मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ३५ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३५ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम:
गुरु म्हणे दीपकासी । श्रीगुरु सांगती अलर्कासी ।
धरूनी योगचर्येसी । योगाभ्यासीं रत व्हावें ॥१॥
उपद्रव नसे जेथें । अभ्यास करावा तेथें ।
एकांतीं समीप जल जेथें । तेथें अभ्यास करावा ॥२॥
वनीं नुकुंजांत । किंवा बसूनी गुहेंत ।
पवित्र स्थळीं देवालयांत । अथवा शून्य गृहांत बसावें ॥३॥
योग हा मनोदंड । मौन होय वाग्दंड ।
निरिच्छता देहदंड । हें अखंड असावें ॥४॥
हातीं घेती वेणुदंड । जे होती पाखंड ।
किंवा होती भंड । त्यांचें तोंड न पहावें ॥५॥
काया वाचा मनोदंडी । जाणावा तो त्रिदंडी ।
बासानें न होई दंडी । जो न सोडी रागद्वेषां ॥६॥
जो नेणे भेदाभेद । ज्याच्या चित्ता नये खेद ।
जो नेणे कधीं स्वाद । तो निर्वाद ब्रह्मभूत ॥७॥
आपुले ठायीं सर्व पाहे । सर्वांठायीं आपण पाहे ।
शत्रु मित्र उदासीन हे । भेद न पाहे सर्वथा ॥८॥
त्याला मग कोण प्रिय । तया कोण अप्रिय ।
तो जाणावा अद्वितीय । समदृष्टी होय जयाची ॥९॥
जो लोष्टाश्मकांचन । यां पाहे समान ।
ज्याचें शुद्ध मन । तो योगवान् म्हणावा ॥१०॥
केवळ जो ब्राह्मण । वेदपाठक तयाहून ।
असे श्रेष्ठ जाण । सेवितां पावन करे तो ॥११॥
त्याहूनी श्रेष्ठ जापक । त्याहून श्रेष्ठ याज्ञिक ।
त्याहून श्रेष्ठ ऐक । परोक्षज्ञानसंपन्न ॥१२॥
त्याहूनी ध्यान करी तो । ब्राह्मण श्रेष्ठ होतो ।
त्याहूनी अनुभव घेतो । श्रेष्ठ होतो निश्चयें ॥१३॥
निर्विकल्पसमाधिस्थ । तो ब्राह्मण अतिश्रेष्ठ ।
जो ईश्वरभक्त प्रेष्ठ । ब्रह्मविद्वरिष्ठ तो जाण ॥१४॥
त्याहून नाहीं अधिक । जरी झाला वैदिक ।
नेणें अद्वितीय जें एक । तो शोकभागी होय ॥१५॥
( श्लोक ) ॥ चतुर्वेदोsपि यो विप्र: सूक्ष्मं ब्रह्म न विंदति ।
वेदभारभराक्रांत: स स्याद्ब्रह्मणगर्दभ: ॥१६॥
अलर्का असें जाणून । सर्व प्रयत्नें करून ।
करावें नित्य ध्यान । तरीच पावन निश्चयें ॥१७॥
जरी हा योग वाटे कठीण । तरी ऐक सुगम साधन ।
काम क्रोध जिंकून । संग सोडून बसावें ॥१८॥
अंगुष्ठांनीं कान । तर्जनींनीं नयन ।
मध्यमीं नासा धरून । धरावें आनन चौं अंगुलींनीं ॥१९॥
आपुले उजवे कानीं । जो उमटें ध्वनी ।
तिकडे मन लावूनी । एकाग्र मनीं ऐकावें ॥२०॥
घबराट होतां त्या समयास । सोडावें वाम नासापुटास ।
पुन: धरूनी तयास । उजव्यानें श्वास सोडावा ॥२१॥
असें पुन: पुन: करावें । नादीं लक्ष्य लावावें ।
सूक्ष्मनाद ऐकावे । स्थूल सोडावे सर्वथा ॥२२॥
दशविध नाद होती । ते भरती चित्तीं ।
ये उन्मनी स्थिती । सर्व वृत्ती वारूनी ॥२३॥
येणें होई समाहित । राही योगी प्रसन्नचित्त ।
होई एकांतभक्त । हा विमुक्त जाणावा ॥२४॥
एकदां होतां समाहित । बाह्याभ्यंतरवर्जित ।
त्याचा करावया घात । कोणी जगांत नसेची ॥२५॥
जो मुक्तस्थितीला । गुरुप्रसादें आला ।
भ्रष्ट करावया तयाला । कळिकाळालाही शक्ति नसे ॥२६॥
असेंही ध्यान न घडे । प्रतिबंधें विघ्न घडे ।
अभ्यास तोही पुढें । न वाढे जयाचा ॥२७॥
ज्याचें पाप प्रबळ । त्याचें मन हो चंचळ ।
तें कराया निश्चळ । योगी व्याकुळ होई तो ॥२८॥
तेणें विष्णूचें ध्यान । करावें अनुदिन ।
मग पाप जाऊन । स्थिर मन होईल ॥२९॥
ज्याचे पाद सहस्त्र । ज्याचे हात सहस्त्र ।
ज्याचे नेत्र सहस्त्र । शिरें सहस्त्र जयाचीं ॥३०॥
ज्याचे पोटी ब्रह्मांड । त्रैलोक्य हा ज्याचा पिंड ।
ज्याचा आनंद अखंड । तेज उदंड जयाचें ॥३१॥
सर्व प्राण्यांचीं जीं शिरें । तीं तयाचीं शिरें ।
एवं सर्व गात्रें । तयाचें चतुरें जाणावीं ॥३२॥
पादाधोभाग अतल । पादोर्ध्वभाग वितल ।
गुल्फ हे सुतल । महातल जंघादेश ॥३३॥
ढोंपरें तलातल । मांड्या रसातल ।
कमर पाताल । एवं सप्तपाताल अधोभाग ॥३४॥
बेंबी भूलोक । पोट भुवर्लोक ।
हृदय स्वर्लोक । महर्लोक कंठ ज्याचा ॥३५॥
मुख जनलोक । भ्रुकुटी तपोलोक ।
मस्तक सत्यलोक । एवं सप्तलोक ऊर्ध्वभाग ॥३६॥
जड वातावरण । हे जयाचे प्राण ।
पृथ्वी देह जाण । चौदा भुवनें शरीरीं ॥३७॥
नक्षत्रें दांत ज्याचे । माया हास्य जयाचें ।
निमिषोन्मेष जयाचे । दिवारात्री म्हणती ॥३८॥
कटाक्ष हे सृष्टी । कुक्षी समुद्र म्हणती ।
सर्व नद्या नाड्या होती । केश म्हणती वृक्षौषधी ॥३९॥
वृष्टी ज्याचें रेत । हाडें हीं पर्वत ।
बळ ज्याचें वज्र हस्त । कोप ज्याचा श्रीरुद्र ॥४०॥
दिशा ज्याचे कान । ज्याची त्वचा पवन ।
सूर्य ज्याचा नयन । जिव्हा वरुण जयाची ॥४१॥
ज्याचें घ्राण अश्विनीकुमार । हीं ज्ञानेंद्रियें साचार ।
आतां कर्मेंद्रियें चतुर । ध्याती तीं सादर ऐक तूं ॥४२॥
वाचा अग्नी निश्चित । इंद्र ज्याचे हात ।
पाय ज्याचे अच्युत । निरृती गुद जयाचें ॥४३॥
प्रजापती लिंग जयाचें । चंद्र मन जयाचें ।
नारायण चित्त जयाचें । बुद्धि बृहस्पती जाणावी ॥४४॥
ज्याचा अहंकार रुद्र । असा ज्याचा आकार ।
जो त्रिभुवनाधार । विश्वेश्वर ध्यानमूर्ती ॥४५॥
ज्या ध्यातां ये महोत्सव । ज्याचा वाचक प्रणव ।
तयाचे तीन अवयव । अकार उकार मकार ॥४६॥
ह्या मात्रा तीन । ऋषी देवादि जाणून ।
करावेम तयाचें ध्यान । पापा जाळून टाकी जें ॥४७॥
एकांतीं बसून । घालूनी दृढासन ।
दीर्घ उच्चार करून । भावें प्रणव जपावा ॥४८॥
अकार उकार मकार । ह्या तीन मात्रा निर्धार ।
जिचा नोहे उच्चार । सूक्ष्मतर अर्ध मात्रा ती ॥४९॥
ही मात्रा योगी जाणती । जसी मुंगीची गती ।
तसी मस्तकी ती । घुमे सूक्ष्म गतीनें ॥५०॥
ही गांधारस्वरासम । म्हणूनी गांधारी हें नाम ।
इला देती योगी परम । ही विश्राम दे जीवा ॥५१॥
अर्ध नकुळाची मात्रा । चाष तो एक मात्रा ।
कावळा बोले दोन मात्रा । तीन मात्रा मोर बोले ॥५२॥
मनीं आणूनी ह्या मात्रा । प्रणवा साडे तीन मात्रा ।
उच्चारिजे सात मात्रा । चौदा मात्रा त्यानंतर ॥५३॥
दीर्घ म्हणतां ओंकार । जो होई उच्चार ।
मस्तकीं घुमे तो मनोहर । त्रिकाळ दररोज जपतां ॥५४॥
उच्चारितां नेटें । जो ध्वनी उमटे ।
तो उत्तरोत्तर गोड वाटे । मागें हटे मनोराज्य ॥५५॥
घ्यावें धनुष्य ओंकार । अभ्यासानें ओढावें बरोबर ।
लावूनी मन हा शर । वेधावें परब्रह्म तें ॥५६॥
जो कां माशी मारी । तो लक्ष्य चित्तीं धरी ।
मग अचूक मारी । त्यापरी येथें जाणावें ॥५७॥
मारितां प्रमत्त होतां । लक्ष्य न राखितां ।
मारगिरी चुकतां । नये हातां जेवीं लक्ष्य ॥५८॥
तेवीं येथें जाण । प्रमत्त होतां तत्क्षण ।
विक्षेपीं पडे अंत:करण । दु:ख दारुण ये मग ॥५९॥
म्हणूनी सावधान । जो ठेवी आपुलें मन ।
तो पावे समाधान । पुनरावर्तन चुकवी तो ॥६०॥
तीनी मात्रांचे भेद । जाणावें विशद ।
देवता ऋषी छंद । जाणुनी उच्चार करावा ॥६१॥
अग्नी ऋषी अकारासी । गायत्री छंद त्यासी ।
ब्रह्मा दैवत त्यासी । पीत वर्ण जाणावा ॥६२॥
क्लीं बीज क्रियाशक्ती । अथवा जागृती ।
भू:स्थान म्हणती । असे उदात्त स्वर ॥६३॥
त्याचा ऋग्वेद जाण । विश्व आत्मा रजोगुण ।
भू तत्व प्रात:सवन । असे अग्नी गार्हपत्य ॥६४॥
स्थूल भोग नेत्र स्थान । वैखरी वाचा स्थूल देह जाण ।
असें मनीं आणून । अकारध्यान करावें ॥६५॥
अग्नि ऋषि उकारासी । त्रिष्टुप् छंद त्यासी ।
देवता वैकुंठवासी । रक्तवर्ण जाणावा ॥६६॥
श्रीं बीज ज्ञानशक्ती । स्वप्नावस्था बोलती ।
भुव: स्थान म्हणती । असे स्वर अनुदात्त ॥६७॥
त्याचा यजुर्वेद जाण । अग्नी असे दक्षिन ।
नभस्तत्व मध्यंदिन सवन । सत्वगुण तैजस आत्मा ॥६८॥
प्रविविक्त भोग कंठस्थान । मध्यमा वाचा सूक्ष्म देह जाण ।
असें मनीं आणून । उकारध्यान करावें ॥६९॥
सूर्य ऋषि मकारासी । जगती छंद त्यासी ।
देवता कैलासवासी । श्वेतवर्ण तयाचा ॥७०॥
र्‍हीं बीजें द्रव्य शक्ति । निद्रावस्था बोलती ।
स्व:स्थान त्याचें म्हणती । स्वरित स्वर तयाचा ॥७१॥
त्याचा सामवेद होय । अग्नि आहवनीय ।
द्यौस्तत्व सवन तृतीय । प्राज्ञात्मा तमोगुण ॥७२॥
आनंद भोग हृदयस्थान । पश्यंती वाचा देह कारण ।
असें मनीं आणून । मकारध्यान करावें ॥७३॥
अर्ध मात्रेचा वरुण ऋषी । विराट्छंद तयासी ।
परमात्मा देवता त्यासी । क्रौं बीज विज्ञानशक्ति ॥७४॥
तयाचे सर्व वर्ण । भूर्भुव: स्व: स्थान ।
तुर्या अवस्था जाण । सर्व गुण सर्व स्वर ॥७५॥
सांवर्तकाग्नि जाण । तया सर्व सवन ।
प्रत्यगात्मा तत्वें तीन । नाद वेद परा वाणी ॥७६॥
निरतिशयानंत मूर्धास्थान । अस्मिता आहे म्हणून ।
देह महाकारण । अर्धमात्राध्यान असें हें ॥७७॥
ब्रह्म ऋषी ध्वनीचा । परब्रह्म देव त्याचा ।
अव्यक्त गायत्रीछंद त्याचा । अवस्था मनोन्मनि चिच्छक्ति ॥७८॥
स्वात्मैक्यावस्थिती । चिदाकाश स्थान म्हणती ।
असें जाणून जे ध्याती । तयां मुक्ती ये त्वरें ॥७९॥
विश्वा विराटासी । तैजसा सूत्रात्म्याशीं ।
प्राज्ञा अक्षरासी । अभेदेसी साम्य कीजे ॥८०॥
व्यस्त हा देह पिंड । समस्त ब्रह्मांड ।
लक्ष्यार्थी याचा अखंड । स्वभाव ध्यानीं आणावा ॥८१॥
पहिली र्‍हस्व मात्रा । दुसरी दीर्घ मात्रा ।
तिसरी प्लुत मात्रा । अर्धमात्रा अगोचर ॥८२॥
पहिली व्यक्त मात्रा । दुसरी अव्यक्त मात्रा ।
चिच्छक्ति तिसरी मात्रा । अमात्रा परब्रह्म ॥८३॥
ओंकार उच्चारूनी । क्रमें मात्रा चिंतूनी ।
लक्ष्य ठेवूनी मनीं । रहावें ध्यानीं सादर ॥८४॥
प्रणव आत्मयाचें नाम । म्हणूनी ओंकार ब्रह्म ।
अभेद असती नामी नाम । म्हणोनी ही उपासना श्रेष्ठ ॥८५॥
मृत्युचिन्हें जाणून । जो उपासना करून ।
राहे स्वरूप चिंतून । ब्रह्मीं लीन होई तो ॥८६॥
जरी आपुलें मन । ब्रह्मीं न होई लीन ।
तरी वैखरी वाणीनें । प्रणव जपतां मुक्त होई ॥८७॥
न होतां चित्तलय । वैखरीनें जप होय ।
जपतां प्राणलय । तो मुक्त होय ब्रह्मलोकीं ॥८८॥
गुरुदेवप्रसादानें । प्रणवाच्या ध्यानानें ।
येथेंच मुक्त होणें । अथवा घेणें क्रममुक्ति ॥८९॥
ब्रह्मलोकीं होय गती । ब्रम्ह्यासह ये मुक्ति ।
ती होय क्रममुक्ती । पुनरावृत्ती न दे जी ॥९०॥
मात्राभ्यास जसा । लोक मिळे तसा ।
प्रणवोपासनें असा । मार्ग सहसा न सुटेल ॥९१॥
येथेंच होतां ज्ञान । जीवन्मुक्त होऊन ।
प्रारब्धातें भोगून । ब्रह्मीं लीन होय तो ॥९२॥
त्याचें प्राणोत्क्रमण । न होतसे जाण ।
स्वरूपीं त्याचे प्राण । खास निर्वाण पावती ॥९३॥
तप्त पाषाणावरी । सोडितां अल्प वारी ।
न राहे त्यावरी । पाषाणाभीतरी जिरे जसें ॥९४॥
तसे मुक्ताचे प्राण । न जाती निघोन ।
स्वरूपीं होती लीन । न जाते निघून कोठेंही ॥९५॥
जो कार्यब्रह्मोपासक । त्यासी सुषुम्णामार्ग एक ।
तया मिळे ब्रह्मलोक । क्रममुक्तर्थ ॥९६॥
मृत्युकाळ जाणूनी । नव द्वारें कोंडूनी ।
ब्रह्मरंध्र भेदूनी । ओं म्हणूनी तो जाई ॥९७॥
एक मात्रा ध्यान । घडूनी जातां प्राण ।
तया भूलोकीं पुन: । ये जनन ऋग्वेदें ॥९८॥
ब्रह्मकुळीं जन्मून । ब्रह्मचर्यें तप करून ।
तो ज्ञानी होऊन । घेई निर्वांण निश्चयें ॥९९॥
जरी दोन मात्रा ध्यान । घडून जाई प्राण ।
तया सोमलोकीं नेऊन । यजुर्वेद पोंहचवी ॥१००॥
तेथें दिव्य सुख भोगून । तो भूमीवरी पुन: ।
जन्मुनी ज्ञानी होऊन । घेई निर्वाण निश्चयें ॥१०१॥
जरी त्रिमात्रा ध्यान । घडून जाई प्राण ।
तरी सामवेद नेऊन । पोंहचवी तया सूर्यलोकीं ॥१०२॥
होऊनी पापमुक्त । तो ब्रह्मलोकीं जात ।
तेथें होऊनी ध्यानस्थ । होयी मुक्त निश्चयें ॥१०३॥
कार्याहूनी पर । प्रकृतीहूनी इतर ।
जो पुरुष निर्विकार । अजरामर आत्मा जो ॥१०४॥
त्याचे रूपीं तो उपासक । मिळूनी होयी एक ।
तया कैंचा मोह शोक । नामरूप सोडी जो ॥१०५॥
सार्ध त्रिमात्रा ध्यान । घडे तो होय अपरिच्छिन्न ।
तो राहे व्यापून । त्याचें गमन कोठें व्हावें ॥१०६॥
तया न जाणें न येणें । येथेंच मुक्त होणें ।
राजा त्वां हें जाणणें । प्रणवोपासना करूनी ॥१०७॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये पंचत्रिशोsध्याय: ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP