दासोपंत चरित्र - पदे ७०१ ते ७२५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


जय जय दिगंबरा दीनवत्सला । जय जय दिगंबरा दीनप्रतिपाळा । जय जय दिगंबरा करुणाकल्लोळा । करुणार्णवा दयानिधे ॥१॥ मी तो अत्यंत पामर । पतितांमाजी पतिततर । तूं तरि करुणासागर । दावी मजला पादांबुज ॥२॥ यापरी करुन स्तवन । मांडून तेथे दृढासन । प्रारंभिले अनुष्ठान । अवधूताच्या प्राप्तीस्तव ॥३॥ अवधूती प्रवेशून चित्तवृत्ति । अन्नादि विषय समूळ त्यागिती । अवधूतप्राप्तीस्तव निश्चिती । तप करितसे दुर्धर ॥४॥ अवधूतांचे ध्यान अर्चन । तेंच पंताचे अशन पान । अवधूतावांचूनि एक क्षण । न गमे ज्यासि अवस्थात्रयी ॥५॥ अवस्थात्रयी अवधूतमूर्ति । ह्रदयीं आठवूनि निश्चिती । यापरी तप करितां निगुती । वर्ष झाले द्वादश ॥६॥ पंतांची तपसरिता । दिगंबरसागरी जाऊन मिळतां । दिगंबर तोषूनि निजचित्ता । प्रगटते झाले पंतापुढे ॥७॥ समचरणसरोज मनोहर । कटी शोभे पिंवळा पीतांबर । कर्णी तळपे कुंडल मकराकर । गळां शोभे सुमनमाळा ॥८॥ सुहास्यवदन राजीवनेत्र । शुध्दश्यामवर्ण कोमलगात्र । परमानंदमय मनोहर । सच्चिदानंद वोंतिव ॥९॥ षडबाहुयुक्त बाळदिगंबर । ज्याचे तेज न माये अंबर । काय उदय झाले कोटि दिवाकर । एके काळी समागमे ? ॥७१०॥ पाहतां ऐशी मूर्ति सांवळी । पंताची वृत्ति अवधूती रंगली । काय वर्णावा तो आनंद । त्या काळी । सहजानंद दाटले दश दिशा ॥११॥ सहजानंद दाटतां दृष्टी । ब्रह्मानंदे भरली सृष्टि । परमानंद भरतां पोटी । अद्वयलुटीते लुटिती ॥१२॥ प्रकाशी जाऊनि मिळे प्रकाश । तरंग करी उदकीं प्रवेश । त्यापरी दिगंबरी समरस । पंत होतसे क्षणैक ॥१३॥ तेव्हा श्रीदिगंबर आपण । षडबाहू आपुले पसरुन । स्वानंदे पोटी धरितसे कंवळून । दासोमहाराजांसि त्या काळी ॥१४॥ तेव्हा दासोमहाराज । मस्तक ठेवूनि दिगंबरपादांबुज । साष्टांग प्रणिपात करितां सहज । प्रेमाश्रु चालिल्या नेत्रद्वारा ॥१५॥ मुखे करावे काही स्तवन । तरि वाचेसि पडे मौन । ज्यास वर्णितां वेद मौन । तो मूर्तिमंत पुढे उभा ॥१६॥ जो मनोवाचा अगोचर । व्यासादिकांस न कळे पार । तो घवघबीत पंतांसमारे । उभा असे सुहास्यवदन ॥१७॥ ते मूर्ति पाहतां नयनी । तोच दिसे जनी वनी । मी कोण ? काय पाहतों नयनी ? । हे भान कांही नसेचि ॥१८॥ यापरी निर्विकल्प स्थिति । पंतांची पाहतां अवधूतमूर्ति । ब्रह्मानंद होऊनि चित्ती । आपणच करितसे सावध ॥१९॥ सावध होतांच पंतराय । लक्षूनि अवधूतपाय । पूजा करितसे निश्चये । कुलस्वामीसि स्वानंद ॥७२०॥ स्वप्रेमजीवनी करवून स्नान । सद्भावाचे लावी चंदन । निजरंगाच्या अक्षता पूर्ण । पूर्णानंद वाहतसे ॥२१॥ सुमन ते सुमनमाळा । अमळ तो परिमळ आगळा । अर्पीतसे चरणकमळा । आनंदेसी त्या काळी ॥२२॥ अहेतुकाचे जाळूनि धूप । स्वयंप्रभा पाजळी दीप । चौ पुरुषार्थ नैवेद्य सोप । अर्पिते झाले अति हर्षे ॥२३॥ पंचप्राणांचे करुन नीरांजन । पंचतत्वांच्या वाती जाण । अव्यक्त स्नेही भिजवून पूर्ण । स्वप्रकाशज्योति पाजळिती ॥२४॥ बावन मातृका तांबोल । निर्वासना तें पूगीफल । अमन तें दक्षिणा केवळ । अर्पिते झाले अल्हादे ॥७२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP