अध्याय अकरावा

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


॥ श्री गणेशाय नम: ॥
जय जय सद्गुरुनाथा ॥ पतितपावना समर्था ॥ दीनदयाळा कृपावंता ॥ तुज वर्णितां मौन्य पडे ॥१॥
परा याचा नेणे पार ॥ तेथें काय वैखरीचा उच्चार ॥ तूं अनिर्वाच्य निर्विकार ॥ म्हणोनि नमस्कार मौन्यचि ॥२॥
मौन्यचि नमस्कार कीजे ॥ तेव्हाच तुज लाविजे ॥ येरवीं काय तुजसीं दुजें ॥ सहजीं सहज जडला असे ॥३॥
जसे सागरीं कल्लोळ उठती ॥ तरी काय सागरावेगळे असती ॥ तैसे तुजमाजी आम्हीं गुरुमूर्ती ॥ ऐसी स्थिति कळों आली ॥४॥
सुवर्ण नग झालें ॥ परी सुवर्णचि असे संचलें ॥ तैसे तुजपासुनी विस्तारिले ॥ परि असती जडले तुझे पायीं ॥५॥
जैसीं उंसांचीं कांडोरीं पेरितां ॥ तेथें उंसचि होय तत्त्वतां ॥ तैसीं आत्मत्वीं पाहों जातां ॥ भ्रांति विषयममता ॥ दिसेना ॥६॥
जैसे अग्निपासोनि दीप होती ॥ परी ते अग्निरूप आहेती ॥ तैसे ब्रह्मीं जीव भासती ॥ परी आहेती तद्रूपचि ॥७॥
मृत्तिकेपासोनी भांडीं होती ॥ वेगळ्या झाल्या आकृती ॥ परी मृत्तिकारूपचि आहेती ॥ तैसी स्थिति तुझेनी ॥८॥
जैसें ग्राम आहेती भिन्न भिन्न ॥ आणि त्यांचीं नामेंही अन्य ॥ परि पृथ्वी एकचि जाण ॥ तैसे आम्ही जाण तुझे ठाईं ॥९॥
चार खाणी चार वाणी ॥ चौर्‍याशीं लक्ष जीवयोनी ॥ अनंत ब्रह्मांडें आदिकरूनी ॥ तुजपासोनी विस्तार ॥१०॥
जैसें तसू तरी एक ॥ परि पट होतीं अनेक ॥ तैसें तुजपासोनी विश्व सकळिक ॥ परि न मोडेचि देख एकपणाचा ॥११॥
सूत पट नामें दोन ॥ परि कापूसचि तो अभिन्न ॥ तैसें क्षराक्षर जाण ॥ तुज भिन्न नव्हेती ॥१२॥
जैसें सूत पट दोन बोलीं ॥ परी कापूरचि थोकावली ॥ तैसी क्षराक्षर तुजपासोनी झालीं ॥ असती जडलीं तुजसीच ॥१३॥
जैसें वृक्षीं पल्लव वेगळाले ॥ परी वृक्षींच असती जडले । तैसे तुजपासोनी वृक्ष झाले ॥ जग व्यापिलें तुज एक ॥१४॥
सर्व जीवांचें जीवन ॥ सर्वा भूतां अधिष्ठान ॥ स्थिति उत्पत्ति प्रळय भिन्न ॥ ऐसें ज्ञान तुझें तुजला ॥१५॥
कां जे जप तप वाच्यांश ॥ तूं तो अससी लक्षांश ॥ म्हणोनी श्रुतीसी सायास ॥ मग मौन्य वाचेसीं पडलें कीं ॥१६॥
तुझें जाणावया ज्ञान ॥ तुजवीण श्रेष्ठ आहे कोण ॥ म्हणोनी तुझ्या कृपेविण ॥ नकळे जाण जप तपें ॥१७॥
सबाह्य अंतरीं तुज जाणितलें ॥ जाणणेंही तद्रूपचि झालें ॥ मग सहजचि वेद मौनावले ॥ तैसें मज जाहलें असे कीं ॥१८॥
सागराचा थाक घ्यावा म्हणो ॥ सैंधवखडा निघे आपण ॥ तो जातांचि गेला विरोन ॥ समुद्र होवोनी राहिला ॥१९॥
तैसेंच आत्मस्वरूपाशीं । वेद गेला आणावयसी ॥ तो मुकावला देवपणासी ॥ पडे वाचेसी मौन्य पैं ॥२०॥
तैसें तव कृपेंकरून ॥ आत्मानुभव होतां जाण ॥ वैखरीस जपडॆ मन्य ॥ करावया स्तवन रीघ नाहीं ॥२१॥
वेद म्हणती नेतिनेति ॥ या अभिप्रायातें कोणी न जाणती ॥ निरसी वाच्यांशाप्रति लक्षांशाप्रति ॥ लावावया ॥२२॥
जें जें काहीं दृश्यमान ॥ तें तें अवघेंचि अप्रमाण ॥ हें वेदाचें वर्म जाण ॥ जाणती खूण अनुभवी ॥२३॥
मन बुद्धींसी जें कांहीं आलें ॥ अथवा वाचेनें बोलविलें ॥ तें तें दृश्य सोडविलें ॥ ऐसीं गुह्यें सांगीतली वेदीं ॥२४॥
जें जाणोनी वेद मौनावले ॥ तेंचि मन अनुभवा आलें ॥ वेदवाच्यांश उरलें ॥ जन मार्गीं लावावया ॥२५॥
वेद तो वाच्यांशपूर्ण ॥ आणि स्थूळ तो दृश्य आपण ॥ म्हणोनी वाचे धर्मस्थूळीं स्थापोन ॥ असावें आपण निर्हेत ॥२६॥
ऐसें स्वामींनी केलें निरूपण ॥ ते मज कळूं आली खूण ॥ कां जो इंद्रियांचा स्वभाव जाण ॥ चेष्टांविण न राहती ॥२७॥
जरी झालें ब्रह्मज्ञान ॥ उडालें द्वैतबुद्धीचें ठाण ॥ परी जें शरीर आहे भिन्न भिन्न ॥ तें एक जाण नव्हेचि ॥२८॥
जैसा वेद एक लक्षांश झाला ॥ परी वाच्यांश असे उरला ॥ तैसा मनें अनुभवा आला ॥ परी राहिला स्थूळयोगें ॥२९॥
म्हणोनी स्थूळ वर्तणुकेसीं ॥ वेदाचे आचार निश्चयेसीं ॥ ऐसें स्वामींनी उपदेशिलें मजसीं ॥ तें दीनासीं मानलें ॥३०॥
ऐसें मानिलें म्हणाल मनीं ॥ तरी सांगितलें वेगळें करूनी ॥ स्वामींनां बोधिलें नाना वचनीं ॥ तेंचि परतोनी सांगतों ॥३१॥
जैसें सुवर्ण तरी एक ॥ परी नग झालेती अनेक ॥ जेथींचें तेथें लेखितां सुख ॥ तैसें देख कर्मही ॥३२॥
कानींचे नग घालावे नाकीं ॥ नाकींचे नग घालावे मस्तकीं ॥ ऐसें स्थूळभावें अनेकीं ॥ कर्मविशेषीं लागलें ॥३३॥
जोंवरी अलंकाररूपें सुवर्ण ॥ तोंवरी स्थूळीं शोभायमान ॥ तैसें देह वर्तमान ॥ तोंवरी जाण कर्म यासीं ॥३४॥
मग आपले स्थळीं मिरवले ॥ तरी ते काय सुवर्णपणा मुकले ॥ तैसें स्थूळें विधियुक्त कर्म केलें ॥ तरी काय गेलें ब्रह्मत्व ॥३५॥
ब्रह्म जैसें तैसेंचि आहे ॥ स्थूळ कर्मासी लिप्त नोहे ॥ त्रिगुणी येणें वर्तताहे ॥ ब्रह्म जाणताहे साक्षित्वासीं ॥३६॥
मी कर्म करीन अथवा न करीन ॥ ही कल्पना करावया कोण ॥ ज्या ज्या वर्णां देह निर्माण ॥ तें जाण कर्म त्यासी ॥३७॥
हे तो सहजस्थिति पाहीं ॥ येथें कोणी नवल केलें नाहीं ॥ जे कर्म टाकोन देहीं ॥ निष्कर्म सोई धरावी ॥३८॥
निर्विकार वस्तु जे आहे ॥ तेथें कर्माची नाहीं सोये ॥ जैसें आकाशीं अभ्र होय जाये ॥ आकाश पाहें संचलें ॥३९॥
अभ्र झालें थोर लहान ॥ अभ्रासीं ते नाना वर्ण ॥ जैसें आत्मत्वीं दृश्य जाण ॥ वर्णावर्ण शोभती ॥४०॥
अभ्रास वाड आकाश मी कर्मकर्ता ॥ ऐसी जी आथिली अहंता ॥ ते तुझे कृपें सद्गुरुनाथा ॥ गेली तत्वतां हरपोनी ॥४२॥
देहेंचि मयां मानिलें होतें ॥ म्हणोनी अहंकर्तेपण जडलें होतें ॥ पूर्णब्रह्म झालें मातें ॥ देहममता नाहीं कीं ॥४३॥
तुमचे चरणीं मस्तक ठेविला ॥ तेव्हांच संदेह तुम्हां समीर्पला ॥ नातें नाहीं देहा आणि मला ॥ मी पूर्णत्व संचलों वेगळाचि ॥४४॥
ऐसें तुमचे कृपेंकरून ॥ मज बोधानें आलें ज्ञान ॥ तंव सद्गुरु बोलिले आपण ॥ भला म्हणोन स्थापिला ॥४५॥
जैसा चंद्र तारांसमावेत ॥ व्योम जळीं भासत ॥ तैसें तुझे बुद्धीआंत ॥ ज्ञान समस्त बिंबलें ॥४६॥
माझें निवालें अंतर ॥ तुज ज्ञान झालें प्रखर ॥ जें जें सांगितलें उत्तर ॥ हृदयामाजी धरियलें ॥४७॥
अरे बापा स्थूळपासोन ॥ कोणाचा उगवा होत नाहीं म्हणोन ॥ स्थूळची आस्था धरून ॥ कथेचें ज्ञान तें वाउगें कीं ॥४८॥
नवनिधि अष्टमासिद्धी ॥ हे तव अद्वैत भजनीं उपाधी ॥ तो वेदबाह्य त्रिशुद्धी ॥ तो स्वरूप आनंदी विसरला ॥४९॥
उडत पडत रडत ॥ हें अवघें पाखांडमत ॥ सर्वत्रीं प्रकाशली एक ज्योत ॥ तेथें हेत कायसा ॥५०॥
म्हणोनी वृत्ती तेचि निवृत्ती करी ॥ व्यापक होये आकाशापरी ॥ विधियुक्तकर्मे निर्धारीं ॥ अति आदरें करावीं ॥५१॥
तें कर्म म्हणजे कोण कोण ॥ तेंही सांगतों वेगळें करून ॥ ज्या वर्णीं जो जो जाण ॥ वेद आपण स्थापिला ॥५२॥
जेणें शोभिवंत सर्व वर्ण ॥ जो वेदाचें अधिष्ठान ॥ सर्व मंगळाचें कारण ॥ मंत्राधीन देव त्याच्या ॥५३॥
ज्याच्या पवित्रपणाची थोरी ॥ नेणिजे गा सुरवरीं ॥ तो भूदेव अवनीवरी ॥ करी निर्धारी कर्मातें ॥५४॥
ज्याचें होतांचि दर्शन ॥ महापाप होय क्षाळण ॥ बिंदुमात्र तीर्थ घेतां जाण ॥ होय पावन तात्काळ ॥५५॥
जें देवाचें भूषण ॥ जेणें तीर्थासी तीर्थपण ॥ जेणें शास्त्रासीं महिमान ॥ जें आयतन विधिचें ॥५६॥
जें स्वकर्माचें माहेर ॥ बद्ध मोक्ष ज्याचे कर ॥ जेणें पावन चराचर ॥ ज्यातें हरिहर वंदिती ॥५७॥
जें सर्व भूषणाचें भूषण ॥ तें ब्राह्मणाचें पदरज जाण ॥ ब्राह्मण म्हणोनि विष्णु आपण ॥ हृदयीं पदचिन्ह मिरवी ॥५८॥
या ब्राह्मणाचे कर्मासीं ॥ रत्नाकरा सांगतों तुजपासीं ॥ सावध करोनि श्रवणासीं ॥ अति आदरेंसी करावें ॥५९॥
जरी श्रोता होय सावधान ॥ तरी वक्त्यांचें निवे मन ॥ श्रोतावक्त्यांचें भांडवल जाण ॥ हें सत्य वचन जाणावें ॥६०॥
यजन याजन अध्ययन ॥ अध्यापन दान आणि प्रतिग्रहण जाण ॥ हें ब्राह्मणाचें कर्मभूषण ॥ स्वभावें करून जडलें असे ॥६१॥
यजन म्हणजे यज्ञ करून ॥ संतुष्ट करावें देवांलागुन ॥ देव संतुष्ट केल्याविण ॥ नोहे पर्जन्यवर्षाव ॥६२॥
पर्जन्य वर्षल्यावीण ॥ कणादिक नोहे निर्माण ॥ कणाविण सकळ जन ॥ नव्हे जीवन मनुष्याचें ॥६३॥
मनुष्याविण कांहीं ॥ सृष्टीचें कर्म होणार नाहीं ॥ वेदशास्त्राचा महिमा पाहीं ॥ मनुष्याविण कांहीं वाढेना ॥६४॥
तीर्थव्रत देवी देवता जाण ॥ जप तप अनुष्ठान ॥ शुभ अशुभाचें ज्ञान ॥ मनुष्याविण कोण जाणे ॥६५॥
वेदशास्त्राची व्युत्पत्ती ॥ चौसष्टी कळांची ख्याती ॥ मनुष्याविण इतरांप्रति ॥ कैंचि गति ये ठायीं ॥६६॥
यज्ञ करिताती निर्वाणीं ॥ तेणें पर्जन्य होय धरणीं ॥ देव पितर तृप्त करूनी ॥ करिती जतन मनुष्याची ॥६७॥
सर्व मनुष्यचि तृप्त करिती ॥ आणि सर्वांस मनुष्य जाणती ॥ मनुष्यावेगळी भावभक्ती ॥ ज्ञानपदार्थीं पैं नाहीं ॥६८॥
मनुष्य सर्व सुखाचें आयतन ॥ मनुष्य सर्व सुखाचें कारण ॥ विधिनिषेधा लागुन ॥ एक जाण मनुष्यचि ॥६९॥
ऐसें जें मनुष्यनिधान ॥ त्याचें अन्नची जीवन ॥ अन्नावेगळे प्राण ॥ न वांचती जाण भूतांचे ॥७०॥
अन्नाद्भवंति भूतानि ॥ ऐसें गीतेमाजी बोलिले चक्रपाणी ॥ म्हणवोनि अन्नावेगळे कोणी ॥ भूत अवनीवरी वांचेना ॥७१॥
तरी पर्जन्या वेगळें नव्हे अन्न ॥ पर्जन्य नव्हे देवतृप्ति झाल्याविण ॥ देवतृप्ति यज्ञेंचि जाण ॥ म्हणवून ब्राह्मण यज्ञ करिती ॥७२॥
सर्वत्रीं एक जाणोनी ॥ द्वैतभावनेतें सांडोनी ॥ यज्ञ करिती विधि करोनी ॥ देव समस्तां सुख होय ॥७३॥
अहं ब्रह्मास्मि जाणोन ॥ राहिले सर्व साक्षी होऊन ॥ गुरुमुखें ज्ञानाग्नि चेतवून ॥ करी यजन भ्रांतीचें ॥७४॥
जें जें कांहीं दृश्यमान ॥ तें तें होमद्रव्य जाण ॥ धुर तोचि रे अज्ञान ॥ सोहं मंत्रेकरून होम होय ॥७५॥
सोहं आणि हंस ॥ घोष होय रात्रंदिवस ॥ मारोन देहाभिमान पशूस ॥ पुरोडाश मन अर्पिती ॥७६॥
ऐसा हा ज्ञानयज्ञ ॥ नव्हे सद्गुरु दास्याविण ॥ हा यज्ञ न करितां जाण ॥ न होय समाधान देवाचें ॥७७॥
इतर बाह्य यज्ञ करिती ॥ एकात्मता नसे चित्तीं ॥ म्हणोनी पशूंतें वधिती ॥ ते मंदमति जाणावे ॥७८॥
यज्ञपुरुषातें चुकती ॥ जो व्यापक सर्वांभूतीं ॥ द्वैतभाव यज्ञ करिती ॥ त्याची यज्ञस्थिति वाव ॥७९॥
आपुलें साक्षित्व नाहीं जाणत ॥ मी देह असें मानित ॥ बाह्य अहंकार धरित ॥ तो यज्ञ होत वेदबाह्य ॥८०॥
शिवोभूत्वा शिवंजयती ॥ हें उपदेशी सर्वार्थीं ॥ याची जे उपेक्षा करिती ॥ तो बोलिलेती वेदबाह्य ॥८१॥
जे आत्मानुभवातें चुकले ॥ ते यज्ञीं अधिकारी नाहीं बोलिले ॥ आणि त्यांहीं यज्ञ केले ॥ ते झाले पोरखेळ ॥८२॥
पोरें भातुकली करिती ॥ नवरा नवरीचें लग्न लाविती ॥ बाजारोबाजार मिळविती ॥ उठा म्हणती भोजना ॥८३॥
वस्त्रें फेडा म्हणती ॥ स्नानें करूनी बैसा पात्रीं ॥ वाढणार्‍यामध्यें फिरती ॥ आदर करिती घ्याजी घ्याजी ॥८४॥
जेवणार म्हणती झालों पूर्ण ॥ बहुत अपूर्व आजिचें अन्न ॥ लटिक्याचि मिटक्या मारिती जाण ॥ देखिलें अन्न कोणी नाहीं ॥८५॥
ऐसें आत्मानुभवाविण ॥ जें जें कर्म तेचि अकर्म जाण ॥ जें जें केलें तें अप्रमाण ॥ वेदबाह्य जाणिजे तो ॥८६॥
जो व्यापकातें चुकला ॥ तोचि वेदबाह्य बोलिला ॥ तेणें जो यज्ञ केला ॥ तो गेला वायांची ॥८७॥
स्वप्नीं उदंड देखिलें सुख ॥ परी जागृतीस अवघें लटिक ॥ तैसें देहाभिमान यज्ञादिक ॥ अवघें मायिक जाणिजे ॥८८॥
स्वप्नींचे अमृतें जरी वांचता ॥ तरी बाह्ययज्ञीं ईश्वर तृप्त होता ॥ ही अवघी मिथ्या वार्ता ॥ तैसा सुता यज्ञ जाण ॥८९॥
मृगजळाचे जळेंकरून ॥ जरी निर्माण होतें धान्य ॥ तरी बाह्ययज्ञ करून ॥ तृप्त नारायण होता कीं ॥९०॥
गंधर्वलग्नाभीतरी ॥ वांझपुत्र नांदता जरी ॥ तरीच बाह्ययज्ञें श्रीहरी ॥ होता निर्धारीं संतुष्ट ॥९१॥
दर्पणामाजील हार जाण ॥ कंठी घालवता घेऊन ॥ तरी जीवदशेचे यज्ञेंकरून ॥ होता भगवान् संतुष्ट ॥९२॥
अहंदेह असें म्हणोन ॥ यज्ञ केला तो अप्रमाण ॥ ऐसें जाणोनी विद्वज्जन ॥ साक्षी होवोनी यज्ञ करिती ॥९३॥
शरीरभावनेतें सांडोनी ॥ राहती साक्षी होवोनी ॥ मीतूंपणातें त्यजुनी ॥ करिती यज्ञ तो उत्तम ॥९४॥
हों ब्राह्मणाचें प्रथम भूषण ॥ जेणें ब्राह्मणासीं ब्राह्मणपण ॥ सांगितलें यजन ॥ त्याचें आख्यान केलें तें ॥९५॥
ऐसें साक्षित्वें करितां यज्ञासीं ॥ व्यापकत्व पाहती हृषीकेशी ॥ यजन म्हणजे दुसरीयासी ॥ आदरेंसी करविसी ॥९६॥
गुरुकृपेंकरून ॥ मज लाधली अनुभवी खूण ॥ जैसा आपण केला यज्ञ ॥ दुसर्‍यासी जाणतो तेंचि सांगे ॥९७॥
आत्मप्रचीत गुरुप्रचीत ॥ आणि तिसरी शास्त्रप्रचीत ॥ अनुभवें ऐसें जे करीत ॥ तेचि शिकवती दुसर्‍यासी ॥९८॥
यजन आतण याजन ॥ याप्रकारें कर्मे जाण ॥ येणेंचि संतुष्टे नारायण ॥ होय पर्जन्य अमूप ॥९९॥
जे ज्ञान यज्ञातें जाणती ॥ तेचि जाणा वेदांती ॥ जे ज्ञानयज्ञातें नेणती ॥ ते बोलिजेति वेदबाह्य ॥१००॥
अध्ययन आणि अध्यापन ॥ यांचें सांगीतलें लक्षण ॥ रत्नाकरा होईं सावधान ॥ यजन याजन सांगीतलें ॥१॥
अध्ययन पदार्थाचा अर्थ ॥ अध्ययन करावें वेदांत ॥ मी कोण आहें अखंडिते ॥ विचार करित जावा कीं ॥२॥
मी यांमाजीं आहें कोण ॥ जीव किंवा प्राण ॥ मी देह किंवा मन ॥ हेंचि अध्ययन करावें ॥३॥
स्थूळ सूक्ष्म कारण ॥ जाग्रुती स्वप्न सुषुप्ती जाण ॥ त्वंपद तत्पद विचारून ॥ हेंचि अध्ययन करावें ॥४॥
करूनि वेदशास्त्राची व्युत्पत्ती ॥ आत्मा पहावा सर्वांभूतीं ॥ कल्पनेची करावी शांती ॥ हेचि स्थिती अध्ययनाची ॥५॥
सद्गुरुमुखें आपण ॥ करावें ओंकारविवरण ॥ करावें अभिमान सांडून ॥ हें अध्ययन करावें ॥६॥
क्षर आणि अक्षर ॥ यांचा करावा विचार ॥ त्यजीत जावे विकार ॥ हेंचि याचे अध्ययन ॥७॥
सगुण आणि निर्गुण । सच्चिदानंदघन ॥ प्रकृति पुरुषाचें विवरण ॥ हेंचि अध्ययन करावें ॥८॥
ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रियें ॥ अंत:करण चतुष्ट्य काये ॥ पंचीकरणीं विचारूनी पाहे ॥ हेचि सोय अध्ययनाची ॥९॥
मी आहें कोठील कोण ॥ मज महाजन्म काय म्हणोन ॥ निर्विकल्प होय मन ॥ हेंचि अध्ययन करावें ॥११०॥
अष्टप्रकृति त्या कोण कोण ॥ करावें माया अविद्येचें निरसन ॥ त्यजावा देहाभिमान ॥ हेंचि लक्षण अध्ययनाचें ॥११॥
परा पश्यंति मध्यमा वैखरी ॥ जीव शिव हा निर्णय करीं ॥ मी कोण हें निर्धारीं ॥ अखंड विचारी अध्ययन ॥१२॥
लोकेषणा वित्तेषणा ॥ सांडोनियां दारेषणा पुत्रेषणा ॥ जाऊनि सद्गुरुसीं शरणा ॥ आपण आपणा जाणावया ॥१३॥
अद्वैत ग्रंथ पाहत ॥ उपनिषद्भागवेदांत ॥ सोहं हंसाचा विचार करित ॥ तेंचि तत्वतां अध्ययन कीं ॥१४॥
सद्गुरुस गेलिया शरण ॥ तेव्हां ते बोधिती आपण ॥ तें अति आदरें करावें श्रवण ॥ देहाभिमान त्यजुनी ॥१५॥
जोंवरी देहाभिमान गेला नाहीं ॥ तोंवरी श्रवण तें श्रमचि पाहीं ॥ ऐसें जाणोनी धरी सोई ॥ न करी कांहीं तर्कातर्क ॥१६॥
जें जें सद्गुरुमुखें वाक्य निघत ॥ वेदशास्त्राचें साक्षिभूत ॥ वरच्यावरी जो झेलित ॥ जैसे चकोर प्राशिती चंद्रामृत ॥१७॥
श्लोक ॥ न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तप: ॥ गुरुज्ञानात्परं नास्ति तस्मै श्रीगुरुवे नम: ॥१॥ टीका ॥ गुरुवेगळा तत्वांश अधिकार नाहीं ॥ जो व्यापक असे सर्वांठायीं ॥ जप तप केल्या सोई ॥ महिमा त्याचा नकळेचि ॥१८॥
जैसें तत्व जाणीतल्यावरी ॥ द्वैतभावाची न उरे उरी ॥ जैसा सूर्य प्रकाशला अंबरीं ॥ अंध:कारपुरी नाशीजे ॥१९॥
ऐसें जें तत्त्वज्ञान ॥ तेंचि सद्गुरुकृपेविण ॥ सर्वसाक्षी झाला आपण ॥ तेंचि जाण तप कीं ॥१२०॥
मी देह नव्हे आपण ॥ मी वेदांती ब्रह्मपूर्ण ॥ यासींच म्हणावें ज्ञान ॥ आणि तपहि हेंच कीं ॥२१॥
ऐसें जेणें जाणीतलें ॥ तेंचि अध्ययन बोलिलें ॥ स्वयेंचि ब्रह्मरूप झालें ॥ तेणेंचि केलें अध्ययन ॥२२॥
श्लोक ॥ अच्युतोहमनंतोहंगोविंदोहमहंहरि: ॥ माधवोहंमहेशोहमजोहममृततोस्म्यहम् ॥२॥ टीका ॥ अच्युत म्हणजे कायी ॥ ज्यासीं कांहीं चंचळता नाहीं ॥ हे उत्पत्ती प्रळयातीत पाहीं ॥ जें सर्वांठायीं कोंदलें ॥२३॥
तें मीच स्वयें आपण ॥ आपण तोही मीच जाण ॥ गोविंद आणि हरि पूर्ण ॥ मी अधिष्ठान सर्वांचें ॥२४॥
मी एक आत्मा चराचरीं ॥ हे नाशवंत मी अविनाश निर्धारीं ॥ ऐसें अखंडाध्ययन करी ॥ तोचि चराचरीं ज्ञानी कीं ॥२५॥
नित्यानित्य आत्मविवरण ॥ हेंचि ब्राह्मण अध्ययन जाण ॥ यावेगळें विटंबन ॥ सत्य हेंचि मानावें ॥२६॥
श्लोक ॥ आनंद: सत्यबोधोहमिति ब्रह्मानुचिंतयेत् ॥ अयं प्रपंचो मिथ्या वैसत्यं ब्रह्म सनातनम् ॥३॥ टीका ॥ आनंदस्वरूप मी आपण ॥ ब्रह्म जें शाश्वतपूर्ण ॥ ऐसेंचि अखंड करी चिंतन ॥ हेंचि अध्ययन जाणावें ॥२७॥
प्रपंच मिथ्या दिसत ॥ म्हणोनी यासीं जाणत ॥ मी ब्रह्म सदोदित ॥ हेचि स्थित अध्ययनाची ॥२८॥
श्लोक ॥ गुरुर्वेदं वेदवाक्य कर्मब्रह्म स निश्चयम् ॥ आत्मबोध प्रवचनं तस्याध्ययन मुच्यते ॥४॥ टीका ॥ यासी प्रमाण वेदांत ॥ आणि सद्गुरु ऐसेंच बोधित ॥ ऐसें जाणुनी भ्रमातें त्यागित ॥ अध्यय हें सत्य जाणावें ॥२९॥
मी ब्रह्मीं संचलोंचि आहें ॥ जैसा तैसाच भासताहें ॥ जैसा काष्ठीं अग्नीं दुघीं घृत हें ॥ मी नव्हे संसारिक ॥३०॥
जळीं आकाश भासत । तरी काय तें जाणावें त्यात ॥ तैसा संसारीं मी देख पतित ॥ परी लिप्त तेथें नव्हेचि ॥३१॥
नाहीं पृथक्ब्रह्म मजविण ॥ मी सर्वांचें आयतन ॥ मी सर्वांतीत आत्मा पूण ॥ चैतन्य घन तो मीच ॥३२॥
मी नाहीं देहाचें ठायीं ॥ देह असे माझ्याठायीं ॥ नाहीं केवळ सनातन पाहीं ॥ तेचि सोय अध्ययनाची ॥३३॥
एक मी अद्वैत ब्रह्म जाण ॥ नव्हे नास्तिक अकिंचन ॥ हेंहि ब्रह्मज्ञानाचें अध्ययन ॥ सर्व यावीण विटंबना ॥३४॥
विद्या विनयतेस जरी जाणती ॥ आणि आपणातें नेणती ॥ पोटासाठीं अभ्यास करिती ॥ तेनें जाण चित्तीं विटंबना ॥३५॥
बाह्य संपादनी करिती ॥ आपण अंतरात्मा नेणती ॥ तें अध्ययन नव्हे फजिती ॥ ज्ञाते त्यागिती म्हणोनी ॥३६॥
जें जें अद्वैता वेगळें भजन ॥ तें तें ज्ञाते न करिती जाण ॥ कृष्ण नामस्मरणीं आवडी पूर्ण ॥ हें अध्ययन ज्ञात्याचें ॥३७॥
अद्वैतपण तरी न मोडे ॥ आणि भक्ति तरी घडे ॥ ऐसें अनुभव चोखडे ॥ ज्ञात्ये धडफुडे आचरिती ॥३८॥
शब्दब्रह्मीं अति निपुण ॥ काव्य व्याकरणीं व्युत्पन्न ॥ मी कोण हें नाहीं ज्ञान ॥ तेचि जाण विटंबना ॥३९॥
हेंचि ब्राह्मण अध्ययन जाण ॥ त्याचें झालें निरूपण ॥ पुढें अध्यापनाचें व्याख्यान ॥ सावधानें पैं ऐकावें ॥१४०॥
अध्ययन म्हणेज आपण करणें ॥ अध्यापन दुसरियासी सांगणें ॥ हित होय तें त्याचें करणें ॥ त्यासीच म्हणणें अध्यापन ॥४१॥
दृश्य पदार्थ तो निरसून ॥ सांगे आत्मानुभयाची खूण ॥ म्हणे बापा सावधान ॥ पाहें परतोन आपणासी ॥४२॥
सांगे वेदशास्त्र व्याख्यान ॥ शब्दब्रह्म करी निपुण ॥ म्हणे तूं साक्षी याहून ॥ वेगळा जाण अससी रे ॥४३॥
तूं स्थूळ देह नोहेसी ॥ तयाचा जाणता आहेसी ॥ शुभाशुभतें जाणसी ॥ म्हणोनी देहाभावनेसीं सांडीं रे ॥४४॥
श्लोक ॥ प्रथमं च लिखद्रक्तं द्वितीयं श्वेतवर्णकम् ॥ तृतीयं श्यामवर्णं च चतुर्थं नीलपीयतों: ॥५॥ टीका ॥ प्रथम स्थूळ रक्तवर्ण ॥ त्याचें औटहात प्रमाण ॥ तेंचि पंचभूतात्मक जाण ॥ याहूनी वेगळें ॥१४५॥
स्थूळ जें जें कर्म होय कांहीं ॥ तें तें साक्षित्व जाणसी पाहीं ॥ तुजविण जाणत नाहीं ॥ सांडीं सोय देहाची ॥४६॥
सूक्ष्म देह श्वेतवर्ण ॥ तो असे अंगुष्ठप्रमाण ॥ वासनात्मक लिंगदेह जाण ॥ याहून वेगळा ॥४७॥
तिसरा कारणदेह श्यामवर्ण ॥ त्याचें अर्धपर्व प्रमाण ॥ त्याहून वेगळा आपण ॥ अध्ययन करीं तूं ॥४८॥
चतुर्थ देह महाकारण ॥ नीलवर्णमसुर प्रमाण ॥ त्याचा प्रकाशक जाण ॥ साक्षी पूर्ण चौघांचा ॥४९॥
तूं चौदेहांचा जाणता ॥ अससी चौदेहांपरता ॥ सर्वत्रीं तुझीच सत्ता ॥ ऐसेंच तत्वतां बोधीतसे ॥१५०॥
श्लोक ॥ नीलविद्युत्प्रभा सूक्ष्म पीतश्वेतं तथैव च ॥ सर्व रंगातीत आत्मा व्याप्ते अध्यापनं भवेत् ॥६॥ टीका ॥ नीलवर्णामाजी जाण ॥ विजेसारिखा देदीप्यमान ॥ तूं सूक्ष्म सूक्ष्माहून ॥ पीतवर्ण असशी बापा ॥५१॥
त्या पीतशिखेमाजी पूर्ण ॥ परमात्मा असे आपण ॥ त्यानें पाच रंगपण ॥ तो रंगाहून वेगळा ॥५२॥
तेंचि ब्रह्म निश्चयेंसीं ॥ अगोचर इंद्रियासीं ॥ असेच अध्ययन शिष्यासीं ॥ अहर्निशीं करवीं तूं ॥५३॥
श्लोक ॥ यं वैभित्वा योहिगच्छेत्सयोगी योगवान् भवेत् ॥ अन्यथा शब्द पांडित्यं कथयंति वृथा जना: ॥७॥ टीका ॥ जो जो बोले सद्गुरुकृपेंकरूनी ॥ तोचि योगियांमाजी मुकुटमणी ॥ अन्यथा शब्दपांडित्य वाखाणी ॥ म्हणविती ज्ञाते वावचि ॥५४॥
सर्व साधनांचें साधन ॥ जें नाना तपांचें फळ जाण ॥ तें जाणावें ब्रह्मज्ञान ॥ ऐसें अध्ययन करीतसे ॥५५॥
ब्रह्मज्ञानावीण ॥ ज्ञान तें अवघेंचि अप्रमाण ॥ नाना व्युत्पत्ति करितां जाण ॥ जैसें नेत्रेंविण शरीर ॥५६॥
ज्ञातीचा उत्तम आहे ॥ आणि रूपही तैसें पाहे ॥ परी नेत्रांविण त्यासीं तें काये ॥ ब्रह्मज्ञानाविण जाण शास्त्राची ॥५८॥
म्हणोनियां विद्वजन्न ॥ जे पुण्य पुंज ब्राह्मण ॥ त्यांचें हेंचि भूषण ॥ तैसें अवयवें जाण शरीर ॥५९॥
सद्गुरुवाक्य ऐकोनी ॥ बोले रत्नाकर कर जोडूनी ॥ संतोष झाला तुमचे वचनीं ॥ नाहीं मनीं संदेह ॥१६०॥
सूर्याचा होतां प्रकाश ॥ ठाव कैंचा अंध:कारास ॥ तसा तुमचे कृपें मीतूंपणास ॥ ठाव वसतीसीं नसेच कीं ॥६१॥
दान आणि प्रतिग्रहाची स्थिती ॥ तेही सांगावी गुरुमूर्ती ॥ सांगीतल्या निरूपणीं मजप्रती ॥ सुख चित्तीं झालें असे ॥६२॥
तवं सद्गुरु बोलिले आपण ॥ एक दान प्रतिग्रहाचें लक्षण ॥ जेणें होइजे पावन ॥ तेंचि दान करावें ॥६३॥
दानें अमुप बोलिलेति ॥ परि त्यांचीं फळें भोगणें लागती ॥ फळें भोगावया यातायाती ॥ पुनरावृत्ति चुकेना ॥६४॥
दानें तरी सर्व करावीं आपण ॥ परी फळें द्यावीं सोडून ॥ आपुलें साक्षित्व जाणोन ॥ असावें प्रेम सद्धर्मी ॥६५॥
हा धर्म मी दाता आपण ॥ हा याचक सत्पात्र जाण ॥ ही अहंता द्यावी सोडून ॥ करावें दान निराशीं ॥६६॥
शनै:शनै: द्वैतासीं ॥ सांडीत जावें अनुभवेंसीं ॥ निर्विकल्प व्हावें मानसीं ॥ हेंच निश्चयेंसीं दान कीं ॥६७॥
सर्वत्रीं पहावा भगवान ॥ आपणासीं योजावें नाहींपण ॥ राहावें लीन होवोन ॥ हेंच दान निश्चयीं ॥६८॥
जें जें शरीरामाजी विकार ॥ त्रिगुण आदिकरोनि साचार ॥ मी याचा साक्षी होवोनि पर ॥ हें निर्विकार दान कीं ॥६९॥
शरीरीं ज्या देवता आहेत ॥ ते त्यासीं जाय अर्पित ॥ हेंचि दान निश्चित ॥ जेणें हित होय कीं ॥१७०॥
ब्रह्मांड पिंडाचें कारण ॥ कार्याकार्यीं अर्पावें आपण ॥ तेथें न करावें अनुमान ॥ हें महादान बोलिलें ॥७१॥
जाणोनियां तर्कातर्क ॥ सर्वत्रीं पहावें एक ॥ हेंचि निर्विकल्प दान देख ॥ जेणें सुख ईश्वरा ॥७२॥
निंदा स्तुति त्यागुनी ॥ असावें नाहींच होवोनी ॥ या दानाचें फळ निर्वाणीं ॥ चक्रपाणि सांपडे ॥७३॥
देव जोडावया कांहीं ॥ आणिक दान दिसत नाहीं ॥ हेंचि सांगीतलें वेदशास्त्रांहीं ॥ साधुसंतांनीं हेच केलें ॥७४॥
ज्यासीं सद्गुरुचर कृपा पूर्ण ॥ तोचि जाणे दानाजी खूण ॥ इतर भ्रमती वायां जाण ॥ ज्यासीं अभिमान देहाचा ॥७५॥
जे देहाभिमानें दान करिती ॥ ते जाणावें मंदमती ॥ कां जें आपआपणा नेणती ॥ म्हणोनी फजीति दिसतसे ॥७६॥
स्वप्नामाजी केलें दान ॥ जागृतीस येतें विमान ॥ तरी बाह्य व्यवहारें करून ॥ जगज्जीवन संतुष्टे ॥७७॥
तैसा आकार हा नाशिवंत ॥ स्वप्नप्राय ऐसा भासत ॥ त्याचें कर्म कोण अविश्वस्त ॥ ना जोडे सत्य निश्चयीं ॥७८॥
म्हणोनी याचा अभिमान सांडिजे ॥ आणि साक्षित्वें दान कीजे ॥ तेव्हांचि सुख पाविजे ॥ नातरी होय अधोगती ॥७९॥
हा याचकामाजी दानकर्ता ॥ ऐसी जरी वागवी अहंता ॥ तें दान जाण विस्मृता ॥ जेणें घाता पाविजे ॥१८०॥
आपुली पूर्णता विसरोनी ॥ मीच देह मानी मनीं ॥ तो अशौच्य वर्जिला दानीं ॥ करितां हानि होय त्याची ॥८१॥
मीच ब्रह्म ऐसा भावित ॥ हें सर्व आपण मानित ॥ निर्विकल्प दान करित ॥ बोलिलें उत्तम ज्ञान ॥८२॥
ज्या दानीं फळाशा केली ॥ तीं महापापें फळासीं आलीं ॥ निगुरी फळाशें गुंतलीं ॥ म्हणोनि पडलीं भवजन्मीं ॥८३॥
शुक आणि वसिष्ठादिक ॥ नारद आणि व्यास देख ॥ ते याच दानें पावले सुख ॥ आणि एक झालें कीं ॥८४॥
त्यांची आचारस्थिती पाहोनी ॥ विद्वज्जन वर्तती जनीं ॥ तेचि धन्य जन्मा येवुनी ॥ त्याचेनी अवनी पवित्र ॥८५॥
दान शब्दाचें आख्यान ॥ रत्नाकरा सांगितलें वेगळें करून ॥ आतां प्रतिग्रहाचें लक्षण सावधान परिसावें ॥८६॥
आपण जैसें केलें दान ॥ तैसेंच करवावें दुसर्‍यांकडून ॥ त्यांचें अज्ञान घ्यावें आपण ॥ हाचि जाण प्रतिग्रह ॥८७॥
तें जैसें दृश्यमान भासत ॥ तें तें भगवंत म्हणोनी घेत ॥ हाचि प्रतिग्रह सत्य ॥ जेणें हित होय कीं ॥८८॥
मी पूर्ण ब्रह्मा जाणोनी ॥ सर्वसाक्षी होवोनी ॥ घ्यावा प्रतिग्रह आपणीं ॥ तेणें बद्धता जना नोहेचि ॥८९॥
जैसें अग्निमाजी पडतां तृण ॥ तकाळ जाय जळोन ॥ तैसें ब्रह्मज्ञानेंकरून ॥ होय पावन प्रतिग्रहासीं ॥१९०॥
ब्रह्मज्ञानाविण प्रतिग्रह घेतां ॥ प्राणी वावरतसे बद्धता ॥ कां जे धरी देहाची अहंता ॥ म्हणोनी घाता पावे तो ॥९१॥
हा तों दाता मी याचक सत्य ॥ ऐसे भावें दान घेत ॥ तो प्रतिग्रह करी घात ॥ तेणें पावत दु:ख प्राणा ॥९२॥
जोंवरी ऐक्यता बाणली नाहीं ॥ तोंवरी प्रतिग्रह पापचि पाहीं ॥ अनुभवी घेती जेही ॥ ते तें सोई चुकले ॥९३॥
ऐसें जाणोनी पुण्य पूज्य ब्राह्मण ॥ अहं ब्रह्मास्मि जाणोन ॥ साक्षित्वें घेती दान ॥ हें भूषण ब्राह्मणाचें ॥९४॥
यजन आणि याजन ॥ अध्ययन आणि अध्यापन ॥ दान प्रतिग्रह जाण ॥ हें षट्कर्म भूषण ब्राह्मणाचें ॥९५॥
ही तों ब्राह्मणाची सहजस्थिती ॥ जैसी देपाअंगी दीप्ती ॥ कीं कापुरीं जैसी द्युती ॥ तैसी ब्राह्मणीं वस्ती कर्मा ॥९६॥
आकाशीं अवकाशता ॥ वायुसी चंचळता ॥ अग्नीसी दाहकता ॥ तैसें स्वभावतां कर्म जाण ॥९७॥
जळीं जैसें द्रवण ॥ पृथ्वीस कठिणत्व जाण ॥ तैसें ब्राह्मणासीं षट्कर्म पूर्ण ॥ नित्यनैमित्य जडलें असे ॥९८॥
तूं म्हणसी नित्यनैमित्य काय ॥ तेंही सांगतों सावध होय ॥ तूं ऐकोनी धरीं सोय ॥ साक्षी राहें वेगळा ॥९९॥
श्लोक ॥ स्नानं संध्या जपो होमो वेदाध्ययन पूजनम् ॥ अतिथिर्वैश्वदेवं च षट्कर्माणि दिने ॥८॥ टीका ॥ स्नान तरी आत्मानुतीर्थीं ॥ तेथें भवभयाचे मळ जाती ॥ त्रिविध ताप होय समाप्ती ॥ हेच स्थिति स्नानाची ॥२००॥
चौदेहांचीं वस्त्रें फेडुनी ॥ देहाभिमान पायपोस सांडुनी ॥ तुर्येनें अंगवस्त्र नेसुनी ॥ करी स्नान सुखें तेव्हां ॥१॥
एका सद्गुरुकृपेविण ॥ अनुभवतीर्थीं नव्हे स्नान ॥ स्नान नसे तों देहाभिमान ॥ न जाय निश्चयीं ॥२॥
अभिमान जों गेला नाहीं ॥ तोंवरी सोंवळेंचि नाहीं ॥ ओंवळेपणा करितां कांहीं ॥ स्वकर्म सोई लागेना ॥३॥
जैसें विटाळशीनें स्नान केलें ॥ तरी काय तिशीं शुद्धत्व आलें ॥ तैसें देहाभिमानें कर्म केलें ॥ तवं तें गेलें वायांचि ॥४॥
हें जळ मी स्नानकर्ता ॥ असें ज्यासी भासलें चित्ता ॥ तेथें कल्पनेचा विटाळ तत्वतां ॥ तेणें शुद्धता नसेच कीं ॥५॥
चौदेहांजें वस्त्र अंगावरी ॥ ममता मुंडासें बांधी शिरीं ॥ तो वेगळा गा निर्धारीं ॥ कोणपरी सोंवळें नोहे ॥६॥
ज्यानें वस्त्रासीं सांडिलें ॥ स्नान त्यासींच घडलें ॥ संध्येचे अधिकारी झाले ॥ येर राहिले ऐसेचि ॥७॥
आदरें करूनियां स्नान ॥ महारवाड्यांत गेला आपण ॥ त्याचे शुद्धत्वासीं झाली हान ॥ आली नागवण निश्चयेसीं ॥८॥
तैसें स्नान केलें विधियुक्त ॥ परी देहाभिमानें असे स्फुंदत ॥ हाचि महारवाडा सत्य ॥ तेणें होतसे ओंवळा ॥९॥
आपण स्वतां ब्रह्म होऊन ॥ जळही ब्रह्मरूप जाणोन ॥ नाहीं तरी येउनी कीजे स्नान ॥ तरी संध्येसी जाण अधिकारी ॥२१०॥
श्लोक ॥ स्नानेन मल त्यागोsयं शौचमिंद्रिय निग्रह: ॥ आत्मज्ञानं न जानंति सर्व कर्म निरर्थकम् ॥९॥ टीका ॥ मनाचा मळ त्यागणें ॥ तेंचि शुद्धस्नान म्हणणें ॥ इंद्रियनिग्रह करणें ॥ तेंचि जाणणें शौच कीं ॥११॥
ज्यानीं मन आत्मतीर्थीं न्हाणिलें ॥ आणि शरीर जळें शुद्ध केलें ॥ तेचि संध्येसी अधिकारी झाले ॥ साक्षी राहिले होउनी ॥१२॥
स्नान रीति ब्राह्मणाची ऐसी ॥ आतां ऐक संबंधेंसीं ॥ जे संधीस देहनाशी ॥ ज्ञाते मानसीं आणिते हें ॥१३॥
संधीं म्हणजे काय ॥ संधीं मनाचा लय होय ॥ स्वतांचि ब्रह्म होउनी राहे ॥ हेचि सोय संध्येची ॥१४॥
दिवस रात्रीची संधी जाण ॥ इकडे प्रकृती पुरुषां संधी पाहून ॥ प्राणायाम कीजे आपण ॥ संध्या पूर्ण तेचि कीं ॥१५॥
प्रात:काळींच्या संध्येसीं ॥ अर्घ्य देइजे ज्ञानसूर्यासीं ॥ स्वानुभवें त्रिविध तापासीं ॥ अति आदरेंसीं समर्पावें ॥१६॥
अधिभूत अध्यात्म जाण ॥ अधिदैवत त्रिविध ताप पूर्ण ॥ ज्ञानसूर्यासीं अर्घ्य देउन ॥ संध्या आपण साधावी ॥१७॥
तूं म्हणसी अधिभूत अध्यात्म काय ॥ हेंही सांगतों सावध होय ॥ जेणें त्रिविध ताप जाय ॥ साधी सोय संध्येची ॥१८॥
अधिभूत म्हणजे काय ॥ जे दुसर्‍यापासुनी पीडा होय ॥ कलागति भांडणें लागताहे ॥ अथवा जाय चोरी कांहीं ॥१९॥
अथवा आप्ततेमध्यें केला घात ॥ तेणें होतसे आकांत ॥ मग परस्परें कलह करितात ॥ हा अधिभूत ताप कीं ॥२२०॥
हा ताप अति कठिण ॥ ऐक अध्यात्माचें लक्षण ॥ पीडा होय आपल्या शरीरापासून ॥ नाना रोगेंकरून दु:ख पावे ॥२१॥
देवी गोवर ताप जारी ॥ अथवा फोड पुटकळ्या होय शरीरीं ॥ अध्यात्म ताप हा निर्धारीं ॥ धरीं अंतरीं हेत हा ॥२२॥
अधिदैवत म्हणिजे काय ॥ ईश्वरइच्छेनें जें जें निर्माण होय ॥ उगाचि प्राणी मरून जाय ॥ अथवा लागत आहे अग्नि कीं ॥२३॥
यातें दैवी ताप म्हणिजे ॥ ह्या वैराग्यातें अंजुळीं घेईंजे ॥ सोहं मंत्रें अर्घ्य देईंजे ॥ आपण जाणिजे मीच ब्रह्म ॥२४॥
जो स्वत: ब्रह्मत्वासीं आला नाहीं ॥ तो अशौच संध्येसीं वाळिला पाहीं ॥ गुरुगम्य हे जाणती सोई ॥ इतरां कांहीं सुचेना ॥२५॥
हे प्रात:काळीं संध्या करावी जाण ॥ रात्रंदिवसाची संधी पावून ॥ ते रात्रदिवस तूं म्हणसी कोण ॥ प्रकृति पुरुष हेच पैं ॥२६॥
प्रकृतिं हेच रात्रि पूर्ण ॥ पुरुष तो दिवस जाण ॥ सूर्य तोचि गा ज्ञान ॥ याचें दान दोघांचें ॥२७॥
सूर्य जरी नसता ॥ तरी दिवस रात्रि कोण जाणता ॥ तैसें ज्ञानेंविण प्रकृति पुरुषता ॥ कोणासी सुता कळों येती ॥२८॥
म्हणोनी सूर्य तो ज्ञान ॥ बोले आपुलें जाण ॥ त्रिविध ताप ते अर्घ्य देऊन ॥ की जे बोळवण रात्रीची ॥२९॥
रात्रि जेव्हां गेली ॥ तिणें आपुली संपत्ती नेली ॥ कामक्रोधाची हुकी करित होतीं कोल्हीं ॥ तीं राहिलीं उगेंचि ॥२३०॥
अशौच भालवा हुकी करिताती ॥ कल्पनेचे बेडूक कोकरती ॥ ते उगवतां ज्ञानगभस्ती ॥ गेली रात्रि घेऊनि ॥३१॥
प्रकृति जेव्हां गेली ॥ तेव्हां सर्व विकारांची शांति झाली ॥ मग विधियुक्त कर्में चालिलीं ॥ जीं जीं बोलिलीं ज्या वर्णीं ॥३२॥
रात्रि वेदशास्त्र सर्व आहेती ॥ परी आपआपणामाजी थोकावलेती ॥ ज्ञानोदय होतां पसरती ॥ जैशा उगवती कमळिनी ॥३३॥
सूर्योदय होतांचि जाण ॥ कमळणी होय विकासमान ॥ परिमळें व्यापिले सर्व जन ॥ तैसे ज्ञानोदयेंकरून पसरती ॥३४॥
त्या वेदकमळणीपासून ॥ तैसें ज्ञानउदयेंकरून ॥ नाना अर्थ परिमळें व्यापिले सर्व जन ॥ अनुभवभ्रमर करिती रुणझुण ॥ जाती घेऊन परिमळा ॥३५॥
ज्या दिवसीं कमळणी विकासत ॥ ती रात्रि असतां झोंपावत ॥ तैसें प्रकृतिमाजी वेदांत ॥ जेथींच्या तेथें केकावती ॥३६॥
होतां ज्ञानसूर्याचा प्रकाश ॥ प्रकृति रात्रीचा झाला नाश ॥ उगवला आत्मपुरुष दिवस ॥ म्हणोनी संध्येंसीं अधिकारी ॥३७॥
ऐसी प्रात:काळची संध्या झाली ॥ प्रकृतिपुरुषाची संधी सोंपली ॥ पुढें दोन प्रहराची संध्या आरंभिली ॥ संधी साधिली अहं सोहमस्मि ॥३८॥
अहं म्हणजे अहं आत्मा ॥ सोहं म्हणजे परमात्मा ॥ याहीची संधी जीवात्मा ॥ निगमानिगम बोलिजे ॥३९॥
अहं सोमाचें माध्यान्ह ॥ तेथें आत्मभ्रांतीची छाया लोपोन ॥ ते संध्या साधिती विद्वज्जन ॥ जे प्रीतीनें वेदशास्त्रीं ॥२४०॥
गुरुमुखें करूनि वेदाचें श्रवण ॥ अति आवडीनें जे करिती मनन ॥ रात्रीं दिवशीं निजध्यासन ॥ जाण संध्या पूर्ण तेचि झाली ॥४१॥
ज्यांनीं वेदशास्त्रातें नाहीं जाणितलें ॥ त्यांसींया संध्या हा शिवें बोधिलें ॥ जे सद्गुरुसीं शरण गेले ॥ तेही साधती संध्येतें ॥४२॥
जेथें जीव शिव माया जाण ॥ या तिघां अर्घ्य द्यावा आपण ॥ जेथें त्रिपुटीच हरपलें भान ॥ संध्या पूर्ण साधिली ॥४३॥
एवं माध्याह्नकाळींची संध्या साधिली ॥ आतां सायंकाळची संध्या आरंभिली ॥ ते अनिर्वाचनासीं संधी साधली ॥ दशा बाणली पूर्णत्वाची ॥४४॥
जेथें दिवस पूर्ण झाला ॥ मग तो पूर्णत्वा थोकावला ॥ तैसाहि पूर्णत्वासीं सरला ॥ समाधिस्थ राहिला तेच रात्रीं ॥४५॥
आपुलें पूर्णत्व विसरोन ॥ तेचि तिसरी संध्या जाण ॥ या संध्यातें वेदांती जाणती आपण ॥ सद्गुरु ज्यांहीं उपासिला ॥४६॥
ऐसी ही सायंकाळची संध्या जाण ॥ जेथें सच्चिदानंदाचें अर्घ्य देऊन ॥ संधी साधिती ब्राह्मण ॥ ज्यांसीं अर्घ्यन वेदाचें ॥४७॥
साधिती त्या सायंकाळच्या संध्येला ॥ तो ज्ञानसूर्य मावळला ॥ तेणें आपणा विसरला ॥ तोचि बोलिला समाधिस्थ ॥४८॥
जो आपणा आपण नाहीं जाणत ॥ त्यासीं दुजीया कैसा हेत ॥ तेवि ज्ञानरात्र म्हणिजेत ॥ तेथें निद्रिस्त योगिजन ॥४९॥
श्लोक ॥    ॥ न संधि: संधिमित्याहुर्द्वासंध्या साधि वर्तते ॥ विस्मसंधि गतो प्राण: सा संध्या संधिरूच्यते ॥१०॥
अकार गोचरं संध्या निराकारं निरामयम् ॥ परशून्य लीन वीतं सा संध्या संधिरूच्यते ॥११॥
टीका ॥ त्रिकाळ संध्या बोली ॥ परी तैसी संधी कोणी साधिली ॥ कां जे अनुभवासीं भुलली ॥ म्हणवुनी पडली अव्हाटा ॥२५०॥
हा काळ ही संध्या पूर्ण ॥ आणि मी संध्याकर्ता आपण ॥ हा देशशुद्धी अव्हाट जाण ॥ हे विद्वज्जन न मानिती ॥५१॥
श्लोक ॥ विस्मसंधि गत:प्राण: सा संध्या - संधिरुच्यते ॥ टीका ॥ येथें हरपलें मीतूंपण ॥ भेद गेला निपटुन ॥ आपणा आपलें दर्शन ॥ हेंचि चिन्ह संध्येचें ॥५२॥
अंकाविषयीं संध्या साधली ॥ निराकारी संध्या जाहली ॥ निरसोन लीन चित्तें केली ॥ तेचि बोलली उत्तम संध्या ॥५३॥
जोंवरी मनबुद्ध्यादिकांचा ॥ लय झाला नाहीं साचा ॥ तोवरी विधियुक्त संध्येचा ॥ अधिकार कैसा होईल ॥५४॥
कां जो आत्मा अनिर्वाच्य आहे ॥ जेथें मनबुद्ध्यादिकें बोलविलें पाहे ॥ म्हणोनी जो त्यासीं साक्षी राहे ॥ ओंवळेपण जाय तयाचें ॥५५॥
जोंवरी ओंवळेपण गेलें नाहीं ॥ तोंवरी हा प्रपंची पाहीं ॥ कां जे आत्मत्वाची नेणे सोई ॥ तेणें कांहींही नोहे ॥५६॥
बाह्यसंधी संध्या केली ॥ परी आत्मत्वातें चुकली ॥ तरी हे विनोदणी याची संपादनी केली ॥ बहुरुप्यासारखी ॥५७॥
तो जीं जीं सोंगें आणित ॥ तैसीच संपादणी करित ॥ तेचि परिवर्तती आत्मभ्रांतीस्थित ॥ जे न जाणती गायत्रीतें ॥५८॥
ज्याहीं ओंकारासीं जाणितलें ॥ त्यांनीं संध्येतें साधिलें ॥ इतर असत्य बोलिले ॥ वेदें वाळिलें अंत्यजापरी ॥५९॥
या संध्येतें साधिती ॥ ते स्वयेंजि ब्रह्मत्वा येती ॥ म्हणोनी ब्राह्मण बोलिलेति ॥ सर्व वंदिती त्यांलागुन ॥२६०॥
हें स्नानसंध्येचें ॥ निरूपण झालें साचें ॥ आताम ऐक जपाचें जेणें वाचे मौन्य पडे ॥६१॥
सोहं आणि अहं अजपाजप सावकाश ॥ जेणें आत्मभ्रांतीचा नाश ॥ आणि होत प्रकाश पूर्णत्वें ॥६२॥
ते अजपा गायत्री जाण ॥ तें चहूं वेदांचें कारण ॥ अखंड ध्याती योगीजन ॥ जे प्रवीण वेदशास्त्रीं ॥६३॥
पूर्ण सहजचि आहे ॥ कोणाचें कांहीं नोहे ॥ तैसा जपचि सहजचि होय ॥ म्हणोनी ग्राह्य सहजचि योगितां ॥६४॥
अजपचि जपीचे ॥ मनेंविण अनुभव घेईंजे ॥ सद्गुरुकृपेंचि लाहिजे ॥ नाहींतरी जाईंजे अधोगती ॥६५॥
या मंत्राचें जाणोनी ज्ञान ॥ रहावें साक्षी होवोन ॥ मग वैखरीनें जप तप जाण ॥ हें पावन सत्यत्वें ॥६६॥
जें जें वैखरीमाजी आलें ॥ तें तें त्रिगुणात्मक बोलिलें ॥ निर्गुण आत्मत्व अंतरलें ॥ कष्टी झाले देहसंजें ॥६७॥
हा जप मी जपकर्ता ॥ ऐसी जेथें झाली अहंता ॥ तेणेंचि झाली बद्धता ॥ गेली मुक्तता विसरोनी ॥६८॥
अहं बद्ध ऐसें जाणोन ॥ जप करी जो वेदबाह्य जाण ॥ अहंता भले सांडून ॥ अजपा पूर्ण जपताती ॥६९॥
अजपता जप जपोन ॥ स्वयेंचि ब्रह्म झाले आपण ॥ जैसी कीटकी भृंगी ध्यान धरून ॥ भृगी जाण झाली असे ॥२७०॥
जे पूर्ववेदांती असती ॥ तेच या जपातें जपती ॥ विधियुक्त कर्मे आचरती ॥ तेचि स्थिति ब्राह्मणाची ॥७१॥
स्नानसंध्या जपाचा ॥ निर्णय केला असे साचा ॥ आतां एक होमाचा ॥ अभिप्राय साचा सांगतों ॥७२॥
होम म्हणिजे अग्निहोत्र ॥ तेणें ब्राह्मण पवित्र ॥ विधियुक्त आचरती सर्वत्र ॥ ते साचार परम पूज्य ॥७३॥
पांच कुंडे प्राणाग्नीचीं जाण ॥ यांचीं नावें सांगतों भिन्न भिन्न ॥ आहवनीय दक्षिणाग्नि महायज्ञ जाण ॥ अवसानीय मध्यें ॥७४॥
ह्या पांच कुंडींचीं नांवें ॥ आतां सांगतों ऐकावें ॥ मुख्य आहवनीय जाणावें ॥ हृदयीं स्वभावें गार्हपत्य ॥७५॥
नाभि दक्षिणाग्नि वसे ॥ दक्षिण कुंडाग्नी महायज्ञ असे ॥ अवसंध्ये वामकुक्षी रहिवासे ॥ अनुभवी ऐसें जाणती ॥७६॥
प्राण हाचि होता जाण ॥ आपण अग्नि ऊर्ध्व पूर्ण ॥ व्यान ब्रह्मत्व पूर्ण ॥ उदान खूण अर्धयुग ॥७७॥
समान तोचि यजमान ॥ अहंकार पशु जाण ॥ उकार यज्ञस्तंभ पूर्ण ॥ बुद्धि जाण पत्नी कीं ॥७८॥
सृष्टि तेचि वेदिका ॥ राम हेचि दर्भ देखा ॥ जिह्व जाणावि स्त्रुचिका ॥ श्रुत्वा यज्ञापात्र कर दोन्ही ॥७९॥
एवं प्राणाग्नि होय पूर्ण ॥ ज्ञानी करिती अनुभवेंकरून ॥ येणेंचि होती पावन ॥ होमिले जाण विकार ॥२८०॥
एक पंच ज्ञानेंद्रियें ॥ हींच पांच कुंडें पाहें ॥ जेथिंचे तेथें विषय होमित जाये ॥ याची सोय लागेल ॥८१॥
पांच कुंडे जागवोन ॥ ब्रह्माग्नि केला देदीप्यमान ॥ पांचा विषयांची आहुति देऊन ॥ भस्म करोनी अंगीं लावी ॥८२॥
नेत्रकुंडीं रूपातें ॥ होमिलें जाण गा निगुतें ॥ रूपी अरूपी वस्तूतें ॥ अनुभवें जाणते जाणती ॥८३॥
कर्णकुंडामाजी जाण ॥ होमिलें शब्दांलागुन ॥ शब्द नि:शब्दीं अतुडली खूण ॥ गेलें भान भेदाचें ॥८४॥
रसनाकुंडीं रस मिळाला ॥ घ्राण होमीं परिमळला ॥ त्वचेसीं होमीं स्पर्शला ॥ एवं झाला होम असा ॥८५॥
पंच विषयातें होमून ॥ निर्विषय झाला आपण ॥ तोचि देवपूजेसीं अधिकारी पूर्ण ॥ झाला जाण निश्चयीं ॥८६॥
हा स्वताचि ब्रह्म आहे ॥ परी विषय - संगें जीवदशा सोये ॥ तेणें ज्ञानाग्नीतें होमिलें विषयें ॥ तेणें देवपूजेसीच अधिकारी ॥८७॥
आणखी येकचि जाणणें ॥ हेचि देवपूजा म्हणणें ॥ ज्याचा स्वभाव त्यासीच अर्पणें ॥ आपण होणें निर्विकल्प ॥८८॥
अकार हाचि देवालय जाण ॥ माजि आत्मा देव आपण ॥ प्रकृतिस्वभाव तेंचि पूजन ॥ आपण होणें निर्द्वंद्व ॥८९॥
प्रकृतिस्वभावा सहजस्थिती ॥ गुणयोगें असे वर्तती ॥ करणी कारणाप्रती अर्पावी हे रीती ॥ पूजनाची असे पैं ॥२९०॥
कारणापासोन कार्य होतें ॥ आणि कारणींच लय पावतें ॥ जैसें अभ्र गगनींचें गगनीं आटतें ॥ मध्यें भासती वावचि ॥९१॥
जैसें जागृतीं स्वप्नाभाव भासत ॥ मिथ्या जाणोनी सांडी हेत ॥ तैसें अभावें दृश्य दिसत ॥ स्थापित स्वभावें जेथींचा तेथें ॥९२॥
अभ्र काळे पिवळे भासत ॥ तैसेच कोणी मानित ॥ तैसें हें जाणूनी अशाश्वत ॥ ऐसा स्थापित जेथींचा तेथें ॥९३॥
सत्त्व रज तम जाण ॥ यांचीं कर्मे अन्य अन्य ॥ तीं त्यांचीं त्यांस अर्पोन ॥ कीजे पूजन त्यांचेंचि ॥९४॥
सहजासहजींचि सहज होतें ॥ आपण सहजचि अर्पावीं ज्याचीं त्यातें ॥ आणि असावें निर्हेतें ॥ महापूजन यातें म्हणावें ॥९५॥
ही महापूजनाची प्राप्ती ॥ नोहे सद्गुरु वीर कल्पांतीं ॥ करितां नाना व्युत्पत्ती ॥ पूजनस्थिति न जोडे ॥९६॥
हे आहे तैसीच असों देणें ॥ मनोजय होय जेणें ॥ अज्ञान निरसोन ज्ञान जाणणें ॥ तेचि करणें महापूजा ॥९७॥
मनेंचि मन आवरावें ॥ चित्तें चित्त तें मारावें ॥ बुद्धीनें बोधकथेसीं विसरावें ॥ अहंकारें बोळवावें अहंकारा ॥९८॥
हाचि धरावा अहंकार ॥ जो हा नाशिवंत संसार ॥ मी याचा साक्षी होऊनी पर ॥ पूजा निर्विकार हेचि पैं ॥९९॥
आत्मत्व पूजनावांचोन ॥ पूजा तेचि अपूज्य जाण ॥ कां जे पूर्णब्रह्मातें सांडोन ॥ करी पूजन देवतांचें ॥३००॥
जे आपुले पूर्णत्वासीं चुकले ॥ ते बाह्यपूजा वरपडे पडले ॥ देवी देवतांतें पूजो लागले ॥ ते ते पावले तेचि गति ॥१॥
ब्राह्मणासी आत्मत्वावांचोन ॥ दुसरें पूजन नाहीं जाण ॥ एक आत्मत्वावांचोन ॥ न करी पूजन दुसर्‍याचें ॥२॥
हा देव मी पूजाकर्ता ॥ हर सांडोनियां अहंता ॥ पृथक् पृथक् देव पूजितां ॥ अद्वैता न मोडेचि ॥३॥
द्वैतभावें जें जें कीजे पूजन ॥ तें तें अशौच्यचि जाण ॥ त्याचें फळ पापचि पूर्ण ॥ म्हणोनी विद्वज्जन सांडिती ॥४॥
जैसें वृक्षीं पाणी घालावें ॥ तेणें पत्रपुष्पातें पावावें ॥ तैसें एकात्मता जाणतां स्वभावें ॥ महावैभव सर्व पूजिती ॥५॥
भूतें दिसती भिन्न ॥ परी आत्मा एकचि जाण ॥ म्हणोनी भाव धरोनी पूर्ण ॥ सर्वांलागोनि पूजित ॥६॥
यासीं म्हणावे द्वैतपूजन ॥ जें वेदशास्त्रीं प्रमाण ॥ येणें संतोषे भगवान ॥ हें पूजालक्षण ब्राह्मणाचें ॥७॥
हें पूजेचें निरूपण ॥ जेणें संतोषे नारायण ॥ आतां अतिथीचें लक्षण ॥ सावधान परिसावें ॥८॥
जो जो आला अतीत ॥ तो मानावा भगवंत ॥ पूजन करावें विधियुक्त ॥ पुरवावी आस सर्व पदार्थीं ॥९॥
अर्थप्राप्ती उत्तर ॥ होउनी याचक पूजिजे तत्पर ॥ तेणेंचि पाविजे पार ॥ वेदांतसार तोच कीं ॥३१०॥
अतीत आलिया द्वारीं ॥ आणि विन्मुख गेला जरी ॥ तो ब्राह्मण नोहे निर्धारीं ॥ महा अघोरी जाणावा ॥११॥
आपण करितो भोजन ॥ अतिथि - यासीं नाहीं म्हणे अन्न ॥ तो वेदबाह्य जाण ॥ ब्रह्मणपणा त्या कैंचा ॥१२॥
तो जरी ब्राह्मण शुद्ध असता ॥ तरी सर्व ब्रह्म देखता ॥ ब्रह्मरूपी अतिथि मानिता ॥ असत्य पदार्था वंचोना तो ॥१३॥
आपणापासी आहे वित्त ॥ आणि याचकासीं विन्मुख दवडित ॥ त्यातें पाखांडी बोलिजेत ॥ जे ब्रह्मस्थिति नेणती ॥१४॥
ब्राह्मण म्हणिजे ब्रह्म जाणते ॥ म्हणोनी आत्मत्वीं पूजिते अतिथीतें ॥ तरीच पाविजे अच्युतपदातें ॥ अच्युत त्यातें असेचिना ॥१५॥
श्रियाळें केलें अतिथिपूजन ॥ मयूरध्वजें शरीर दिधलें करवतून ॥ बळीं अर्पिलें शरीरालागुन ॥ अतिथिपूजन यातें म्हणती ॥१६॥
कर्ण रणरंगीं असे पडला ॥ अर्जुनबाणें जर्जर झाला ॥ तेणेंही नाहीं अतिथि विन्मुख दवडिला ॥ तरीच पावला परम पदा ॥१७॥
भलते जातीचा असो अतीत ॥ परी तो मानावा भगवंत ॥ जो वेदशास्त्रातें जाणत ॥ तो चालत याच स्थिती ॥१८॥
जे वेदशास्त्रातें जाणती ॥ ते आत्मस्थितीनें वर्तती ॥ ईश्वरभावें सर्व पूजिती ॥ ज्ञाते जाणती या वर्मातें ॥१९॥
ऐसें अतिथिपूजन ॥ याचें सांगितलें निरूपण ॥ आतां वैश्वदेवाचें आख्यान ॥ सावधपणें ऐकावें ॥३२०॥
कर्माकर्माच्या शेणी फोडून ॥ सोहं वायूतें फुंकोन ॥ बुद्धिकुंडामाजी ज्ञानाग्न ॥ वैश्वदेवालागुन करिताती ॥२१॥
सर्व विकारांच्या आहुती ॥ मीतूंपणाच्या चित्रावती ॥ होमिता झाला आहुती ॥ अनुभवस्थिति देखतसे ॥२२॥
कल्पनेच्या बळीसीं ॥ टाकिता झाला अनुभवेंसी ॥ मग लाधला अनुभवेंसी ॥ ब्रह्मत्वासी पावला ॥२३॥
स्नान संध्या जप होम ॥ वेद अतिथि वैश्वदेव जाण ॥ नित्यकर्म जाणावया आपण ॥ यांचें निरूपण सांगितलें ॥२४॥
जें ब्राह्मणासीं ब्राह्मणपण ॥ हेचि वेदाची आज्ञा पूर्ण ॥ येणें ब्राह्मण सर्वमान्य ॥ करिती पूजन श्रेष्ठत्वें ॥२५॥
त्या नित्यनेमामाजी कांहीं अंतरलें ॥ तेणेंचि तें न्यून झालें ॥ जसें रत्नकृच्छ्र केलें ॥ तें मुकलें तेजातें ॥२६॥
तैसें नित्यकर्माविण ॥ ब्राह्मण होय तेजहीन ॥ ऐसे जाणोनियां ब्राह्मण ॥ अतिआदरें करोनि करिती ॥२७॥
आणि जाणोनि आपणासी ॥ साक्षित्वें करावें नित्यासी ॥ तें सांगितलें म्यां तुजसी ॥ जेणें मनासी बोध होय ॥२८॥
तरी हें तूं जाणोनि चित्ता ॥ निर्हेत होईं रे आतां ॥ वेदमर्यादा होय पाळिता ॥ आणि भक्तिपंथा चालावें ॥२९॥
हा अध्याय झाला येथोन ॥ पुढिले अध्यायीं सांगोन ॥ नैतिककर्म तें कोण ॥ सावधान रत्नाकरा ॥३३०॥
सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंद पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥३३१॥
इति श्रीचिदानंदप्रकाशें दीपरत्नाकरग्रंथे गुरुशिष्यसंवादे षट्कर्मनिर्णय - योगविशेष एकादशोsध्याय गोड हा ॥११॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥ ॥ॐ॥    ॥    ओंव्या ॥३३१॥
इति दीपरत्नाकर एकोदशोsध्याय: समाप्त: ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP