मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १०१ ते १२०

दासोपंताची पदे - पद १०१ ते १२०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१०१
असवैल केवि तुतें, सांडूनि येथे आमूतें ?
केवि सुटे प्रीति तुज ? सांग वो ! माये ! मातें. ॥१॥धृ॥
धरवैल कैसें पांदुरी ? वाढविलें जें उदरीं.
अवधूतें तुजवीण कें गति वो ! दुसरी ? ॥छ॥
दिगंबरा ! निश्चयेंसीं कळलें हें मानसीं ::-
विण आह्मा क्षणुभरी देवा ! तुं न राहसी. ॥२॥

१०२
अवधूतेंविण येथें राहावे कैसें पां मातें ?
धरवैल कैसें मज सखिये ! निष्ठूरतें ? ॥१॥धृ॥
वर - देंसीं करा वो ! भेटी; वंदीन पाये लल्लाटीं.
गुण - भ्रमें भ्रमली मीं; पडली पैं बहु तुटी. ॥छ॥
दे ॐ तो श्री दिगंबरु दूरी करी हा संसारू.
करील, न कळे; आतां न धरे वो ! सैये ! धीरु. ॥२॥

१०३
अखिळ सुरवर वेधले पांयीं; मुखकमळ कैसें शोभत ? सैये ? ॥१॥धृ॥
कोण श्यामतनुगे ! सैये ! कोण श्याम तनु ? ॥छ॥
सुंदरतरतनु नीरजनेत्रु श्रीदिगंबरु दे ॐ पाहे; वो सैये ! ॥२॥

१०४
अनंतगुणहीन, अनंतगुणपरिपूर्ण,
अनंत - निर्मळ, मायावर्जित, अनंतपरमनिधान. ॥१॥धृ॥
क्रीया - चरणें द्विजु नेणे; वैयाकरणें नित्यानंदें;
आनंदें नित्यानंदें; प्रबोधें नित्यानंदें; स्वानंदें नित्यानंदें;
अवबोधें; मन राहे परमानंदें;
येणें आनंदें; अविस्पंदें. ॥छ॥
अगूण - सुखमान, अगूण - परमनिदान,
अगूण, विज्वर, विमळ, सनातन, दिगंबर, कल्याण. ॥२॥

१०५
असंगभवहीन, असंगविषयी सुभान.
असंग - विज्वर, विमळ, सनातन, अनुभव - गमकनिधान. ॥१॥धृ॥
क्रीयाचरणें, आचरणें, क्रियाचरणें, अनुमानें, जनुनेणे,
जडुनेणे, द्विजुनेणे, वैयाकरणें, श्रवणेंवैयाकरणे,
ज्ञानेंवैयाकरणे, हां ! रे ! क्रियाचरणें. ॥छ॥
गुरूवीण गति नाहीं; गुरुविण न पडे ठायीं;
गुरू परमगति; परब्रह्मकेवळ; गुरु दिगंबरु देहीं. ॥२॥

१०६
अरे ! अरे ! अज्ञाना ! अरे ! अरे ! मतिहीना !
असंगु आत्मा जवळिचि असतां, भ्रमसी विषयमती नाना. ॥१॥धृ॥
स्व स्वानंदें आनंदें, स्व स्वानंदें, स्वानंदे स्वस्वानंदें, सानंदें सदानंदें,
निजबोधें, खुण पाहे; अनुपाये, स्थिर राहे स्वरुरुशब्दें. ॥छ॥
गेलें वय तें परतोन न ये; न ये; न ये; जाण.
अनंत - मृगजळ - माया - मयजग दिगंबरें कल्याण. ॥२॥

१०७
दिसे तें तव माया. दिसे विषयद्रुमछाया.
दिसे त्रिगुणमती सगुणतदन्वित; दिसे तो भ्रमु वायां. ॥१॥धृ॥
विषयानंदें, आनंदें विषयानंदें, संवादें, विषयानंदें,
प्रमादें विषयानंदें, भवबोधें,
मन माजे; मन माजे; येणें दुर्वादें गुण संस्पदें. ॥छ॥
असंगामृतपूर्ण, असंगपदनिर्वाण,
असंगगुणगण - विगुणविवर्जित, दिगंबर निर्गुण. ॥२॥

१०८
अरे ! अरे ! तूं मना ! अरे ! अरे ! दुर्जना !
अरे ! अरे ! खुण सांडुनि पळसी.
लपणीं लपसी; अज्ञाना ! ॥१॥धृ॥
निजानंदें, आनंदें निजानंदें, स्वबोधें, परमानंदें,
अवरोधें, योगानंदें, स्थिरु हो पां !
लिनु हो पां ! वश हो पां ! येणें अवरोधें. ॥छ॥
श्रमोनी सुख नाहीं; श्रमोनियां फळ कायी ?
श्रमु श्रमासि फळ भ्रमसील; कां पर दिगंबरसुख घेईं. ॥२॥

१०९
आत्मयां कैसें जाणो ? मना - अंतरीं हा मीपणा अंतरीं.
माये बुद्धीचें बोद्धव्य तें वो ! ठेलें बाहेरीं.
अहो ! मीपण हें दूरी. ॥१॥धृ॥
शब्दें शब्दें सखिये ! जातुसे दूरी; अवो ! हा रामु.
अंतरीं यया भेदासि वैरी. ॥छ॥
दृश्य अदृश्य खाये एकलेपणें अवो ! हा आपुलेपणें.
दिगंबरु कैसा भजों येणें बोधनें गुणप्रधानें मनें अवो ! भेदस्पंदनें ? ॥२॥

११०
देह जायील माये ! यया कर्माचि वारीं गुण - धर्म - व्यापारीं.
अवधूती नाहीं भेटि; आतां कैसे मीं करीं ?
अरे ! संतोष शरीरीं, केवि शरीर धरीं ? ॥१॥धृ॥
दत्ता ! संगें तुझया क्षेम ! संसारीं; अरे ! संतोषु शरींरीं.
आनु नेणें तुजवीण; मना ! विश्रांति करी; रूप दावी अंतरीं;
छेदी अवस्था च्यार्‍ही. ॥छ॥
पाये पाहीन माये ! मना अंतरी या हृदया अंतरीं.
दिगंबरेवीण येणें न पवे थोरी; नाहीं लाभु शरीरीं; मोक्षु यये संसारीं. ॥२॥

१११
येकुदां दावा वो ! दृष्टी. लाभु ने घें मीं कोटी.
अवधूतीं मातें माये ! आसक्ति मोठी; अवो ! हे प्रीति वो ! मोटी. ॥१॥धृ॥
दृष्टादृष्टें न गमे. मजमाजीं अंतरीं द्रष्टेपणा अंतरीं.
अवसरू नाहीं भेटीं. काये मीं करीं ? आतां कैसें मी करी ? ॥छ॥
परिखेपण वो ! खोटें; जीवीं वाउगें उठे; दिगंबरीं नाहीं भेदु;
लपणें के कोठें ? याचें असणें कोठें ? ॥२॥

११२
आजिज्ञा सुदीनु माये ! भेटि झाली अंतरीं;
सूति जाली अंतरीं; हृदय भरलें सुखें सागर च्या - र्‍ही;
ते नस्माये अंबरीं. लोपी अवस्था च्या - र्‍ही. ॥१॥धृ॥
राहीं राहीं मानसा ! खुण पाव अंतरीं; सूख पाव अंतरें;
अवधूताचें स्वरूप तूंतें; तूंचि निर्धारी. ॥छ॥
शून्य सारूनि माये ! रूप याचें लाहिजे;
प्रेम याचें लाहिजे. दिगंबरू दीनत्राता;
मया नावडे दूजे; यया न साहे दुजें. ॥२॥

११३
आश्रयें येणें ! वो मातें बुझावीलें अंतरीं;
नीववीलें अंतरीं; रूपाची देखणी दृष्टी सांडूनि दूरी,
रूपा करूनि चूरी. ॥१॥धृ॥
नीजानंदें येणें वो ! मन मालवे अंतरीं.
देहीं देह पारूषलें बोलाचि वरी येका शब्दाचि वरी. ॥छ॥
द्रष्टेपणा बा ! मूळीं; निवळलें अंतरीं; कवळलें अंतरीं.
दिगंबर नीजरूप, नव्हे विकारी; विश्व मुक्तचि करी. ॥२॥

११४
भेदु न साहे वो ! भेटणें ऐसें आहे;
नभ - निभ - निरंजन गुणगुणविलयें. ॥१॥धृ॥
पाहों मीं कैसी वो ? मींचि माते गें ! बाई ये ! ॥छ॥
देहाची सोये वो ! येणेम सूटली माये !
दिगंबरें केलें वर्म; प्रळपतां नये. ॥२॥

११५
प्रारब्ध खोटें वो ! दत्तु न दिसे कोठें.
कय करूं मी सखिये ? सुस्वरूप न वटे. ॥१॥धृ॥
पाये धरीन वो ! भेटि करी गे ! बाइये ! ॥छ॥
देह जाईल तो; कर्म ययासी मूळ;
दिगंबरेंवीण सर्व दुःखचि मूळ. ॥२॥

११६
सावळा सुंदरू वो ! देखिला आदिगुरू.
मन माझें उतावीळ, कैसें मी करूं ?
तें मीं केवि सावरूं ? ॥१॥धृ॥
जाईन सवें वो ! चित्त गुंतलें, माये ! ॥छ॥
मन निमालें वो ! बोध नवे तूळलें.
दिगंबरें येणें माझें मींपण गोविलें. ॥२॥

११७
वाट पाहीन वो ! ध्यान धरीन माये !
अवधूतेंवीण मन निश्चळ न राहे. ॥१॥धृ॥
वेळ जाला वो ! दत्तु न ये गे ! बाइये ! ॥छ॥
आश लागली वो ! बूद्धि गुंपोनि ठेली.
दिगंबरेंवीण सैये ! निराशा जाली. ॥२॥

११८
देह नठवे माये ! दूरि भासत आहे.
गुणीं गुणाचा हरा सुदर्शन वीलयें. ॥१॥धृ॥
दुसरें मीं नेणें वो ! मजवांचुनि गे बाये ! ॥छ॥
येक अर्धटवे शुध्द केवळ माये !
दिगंबर बीजरूप - बोधन - मूळ. ॥२॥

चालि भिन्न
११९
स्वरूपसिद्धा ! निजानंदा ! सुरगणसिद्धा ! त्रीवरदा ! ॥१॥धृ॥
निजानंदा ! आनंदा ! ॥छ॥
अद्वयशुद्धा ! संपूर्णपदा !
दिगंबरानैकविधा ! ॥२॥

१२०
अद्वयमाना ! गुणनिधाना ! मुनिजनधीगहना ! ॥१॥धृ॥
अत्रीवरदा ! आनंदा ! ॥छ॥
त्रीगुणहीना ! परिपूर्णा ! दिगंबरा ! तूं सगुणा ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP