अंक पहिला

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : पाच खणांचा दिवाणखाना. पटई वरीच उंच. जागाही प्रशस्त आहे. समोरच भिंतीला हिरव्या व पांढर्‍या काचांची तावदाने बसविलेल्या खिडक्या आहेत. उजव्या हाताकडील दोन खिडक्या उघड्या असून त्यांतून माडीचा सज्जा, व त्याच्याच पलीकडे, सरासरी बराच मोठा रस्ता असेल इतक्या अंतरावर, एक दोन माड्या, व कोवळ्या उन्हात आनंदाने डुलणारी सुरुची व नारळाची झाडे ही आपल्याला दिसतच आहेत. मधोमध असलेल्या दोन तक्क्यांजवळच पानसुपारीचा डबा, ’ बर्डस आय् ’ च्या तंबाखूचा डबा, पिकदाणी, व दोन तीन पंखे पडलेले आहेत. डाव्या हाताकडील भिंतीला खिडक्या वगैरे काही नाहीत. तिला असलेल्या कोनाड्यांपैकी निरनिराळ्या पेटंट औषधांच्या लहानथोर बाटल्यांनी गजबजलेला अगदी अलीकडचाच कोनाडा काय तो दिसत आहे, कारण बिनघडीची व मेणकापडी गादीची आराम खुर्ची, पुस्तकांचे मोठे कपाट, व बांधलेली मच्छरदाणी ह्यामुळे इतर कोनाड्यातील गूढ नीटसे उकलत नाही. औषधी कोनाड्याजवळच खुंटीला बुरख्यात टांगलेली एक सतार आहे हे सांगायला नकोच आहे. उजव्या हाताकडील भिंतीला पलिकडच्या कोपर्‍यात एक दार असून, त्याच्याच अलीकडे पुस्तकांनी व वर्तमानपत्रांनी भरलेले एक टेबल व दोन खुर्च्या आहेत. जिन्यातून आत शिरण्याचे दार  ह्याच भिंतीला अलीकडच्या कोपर्‍यात आहे.
पात्रे : गंगाधरपंत उर्फ आबासाहेब : हे सरासरी चाळीस पंचेचाळीस वयाचे असून, सैन्याच्या हिशेबी खात्यामध्ये मोठ्या हुद्यावर नोकर आहेत. विश्वनाथ : आबासाहेबांचा नोकर. भालचंद्रपंत , रंगोपंत उर्फ पापय्ये : त्यांचे स्नेही. मालती : त्यांची मुलगी. प्रभाकर : त्यांच्या एका कैलासवासी स्नेह्याचा मुलगा ]

आबासाहेब : ( जिन्याच्या दाराने आत येऊन ) कंटाळलो बोवा अगदी ! काय वाटेल ते करा पण साफच होत नाही ! ( मच्छरदाणीच्या मागून जाऊन कपाटापलीकडे असलेल्या कोनाड्यातून दोन लहान लहान पितळी डबे व एक बशी घेऊन येतो व ते सर्व आरामखुर्चीजवळच खाली ठेवून खुर्चीवर बसतो. एक डबा उघडून त्यातील मोठी चिमूटभर सुंठ काढतो; व ती बशीत ठेवल्यावर दुसर्‍या डब्यातून नागपुरी बोराएवढा गूळ घेतो; व बशीत दोन्ही एकत्र कालवून त्यांच्या सुपारी येवढ्या गोळ्या करुन त्या खाऊन टाकतो. नंतर तोंड वेडेवाकडे करुन ) सुंठीलासुध्दा आताशा तिखटपणा राहिला नाही ! ( थांबून ) हुंअ सगळे जगच - ( इतक्यात विश्वनाथ लहानशी चहाची किटली, कप, बशी, चमचा व बुटकुली घेऊन आत येतो व सर्व खुर्चीजवळ ठेवतो. )
आबासाहेब : ( घड्याळाकडे पाहून ) अरे पुन: आज उशीर केलासच ! किती वेळा सांगितले; पण तुमचे आपले आहे ते आहे !
विश्वनाथ : ताईसाहेबांनी जरा काम -
आबासाहेब : चल बोलू नकोस ! तुम्हाला म्हणजे मिलिटरी कायदाच पाहिजे ! त्याच्याशिवाय नाही ! ( विश्वनाथ कपाटामागील कोनाड्यातून ’ त्रिफळा ’ अशी वर चिठ्ठी चिकटविलेली एक बाटली आबासाहेबांजवळ आणून ठेवतो व मच्छरदाणी सोडू लागतो. )
आबासाहेब : ( बशीत थोडासा चहा ओतल्यावर बाटलीतून पेपरमिटाच्या लहानशा वडी येवढी एक वडी घेऊन ती बशीतील चहात टाकतो. नंतर चमच्याने हळूहळू ठोकून वडीचे तुकडे केल्यावर चहा ढवळून पिऊ लागतो. ) पुन: आता उशीर तर कर; की त्या आमच्या मेजर फॉक्ससारखेच करतो ! घोडा आणायला पाच मिनिटे - अगदी पाचच मिनिटे उशीर झाला पण काही नाही ! तिथल्या तिथे त्या माणसाला त्याने हाकून दिला ! ( पुन: बशीत थोडासा चहा ओतून त्यात बुटकुलीतून चमचाभर तूप घालतो, व चमच्याने ढवलल्यावर चहा पिऊन टाकतो. ) अरे हे दुसरे तर तूप नाही आणलेस ? ( किटलीतील राहिलेला चहा पितो. )
विश्वनाथ : नाही साहेब, परवा लोणी आणले त्याचेच हे.
आबासाहेब : लोणीसुध्दा चांगले मिळेनासे झाले आहे ! ताप आहे खरोखर ! मनासारखे म्हणून काही - ( जिन्यात पाय वाजलेले ऐकून दाराकडे पाहतो. विश्वनाथ सर्व आवरुन जाऊ लागतो. इतक्यात रंगोपंत आत येतात. )
आबासाहेब : ( सूर काढून ) या - वे पापय्ये, अरे विश्वनाथ, रंगोपंतांना थोडासा चहा घेऊन ये.
रंगोपंत : नको, नको, आबासाहेब. ( बरोबर आणलेले पुस्तक आबासाहेबांजवळ ठेवतो, व आबासाहेबांजवळ सतरंजीवर बसतो. )
आबासाहेब : काहो, असे का ?
रंगोपंत : आज किंचित प्रकृती ठीक नाही, तेव्हा म्हणतो -
आबासाहेब : अहो, मग चहा तर चांगला.
रंगोपंत : नको, खरेच नको ! पोटात उगीच ढवळून येईल.
आबासाहेब : ( विश्वनाथास ) बरे का नको आणूस, अरे पण हे बघ. आज माझ्याबरोबर ते केशवराव जाधव जेवायला आहेत म्हणावे. ( विश्वनाथ मान हलवून व किटली वगैरे घेऊन जातो. )
रंगोपंत : ( पुस्तक उघडून थोडीशी पाने चाळतो. )
आबासाहेब : ( ’ बर्डस आय् ’ च्या डब्यातील तंबाखू घेऊन सिगारेट तयार करु लागतो. ) काय पापय्ये, वाचलेत का पुस्तक ?
रंगोपंत : वाचले, पण समजायला तसे बरेच कठीण आहे बोवा.
आबासाहेब : कठीण म्हणजे ? हॅं: अहो चांगल्या बी. ए. एल. एल. बी जना आणि एम्. ए. एल्. एल्. बीजना समजत नाही ते ! ( सिगारेट ओढू लागतो. )
रंगोपंत : आहे खरेच तसे !
आबासाहेब : अहो मी सांगतो ना. एव्हिडन्स  ज्यांना चांगला समजला आहे अशी अरे खरचं - फारच थोडी माणसे !
रंगोपंत : च् ! इतका अवघड आहे का ?
आबासाहेब : ते काही विचारु नका ! नाही म्हणायला, मला आजपर्यंत दोनच माणसे दिसली - त्यांनाच काय तो -
रंगोपंत : ( आ वासून आबासाहेबांच्या तोंडाकडे पाहातो. )
आबासाहेब : एक माधवरावजी आणि दुसरे बळवंतरावजी. यांच्या खेरीच कोणाला नीट समजला असेल असे मला नाही वाटत !
रंगोपंत : वा ! ती माणसे काय....!
आबासाहेब : आपली पौढी मारायची नाही इतकेच. बाकी माधवरावजीचे आणि माझे जेव्हा बोलणे झाले, तेव्हा त्यांनीच मला सांगितले - की, बोवा, तुमच्या इतका एव्हिडन्स अक्ट कोणाला समजला असेल असे - मला तर काही कोणी अजून -
रंगोपंत : हॅ: हॅ: अरे वा !
आबासाहेब : तरी मला सात आठ वेळा वाचावा लागला !
रंगोपंत : मग आबासाहेब ह्या वकील लोकांचे कसे काय चालते हो ?
आबासाहेब : अहो कसचे काय.... आणि काय ! अहो हे वकील ही तितकेच आणि मॅजिस्ट्रेटही बेताचेच म्हणून चालते झाले !
रंगोपंत : हॅ: हॅ: हॅ:
आबासाहेब : मी अगदी कोणालाही च्यालेंज देऊन सांगतो ना, की काही काही मुद्यांचा त्यांनी सरळ अर्थ सांगावा ! कसची अलीकडील माणसे ! माणसे आहेत इतकेच !
रंगोपंत : मग आपण वकिलीचा अभ्यास सोडलात का ?
आबासाहेब : सोडला झाले ! आपले उगीच करमुणीखातर वाचतो येवढेच. ( जिन्यात पाय वाजतात भालचंद्रपंत आत येतात. )
भालचंद्रपंत : काय आबासाहेब ? कसे काय, ठीक आहे ना ?
आबासाहेब : ओ हो हो ! भालुकाका ! अरे वा ! आज इकडे कोणीकडे !
भालचंद्रपंत : नमस्कार रंगोपंत. हं. हं. काय ठीक आहे न ? हं:
आबासाहेब : बरे पण आपली स्वारी इथे आली कधी ?
भालचंद्रपंत : काल रात्रीच. बापूसाहेब केतकर आणि मी -
आबासाहेब : काय बापू केतकर इथे आला आहे ?
भालचंद्रपंत : हो, ते आणि मी, दोघे बरोबरच आलो. आणखी - तुम्हाला त्यांनी आताच्या आता बोलावले आहे.
आबासाहेब : कारे बोवा, इतकी घाई का ?
भालचंद्रपंत : अहो उद्या सकाळीच ते नागपूरला जायचे आहेत.
आबासाहेब : ते काय म्हणून ?
भालचंद्रपंत : त्यांच्या पुतणीचे लग्न ठरले आहे.
आबासाहेब : काकासाहेबांच्या मुलीचे ?
भालचंद्रपंत : हो तिचेच, म्हणून तर येवढी घाई. रात्री आम्ही जेवून उठतो तोच तार आली.
आबासाहेब : काय तडकाफडकी लग्न जमले रे !
भालचंद्रपंत : अहो न जमायला झाले काय ! चांगला आय. सी. एस्. केळकरासारखा - पाच सहाशे रुपये दरमहा मिळवणारा मुलगा मिळतो आहे, तर न जमायला झाले काय हें: हें: !
रंगोपंत : ( पान खात खात ) हो: तर काय !
आबासाहेब : ते खरे. पण ह्यांची त्यांची आधीची काही जान् पछान् होती का ? कारण मला ठाऊक आहे, ती मुलगी बरीच शिकलेली आणि मोठी आहे. म्हणून म्हणतो; बाकी -
भालचंद्रपंत : अहो, जान् नाही आणि पछान् नाही ! मुळी पत्रोपत्री आणि फोटोफोटी जर लग्न ठरले, तर जानपछान् कुठली आली आहे ? नाही म्हणायला केळकर एकदा नागपुरास घाईघाईने आला होता, आणि मुलगी पाहून गेला येवढेच !
रंगोपंत : असे जर आहे, तर मग आमच्या जुन्या लग्नामध्ये आणि तुमच्या नव्या लग्नामध्ये फरक तो काय राहिला ?
भालचंद्रपंत : का ? फरक कसा नाही ?
रंगोपंत : अहो मुली तुम्ही मोठ्या आणि शिकलेल्या करता येवढेच ! पण लग्नाच्या बाबतीत तुम्ही आम्ही एकच ! आमचे जसे -
आबासाहेब : हं: हं: हं: -
रंगोपंत : धर कुठला तरी काशीचा मुलगा आणि पुण्याची मुलगी;  आणि दे लग्न जुळवून ! तसेच तुमचे हे नाही का ? कुठला तरी आय्. सी. एस्. नाहीतर आय्. एस्. एस्. मुलगा आणता आणि कुठली तरी मॅट्रीक नाहीतर बी. ए. मुलगी घेता - अन् देता लग्न लावून !
आबासाहेब : शाबास ! हं: हं: !
भालचंद्रपंत : नाहीतरी लग्ने ही आम्हालाच केली पाहिजेत. ( मालती जिन्याच्या दाराने आत येऊन टेबलापलीकडील दार उघडून आत जाऊ लागते. भालचंद्रपंत पाठमोरा असल्यामुळे मालती आल्याचे त्याला समजून येत नाही. ) मुलीना काय त्यांच्यात दगड समजते आहे ! मोठ्या झाल्या आणि चार बुके वाचली म्हणजे झाले की काय ? हें: हें: ! ( मालती खिडकीतून बाहेर पाहात उभी राहते. )
रंगोपंत : तरी पण आमचे एक वेळ बरे. तसे तुमचे नाही. म्हणजे थोड्या फार जाग्या झालेल्या मुली ! मनासारखे झाले तर ठीक. नाहीतर एखादे वेळेस जीवाला -
आबासाहेब : ऍ : काही करीत नाहीत आणि सवरीत नाहीत ( रंगोपंताकडे पाहून मालती आत जाते. )
भालचंद्रपंत : बरे पण आबासाहेब आता चला लवकर. ते आपली वाट पहात असतील.
आबासाहेब : ( सूर काढून ) जा - ऊ रे काय येवढी घाई आहे. ( उठून कपडे घालू लागतो. ) हे बाकी भालूकाका, आमच्या रंगोपंतांनी तुमची अगदी सोळा आणे उडवली ! हें: !
भालचंद्रपंत : होहो, तर ! ( तिघेही जाऊ लागतात, तोच प्रभाकर आत येतो. )
भालचंद्रपंत : नमस्कार प्रभाकरपंत, काय ओळख आहे ना ?
प्रभाकर : ( उलट नमस्कार करुन हसत हसत ) हो हो, तर ! ओळख आहे म्हणजे !
( मालती खोलीच्या दाराशी येऊन डोकावून जाते. )
आबासाहेब : बरे आहे आम्ही जातो आता. पण काय रे, तू आताशा येत नाहीस. वा ! ( आबासाहेब, रंगोपंत व भालचंद्रपंत जातात. प्रभाकर टेबलावरील दोन वर्तमानपत्रे घेऊन सतरंजीवर वाचीत बसतो. इतक्यात मालतीच्या खोलीत जोराने काहीतरी टेबलावर ठेवल्यासारखा आवाज होतो. प्रभाकर मागे वळून खोलीच्या दाराकडे पाहतो व लगेच पुन: वाचू लागतो. एक दोन मिनिटानंतर मालती दारात येऊन उभी राहते व क्षणभर प्रभाकरकडे पाहिल्यावर आबासाहेबांच्या टेबलाजवळ जाऊन एका मोठ्या पुस्तकाकडे पाहते व ते किंचित सरकविते. तोच प्रभाकर वळून तिच्याकडे पाहतो. )
मालती : म्हटले काय येवढे वाचता आहा ?
प्रभाकर : ( वर्तमानपत्राकडे पहात व किंचित हसत ) नाही, काही विशेष नाही. हे याच्यामध्ये, ब्राऊनिंग आणि टेनिसवर एक मोठा चांगला लेख आलेला दिसतो आहे.
मालती : खरेच का, कोणाचा आहे तो ?
प्रभाकर : नाव नाही दिलेले. पण तुम्ही एकदा जरुर वाचाच.
मालती : हो ! बरी आठवण झाली, विचारीन विचारीन म्हणून म्हणत होते, पण तुम्ही अलीकडे चार पाच दिवसात -
प्रभाकर : ( वर्तमानपत्राकडे पहात ) नाही. विशेष काही काम होते, त्यामुळे - यायला झाले नाही येवढेच.
मालती : हो ! काहीतरीच. काम नाही आणि काही नाही. दादा मुंबईला गेल्यापासून तुम्ही आताशा रोज येतच नाही.
प्रभाकर : ( वर्तमानपत्राकडे पहात व किंचित हसत ) नाही, खरेच -
मालती : पुरे झाले ! उगीच नका आता काहीतरीच सांगू.
प्रभाकर : बरे ते राहू द्या. तुम्ही आधी विचारणार काय होता ?
मालती : विचारणार होते. पण - ( जिन्याच्या दाराकडे पाहते ) नको आता. ( टेबलावरील पुस्तक हलविते. )
प्रभाकर : का ? मध्येच काय फिसकटले ?
मालती : फिसकटले नाही. ( थांबून ) तुम्ही - ब्राऊनिंगची ती सॉनेट वाचलीच आहेत ना ?
प्रभाकर : ( वर्तमानपत्राकडे पहात आठवू लागतो. ) कोणती बरे ?
मालती : अहो परवा आपण दोघांनी मिळून नाही का वाचली ती ?
प्रभाकर : हां, हां, एव्हरीमॅन्स सिरीजमध्ये ब्राऊनिंगच्या कवितांचा जो दुसरा भाग आहे -
मालती : हो तीच, दुसर्‍या भागाच्या शेवटी आहे तीच.
प्रभाकर : वा ! ती तर मला फारच आवडते.
मालती : हो मलासुध्दा ती आवडते, पण -
प्रभाकर : मग त्यात विचारायचे काय आहे ? हं: !
मालती : विचारायचे म्हणजे असे ( थांबून ) नकळत प्रेम करणार्‍या माणसाने - जे तिला उद्देशून म्हटले आहे की - ( थांबून ) माझ्या सगळ्या हालचालींचे मर्म जर तुला कळून येईल तर -
प्रभाकर : ( वर्तमानपत्राकडे पहात ) हो मग, असेच आहे त्यात.
मालती : तर मग मी म्हणते ( थांबून )असेच उलट एखाद्या - हिला - नाही का म्हणता यायचे ? ( टेबलाकडे पहात राहते. )
प्रभाकर : हो, हो, तसेही होईल की, हं: इतकेच ना ? ( घड्याळाचे ठोके पडतात. मालती काही बोलत नाही. ) अरे ! बराच उशीर झाला की ! ( वर्तमानपत्रे गोळा करुन नीट टेबलावर ठेवतो, व किंचित मालतीकडे पाहून ) बरे आहे मग मी जातो आता, माझ्याकडे ते - हे येणार आहेत तेव्हा लवकर घरी जायला पाहिजे. उद्या कदाचित येईनच मी. बरे आहे जातो आता.
मालती : ( प्रभाकरकडे न पहाता, नुसतीच मान हलवते, प्रभाकर गेल्यावर जिन्याकडे काही वेळ पाहते. नंतर लागलीच खिडकीकडे जाऊन रस्त्याकडे पाहत उभी राहते. दोन तीन मिनिटानंतर लुगड्याच्या पदराचे टोक डाव्या हातात धरुन त्याच्याकडे पहात उजव्या हाताने त्याला पीळ घालू लागते. पुढे मध्येच थांबून पुन : रस्त्याकडे पाहते; ) अजूनसुध्दा - ? ( थांबून ) देवा ! नको हा जीव -
( असे म्हणून अत्यंत निराशपूर्ण आकाशाकडे पाहून एक लांब सुस्कारा सोडते. नंतर खोलीत जाते व दार लावून घेते. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP