कुशलवोपाख्यान - अध्याय अकरावा

‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.


( स्रग्धरा )
सौमित्रीशीं कुशाशीं प्रखरतररणीं ज्या क्षणीं योग जाला,
सीतेचा सूनु गर्जें निरखुनि मृगराड् उग्र जैसा गजाला ।
सोडी पांचां शरांतें घनरवरिपु; तो त्यांसि तोडूनि, बोले,
‘ मागें न स्यंदनातें कर, तव पिशितें तर्पितों आजि कोलें. ’ ॥१॥
ऐसें बोलोन, तेणें स्वरिपुरथ शरें ताडितां भोंवताला,
भोवें वेगें मुहूर्त क्षितिवरि करितां अश्व गेले लयाला. ।
तो अन्यस्यंदनस्थ, द्रुत विशिखयुगें वर्म तोडूनि पाडी,
कोपें बाणत्रयानें त्वरित हरिपदीं तत्किरीटासि धाडी. ॥२॥

( पृथ्वी )
म्हणे कुश, ‘ भला ! भला ! त्यजुनि वैरिता संप्रती,
रणांत हरिलेंसि तूं जरि मदीय भाराप्रती, ।
तुझ्या बळभरासि मी हरिन आज, विश्वास हा
मनीं धरुनियां रहा, शरगणासि माझ्या सहा. ’ ॥३॥

( स्रग्धरा )
आग्नेयास्त्रास सोडी कुश, अनळ तदा भाजुनी तद्रथाला,
जाळी वीरव्रजाला, ध्वजरथतुरगां उष्ट्रकांला गजांला. ।
नाना शस्त्रें जळालीं, कितिक शिखिभयें योधवृंदें पळालीं,
छत्रें वर्में गळालीं; सुरुचिर वसनें फार भस्मीं मिळालीं ॥४॥
सौमित्री वारुणास्त्रें शमवित, दुसर्‍या मारुतास्त्रासि सोडी,
तेव्हां वायु प्रचंड ध्वज, रथ गज, जे त्यांसि अत्यंत झोडी. ।
आकाशीं शुष्कपर्णापरि किति फिरती, भ्रांत सारे पदाती.
स्वर्गातें वृक्ष जाती, द्विजसम उडती शैलही, भीति देती. ॥५॥

( शार्दूलविक्रीडित )  
सेनानी मग लक्ष्मणाप्रति म्हणे, ‘ मी यासि संहारितों,
एकाकी तंव साध्य होईल, पहा, अस्त्रांस मी वारितों. ’ ।
ऐसें ऐकुनियां म्हणे कुश, ‘ वृथा मूढा ! किती जल्पसी ?
त्वज्जिव्हा हरितों बरें, मदिषुला छेदों जरी कल्पिसी. ’ ॥६॥

( स्रग्धरा )
ऐसें बोलोनि, जिव्हा हरि बळपतिची, तोहि बाणें कुशाला
ताडी कोपें हृदब्जीं, क्षितिदुहितृसुतें तत्कर छिन्न केला. ।
अर्धेंद्वाकारबाणें मग रुचिर शिर च्छेदितां, रामबंधू
सेनानीमृत्युकाळीं बहुत खवळला मानसीं शौर्यसिंधू. ॥७॥

( शार्दूलविक्रीडित )
आधीं अर्पुनि बाण दारुण सहा, अर्पी बळें शक्तिला; ।
कुंतातें, असिला गदेसि मग तो दावी महाशक्तिला.
त्यागी मुद्गर आणखी परशु या दोहींस, त्यांला करें ।
सीतेचा सूत सप्तधा क्षितितळीं छेदूनि पाडी शरें. ॥८॥
ज्यांपासूनि नभोंतरीं शिखिशिखा विद्युत्समा फांकती,
ऐसे बाण लवाग्रजें कवळितां लोकेशही धाकती. ।
त्यांहीं लक्ष्मणाहृत्कपाटकवच च्छेदूनियां भेदिलें,
त्यातें भूवरि पाडिलें मग कुशें मूर्छास्वहस्तीं दिलें. ॥९॥
जेव्हां दूरुनि बंधुसिंहनिनद श्रोत्रीं तयाच्या धसे,
पाहे, तों बळराजिवेष्टित लव क्ष्माजासुताला दिसे. ।
हातीं घेऊनि खङ्गचर्म, परम क्रोधें तदा धांवला,
अग्नीलागिं सहाय मारुत जसा जाऊनियां पावला. ॥१०॥

( पृथ्वी )
द्विधा गज विदारिले, रथहि धूळिला अर्पिले,
पदातिहय चूर्णिले, पिशिपभूक् क्षणें तर्पिले. ।
कितेक पललक्षमाधर विनिर्मिले क्ष्मातळीं,
कितेक रुधिरें नदी, कितिक कूप, वापी, तळीं. ॥११॥

( उद्गीतिछंद )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं ।
अकरावा अध्याय श्रवण करावा रसज्ञमुख्यांनीं ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP