दासोपंत चरित्र - पदे १७६ ते २००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


आता मजला ते वियोग । वियोग नव्हे ते क्षयरोग । व्यापिले असतां सर्वांग । कोणत्या वैद्या शरण जाऊ ॥७६॥ ते वियोगरुप महिषासुरी । मज व्यापिली बाह्यांतरीं, । कोण भेटेल पंचाक्षरी, । पुत्रप्राप्तिविभूति लावितील ? ॥७७॥ मी द्वादश वर्ष पोषणलालन । केले काय ते पादशाकरण । कैसे दुर्धर दैव जाण ! । दुरावला माझा तान्हया. ॥७८॥ आतां कैंची रे पुत्रप्राप्ति ! । कैंचा भेटेल तो विश्रांतिमूर्ति । कोण दावितील मजप्रती । आणून माझा प्राणसखया ॥७९॥ एकदां जावोत माझे प्राण । परी तो भेटो पुत्ररत्न । यापरी बोलतां नयन भरुन जीवनपात पै होती ॥८०॥ तेव्हां ग्रामीचे मिळती नारीनर । आणखी कित्येक आप्त सहोदर । समजाविती नाना प्रकार । परी तिचे समाधान नव्हेचि ॥८१॥ ह्मणती मी केवळ दैवहीन । मज कैचे तें पूर्ण निधान । मज आंधळीचे हातातून । कोणे नेली पुत्रकाठी ? ॥८२॥ मी ऐसे काय केले की पाप दुर्धर ? । काय भेद पाहिला की हरिहर ? । काय मोडिला की कथागजर । तेणे योग हा प्राप्त ॥८३॥ किंवा निंदिल साधुसंत । अथवा बिघडिले लोकांचे बधुसुत । तरीच हा खेद निश्चित । प्राप्त असे या काळी ॥८४॥ यापरी शोक दुर्धर । करुन रडतां दीर्घस्वर । लोक सांगती समाचार । पुत्र तुमचा पै आला ॥८५॥ मुखासनी होता स्वार । समागमे असे लोक फार । देउळी असे वीसीबहिर । येईल आतां स्वघरा ॥८६॥ माता म्हणती हे कां विनोद । मांडिला काय पाहूनि खेद । ऐसे ह्मणत असतां तो स्वानंद । य़ेऊनि नमस्कार करीतसे ॥८७॥ जेव्हा माता वरते पाहे । तों सत्यच तो पुत्र उभा आहे । मनी ह्मणती हे जागृति कां स्वप्न आहे । ऐशी भ्रांति पै होती ॥८८॥ त्याचे वियोगेकरुन । देहाचे पडर्ते विस्मरण । सत्यच पाहतां पुत्ररत्न । हर्षासागरीं पै बुडती ॥८९॥ तेव्हा पिताही आला धांवत । हा साष्टांग करुनि प्रणिपात । उभा ठाकला जोडूनि हस्त । स्वानदेसि त्या काळीं. ॥९०॥ त्या उभयतांचे नेत्रद्वार । चालिले प्रेमांबुधार । सप्रेमें आलिंगूनि कुमार । मुख चुंबिती स्वानंदे ॥९१॥ तेव्हां त्यांस ऐसे वाटलें, । मरणकाळी अमृत पाजिले । किंवा जळी बुडता काढिले । बाहिर कोणी अवचित ॥९२॥ जेव्हां मथुरेहून । गोकुळा येऊनि श्रीकृष्ण । भेटतां मातापित्यांस आनंद पूर्ण । तदुपरी त्यांस पै होत ॥९३॥ उभयतां बुडती सुखसमुद्री । उभयतांचा हर्ष न माये अंबरी । ते सुख सांठवेना त्यांच्या अंतरी । बाहिर फांकत इंद्रियद्वार ॥९४॥ ते उभयतां जेव्हा वरते पाहती । तेव्हा दश दिशा सुखमयच दिसती । समूळ उडाली वियोगखंती । पुत्रसुखेदु पाहतां ॥९५॥ तेव्हा मिळाले आप्तसहोदर । मिळाले बहुत याचक नर । सर्वत्रा तोषवी पिता निर्धार । दानमान देऊनी ॥९६॥ उत्साह करिती ब्रह्मसंतर्पण । मेळवूनि ब्राह्मण अधिकारी पूर्ण । त्यांस असे वाटले की हा उत्पन्न । आजच आमचे उदरी पै आला ॥९७॥ किंवा व्याघ्रमुखांतून बाहिर आला । की काळे नेतां खाली टाकिला । अथवा अमृत पिऊन सजीव झाला । एकाएकी दैवबळे ॥९८॥ अत्यानंदे विसरती । तुझी झाली काय गती ? । तूं आलासि कोण्यारीती । हे पुसणे कांही सुचेना ॥९९॥ ऐसे होतां दिवस दोनचार । पुत्रास पुसे पिता एक वार । अरे तुझी सुटिका कोण प्रकार । जाली ? तें आता सांग ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP