो ईश्वर । स्थिति उत्पत्ति संहार । करीतसें. ॥३८॥
अग्नि पाणी वर्षून । प्राणी मरती संपूर्ण । पृथ्वी जाय विरून । उदकामाजी. ॥३९॥
अग्नि आपासि गिळून । जाय वार्‍यासी मिळून । वायु आकाशी पळून । लयासी जाय. ॥४०॥
शब्द आणि अवकाश । अहंकार स्फूर्तिभास । प्रकृतींत समरस । होती सर्व ॥४१॥
ब्रह्म आणि मूळमाया । एकपण असे तया । जैसी शरीराची छाया । शरीरासवें. ॥४२॥
जैसी सुवर्णाची कांती । किंवा दीपकाची दीप्ति । अभेदत्वें निश्चिती । असे सदा. ॥४३॥
मायायोगें भसे जग । तेहि ब्रह्मीं एकलग । जैसे सुवर्णाचे नग । सोनेपणें. ॥४४॥  
जैसा तंतुयोगें पट । किंवा मातीयागें घट । दुजा भासे परिस्पष्ट । एकपणें. ॥४५॥
तैसें ब्रह्मीं जग भासे । भासे परी दुजे नसे । एकपणीं भ्रमवशें । भासलें दुजें. ॥४६॥
भ्रमवशें शुद्ध दोर । भासूं लागे फणिवर । तैसें ब्रह्म निर्विकार । विकारी भासे ॥४७॥
आदिमध्यअवसानीं । रज्यू जाला नाहीं फणी । तैसें ब्रह्म जगपणीं । जहालें नाहीं. ॥४८॥
ब्रह्म अद्वय निर्मळ । शुद्ध बुद्ध सर्वकाळ । नसे द्वैताचा मळ । जयाठायीं. ॥४९॥
ऐसा अनुभव घेउनि । राजयोगिया होवोनि । जीवन्मुक्तीसी भोगुनी । राहे सुखें ॥५०॥
सेवुनि दया क्षमा शांति । भक्ति प्रेम भगवंतीं । करी सत्कर्माची रीती । पहिल्यासम. ॥५१॥
रघुवीराची शिकवण । ऐशापरी उमजून । जहालों मी निरंजन । तैसा तूं होईं ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP