मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
कवितेच्या नादी लागून कुणी...

वसंत वाहोकार - कवितेच्या नादी लागून कुणी...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


कवितेच्या नादी लागून
कुणी एक बसला आहे झोपाळ्यावर झुलत
त्याच्या मनात दाटून आली आहे भीती
घराबाहेरची, रस्त्यांची
हातात सुरे परजून उभ्या शहरातून
मोकाट धावणार्‍यांची

आता नाही उरलं ते हत्तीचं बळ त्याच्यात
आणि होती - नव्हती ती त्याच्याजवळची शस्त्रंही
पळवून नेलीत
खोडकर, उनाद माकडांनी

कोणत्याही पुस्तकात, ग्रंथात रमत नाही
मन, मेंदू आत्मा
आणि सापडत नाही उत्तर
आतमधला कल्लोळ शांत करणारं

दिलासा एवढाच की
अजूनही खेळात आहेत
त्याचे जुने - जाणते जिवलग
डोंबारी, मदारी, गारुडी, डफ - तुणतुणंवाले
इथं - तिथं दिसेल त्या रंगमंचावर
शब्दांच्या धुळवडीत बेभान,
घुंगरांच्या नादात नोटांचा पाचोळा उडवीत...

काहीच नाही तक्रार, कांगावा, गार्‍हाणंही !
- मात्र, तुम्ही द्या तुमच्या जुन्या, पिवळ्या वह्या
धुमसत्या - अदमुशा त्याला
ज्यांत बंदिस्त असतील काही कहाण्या हुंदके देणार्‍या
कदाचित थांबूनही जाईल त्याचा झोपाळा कुरकुरता, दुखरा
आणि हातातली लेखणी नाचेल थुईथुई
निळ्या छत्रीवाल्याच्या आशीर्वादां
स्वच्छ, पांढर्‍याशुभ्र, मुक्तछंदी रंगमंचावर अशीच कधी.
उडतीलही पांढरेशुभ्र, धवल थवे
दिगंत व्यापून !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP