दासोपंत चरित्र - पदे ७६ ते १००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


जरि न येईल आज द्रव्य । तुजला वरुं यवन निश्चये । यांत कांही नसे संशय । सत्य सत्य रे सुकुमारा ॥७६॥ वज्ररुप शब्द पडतां श्रवणी । ते भेदून गेले अंत:करणी । त्याचें मोचन दत्तावांचूनि । कांहीच नसे त्यालागी ॥७७॥ कोमाइले मुखकमल । नेत्री चालिलें दु:खजळ । चित्त झाले असे व्याकुळ । कांहीच त्यासि उमजेना ॥७८॥मनीं म्हणतसे, पित्याची आस । आजपर्यंत होती निजमानस । आतां तेही दिसे निरास । पुढील भविष्य कळेना ॥७९॥ आतां माझे आराध्यदैवत । जो ब्रह्मादिकांचा ध्येय निश्चित । त्यावांचून वारेल हे अनर्थ । पाहतां कोणी दिसेना ॥८०॥ ऐसे भावून निज मनी । चित्त एकाग्र करुनि । वृत्ति ठेवूनि अवधूतचरणी । धांवा करीतसे त्याकाळी ॥८१॥ जय जय अत्रितनया ! आनंदनिलया ! । आनंदकारका भक्तसमुदाया ! । आतां तुजवांचूनि श्रीयोगिराया । शरण जाऊं कोणासि ? ॥८२॥ तूं तो सर्वतरंग । असूनिही निर्गुण नि:संग । तुझे चरित्र अभंग । ब्रह्मादिकांसि अगम्य ॥८३॥ अगम्य तुझी कीर्ति देख । अभिनव तुझी करणी अलौकिक । तूं सकळसाक्षी सर्वप्रकाशक । सन्मयरुपा संकाश ॥८४॥ सर्वाचा तूं अससी ईश । यास्तव तुझें नाम जगदीश । जग म्हणायाचें ही भ्रांति नि:शेष । तुझे ठायीं दिसेना ॥८५॥ तूं तो निष्कळंक, निर्विकार । भक्तांस्तव होऊनि साकार । विहरसी निजचराचर । अंतरंगा, दयाळा ॥८६॥ तुज ऐसा नसे दयाळू । तुज ऐसा नसे कृपाळू । तुलाच असे माझा कळवळू । कैवल्यकंदा करुणार्णवा ॥८७॥ तूं तो केवळ अद्वय सच्चिदानंद । भक्तवत्सल स्वानंदकंद । भक्तप्रतिपाळक हे ब्रीद । तुहे असे रे दिगंबरा ॥८८॥ तूं अससी जरि भक्तप्रतिपाळक । आज सत्य करसील देख । सत्यच तूं दीनवत्सल सहजानंददायक । अंतरात्मा, दिगंबरा ॥८९॥ मी जन्मलो ज्यांचे उदरीं । ते बाप राहिले देशांतरी । तूं बाप अससी हृदयांतरीं । यास्तव बाहतों तुजलागीं. ॥९०॥ तूं विश्वाचा जननीजनकु, । तूं विश्वाचा प्रतिपालकु, । तूं विश्वाधारु, विश्वव्यापकु, । विश्वात्मा, सर्वेशा. ॥९१॥ हा तो यवनरुप व्याघ्र । मज गिळूं पाहे समग्र। तरि कॄपाशास्त्रे वधून शीघ्र । रक्षी माते दयाळा ॥९२॥ हा तो यवनरुप समुद्र । यांत बुडवूं पाहतो निर्धार । तरी तूं तारक कर्णधार । काढी वेगें कृपाळा ॥९३॥ हा तो यवनकाळसर्प । दंशून करावा काळरुप । ऐसे इच्छितो तूं चिद्रूप । गारुडी असतां भय काये? ॥९४॥ हा यवनरुप बेडी । ठोकूं इच्छितो अति तांतडी । तरि तूं कैवारी प्रोढी । तोंडी सत्वर दीनबंधु ॥९५॥ हा यवनरुप वडावाग्नि । यांत लोटूं पाहतो मजलागूनि । तरि तूं कॄपाघन वर्षूनि । शीतळ करी रे श्यामांगा ॥९६॥ आतां तुजवीण म बाळातें । कोण रक्षील, गा दीनानाथ ? । धांव धांव गा श्रीअवधूत. । अंत किती पाहतोसि ? ॥९७॥ हे तुझे अंत पाहण्यांत । माझा प्राण जातो निश्चित; । यास्तव धांव धांव रे त्वरित । हे दुरित माझे निवारी ॥९८॥ जरि माता उपेक्षी बाळावरि । तरि त्याचें संरक्षण कोण करी ? तूंच माउली गा निर्धारी । वोसंगा घेई मजलागी ॥९९॥ आज अस्तास जातां दिनमणि । माझे ब्रह्मत्वास असे हानि । हे तो जाणतोस कीं दंडपाणी । दयार्णवा, दयाळा ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP