कुशलवोपाख्यान - अध्याय नववा

‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.


( स्रग्धरा )
शत्रुघ्न क्रुद्ध तेव्हां नवशरनिकरें शत्रुला क्षिप्र ताडी,
तो त्याचें, तद्रथाचें, रज अनिलकरें स्वर्गलोकासि धाडी. ।
सौमित्रीच्या हृदब्जीं क्षत करुनि, रथोपस्थदेशींच पाडी.
तत्सेनामांसखंडें बककरटशिवागृध्रयूथासि वाढी. ॥१॥

( प्रहर्षिणी )
त्याकाळीं बहुतचि तत्करें गळाले जे होते मग हतशेष, ते पळाले. ।
दैवानें लवहि तदा विमोह जाला; आलिंगी, नमन करून अग्रजाला. ॥२॥
‘ बंधो ! त्वां बहु अनवद्य कर्म केलें, दुष्टाचें कटक बरें क्षयासि नेलें. ।
त्वद्योगें लवहि न शत्रुभीति मातें, तूं आज्ञा कर, धरितों तुरंगमातें. ॥३॥

( मयूरी )
आज्ञा होतां सीतापुत्राची, हातें वृक्षीं बांधी श्रीरामाच्या वाहातें. ।
युद्धाकांक्षी वाय्वग्नीसे ते बंधू एके जागीं झाले शौर्याचे सिंधू. ॥४॥

( शार्दूलविक्रीडित )
गेले जे हतशेष सैनिक, तिहीं साकेत आसादिलें.
स्वस्वांतीं म्हणती, ‘ अहो ! बहु बरें सत्कर्य हें साधिलें ! ’
झाले सावध, यज्ञमंडपमहाद्वारासि ते पावले.
तद्दृग्भृंग रघूत्तमांध्रिकमलामोदार्थ झेपावले. ॥५॥

( विबुधप्रिया )
मेखळारुरुचर्मपिप्पलदंडशृंगसभाजित,
स्वर्णभूतनयासमन्वित भूमिदेवसभाजित, ।
होमधूमविलोहितेक्षण, सानुकंपनिरीक्षित,
प्रेक्षिला भरताद्युपासितपाद, राघव दीक्षित. ॥६॥

( प्रहर्षिणी )
ते सारे म्हणती, नमून ‘ पूर्णकामा ! श्रीरामा ! रघुतिलका ! पवित्रनामा ! ।
त्वद्वाजी क्षितिवर हिंडतां, तयाला पूजूनी सकळहि लोक पूत झाला. ॥७॥

( गीतिवृत्त )
धरिला तुरंग ज्यांहीं रविनंदनलोकमार्गही त्यांहीं. ।
एवं स्वामी ! पाहीं, विजयचि झाला तव प्रतापांहीं. ॥८॥

( शार्दूलविक्रीडित )
एवं तो हय रक्षिला, नृपजनें शत्रुघ्न वाखाणिला,
वाल्मीक्याश्रमसन्निध त्वदनुजें वीरेश्वरे आणिला. ।
कोणेक द्विजबाळ विघ्न करिता झाला पथीं, त्याप्रती
येतां जिंकुनिया, तदग्रज दुजा आला महादुर्मती. ॥९॥
तेणें सानुज सैन्यपाळ वधिला, शत्रुघ्नही ताडिला
हृपद्मीं बहु तिक्ष्णबाणनिकरें, निर्जीव तो पाडिला, ।
केले त्या शिशुनें असें तव बळीं शार्दूलविक्रीडित,
आलों त्वच्चरणासमीप नृपते ! तत्साध्वसें पीडित. ’ ॥१०॥

( हरिणी )
परिसुनि म्हणे त्यांतें सीतापति, ‘ भ्रमलां कसे ?
शिव ! शिव ! पिशाचाविष्टोक्तासमान मला दिसे. ।
हर ! हर ! नसो यज्ञस्थानीं प्रजल्प. उगे रहा.
मदनुजनिला ताडी ऐसा न विष्णु, न वृत्रहा. ’ ॥११॥

( शार्दूलविक्रीडित )
ऐसें ऐकुनि, त्यासि वंदुनि शिरीं, ते बोलती सन्मती,
‘ देते ज्ञान, अनादि मोह हरुनि, त्वन्नामधेयस्मृति. ।
पैशाचभ्रमजन्म होईल विभो ! आम्हासि कां ? शर्मदा !
तूझे सेवक, तूज गाउनि, तुला संप्रेक्षितां सर्वदा. ॥१२॥

( अनुष्टुप् )
ऐसें ऐकूनियां राम पावला हृदयीं श्रम. ।
मग बोले लोककामकल्पद्रुम मनोरम. ॥१३॥
‘ जंबुकें वधिला सिंह, बुडाला गोष्पदीं करी, ।
झाली कशी कालगत्या विपरीताचि हे परी ? ॥१४॥

( स्रग्धरा )
रे वत्सा ! लक्ष्मणा ! तूं लवणरिपुचिया मृत्युपाशासि खंडीं,
वाजीतें सोडवूनि द्विजशिशुसि बरें मद्यशोघ्नासि दंडीं. ।
वीरा ? तूं मेघनादांतक, मजहुनिही कीर्ति तूझी विचित्रा,
त्वां पुत्रें लोकवंद्या, अदिति जसि, तशी माय माझी सुमित्रा. ॥१५॥

( शार्दूलविक्रीडित )
आज्ञा वाहुनि मस्तकीं, नमुनियां सौमित्र तेव्हां निघे
तत्सेनाहतदुंदुभिस्वन तदा स्वर्गासि पाहूं रिघे. ।
एकस्त्रीव्रतपूत सर्व भट ते प्रोद्दामवीर्यास्पद
स्वांतीं मानिति जीवितासि तृणवत् सिंधूसिंही गोष्पद. ॥१६॥
वाजींच्या खुरकुट्टणें करुनियां पाषाण झाले चुरा,
सांगायास्तव रेणुदूत बहुधा गेला सुरांच्या पुरा. ।
भूभृत्कल्पमतंगजोद्भटघटाभाराकुलांगी धरा,
कन्यापुत्रविनाश मानुनि जणों, झाला तिला कापरा. ॥१७॥
गेल्या शुत्रजनांगनाक्षियुगुलीं तत्सैन्यधाकें धुनी,
होतें जें तृण तेंहि रामरिपुचीं तुंडें बळें शोधुनी. ।
होतां हीन लताद्रुमें न मग तीं संशोभती काननें,
जैशीं रामसुरद्रौतद्गुणलतासंत्यक्त लोकाननें. ॥१८॥

( अनुष्टुप् )
एवं सौमित्रि जाउनी रणभूमीस पावला. ।
जीवशेष, धरासंस्थ, निजानुज विलोपिला. ॥१९॥

( उद्गीतिछंद )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलव्याख्यानीं ।
हा नववा अध्याय श्रवण करावा रसज्ञमुख्यांनीं. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP