मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद २४१ ते २६०

दासोपंताची पदे - पद २४१ ते २६०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


२४१
भक्तजन - कामधेनू अवधूतु हा सगूणु. ॥१॥धृ॥
वो ! माहेर माझे माये ! वाट पाहे; कां पां ! नये ? ॥छ॥
दिगंबरु दीनत्राता कयी पाहिन मी येतां. ॥२॥

२४२
भक्तजन - चिंतामणी अवधूता तूं जननी. ॥१॥धृ॥
रे ! चिंतनीं ध्यानीं मनीं आठवेसी अंतःकरणीं. ॥छ॥
दिगंबरा ! ( तुझी आण ) आन नेणें तूजवीण. ॥२॥

२४३
परब्रह्म सुखसार ! मनबुद्धी - अगोचर ! ॥१॥धृ॥
रे ! कमळनयनरूप ! ज्ञेय सानले स्वरूप. ॥छ॥
दिगंबर दिव्यमान अहंमतीचें कारण. ॥२॥

२४४
जनजाया चिदव्यया ! दृश्य दिसे तें पैं माया. ॥१॥धृ॥
रे ! आत्मयां ! भेदहीन केवि भजें मी निर्गुण ? ॥छ॥
दिगंबरा ! तूं मीं ब्रह्म; तेथ कैचें रूप नाम ? ॥२॥

२४५
मिसळले गुणी गुण. रूपीं निमालें हें मन. ॥१॥धृ॥
रे ! अवधूता ! केवि स्मरें ? तुज कैसेनी वीसरें ? ॥छ॥
दिगंबरा ! तुझां ठायीं मीतूंपणस्फूर्ति नाहीं. ॥२॥

२४६
जपुतप तीर्थाटण माझें हेंचि ब्रह्मज्ञान. ॥१॥धृ॥
रे ! अवधूता ! तुझें ध्यान माझें सकळ साधन. ॥छ॥
योग यज्ञ दान क्रीया दिगंबरेंवीण वाया. ॥२॥

२४७
मन माया, मन पर, मन निज निर्विकार. ॥१॥धृ॥
रे ! मना ! तूझें करणें गुण - मती तें मी नेणें. ॥छ॥
दिगंबरीं माया मन, हेही मनें कळे खूण. ॥२॥

२४८
निदा मुक्तामनें बंधू. मनें बंधन विछेदु. ॥१॥धृ॥
रे ! मन्ना ! तूंचि सर्व. नाहीं तूतें पूर्वापूर्व. ॥छ॥
दिगंबरीं मन क्षर. सेव मनचि अक्षर. ॥२॥

२४९
लय लक्षमान मृषा. वृत्तिरंजन मनसा. ॥१॥धृ॥
रे ! मन्ना ! तूंचि पर सुखमय चिद्विसार. ॥छ॥
दिगंबरीं मने मोक्षु. मनें घेतला तो पक्षु. ॥२॥

२५०
मन माझें नये आया रूपीं तुझां योगिराया ! ॥१॥धृ॥
रे ! मन्नाचें तूं बीज सत्य स्वरूप सहज. ॥छ॥
दिगंबरिं आटे मन; तरि चुके संसरण. ॥२॥

२५१
मनें ध्येला तोचि योगु. मनें मानिला तो भोगु. ॥१॥धृ॥
रे ! मन्ना ! तूझें करणें ! काये करिसी ? मी नेणें. ॥छ॥
देव भक्त मनें केलें. दिगंबरु मन जालें. ॥२॥

२५२
ध्यानीं, मनीं, सूचिंतनीं, आठवसी प्रतिक्षणीं. ॥१॥धृ॥
रे ! आत्मयां ! योगिराया ! आदिगुरो ! दत्तात्रया ! ॥छ॥
दिगंबरा ! तुझें ध्यान करी अवस्था भेदून. ॥२॥

२५३
हृदईं काम ना क्रोधु असंवरू; संन्यासु तोवरि काई ?
वाक्यविचारणा; प्रणवाचा जपु; निष्ठेसि ठावोचि नाहीं !
दंड, कमंडलु, पादुका, काशाय वस्त्र, पवित्रसे देहीं.
अंतरीची खूण न कळे; प्राणियां ! न सुधी बोंडिकी डोई ! ॥१॥धृ॥
ऐसें चूकलें रे ! चूकलें रे ! वेषूचि दाविते देहीं !
सद्गुरूवांचूनि ज्ञान नाहीं; पुढें विश्रांति ते तेथ कायी ? ॥छ॥
शास्त्रवादे बहू बोलती सैराट; भक्षिती गोमुखें अन्न !
अंतरीचा क्रोधु; बाह्य तें वैराग्य; मध्यभागीं तपे मन !
निविजे तेथ तो उपाॐ न दिसे; व्यर्थ मायीक ध्यान !
दिगंबरेवीण चूकले प्राणिये; न कळे तत्त्व निर्वाण ! ॥२॥

२५४
हृदयी कौटल्य, संतापु सर्वदा; कासया चाळिसी मणी ?
ग्राम्य जल्पीं मन नित्य रंगलें; उठिती तरंग ध्यानीं !
आसनाचा बंधु; गोमुखें गवाळीं मांडूचि दाविजे जनीं !
मन पिसाळलें दशदीशा भ्रमे; आइके वार्ता कानीं ! ॥१॥धृ॥
ऐसे चूकले रे ! चूकले रे ! दंभु विस्तारिती जन !
सद्गुरूवांचूंनि वर्मचि न कळे; कायिसे योगसाधन ? ॥छ॥
स्वप्न कां सुषुप्ती, दोनीचि अवस्था, श्रवणीं तीसरी नाहीं.
पिंडु पडो; परि पराते न धरि; ऐसिया सांगणें कायी ?
वीष घोटे; परि स्वहित न गिळे; विश्रांति मानिलि देहीं !
दिगंबरा ! जन चूकलें सर्वथा; सत्य तें तुझांचि ठायीं ! ॥२॥

२५५
शिष्यपरिग्रहें आगळे; त्यावरि काव्य कूशलता देहीं !
शांति निवृत्ति तो वेषचि दावीती; हृदयीं कांहींचि नाहीं !
दानयुक्ती जन मोहिती सर्वथा; गुरुत्व तें तेथ कायी ?
धन मान मद अन्वीत प्राणिये; संसारु न तुटे तेही ! ॥१॥धृ॥
ऐसे मोहक रे ! मोहक रे ! मोहिती जन जनाते !
उद्यमा माझारी हा येकु; यापरी नलगे मानु साधुंतें ! ॥छ॥
परि इंद्रावण सुंदर साजिरें, अंतरीं तें काळकूट !
तैसाचि बाहिजू रमणीयू; परि मन नव्हे चोखट !
ज्ञान वा कर्मसें मध्येंचि नाशिती, कर्पूर जेवि मर्कट !
दिगंबरेंवीण सत्य तें न कळे; कायिसी ते खटपट ? ॥२॥

२५६
नामसंकीर्तनीं टाळिया वादिती; करिती प्रेमनर्त्तन.
आसक्त जाहाले सद्गुरूस्मरणी; लागलें तदंग ध्यान.
निर्लज्ज मानस, मति प्रकाशली; गर्जती भक्त सज्जन.
सर्व असो ते निदभेंचि नाडलें; दीवसा पडले खान. ॥१॥धृ॥
ऐसें चूकले रे ! चूकले रे ! चूकले पासूनि जन !
मानवांचीं मुखें पाहाती प्राणिये; काये देती तया जन ? ॥छ॥
सुमनाची सेज खरासि ? कासया चंदन मर्दिजे आंगीं ?
कर्पूराची राशी शूकरा देयिजे; तो काये तेथिचा भोगी ?
नाम हें अमृत वीषयी; कां तेवि अर्पिजे दंभाचिलागी ?
दिगंबरेवीण मायीक सकळ श्रमु; तो श्रमु दे जगीं. ॥२॥

२५७
जनन जन्म भूली, दुःखाची सरिता भजतां उसंत नाहीं.
विषयभोगु भ्रमु भ्रांति खलुता चिंता झगटे हृदयीं.
मीं माझेंपण बंधन दृढ गा ! वाउगा तो संदु देहीं.
देहचि सांडूनि जाणें निदानी मग ते कवणाचें काई ? ॥१॥धृ॥
ऐसी जनभूलि रे ! जनभूलि रे ! जनभूलि जनासि जाली !
मोक्षु ना संसारू, मध्येंचि भ्रमतांहे; ना ते गति जाली. ॥छ॥
सदन, धन, जाया, जननी, कनक, कानक, भजतासी ?
प्रतिदेही विपरीत नानाविध ते मोहक जाण मनासी.
आपुलें हीत तुतें कांहींचि न कळे; कवण होइल गति कैसी ?
दिगंबराप्रति वेगीं रिघ कां शरण; जना ! खुण परियेसीं ? ॥२॥

२५८
तुझें चि तुज काहीं न कळे; बापा ! सिकवण ते कित्ती काई ?
चंचळपणा सर्व सांडूनि न राहातां निवसी ठायिंचा ठायीं.
आप जाणोनियां परतें विसरें; तुजहूंनि काहींचि नाहीं.
परमतत्व परब्रह्म तुं; देह - दीनत्व सांडूंनि देयीं. ॥१॥धृ॥
जना ! तव हित रे ! तव हित रे ! तव हित तूजचि पासी.
कर्पुरु ढिवळें करूंनि इंधन कुळथि कां पचितासि ? ॥छ॥
जिवन - हीन वन निर्जन भ्रमतां मन तें संतोषु मानी.
चंचळ हें मन विलुवरि; स्वमनी दुःखचि तेथ न मनी.
एकांतु ह्मणतां नामचि नाइके; निद्रा पावे अवसानी.
दिगंबरें - विण सुनाट हें मन श्रमे जन्म मरणीं. ॥२॥

२५९
दुर्लभ हें मन मानव्य; मनुजा ! पळ, पळ, जातसे वायां.
कवण हीत तुझें करील साधन ? तळमळ करिसी काह्या ?
स्वजन, धन, जन, यौवन, पाहासी; सर, सर, हे सर्व माया.
कर्पुरु सांडुनि शूकरु जैसा मळ पंकु पाहिजे तया. ॥१॥धृ॥
मना ! भव - तम रे ! भव - तम रे ! भव - तम ऐसें आहे.
देखोंनियां दीपु पतंगु झडपी; ऐसिया करणें काये ? ॥छ॥
दुर्लभ हा गुरु - संगु मनुजा ! भाग्यें वर - पडि जाली.
हातिचें निधान तुजचि देखतां जाइल; मानस घालीं.
गेलियांवरि मग कधींचि नलगे; तळमळ तेचि उरलीं.
दिगंबरेंविण न घडे सुटिका; आइकें, हें सत्य बोली. ॥२॥

२५९
विवर्त्त - मृगजळ - चंचळ - सरिरा धरितां काहिंचि नाहीं.
स्वप्न विषय सुख सरला भोगुंनि; सतोषु तेणें कायी ?
इंद्रजाल सर्व समान लटिकें जाणतीं सर्वज्ञ देही.
अवस्था जनित भान तैसेंचि; मनुजा ! आप विचारूंनि पाहीं. ॥१॥धृ॥
निर्मळ रे ! निर्मळ रे ! निर्मळ गगनाकार.
विविध - भेद - विरहीत भजिजे ब्रह्म शुद्ध अक्षर रेया ! ॥छ॥
कमळणीदळ - गतजळ - चंचल तें कळतां मानचि नाहीं.
घटिकायंत्री द्रवतें पाणी; निदान तयाचें कायी ?
तैसें हें मानव्य दैवज चपळ; प्रेत्नु न कंरिसी काहीं ?
दिगंबरा - प्रति जाउंनि पुस खुण; सांपडैल हृदयीं रे ! ॥२॥

२६०
मृगमद परिमळ, चंदन, लसना, लेपुनि काजचि नाहीं.
धृत, मधु, पय, रसु, योगा न मिळे; निम्र - बीज हृदयीं.
तैसे जन मन - मळ - खळ भजती; परगुणु नेघति देहीं.
सद्गुरूही परि पुरे ह्मणती; हीत न संगति कांहीं रे ! ॥१॥धृ॥
आतां, निदान रे ! निदान रे ! नरदेह गेलें वाया.
साहोंचि पाहे, तया कित्ती मुंडन ? काये करणें ? देवराया ! ॥छ॥
तेचि दिसे; परि सरिता वाहे; धर धर वाहे पाणी.
जन धन भजतां निदान आलें; संचरलें तव गूणीं.
घनगुणें घन - वटु शब्दही नाइकें; न दिसे रूप नयनी.
दिगंबराप्रति शरण रिघ पां ! शरण पडलें देह - मरणीं. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP