अध्याय नववा

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


॥ श्री गणेशाय नम: ॥
जय जय स्वामी सद्गुरु ॥ तूं पूर्णामृत पूर्णसागरु ॥ तुझा नकळे कोणा पारु ॥ तूं अपारू अससी ॥१॥
तूं सर्वांची आदी ॥ आदि मध्य अवसान तुजमधीं ॥ जैसे तरंग असती सर्वस्वीं उदधीं ॥ परी तरंगां शुद्धि नसेचि ॥२॥
तरंग सागराचे अंश ॥ परि तरंग नेणती सागरास ॥ तैसीं मनबुद्ध्यादिकें सर्वस्व ॥ तुझा भास नसे त्यां ॥३॥
तरंग उठोन सागरीं क्रीडत ॥ सागर निश्चळ परि ते चंचळ दिसत ॥ तैसी मनादिकांची स्थिती ॥ सत्तें वर्तत तुझीया ॥४॥
तुझ्या सत्तें मना मनपण ॥ परी मनासीं नाहीं तुझें ज्ञान ॥ जैसें तरंग सागरा प्रमाण ॥ नेणती जाण कल्पांतीं ॥५॥
जैसे तरंग सागरा नेणती ॥ परी विसरोन सागरचि होती ॥ तैसा तूं मनाचे अंतीं ॥ सहजचि संचलासी ॥६॥
मन होतां अमन ॥ तूं स्वत:सिद्ध पूर्ण ॥ तूं उलटाचि सुटला जाण ॥ म्हणवून खूण नकळेचि ॥७॥
आपणा कांहींच न होइजे ॥ तेव्हांचि तूंतें लाहिजे ॥ ऐसें वर्म आहे तुझें ॥ तें नेणिजे कांहीं केल्या ॥८॥
तुझे कृपेविण ॥ तुझें नकळे महिमान ॥ ऐसी मजकळोन आली खूण ॥ तूं आदि अवसान सर्वांचा ॥९॥
मनाचे आदी तूं आहेसी ॥ मनाचे अंतीं तूं लाहिजेसी ॥ म्हणोन सांडोन मनमणासीं ॥ शरण तुजसीं कृपाळुवा ॥१०॥
आतां हेचि माझी विनवणी ॥ सांगा सहजचि मांडणी ॥ सहज वोळखावें कैसेनी ॥ तें उकलोनी सांगावें ॥११॥
मागिले अध्यायीं आपण ॥ मज दिधलें अभयदान ॥ कीं पुढें सहजाची खूण ॥ तुजलागोन सांगेन रे ॥१२॥
तें कृपाकरोन आतां ॥ मज सांगावें सद्गुरुनाथा ॥ जेणें सहज बाणे चित्ता ॥ तेंचि ताता करावें ॥१३॥
मज ब्रह्म - बोध पूर्ण झाला ॥ सहज राहे ऐसें मजला ॥ कृपावलोकनें पाहिजे केला ॥ उपदेश मज ॥१४॥
तरी सहज तें कैसें ॥ म्यां जाणावें मानसें ॥ शरीर क्रीडा सहवासें ॥ कैशा जाण कराव्या ॥१५॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ बोलिले गुरु चकोर जीवन ॥ रत्नाकरा तुज देखोन ॥ माझें मन आनंदलें ॥१६॥
जें सर्वांसीं चोरलें होतें गुज ॥ तें म्यां सांगितलें तुज ॥ कां जे तुज प्रसन्न ज्ञानराज ॥ म्हणोनी मज चोरवेना ॥१७॥
गुह्याचे गुह्य सांगितलें ॥ आतां कांहीं नाहीं उरलें ॥ मनबुद्ध्यादिकांचें मावळलें ॥ शरीर राहिलें निर्विकार ॥१८॥
तें सहजीं सहज राहावें ॥ प्रारब्धाआधी न लावावे ॥ जें जें होईल स्वभावें ॥ तें तें जावें भोगित ॥१९॥
जैसें देटींचें पान सुटलें ॥ तें वायूचे आधीन झालें ॥ जिकडे तिकडे वायूनें नेलें ॥ तिकडे गेलें सहजचि ॥२०॥
तैसें कल्पना देटींचें सुटोन ॥ शरीर करावें प्रारब्धाधीन ॥ आपण करावें भजन ॥ प्रयत्नें करूनी श्रीकृष्णाचें ॥२१॥
तूं म्हणसी प्रारब्धाधीन ॥ भक्तिहि होईल प्रारब्धेंकरून ॥ आपण कायसा करावे प्रयत्न ॥ ऐसें अनुमान करिसी ॥२२॥
तरी शरीर भोग तो प्रारब्धाधीन ॥ सुख दु:ख होय प्रयत्नेंवीण ॥ म्हणोनी शरीरभोग आपण ॥ सहज करून भोगिजे ॥२३॥
भक्ति केल्याविना ॥ न होय सत्य जाणा ॥ सुख दु:ख नाना ॥ प्रयत्नेंवीण होतील ॥२४॥
म्हणोनी शरीरभोगासीं ॥ तूं प्रयत्न करीं सहसी ॥ हरिभक्ति आदरेंसीं ॥ अति हर्षे करावी ॥२५॥
करितां हरिभजनासी ॥ मध्येंच उठेल विवसी ॥ मेळवितां अशनवसनासी ॥ होय भजनासीं अंतराये ॥२६॥
कां जे विषयीं रत झालेती ॥ शरीरभोगातें इच्छिती ॥ आपले साक्षित्वा नेणती ॥ म्हणोन करिती प्रयत्नातें ॥२७॥
ज्यासी अनुभवाचें नाहीं ज्ञान ॥ तोचि म्हणे तो मी शरीरीं आपण ॥ मग याचें करावया पालन ॥ नाना प्रयत्न करीत ॥२८॥
ज्यासीं आपुलें नाहीं ज्ञान ॥ तो काय जाणे सहजाची खूण ॥ व्हावें प्रारब्धाआधीन ॥ हेचि खूण सहजाची ॥२९॥
देह आजीच जावो ॥ अथवा चिरंजीव राहो ॥ परि याचा कांहीं नसावा मोहो ॥ वोळंगावा देव आवडी ॥३०॥
जें जें होईल ज्यावेळे ॥ तें भोगावें प्रारब्धबळें ॥ प्रयत्न सांडून प्रेमबळें ॥ मानीं वेगळें आपणासी ॥३१॥
तरि हे सृष्टि त्रिगुणाआधीन ॥ गुणयोगें चाले जाण ॥ शुभाशुभ कर्मे अजाणून ॥ गुणेंकरून होत असती ॥३२॥
जें कांहीं मजपासून होय तें ॥ ऐसें तूं नको म्हणूं आपणातें ॥ जैसें चुंबक चालवी लोहातें ॥ तें सांग नुसतें तुझेनी ॥३३॥
जैसें चुंबक लोहा चालों गेला नाहीं ॥ परी सन्निधानें चाले पाहीं ॥ तैसें आत्मसत्तेनें सर्वही ॥ संदेह कांहीं धरू नको ॥३४॥
अहंभोक्ता अहंकर्ता ॥ ऐसी जरी मानसी चिंता ॥ कां जे मी सर्वां चालता ॥ ऐसी अहंता करशील ॥३५॥
आत्मा गुणानें चालवित होता ॥ तरी तो सुखदु:खातें भोगिता ॥ आत्मसत्ते गुणासीं गुणता ॥ सहज सुता होतसे ॥३६॥
जैसा चुंबकासीं हा हेत नाहीं ॥ माझ्या सत्तेनें चाले लोखंड पाहीं ॥ तैसें आत्म्यासीं गुण कांहीं ॥ भाव नाहीं सर्वथा पैं ॥३७॥
जैसे गृहकर्मासीं दीपक ॥ प्रकाशन वेगळाच देख ॥ त्याचे तेजें वर्तती एकमेक ॥ नसे शोक त्या कर्माचा ॥३८॥
एक येती एक जाती ॥ एक जेविती एक वाचिती ॥ एक चोरी करिती ॥ परी दीपजोती नेणेचि ॥३९॥
दीपावेगळें कांहीं नाहीं ॥ परी दीप नेणें तेचि सोई ॥ तैसी आत्मसत्ते गुण पाहीं ॥ कर्मे देहीं दिसती ॥४०॥
शुभाशुभ कर्मे होती ॥ ते गुणयोगें जाण चित्तीं ॥ म्हणोनी निंदा आणि स्तुति ॥ सांडून भक्ति करावी ॥४१॥
उत्तम कर्म सत्त्वगुणापासोन ॥ मध्यम हें रजोगुणें ॥ कनिष्ठ तें तमोगुणें ॥ आत्मा जाण प्रकाशक ॥४२॥
जे गुण चेष्टेतें नेणती ॥ तेचि निंदा स्तुती वरपडे होती ॥ जे गुण कर्मातें जाणती ॥ ते त्यागिती अभिमान ॥४३॥
शरीर जड अचेतन ॥ त्याची चेष्टा गुणाधीन ॥ ऐसें जाणोन साधुजन ॥ विकारभान सांडिती ॥४४॥
जैसें मृगजळाचें पुरेंकरून ॥ न लोटती गिरिवर जाण ॥ तैसे गुणाचे विकारें आपण ॥ साधुजन गजबजती ॥४५॥
कां जे वस्तु गुणातीत आहे ॥ तो गुणर्कांसीं लिप्त नोहे ॥ ते वस्तु मीचि स्वयें ॥ म्हणून राहें निर्विकल्प ॥४६॥
जैसे वायूचे झडाडें ॥ आकाशातें न उडे ॥ तैसें त्रिगुणाचे गडबडे ॥ साधून अडे देहसंगें ॥४७॥
आकाशमाजी येतां धुई ॥ परी आकाश न माखे कांहीं ॥ तैसी देहाची हे सोई ॥ साधु पाहीं लिंपेना ॥४८॥
जैसे जगाचे उपद्रवेंकरून ॥ पृथ्वी गादीना आपण ॥ तैसें गुणाचे योगेंकरून ॥ साधूचें मन डळमळीना ॥४९॥
जे सद्गुरुचे अंकिले ॥ ज्याहीं आपणा जाणितलें ॥ तेचि गुणकर्मातीत झाले ॥ म्हणवून राहिले साक्षिरूप ॥५०॥
जो मुक्त झाला आपण ॥ त्यांसीं मुक्त भासे सर्व जन ॥ कां जे तो त्रिगुणातीत म्हणोन ॥ भावी भगवान् सर्वत्रीं ॥५१॥
ज्यासीं सर्वत्रीं भासलें एक ॥ तोचि मीतूंसी झाला विन्मुख ॥ जैसें जागृतीं स्वप्न देख ॥ गेलें नि:शेष हरपोनी ॥५२॥
जोंवरी नि:संगता जोडिली नाहीं ॥ तोंवरी सहजसहजाची न कळे सोई ॥ आणि सहजाविण पाहीं ॥ सुख कांहीं निसेना ॥५३॥
त्वां पुसिली सहजाची खूण ॥ ती म्यां सांगितली आपण ॥ तरी तूं सहज होवोन ॥ करीं भजन अद्वैत ॥५४॥
आकारस्थिति सहज जाणोन ॥ तूं राहें निर्विकल्प होवोन ॥ सर्वही मीच म्हणवोन ॥ करी भजन एकत्वें ॥५५॥
सर्व इंद्रियातें वळून ॥ सांठीवी मनातें आणून ॥ तें मन गगनामाजी लीन ॥ अनुभवेंकरून करावें ॥५६॥
त्या गगनानें गिळून ॥ असावें अवकाशरूप होवोन ॥ तेव्हांचि आतुडे सहजाची खूण ॥ सत्य जाण रत्नाकरा ॥५७॥
तूं हें आपणामाजी जाणोन ॥ जाय आपणासीं विरोन ॥ दृश्य द्रष्टा नारायण ॥ मीपण तें वावचि ॥५८॥
मीपण सांडून भक्ति करणें ॥ ते अव्यभिचारिणी भक्ति म्हणणें ॥ मीपण धरून जें वर्तणें ॥ तोचि जाण व्यभिचार ॥५९॥
कां जें सर्वत्रीं एक आहे ॥ जैसें तैसेंचि भासताहे ॥ भासण्यापासोन अतीत राहे ॥ भासविताहे आपण ॥६०॥
जें जाणत्यासीं जाणतें ॥ जाणोन नाहींच होतें ॥ नाहींपणाची जे आइते ॥ ते सर्वांतें प्रकाशी ॥६१॥
जें सर्व प्रकाशिलें ॥ एकमेकांतें जाणविलें ॥ भेद दावोन संचलें ॥ एकीं एकलें एकत्व ॥६२॥
त्या एकत्वीं मीपण ॥ तोचि व्यभिचार भक्ति जाण ॥ मजसकट हा भगवान ॥ तोचि जाण अव्यभिचार ॥६३॥
आब्रह्मस्तंभापर्यंत ॥ एक व्यापक विश्वनाथ ॥ जैसा उभा आडवा तंत ॥ पटीं दिसत पाहतां ॥६४॥
उभा आडवा तंतु एक ॥ तैसा विश्वीं विश्वनायक ॥ ऐसें जाणोनी भक्ति करी देख ॥ तेचि ओळख अव्यभिचारु ॥६५॥
अव्यभिचारी भक्ति करितां ॥ संतोष होय विश्वनाथा ॥ म्हणोन रत्नाकरा आतां ॥ भक्तिपंथा लागावें ॥६६॥
ऐसें सद्गुरुवाक्य ऐकोनी ॥ बोले रत्नाकर कर - जोडोनी ॥ स्वामी मज अनाथ जाणोनी ॥ विनवणी एक ऐकावी ॥६७॥
ऐका ऐसें जरि म्हणावें ॥ तरी तुम्हां नायकणें देखावें ॥ ऐकणें नायिकण्याची साक्षी व्हावें ॥ तेव्हां स्वभावें तूंचि तूं ॥६८॥
ऐशिया तुझें करितां स्तवन ॥ तरी तें स्तवन तुझे सत्तेंकरून ॥ परि तूं स्तवातीत आपण ॥ स्तवनीं स्तवनातें जाण प्रकाशसी ॥६९॥
तुझ्या प्रकाशीं सर्व प्रकाशिलें ॥ तेथें माझें मीपण कोठें उरलें ॥ आतां भक्ति करा म्हणितलें ॥ हें वाटलें नवल कीं ॥७०॥
आधीं माझा मजलाचि ठाव नाहीं ॥ मी भासतों मिथ्यापरि पाहीं ॥ जैसें मृगजळ भासोन कांहीं ॥ सत्य नाहीं निश्चयें ॥७१॥
तैसें देहसंगें कोण ॥ माझा ठायीं जें मीपण ॥ जैसें उखरासंगें किरणीं जाण ॥ होय भान मृगजळाचें ॥७२॥
जैसें उखरसंगेंकरून ॥ पाहा त्यासीं भासे मृगजळभान ॥ तैसें देहसंगें जाण ॥ उठे मीपण नसतेंचि ॥७३॥
त्या मीपणेकरून ॥ अज्ञान देहाभिमान ॥ त्या देहाभिमानेंकरून ॥ द्वैत जाण भासत ॥७४॥
तें अज्ञान ज्ञान झालें ॥ तेथें द्वैत सहजे गेलें ॥ मीतूपणावीण उरलें ॥ एकत्वीं एकलें प्रकाशरूप ॥७५॥
आता द्वैतासीं ठाव नाहीं ॥ तेथें करावें कोणाचें काई ॥ हें उकलोनि स्वामीही ॥ सांगावी सोय हिताची ॥७६॥
तुम्ही पूर्वी जें सांगितलें ॥ तें म्यां मनीं धरिलें ॥ आतां जे निरोपिलें ॥ तें वहिलें सांगावे ॥७७॥
माझ्या ठाईं तें कांहीं ॥ कर्तृत्वाचे उरलें नाहीं ॥ आज्ञा केली स्वामीही ॥ जे भक्ति सोय धरावी ॥७८॥
तें भक्तिलक्षण ॥ स्वामी सांगावें विवरोन ॥ तवं बोलिले सद्गुरु आपण ॥ भला म्हणोन आश्वासिला ॥७९॥
तुझें मनींची भावना ॥ मज कळों आली जाण ॥ जेथें ठाव नाहीं मीतूंपणा ॥ तेथें कोणे कोणा भजावें ॥८०॥
जरी मुळींचें आहे पाहावें ॥ तरी ऐसेंच आहे रे स्वभावें ॥ तरी वेदमर्यादेतें पाळावें ॥ म्हणोन करावें भक्तीतें ॥८१॥
शिवोचभूत्वा शिवंजयति ॥ ऐशी बोलत आहे श्रुति ॥ म्हणोन टाकितां देहाभिमानाप्रति ॥ ब्रह्मस्थित बाणली ॥८२॥
स्वतां जो ब्रह्म होईल ॥ तोचि व्यापक ब्रह्मतेजा रमेल ॥ देहाभिमान जो करिल ॥ त्यासीं होईल कष्टचि ॥८३॥
चौं देहातें निरसोन ॥ मन बुद्ध्यादिकांतें त्यागोन ॥ जो राहिला साक्षी होवोन ॥ तोचि आपण ब्रह्म झाला ॥८४॥
तो अनुभवें ब्रह्म झाला ॥ परि देह आहे उरला ॥ म्हणऊन देहसंगें भक्तीला ॥ साधी वहिला लागवेगें ॥८५॥
अरे ब्रह्म त्वरित आयतेंचि आहे ॥ आदिअवसानीं संचलें पाहे ॥ हें होतां नवल काय ॥ परि भक्ति आहे कठीण ॥८६॥
ब्रह्म होऊन आपण ॥ शरीरीं दावावें भक्तिचिन्ह ॥ कां जें शरीर अपवित्र म्हणोन ॥ यासीं भूषण भक्तीचें ॥८७॥
अरे तूं मुळींचा ब्रह्म आहेसी ॥ परी शरीर अपवित्र पापाची राशी ॥ भक्ति केल्यानें पवित्र त्यासीं ॥ तूं साक्षित्वेंसीं राहीं रे ॥८८॥
त्वां आपूलें साक्षित्व जाणीतलें ॥ तरीं काय देहाचें कर्म राहिलें ॥ मनाचें मनपण गेलें ॥ कीं बुडालें तर्कातर्क ॥८९॥
कीं नेत्रींचें पाहणें ॥ मुखाचें बोलणें ॥ जिव्हेनें रस घेणें ॥ गळे ठाणें स्वप्नाचें ॥९०॥
जागृती अवस्था बुडाली ॥ प्राणाची रिगनिधी राहिली ॥ बुद्धी बुद्धीसीं भुलली ॥ अहंकार समूळीं गेला काय ॥९१॥
सुषुप्तीचें उडालें ठाण ॥ तुर्याचें उडालें जाण ॥ गेले काय ते विचारून ॥ मग न करणें भक्तीसीं ॥९२॥
जरि यामाजी कांहीं असेल ॥ तरी भक्ति करितां सुटतील ॥ हें गुह्य अति सखोल ॥ वेचितां मोल नकळेची ॥९३॥
जे पूर्णानुभवी असताल ॥ ते या सुखातें जाणतील ॥ खंडज्ञानी हंसतील ॥ म्हणतील ते ऐका ॥९४॥
आम्हां सद्गुरुचे कृपेविण ॥ पूर्ण झालें ब्रह्मज्ञान ॥ भेदाभेद गेला जाण ॥ कर्म कोण काज काय ॥९५॥
जे विविध निषेध वागविती ॥ तेचि कर्माकर्मीं गुंतती ॥ आम्हां तुष्टला श्रीपती ॥ लाधली स्थिति वामाची ॥९६॥
वाममार्गाचें ज्ञान ॥ तें प्राप्त भाग्येंकरून चारही वर्ण एकचि जाण ॥ भेदभान नसेच कीं ॥९७॥
जेथें इंद्रिय तृप्त नव्हती ॥ ज्ञान नव्हे तें भजती ॥ मद्यमांसादि भक्षिती ॥ इतरां म्हणती कंटक हे ॥९८॥
वर्णावर्ण देती सोडून ॥ नित्यनैमित्याचें वोळवण ॥ करिताती विषयसेवन ॥ तेणेंचि करून संतोषती ॥९९॥
ज्यांसीं आत्मानुभव नाहीं ॥ ते या अज्ञानीं रत पाहीं ॥ ज्यासी त्याची शुद्धी नाहीं ॥ साचें कांहीं हित तें ॥१००॥
ते अनहितचि करिती ॥ परि हित मानोनि घेती ॥ ऐसे भुलले मंदमती ॥ ते बोलती अव्हसव्ह ॥१॥
सांडूनियां कल्पतरू ॥ करिती शेराचा आदरू ॥ तैसे सांडून निर्विकारू ॥ विकारीं आदर करीती ॥२॥
तुळसीचें झाड उपडून ॥ करी भांगेचें रोपण ॥ तैसें व्यापकतें सांडून ॥ होती जाण एकदेशी ॥३॥
कामधेनु हाकून बाहेर घातली ॥ आणि आदरें गाढवें पाळी ॥ तसी वाममार्गा रतता झाली ॥ आत्मत्वीं पडली भुली त्यांसीं ॥४॥
परितासें सांडोन ॥ आदरें घेती पाषाण ॥ तैसें आत्मत्वातें नेणोन ॥ करी पूजन देवीदेवतेचें ॥५॥
राज्य टाकूनि मजूरी ॥ जैसा राजा बळेंचि करी ॥ तैसें पूर्णत्त्व सांडोनी दूरी ॥ देवता तरी भजत असे ॥६॥
अमृत सांडून कांजी प्याला ॥ तैसा प्रसंग दिसे घडला ॥ हा देह मी म्हणवूनी मानिला हावें भरला म्हणवूनी ॥७॥
शिवभूत्वा शिवंजयती ॥ त्याची तों नकळाचि स्थिती ॥ मग देहबुद्धीनें वर्तती ॥ इतरां निंदती महामुर्ख ॥८॥
एक अद्वैत भक्तीवीण ॥ जें जें कीजे तें विटंबन जाण ॥ म्हणोनी पाखंडातें सांडून ॥ करीं भजन रत्नाकरा ॥९॥
कां जें शरीर जोंवरी आहे ॥ जोंवरी तेणें करावें काये ॥ मन बुद्ध्यादिकां लाविजे सोय ॥ जे होय निर्विकार ॥११०॥
जोंवरी शरीराचें अधिष्ठान ॥ तोंवरी मन बुद्ध्यादिक जाण ॥ म्हणोन त्यासीं भक्तीचें अनुसंधान ॥ साक्षेपें करूनि लावावें ॥११॥
तुज मनासीं कांहीं ॥ संबंध मुळींहून नाहीं ॥ परि मन तुझे ठायीं ॥ म्हणोनी सोई लावावें ॥१२॥
मनें कीजे आत्ममनन ॥ मुखें कीजे अद्वैतस्मरण ॥ नित्यनैमित्य आदरेंकरून ॥ करावें आपण विदाज्ञें ॥१३॥
जैसे सागराचे कल्लोळ सागरीं क्रीडती ॥ परी ते सागररूपचि होती ॥ तैसी करावी भक्ती ॥ अद्वैतस्थिती जाणोन ॥१४॥
जोंवरी अद्वैतस्थिति जाणली नाहीं ॥ तोंवरी भक्ति नोहे कांहीं ॥ ऐसे जाणोनी सोई ॥ लवलाहीं धरावी ॥१५॥
पूर्वीं ब्रह्मज्ञानी झालेती ॥ त्यांहीं केली अद्वैतभक्ती ॥ वेदमर्यादाते पाळिती ॥ जना दाविती आचरोनी ॥१६॥
श्रेष्ठ जरी न दावित आचरून ॥ तरी गनासी मार्ग लागेल कोठून ॥ म्हणोनी जन उद्धरास्तव जाण ॥ करावें भजन अहर्निश ॥१७॥
सर्व आपणामाजी जाणिजे ॥ सर्व आपणचि होईजे ॥ नि:संदेह कीर्तन कीजे ॥ सर्व सांडीजे संदेहातें ॥१८॥
भक्ति ज्ञान वैराग्य ॥ आहो हें आत्मानुभवाचें भाग्य ॥ जेणें संतुष्टे श्रीरंग ॥ तैसें भाग्य शरीराचें ॥१९॥
हा त्रिवेणी ओघ पाहीं ॥ असे ज्या नराच्या ठायीं ॥ त्याच्या भाग्यासीं पार नाहीं ॥ नरदेही तोचि धन्य ॥१२०॥
भक्ति म्हणजे काई ॥ जेथें द्वैतभाव नाहीं ॥ अनेक दिसतां पाही ॥ एकत्व सोई चुकेना ॥२१॥
जग दिसे आनन ॥ परि भाव नोहे भिन्न भिन्न ॥ जैसें नग असतां सुवर्ण ॥ असे व्यापुन सर्वांतें ॥२२॥
जें जें त्यासीं भेट भूत ॥ तें मानिजे भगवंत ॥ नाना घटीं एकभूत ॥ असे दिसत जेवीं ॥२३॥
जैसे साखरेचे रवे आणोन ॥ परि गोडी नव्हे भिन्न ॥ कीं गार तेंचि नीर जाण ॥ भूतीं भगवान् तैसा असे ॥२४॥
परळ माथण रांजण ॥ घडे गाडगीं अगण्य ॥ परि मृत्तिका नोहे भिन्न ॥ तैसा भगवान् सर्वत्रीं ॥२५॥
सर्व भूत एक जाणून ॥ निंदास्तुति सांडून ॥ शरीर लावी भक्तीआधीन ॥ ज्ञानी जाण तो एक ॥२६॥
ब्रह्मस्थिति बाणली अंतरीं ॥ ती दाखवावी शरीरीं ॥ द्वैताद्वैत सांडूनी दूरी ॥ नित्य करी नामघोष ॥२७॥
जैसें ब्रह्म सर्वत्रीं व्यापक आहे ॥ तैसें प्रकाशिलें पाहें ॥ तैसा तूं शरीरेंकरून होय ॥ धरीं सोय भक्तची ॥२८॥
श्रीगुरुकृपें ब्रह्मानुभव झाला ॥ तेणें द्वैतभाव अवघाचि गेला ॥ परी शरीर अहए तों वेदमर्यादेला ॥ पाळीं वहिला लागवेगें ॥२९॥
वेदाची आज्ञा पाळणें ॥ हेचि देवाची भक्ति म्हणें ॥ देवाशीं अवतार लागला घेणें ॥ वेद स्थापनेस्तव ॥१३०॥
देववेदाचे अनुसंधानें चालती ॥ त्यासीं रक्षितीं श्रीपती ॥ जे वेदाची आज्ञा मोडिती ॥ ते जाती नरकालया ॥३१॥
अहं ब्रह्मास्मि ऐसें ॥ वेध बोश करीतसे ॥ सांडोन द्वैतपिसें ॥ पहा सौरसें एकचि ॥३२॥
अहं देहातें सोडून ॥ अहं ब्रह्मास्मि आपण ॥ ऐसें मानुनी करीं भजन ॥ आज्ञा पूर्ण वेदाची ॥३३॥
शरीराचें क्रीडन ॥ तें होय त्रिगुणांचे योगेंकरून ॥ अहंकर्तेपणातें सांडून ॥ करी भजन वेदाज्ञा हे ॥३४॥
जीव शिव ऐसें हें बोलणें ॥ तें विद्या अविद्या जाणणें ॥ विद्या अविद्या त्यजूनि करणें ॥ हे आज्ञा वेदाची ॥३५॥
श्रुति अणोरणीयान्महतो महीयान् ॥ अणू म्हणजे अति सूक्ष्म ॥ त्या सूक्ष्मीं आत्माराम ॥ सूक्ष्म माझेनि उत्तम ॥ सांडा भ्रम द्वैताचा ॥३६॥
महतो महीयान् असे वचन ॥ मी सर्वांचा आदिमध्य अवसान ॥ मजहूनि थोर नाहीं जाण ॥ सर्व आत्मत्व जाण प्रकाशें ॥३७॥
आत्मत्वीं आत्मत्व आहे ॥ आत्मत्वीं आत्मत्व पाहें ॥ आत्मत्वीं आत्मत्व भासताहे ॥ सांडी सोय द्वैताची ॥३८॥
हें सर्व आत्मत्वचि असे ॥ मीतूंपण आत्मत्वीं वसे ॥ जैसा दीपीं प्रकाश जडला असे ॥ मीतूंपण तैसें आत्मत्वीं ॥३९॥
कीं अग्नींत जैसी उष्णता ॥ कीं कापुरीं परिमळता ॥ पुष्पीं जैसी सुगंधता ॥ आत्मत्वीं तत्वता तैसें मी तूंपण ॥१४०॥
आत्मत्वें मीतूं प्रकाशलें ॥ मीतूंपणें आत्मत्व भासलें ॥ हें आत्मत्वचि जाणितलें ॥ जाणोन संचलें निर्विकार ॥४१॥
हे एकीं अनेक भासलें ॥ हें आत्मत्वचि प्रकाशिलें ॥ प्रकाश गिळोनियां तरलें ॥ विसरलें उरलेंपण ॥४२॥
आहे आणि नाहीं ॥ हें आत्मत्वीं आत्मत्वें पाहीं ॥ अणुपासून ब्रह्मावरी पाहीं ॥ दुजें नाहीं आत्मत्वेंवीण ॥४३॥
जैसे तरंग होती सागरापासोन ॥ त्यामाजी सागरचि आहे जाण ॥ नांवरूपचि हे भिन्न ॥ येर्‍हवीं जीवन दो ठायीं एकचि ॥४४॥
कल्लोळसागर दोनी एक ॥ तैसे आत्मत्वीं जीवशिव देख ॥ ऐसें जाणोनी सम्यक् ॥ एकीं अनेक पाहावें ॥४५॥
सागरीं लहरी एकचि जीवन ॥ परी वायुसंगें तरंग फेन ॥ याचीं नांवें रूपें अन्य ॥ येर्‍हवीं जीवन पूर्णचि ॥४६॥
तैसें एक वस्तूचे ठायीं ॥ चराचर भासे पाहीं ॥ म्हणवून मीतूंपणाची सोई ॥ सत्य नाहीं भासोन ॥४७॥
सूक्ष्मी तरी अणूपासून ॥ थोरपणा नाहीं प्रमाण ॥ ऐसा बोध वेद करी आपण ॥ परी खूण नकळेचि ॥४८॥
कां जे सद्गुरुची नाहीं कृपा ॥ म्हणोनि चुकले सत्यस्वरूपा ॥ लक्ष्यांश टाकून वाच्यांश धापा ॥ देती बापा देहसंगें ॥४९॥
नेति नेतीति वेदश्रुती ॥ निरसिलें वाच्यांशाप्रती ॥ परा परतली मागुती ॥ बोलावया रिती वाट नाहीं ॥१५०॥
आकाशीं आहे अवकाश ॥ म्हणोनी तेथें जन्म सुशब्दास ॥ ब्रह्मघन स्वप्रकाश ॥ म्हणोन वेदास मान्य कीं ॥५१॥
वेद जें जें पाहों जाये ॥ तेथें तेथें कोंदलेंचि आहे ॥ म्हणवोन थकित झाला पाहें ॥ जैसें अंतराळीं पाय पांगुळती ॥५२॥
जें जें त्रिगुणातीत आलें ॥ तें तें वेदें वर्णिलें ॥ जैसें स्वप्न जें जें देखिलें ॥ तें सांगितलें जागृतीं ॥५३॥
स्वप्न सांगणें संपलें ॥ मग सहजचि मौन्य पडलें ॥ तैसें वेदासही झालें ॥ मौन्य पडलें वाचेसीं ॥५४॥
एक पाखंडी म्हणती ॥ पार नकळे वेदाप्रती ॥ म्हणवोन नेति नेति म्हणती ॥ मग इतरांची गति काय ॥५५॥
वेदा नकळे जेथें पार ॥ तेथें मनुष्य काय पामर ॥ म्हणोन आत्मानुभवाचा विचार ॥ नकळे साचार कोणासीं ॥५६॥
आतां निर्गुणाची चर्चा करिती ॥ ते महा अज्ञान मंदमती ॥ जे फळाशा कर्म करिती ॥ ते सद्य:भोगिती सुख ॥५७॥
ऐसें कांहीं कर्म करावें ॥ जें सद्य:फळातें भोगावें ॥ जन्म आल्यानें सुख द्यावें ॥ विषय सेवावे आवडीनें ॥५८॥
त्या विषय सेवनास्तव ॥ जारण मारण स्तंभ्हन पढती सर्व ॥ मोहन उच्चाटण करितां जीव ॥ मारितां कींव नयेचि ॥५९॥
नाना बळीदानें देऊन ॥ साधिती भूत प्रेतांलागुन ॥ शरीर भोगासीं जीव प्राण ॥ वेचितां हानि - पमानिच ॥१६०॥
जे देह मी नोहे म्हणती ॥ ते देहभोगातें वंचिती ॥ त्यांचे तोंडीं पडली माती ॥ ऐसे म्हणती पाखंडी ॥६१॥
घरदारातें सोडोनी ॥ सर्व विषयां पाठी देऊनी ॥ राहिले निरभिमान होऊनी ॥ तीहीं जननी कष्टविली ॥६२॥
जेणें अभिमान टाकिला ॥ तो देहभोगासी वंचला ॥ जैसा आला तैसा गेला ॥ विषय भोगाला न सेवितां ॥६३॥
जरी पदरीं असे बहु पुण्य ॥ तरीच विषयभोग जाणणें ॥ दिधल्याविण नाहीं पावणें ॥ दैन्य भोगणें कपाळा आलें ॥६४॥
ज्या ज्या कर्मे विषयप्राप्ती ॥ तें तें आदरेंचि करिती ॥ जेथें फळाशा न देखती ॥ तें त्यागिती महामूर्ख ॥६५॥
ज्यासी आत्मत्वाचें नाहीं ज्ञान ॥ तोचि शरीरभोगीं अशक्त जाण ॥ नैराश्य कर्मातें सांडून ॥ करी आदरें काम्यकर्म ॥६६॥
ऐसे पाखंडी मंदमती ॥ ज्यांसीं नाहीं अनुभव प्राप्ती ॥ ते वेदवर्मातें नेणती ॥ म्हणोनि भ्रमती देहसंगें ॥६७॥
जे वेदगुह्यातें जाणती ॥ तेचि म्हणावे वेदांती ॥ जे वेदवर्मातें नेणती ॥ ते जाण चित्तीं वेदबाह्य ॥६८॥
जो स्वानुभव सुखावेगळा ॥ तो अंत्यजापरी वेदें वाळिला ॥ म्हणो वेदबाह्य बोला आला ॥ जो चुकला आपणासीं ॥६९॥
ज्यासीं सर्वत्रीं आहीकभाव नाहीं ॥ तोचि वेदबाह्य पाहीं ॥ तो कर्म करी जें कांहीं ॥ तें सर्वही विटंबन ॥१७०॥
जैसा विटाळसीनें आचार केला ॥ तो अवघाचि वायां गेला ॥ कोणी स्पर्श न करीच तिला ॥ अज्ञाना घडला प्रसंग तैसा ॥७१॥
तो आपले ठायीं शुद्ध ॥ परी वेदासीं विरुद्ध ॥ कां जे वस्तु सांडूनि स्वत:सिद्ध ॥ काम्य उपाधि करीतसे ॥७२॥
जे वेदोक्त कर्म करिती ॥ परी वेदबाह्य जाण चित्तीं ॥ जेवीं विटाळसी घरांत जैसी ॥ परी पातळे तिसीं भ्रतार तिचा ॥७३॥
लेकी सुना पाती पोती ॥ ठेवा ठेवल्यासीं असे जाणतीं ॥ बोलती युक्ती प्रयुक्ती ॥ परि घरांत सरती ते नोहे ॥७४॥
तैसा असे स्वत: आचारी ॥ आणि विधियुक्त कर्म करी ॥ परि तो वेदबाह्य निर्धारीं ॥ कां जे अंतरीं स्वात्मबोध ॥७५॥
अंतरीं नाहीं एकनिष्ठा ॥ बाह्य व्यवहारी वाढवी प्रतिष्ठा ॥ वर्मकर्माची करी चेष्टा ॥ भरावया पोट लागुनी ॥७६॥
ते कर्म करिता वेदबाह्य ॥ जे नेणती वेदगुह्य ॥ विटाळसीच्या परी होय ॥ घरांत नोहे सरतेची ॥७७॥
चारी दिवस जेव्हां होती ॥ तेव्हां घरांत होई सरती ॥ तैसें चारी देह निरसती ॥ तेव्हां आत्मस्थिति जाणेल ॥७८॥
चारी देह चारी शून्य ॥ चारी अवस्था चारी वाचा जाण ॥ जीव शिव माया ब्रह्म ॥ हेंचि खूण चौर्‍यासींची ॥७९॥
याचें जों झालें नाहीं निरसन ॥ तोवरी नकळे वेदाची खूण ॥ गुह्य खुणेविण आपण ॥ वेदबाह्य जाण निश्चयेंसीं ॥१८०॥
ओं इत्यकाक्षरं ब्रह्म असें ॥ वेद बोलत असे ॥ येचें कोणा भान नसे ॥ जीवदशें भ्रमताती ॥८१॥
एका सद्गुरु कृपेविण ॥ नोहेचि ओंकार विवरण ॥ जोंवरी नोहे ओंकाराचें ज्ञान ॥ तोंवरी जाण वेदबाह्य ॥८२॥
ओंकार वेदांचे कारण ॥ वेद झाले ओंकारापासून ॥ सर्व सृष्टीचें मंडण ॥ झालें जाण ओंकारी ॥८३॥
जोंवरी नोहे ओंकाराचे ज्ञान ॥ तोंवरी ज्ञान तेंचि अज्ञान ॥ भूस कांडितां कण ॥ प्राप्ति नोहे कल्पांतीं ॥८४॥
फेण पितां तृषा कांहीं ॥ सर्वथा जाणार नाहीं ॥ तैसी शब्दब्रह्में सोई ॥ नकळे पाहीं ओंकाराची ॥८५॥
तरी ओंकार सर्वांचें सार ॥ गुरुज्ञानें कळे साचार ॥ व्युत्पत्तीनें नकळे पार ॥ हा निर्धार वेदाचा ॥८६॥  
ही वेदाची आज्ञा प्रमाण ॥ म्हणोनियां भावेंकरून ॥ अंतरसाक्षी होवोन ॥ करावें भजन वेदाज्ञा ॥८७॥
अहं ब्रह्मास्मि ऐसें ज्ञान ॥ नाहीं ज्या नरालागुन ॥ तो वेदवाचा पशु जाण ॥ यदर्थी दे प्रमाण श्रुती ॥८८॥
अहं ब्रह्मास्मि यो वेद: ॥ स सर्वं भव भृन्नत: ॥ ना भूत्यानेशतद्देवा ॥ तस्मात्मैश्यां भव द्विज ॥८९॥
ब्रह्म तो मी स्वयं आपण ॥ आणि जगही ब्रह्मस्वरूप जाण ॥ देव भूत हें वचन ॥ अप्रमाण सर्वही ॥१९०॥
ऐसा निश्चय ज्या बाणला ॥ तोचि बुद्धिवंत भला ॥ जगासमेत आपणाला ॥ भास झाला ब्रह्मचि ॥९१॥
तोचि ब्रह्मानुभवी जाण ॥ इतर ते वेदबाह्य पूर्ण ॥ म्हणोन आलें पशुपण ॥ दैवाधीन झाला तो ॥९२॥
श्लोक ॥ अन्योसावहमन्यास्मि उपासतेsन्य देवता: ॥ न स वेद नरो ब्रह्म स देवानां यथा पशु: ॥९३॥
टीका ॥ जगापरतें ब्रह्म आहे ॥ जग ब्रह्मरूप नोहे ॥ ऐसें जो मानिताहे ॥ तोचि पाहे पशु ॥९४॥
आपलें ब्रह्मत्व नाहीं जाणत ॥ तोचि देवातें उपासित ॥ मग काम्यकर्म करीत ॥ पोट भरीत देवाचें ॥९५॥
पशु जैसा पराधीन आहे ॥ जिकडे नेला तिकडे जाये ॥ तैसें अनुभवेवीण प्राण्यासी होये ॥ भजतां हे देवतातें ॥९६॥
अहं ब्रह्मास्मि चुकला ॥ म्हणोन जीवदशे आला ॥ तेणें वृद्धी झाली कल्पनेला ॥ म्हणोन झाला पराधीन ॥९७॥
ब्रह्मदशा सांडून ॥ जो म्हणे जीव आपण ॥ तोचि महा अज्ञान ॥ पशु जाण निश्चयें ॥९८॥
आहार निद्रा भय मैथुन ॥ हें सर्वांसीं आहे ज्ञान ॥ परी एका आत्मज्ञानाविण ॥ पशुपण आलें कीं ॥९९॥
ब्रह्मज्ञान तेंचि ज्ञान ॥ इतर तें सर्व अज्ञान ॥ तरी ब्रह्मज्ञान म्हणसी कोण ॥ तेही खूण सांगतों ॥२००॥
ब्रह्मज्ञान म्हणजे कांहीं ॥ जेथें आपपर नाहीं ॥ एक जाणोन ठाईं ॥ भक्ति पाहीं करीत ॥१॥
ते भक्ति कैसी म्हणसी ॥ ब्रह्मत्वें पाहें सर्वांसीं ॥ जो सागरकल्लोळेसीं ॥ भक्ति तैसी करीं तूं ॥२॥
शरीर जैसे अवयव आहेती । पाहतां वेगळे भासती ॥ परी ते शरीरासीं जडलेती ॥ व्यापार करिती वेगळाले ॥३॥
व्यापार वेगळाले करिती ॥ परी एकाच शरीरीं आहेती ॥ तैसी वेगळाली भूताकृती ॥ परी असती एकत्वें ॥४॥
जैसीं चित्रें आणोन ॥ परि भिंती एकचि जाण ॥ तैसा भूतीं भगवान ॥ ऐसें जाणोन करी भक्ती ॥५॥
ऐसा अद्वैत बोध झाला ॥ तोचि ज्ञानी सदैव भला ॥ जो वेदगुह्यातें पावला ॥ पशुत्वें मुकला म्हणोनी ॥६॥
ज्यासी आपलें नाहीं ज्ञान ॥ तोचि वेदबाह्य जाण ॥ म्हणोनी आपलें पशुपण ॥ फिरे वन शब्द ब्रह्माचें ॥७॥
नाना देवतांच्या उपासना ॥ हेंचि महावन जाणा ॥ काम्य कर्माची तृष्णा ॥ सेवितां मना हर्ष वाटे ॥८॥
श्रुति ॥ यतो वाचो निवर्तंते ॥ अप्राप्य मनसा सह ॥ टीका ॥ वनवासी अप्राप्त ॥ मानसीं अगोचर सत्य ॥ ऐसें वेद असे बोधित ॥ यातें नाहीं जाणत म्हणोन पशु ॥९॥
अहं ब्रह्मासि जाणीतलें ॥ तेव्हां पशुत्व वाव झालें ॥ त्यातेंचि वेदें अंगिकारिलें ॥ इतरां वाळिलें अंत्यजापरी ॥२१०॥
म्हणोनी वेदाची आज्ञा प्रमाण ॥ मानावीं हें भक्तिलक्षण ॥ जो वेदाज्ञेसीं दुर्‍हावी जाण ॥ अभक्तपण तेणेंचि त्यासीं ॥११॥
तरी वेदांती ते कोण ॥ त्यांचें सांगतों विवरण ॥ कथा वाढली जाण ॥ धरी खूण जीवीं हे ॥१२॥
वेदाची आज्ञा पाळिती ॥ तेचि जाणावी हरिभक्ती ॥ साक्षी होवोनि शरीरीं राहती ॥ भक्ति करिती शरीरीं ॥१३॥
जैसा वारा वाजोन जातसे ॥ परी डोल तो वृक्षीं उरलासे ॥ प्रारब्धयोगें तैसें ॥ होत असे शुभाशुभ ॥१४॥
अनुभवें मुक्त झालों आपण ॥ परी शरीर गेलें नाहीं नासोन ॥ तरी शरीर आहे वायुआधीन ॥ तें वावन कैसें होय ॥१५॥
यदर्थीं एक दृष्टांत ॥ सांगतों तुला देई चित्त ॥ जेणें बोधे तुझें चित्त ॥ होय अंत कल्पनेचा ॥१६॥
ते कल्पना कोण म्हणसी ॥ तेही सांगतों परियेसी ॥ मागें तूं म्हणत होतासी ॥ भजूं कोणासी द्वैत नाहीं ॥१७॥
गांवावेगळें शिवेसीं ॥ कोणें कल्पावें मनासीं ॥ देवावीण देउळासी ॥ कासयासी बांधावें ॥१८॥
आधीं मजसीं ठाव नाहीं ॥ परी भजावें कोणा कांहीं ॥ हें पाखंड्याचें मत पाहीं ॥ अनुभव नाहीं ज्यालागी ॥१९॥
एकमेवा द्वितीयं नास्ति ॥ तरी कोणाची करावी भक्ती ॥ ऐसें बोलती मंदमती ॥ जे नेणती आपणातें ॥२२०॥
जरी ते आपणा आपण जाणते ॥ तरी ऐसें न बोलते ॥ संसारीं सहज राहते ॥ भक्ति करी ते आदरें ॥२१॥
कां जे शरीर प्रारब्धाधीन ॥ हें असतों त्यासीं ज्ञान ॥ त्याचा सांडोन प्रयत्न ॥ सहज जाण रहाते ॥२२॥
शरीरभोग सहज राहते ॥ आपणास वेगळे जाणते ॥ साक्षित्वें भक्ति करिते ॥ पाळिते वेदवचन ॥२३॥
जेथींचें तेथें कर्म स्थापोन ॥ करीत वेदाचें पाळण ॥ ज्यासीं नाहीं आपलें ज्ञान ॥ वेद म्हणोन पाखंड ॥२४॥
पाखंडी ब्रह्म झालों म्हणती ॥ परी शरीरभावना सांडिती ॥ आदरें संसार करिती ॥ आणि त्यागिती भक्तीतें ॥२५॥
माझें तुझें म्हणती ॥ ज्ञानाज्ञान विचारिती ॥ महत्वालागीं मरती ॥ शब्देंचि ठकविती लोकांसी ॥२६॥
हळहळ ती गेली नाहीं ॥ धनाशा ती वसे देहीं ॥ ममता जडलीसे पाहीं ॥ स्थूळाचा नाहीं विसरु ॥२७॥
कामक्रोधांचें आयतन ॥ निंदा द्वेषाचि तो खाण ॥ लोभमोहाचें अधिष्ठान ॥ न साहे वचन कोणाचें ॥२८॥
सुख झाल्या सुखावत ॥ जैसा निवांत दीप धरी जोत ॥ दु:ख झाल्या खेदयुक्त ॥ वायूनें जोत हाले जेवीं ॥२९॥
शरीरीं चेष्टा सर्व आहेती ॥ आणि ज्ञानकथन कथिती ॥ एकमेवाद्वितीयं नास्ति ॥ साक्ष देती वेदाची ॥२३०॥
अरे हें वचन सत्यचि असे ॥ म्हणे के आत्मा सर्वत्रीं वसे ॥ महभ्दूते ते अनायासें ॥ दृश्यत्वें दिसती वेगळालीं ॥३१॥
तरी दृश द्रष्टातें सांडोन ॥ पहा स्वयेंचि ब्रह्म होवोन ॥ ही तों त्यांसीं नकळेचि खूण ॥ पाखंड म्हणोन बोलत ॥३२॥
ब्रह्म अद्वैत एक आहे ॥ हें कोण म्हणती नोहे ॥ परी आकार भिन्न भिन्न स्वतां आहे ॥ भक्ति होय आकारें ॥३३॥
निराकारीं प्रपंच परमार्थ ॥ ज्ञान अज्ञान जात गोत ॥ देवी देवताभक्त ॥ तीर्थ व्रत नाहीं कीं ॥३४॥
पिंड ब्रह्मांड रचना ॥ चारी वेद चौसष्टी कळा जाणा ॥ जप तप अनुष्ठान नाना ॥ नाहीं रचना सृष्टीची ॥३५॥
त्याचें मनेंविना मनन कीजे ॥ अनुभवाविण अनुभव जाणिजे ॥ कांहींच आपण न होईजे ॥ तेव्हांच पाविजे निर्गुण पैं ॥३६॥
तेथींची खूण अनुभवी जाणती ॥ जे सद्गुरुचे अनुग्रही असती ॥ ते शरीरीं साक्षित्वें वसती ॥ पाळिती वेदमर्यादा ॥३७॥
ज्यासीं नाहीं अनुभवज्ञान ॥ ते करिती बाह्यपूजन ॥ आगममार्गीं जाती प्रवीण ॥ चक्रें जाण भारताती ॥३८॥
त्या चक्राची स्थिती ॥ बोलतां नये मजप्रती ॥ आदरें विषय सेविती ॥ इंद्रिय करिती तृप्त ते ॥३९॥
जैसें अंधळें गुरुं ॥ लाधलें हिरवा चारु ॥ तें विसरलें मागील मोहरु ॥ पुढील विचार नेणवेची ॥२४०॥
तें ममतालोभीं भरलें ॥ चरत पुढेंचि चालिलें ॥ मार्गीं आडांत पडतें झालें ॥ मग पडलें चरफडीत ॥४१॥
वरतें येतां नये ॥ मध्यें तो जीवन जाये ॥ ऐसें पाखंडीयासीं होये ॥ पडता हे भ्रमकूपीं ॥४२॥
तैसें झालें प्राण्यासीं जाण ॥ अंध तो आत्मानुभवावीण ॥ आणि विषयाचें तृण लाधून ॥ तेणें चाले रान शब्दाचें ॥४३॥
निंदा स्तुतीच्या दरडी उतरत ॥ देहाभिमानाच्या पर्वतीं राहत ॥ नाहीं आपल्या ब्रह्मत्वाचा हेत ॥ म्हणोनि फिरत मायावनीं ॥४४॥
जें मन बुद्धींसी अगोचर आहे ॥ तें याच्या साधनें साधेल काये ॥ ऐसी ज्यासी नकळे सोये ॥ तोचि पाहें पशु खरा ॥४५॥
तो पूर्णत्वाचा गांव टाकून ॥ फिरे मायावनीं आपण ॥ जेथें कामक्रोधांचें अखंड स्थान ॥ विषयांचें तृण वाढलें ॥४६॥
जेथें लोभाचे फोक वाढले ॥ ते गगनाशीं पाहावया गेले ॥ ते इच्छा फळी फळा आले ॥ घड लागले अमुपचि ॥४७॥
विद्यामद गजासी पाहीं ॥ जेथें पारावर नाहीं ॥ मोह अजगर ठायीं ठायीं ॥ जे सदा पाहीं भुकेले ॥४८॥
जेथें मनमृग चमकत ॥ तो असे विकार समवेत ॥ त्यावरी मांडीं बुद्धिघात ॥ परी तो जात टाकोनी ॥४९॥
नाना मतांतराचे कांहीं ॥ वृक्षांसी पारच नाहीं ॥ कल्पनेचे कावळे पाहीं ॥ ठाई ठाइ कोकाती ॥२५०॥
तृष्णेचे वेल चालिले ॥ तीहीं तें वनचि व्यापिलें ॥ त्या वनी पशु पडले ॥ सांपडले भ्रमकूपीं ॥५१॥
असें यांचें आचरण ॥ ते दृष्टरूपचि जाण ॥ म्हणोनी आलें पशुपण ॥ फिरती वन शब्दब्रह्मांचे ॥५२॥
अनिर्वाच्य वस्तूचें ठाई ॥ शब्द हेचि माया पाहीं ॥ येणेंचि पाखांडीं ठाई ठाईं ॥ तूं हे सोय सांडीं रे ॥५३॥
ऐसियाचा संग करितां पाविजे आत्मघाता ॥ वाघाचा संग करितां ॥ सुखवार्ता कैंची पैं ॥५४॥
दुर्गंधीचा संग करितां जाण ॥ दुर्गंधीच पाविजे आपण ॥ तैसें देहाचे संगेकरून ॥ कैचें पावन होइजे ॥५५॥
वेडे तैसें वेडियासीं भेटले ॥ तेथें सुख काय झालें ॥ तैसें देहवादीं नाडले ॥ तेचि बोलिले वेदबाह्य ॥५६॥
कीं जे अहिक्यता सांडूनि दिली ॥ आणि द्वैतवादीं प्रवर्तलीं ॥ तें आपणा आपण वंचिलीं ॥ अवघीं पडलीं भवचक्रीं ॥५७॥
तरी आतां तूं करीं आपण ॥ सांडूनिया मीतूंपण ॥ अद्वैत बोध करीं भजन ॥ पाखंडपण सांडिजे ॥५८॥
तूं अनुभवें ब्रह्म झालासी पूर्ण ॥ परी जोंवरी शरीर आहे वर्तमान ॥ तोंवरी वेदाची आज्ञा प्रमाण ॥ करी आपण रत्नाकरा ॥५९॥
कां जें तूं तों कर्मातीत ॥ परी शरीरेंचि कर्म होत ॥ कर्मेंचि शरीर शोभत ॥ धरीं हेत जीवीं हा ॥२६०॥
ज्या ज्या वर्णीं जें जें जन्मले ॥ त्यांचें त्यासीं कर्म लागलें ॥ जें जें विधियुक्त बोलिलें ॥ तेंचि केले पाहिजे ॥६१॥
शिवोभूत्वा शिवंजयति ॥ हेचि वेदगुह्य जाणती ॥ ऐसें जाणोनि करीं भक्ती ॥ सर्वभूतीं एक पाहे ॥६२॥
शरीरकर्म सहजचि आहे ॥ हें टाकिल्यानें नवजाये ॥ कर्म टाकिलें म्हणतां पाहे ॥ वेदबाह्य बोलिजे ॥६३॥
शरीराचीं कर्मे टाकिलीं ॥ परी मनामाजी भरलीं ॥ मनेंचि बद्धता झाली ॥ मुक्तता गेली मनायोगें ॥६४॥
कर्म सांडिलें नाहीं ॥ मनीं कल्पना भरली पाहीं ॥ शरीरकर्म टाकिलें ज्यांहीं ॥ ते पडले प्रवाहीं भवजन्माचे ॥६५॥
म्हणोनी वेदें जें सांगीतलें ॥ ज्या ज्या वर्णीं जें जें कर्म नेमिलें ॥ तें तें साक्षित्वें पाहिजे केलें ॥ जेणें आपुलें हित होय ॥६६॥
तूं मागें म्हणत होतासी ॥ ठाव नाहीं द्वैतासीं ॥ तरी म्यां भजावें कोणासी ॥ ऐसी अशंका घेतलीस ॥६८॥
तरी तुजहून कांहीं ॥ सनकादिक मूर्ख नाहीं ॥ तेही भक्ति करिती पाहीं ॥ सांडोनि सोई भेदाची ॥६९॥
तुज काय सनकादिकांहून ॥ अधिक झालें ज्ञान ॥ आतां सांडीं शहाणपण ॥ करीं स्मरण आवडीनें ॥२७०॥
जें जें होईल दर्शन ॥ तें तें जाणिजे भगवान ॥ त्यासीच म्हणावे स्मरण ॥ सांडीं भान कल्पनेचें ॥७१॥
अंतर निर्मळ ज्ञानेंकरून ॥ बाह्य निर्मळ कर्म करून ॥ वाचा शुद्ध करी हरिकीर्तन ॥ तीर्थादि गमनें चरण शुद्धी ॥७२॥
वाचेसीं जरी नाहीं स्मरण ॥ तरी व्यर्थ इतर करी जल्पन ॥ म्हणोन करितां अखंड हरिकीर्तन ॥ वाचेचें जाण सार्थक ॥७३॥
हरिस्मरणावीण वाचा ॥ तेथें संचार होय पापाचा ॥ पापें घात होय त्याचा ॥ पावे नरकाचा अधिकारी ॥७४॥
ऐसें जाणोन सावकाश ॥ स्मरण करीं रात्रंदिवस ॥ येणेंच शुद्धता वाचेस ॥ धरीं विश्वास जीवीं हा ॥७५॥
करीं प्रतिमेचें पूजन ॥ करावें ब्राह्मणाचें चरण क्षाळण ॥ हरिमंदिर संमार्जन ॥ येणेंचि पावन कर होती ॥७६॥
नेत्रीं दिसे जें जें कांहीं ॥ तें तें हरिरूपचि पाहीं ॥ सांडोनी नाना रंगाची सोई ॥ पावन नाहीं नेत्र तेणें ॥७७॥
शरीरें देवास कवळोन ॥ लोटांगण की जेती आपण ॥ संतसेवेसीं लावावें मन ॥ तेणें शरीर पावन रत्नाकरा ॥७८॥
गुरुज्ञानें अंतर शुद्ध केलें ॥ वेदवाक्यें बाह्य शुद्ध झालें ॥ अंतर बाहेर हरिभक्तीं लाविलें ॥ तोचि बोलिजे ब्रह्मज्ञानी ॥७९॥
आपण सर्वसाक्षी होवोन ॥ करी विधियुक्त आचरण ॥ हरिभजनीं आल्हादपूर्ण ॥ तोचि ब्रह्मज्ञानी बोलिजे ॥२८०॥
निंदा स्तुती सांडुनी ॥ राहिला लीन होउनी ॥ अखंड लोळे संतचरणीं ॥ तोचि ब्रह्मज्ञानी बोलिजे ॥८१॥
जें जें कर्म बोलिलें जेथें ॥ तें तें स्थापित जाय तेंथें ॥ आत्मवत् मानीं सर्वभूतें ॥ मानावा त्यातें ब्रह्मज्ञानी ॥८२॥
सद्गुरुचरणीं दृढ भाव ॥ गुरुरूप देखे सर्व ॥ सांडोनियां मिथ्या भाव ॥ पाहे देव सर्वांभूतीं ॥८३॥
सुख झाल्या सुखावेना ॥ दु:ख झाल्या न सांडी भजना ॥ अखंड करी वेदांत श्रवणा ॥ तोचि जाणा ब्रह्मज्ञानी ॥८४॥
मागील आठवण नाहीं ॥ पुढील चिंता न करी कांहीं ॥ जें जें होय ज्यासमयीं ॥ त्यां त्यां नाहीं पाठमोरा ॥८५॥
माया ती मुळींच नाहीं ॥ आहिक्यता सर्वांठायीं ॥ हरिभजनीं आळस नाहीं ॥ तोचि पाहीं ब्रह्मज्ञानीं ॥८६॥
अशुभ न वदेचि वाणी ॥ जो निर्विकल्प मनीं ॥ मरणाआधीं राहिला मरोनी ॥ तोचि ज्ञानी बोलिजे ॥८७॥
विद्यावैभव चतुर ॥ ज्ञानचातुरीं भांडार ॥ परी नसेचि अहंकार ॥ तोचि  साचार ब्रह्मज्ञानीं ॥८८॥
ज्या ज्या वर्णीं जें कर्म बोलिलें ॥ तें तें स्थापीत जाय वहिलें ॥ आत्मवैभव जोडलें ॥ धरूनि राहिले तेचि ज्ञानी ॥८९॥
आकाश पडतां कोसळून ॥ परी न डळमळी त्याचें मन ॥ राहे साक्षी होवोन ॥ तोचि जाणा ब्रह्मज्ञानी ॥२९०॥
जप तप अनुष्ठान ॥ करी तीर्थव्रता लागून ॥ वेदशास्त्राचें वाढवी महिमान ॥ तोचि एक पूर्णज्ञान ॥९१॥
परस्त्री मातेसमान ॥ परधन विष्टेसमान ॥ सांडोनि राहे थोरपण ॥ तोचि पूर्ण ब्रह्मज्ञानी ॥९२॥
मागचें भान सांडूनी ॥ राहे सहजीं सहज होवोनी ॥ काळवेळ हरिजगीं ॥ न विचारीं मनीं ज्ञानी तोची ॥९३॥
शरीरभोगातें आळसी ॥ हरिभक्ति करी आदरेंसीं ॥ सांडूनियां लौकिकासीं ॥ कीर्तनासी करीतसे ॥९४॥
टाळमृदंगाचे घोषें ॥ कीर्तन करी अति हर्षे ॥ प्रेमें नाचत उल्हासें ॥ आत्मसौरसें डुल्लत ॥९५॥
अविनाश वस्तूतें सत्य ॥ दृश्याभास मिथ्या भासत ॥ ऐसें अखंड गात ॥ तटतटा नाचत वेळोवेळां ॥९६॥
कृष्णकेशव गोविंद हरी ॥ ऐसीच अखंड गर्जना करी ॥ जेणें ज्ञानबोध अंतरीं ॥ तैसेपरी सांगत ॥९७॥
जेणें अज्ञाना होय ज्ञान ॥ ऐसें लावी अनुसंधान ॥ भक्तिज्ञान वैराग्यपूर्ण ॥ करी निरोपण वेळोवेळां ॥९८॥
सन्मार्ग लागे जनासीं ॥ तेंचि करी आदरेंसीं ॥ आपण तरोनि तारी इतरांसीं ॥ तोचि निश्चयेसीं ब्रह्मज्ञानी ॥९९॥
अणुपासोन ब्रह्मवरी ॥ म्हणे हें मजमाझारी ॥ जना जाणे अववापरी ॥ म्हणोनी करी बोध सकळां ॥३००॥
आपुले सर्व जाणून ॥ म्हणे अवघ्यां माजी मीच आपण ॥ ऐसें जाणोन आकळी मन ॥ सांगे ज्ञान सकळांसीं ॥१॥
जो नायके मन घालुन ॥ त्यासी सांगे कर जोडोन ॥ म्हणे हें मज द्यावें दान ॥ करुणा करून बोलत ॥२॥
जैसा नेत्रामाजी कण जातां ॥ तो काढी तवं गोड लागे चित्ता ॥ तैसा साळ्या भोळ्यासीं बोध करितां ॥ आळस सर्वथा न करीच ॥३॥
त्यासी ब्रह्मज्ञानी म्हणावें इतर ते पाखांडी जाणावे ॥ ऐसें जाणोनी मनोभावें ॥ करावें सांगीतलें तें ॥४॥
मागें जें निरोपण केलें ॥ जें तूं तें चौदेहांपासून सोडविलें ॥ तुझें तुज भासविलें ॥ चोरलें गुह्य होतें जें ॥५॥
वेगळें आपणासी जाणूनी ॥ भक्ति करी आदरें करूनी ॥ संदेह अस्सेल तरी मनीं ॥ बोल वचनीं रत्नाकरा ॥६॥
सद्गुरुवाक्य ऐकोनी ॥ बोले रत्नाकर कर जोडूनी ॥ संदेह नाहीं माझे मनीं ॥ परि एक विनवणी आहे स्वामी ॥७॥
त्रिकांड वेद बोलिला आपण ॥ कर्म उपासना अध्यात्म जाण ॥ सत्व रजतम त्रिगुणात्मक पूर्ण ॥ ब्रह्म त्रिगुणांहून वेगळें ॥८॥
ब्रह्म ते त्रिगुणात्मक आहे ॥ कर्म त्रिगुणयोगें होये ॥ याच्यायोगें सार्थक काये ॥ सांगा सोय असेल तैसी ॥९॥
कर्म एकविध नाहीं ॥ ऐसीच उपासना पाहीं ॥ कळल्या न करावें कांहीं ॥ ते सांगा सोय मजलागीं ॥३१०॥
वेदाची मर्यादा पाळिती ॥ तेचि जाणावी हरीची भक्ती ॥ ऐसें स्वामी बोलिलेती ॥ तेणें चित्तीं संदेह झाला ॥११॥
कर्मणो गहना गति: ॥ ऐसें असे गीता बोलती ॥ त्या कर्मीं मज दीनाप्रती ॥ कां गोवितां नकळे ॥१२॥
मी तो झालों कर्मातीत ॥ सर्व हें मजमाजी भासत ॥ कर्म करावया माझें चित्त ॥ नाहीं घेत गुरुमूर्ती ॥१३॥
कर्म करून कोण तरला ॥ ऐसा म्यां नाहीं ऐकिला ॥ ब्रह्मस्थिति बाणली मला ॥ कैसें कर्माला करूं मी ॥१४॥
तुम्हीच सर्व निरसलें ॥ चौं देहांतें उठविलें ॥ मागुतें कर्म स्थापिलें ॥ हें वाटलें नवल मज ॥१५॥
ऐसें वदे देहातीत होऊन ॥ आणि कर्म तें नोहे देहावीण ॥ हें जैसें असेल तैसें आपण ॥ सांगा करून वेगळालें ॥१६॥
हा अध्याय तरी पूर्ण झाला ॥ पुढले अध्यायीं सांगेन तुला ॥ जेणें बोध होय मनाला ॥ होईं कथेला सावध ॥१७॥
नऊ अध्याय झाले पूर्ण ॥ आतां दहाव्याचा आरंभ जाण ॥ पूढें अपूर्व होईल निरूपण ॥ जेणें मन निवे तुझें ॥१८॥
तूं जाणोन नेणता होसी ॥ हें कळों आलें मजसीं ॥ रामानंद म्हणे वेगेंसीं ॥ सावध कथेसी रत्नाकरा ॥१९॥
जे गुह्य सर्वातीत होतें चोरलें ॥ तें रत्नाकरा प्रगट केलें ॥ माझें समाधान झालें ॥ सांगेन पुसिलें सर्वही ॥३२०॥
हा दीपरत्नाकर ग्रंथ ॥ जेणें अज्ञानाचें बोधे चित्त ॥ संतोषती साधुसंत ॥ हें मथित वेदांताचें ॥२१॥
जे सद्गुरुचे अनुग्राही होती ॥ ते यातें अमृतापरी सेविती ॥ पाखंडी ऐकोनी उफाळिती ॥ जे वर्तती जीवदशें ॥२२॥
चंद्रामृत चकोरा प्राप्त ॥ कावळ्याचें हृदय फुटत ॥ तैसा गुरुभक्त घेती अर्थ ॥ नीगुरे करीत वाद सदा ॥२३॥
जैसें अंजनेंविण निधान ॥ प्राप्त नोहेचि जाण ॥ तैसें निगुर्‍यासीं नोहे ज्ञान ॥ वाद म्हणोनी करिताती ॥२४॥
दीपरत्नाकरीं करीं ब्रह्मज्ञान ॥ करतलामल केलें जाण ॥ जैसें समुद्र मंथन करून ॥ काधिले निधान अमृत ॥२५॥
त्या अमृतें देव सुखी झाले ॥ आणि राहूचें मस्तकचि गेलें ॥ तैसें गुरुभक्तासीं अनुभवा आत्नें ॥ इतर पडले द्वंद्वभेदीं ॥२६॥
नित्य भाव धरिती ॥ हा ग्रंथचि गुरु म्हणती ॥ तेही सुखातें पावती ॥ संदेह चित्तीं नसावा ॥२७॥
सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंद पदें ॥ रत्ना कराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥३२८॥
इतिश्री चिदादित्यप्रकाशे दीपरत्नाकरग्रंथे अद्वैतभक्तियोगो नाम नवमोsध्याय: ॥९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ एकंदर ओंव्या ॥३२८॥    ॥    ॥
इति दीपरत्नाकर नवमोध्याय: समाप्त ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP