मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय २५ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २५ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे दीपकासी । पुत्रानें असें पितयासी ।
अर्जुनाख्यान विस्तारेंसी । कथिलें दत्तकथान्वित ॥१॥
पुत्र म्हणे ऐक ताता । अलर्क नामें राजा होता ।
तोही शरण येऊनी दत्ता । योगसाम्राज्यता पावला ॥२॥
पिता म्हणे रे सुता । अलर्क हा कोण होता ।
केंवी शरण आला दत्ता । योगसाम्राज्यता कशी घे ॥३॥
दत्ताचें यश पावन । ऐकाया लावी मी कान मन ।
तृप्ती नोहे अजून । सांग विस्तारून आणीकही ॥४॥
स्वयें असूनी निराकार । जो जाहला नराकार ।
ज्याचा हा अवतार । करी निराकार निजभक्तां ॥५॥
दत्तकथामृतपान । पुरे पुरे म्हणेल कोण ।
घेतां भरूनी श्रवण । वाटे अजून पाहिजे ॥६॥
ऐसें ताताचें वचन । त्या पुत्रानें ऐकून ।
मग केलें निरूपण । अलर्काख्यान पावन जें ॥७॥
तें मीही तुजप्रती । सांगतों ऐक निगुती ।
सोमवंशीं नृपती । शत्रुजित नामें एक होता ॥८॥
शिवप्रसादेंकरून । त्याला झाला एक नंदन ।
सर्वगुणसंपन्न । दिसे शोभन स्वरूपें ॥९॥
असा तो गुणखाणी आत्मज । त्याचें नाम ठेविलें ऋतुध्वज ।
केवळ पुण्याचा पुंज । तेजें विराजमान जो ॥१०॥
त्याचें होतां व्रतबंधन । करी सर्व विद्याध्ययन ।
झाला धनुर्वेदाभिज्ञ । ज्याला प्राज्ञ मानिती ॥११॥
राजपुत्र महाशूर । शरणागतांचा आधार ।
नीतिशस्त्रीं सादर । जो उदार कीर्तिमंत ॥१२॥
असा जो राजकुमार । युवराज होऊनी सादर ।
वागे तंव एक विचित्र । नवल घडलें ऐक तें ॥१३॥
रेवातीरी गालवमुनी । राहे आश्रम करूनी ।
जो सादर स्वानुष्ठानीं । राहे ध्यानीं निमग्न जो ॥१४॥
पर्वकाळीं ऋषीश्वर । श्रद्धेनें आरंभी अध्वर ।
पातालकेतु असुर । महाक्रूर विघ्न करी ॥१५॥
आरंभितां होम । दिसूं लागतां धूम ।
येऊनी दैत्य महाभीम । होमविध्वंस करीतसे ॥१६॥
अस्थि मांस रक्त । टाकी यज्ञशाळेंत ।
करी यज्ञ दूषित । मुनी त्रस्त जाहला मग ॥१७॥
मुनी म्हणे करावें काय । दैत्य करिती अंतराय ।
मला न सुचे उपाय । करुं काय मी आतां ॥१८॥
जरी करूनी कोप । दुष्ट दैत्या द्यावा शाप ।
तरी भंगेल कोप । लागेल पाप निश्चित ॥१९॥
म्हणे देवा परमेश्वरा । धर्मपाळका दयाकरा ।
कां उपेक्षसी उदारा । भक्ताधारा दीनबंधू ॥२०॥
दैत्यें मज गांजिले । यज्ञयाग राहिले ।
माझें कर्म लोपलें । कां उपेक्षिलें आम्हांसी ॥२१॥
आम्हां तुझा विश्वास । दैत्यें आह्मां दिला त्रास ।
याचा करी तूं नाश । आह्मां निराश करूं नको ॥२२॥
असा दीन होऊनी । ईश्वरा प्रार्थी मुनी ।
ईश्वर प्रसन्न होऊनी । आकाशवचनीं अभय दे ॥२३॥
मुनीच्या समीप अकस्मात । दिव्य अश्व उतरत ।
मानी आश्चर्य मनांत । ऐकत तंव आकाशवाणी ॥२४॥
हा दिव्याश्व घेऊनी । शत्रुजिताचे सदनीं ।
मुने त्वां जाऊनी । निजरक्षणीं पुत्र मागे ॥२५॥
ऋतुध्वज या अश्वावर । बसूनी मारील असुर ।
मग तुवां सादर । करावा अध्वर निर्विघ्नपणें ॥२६॥
असी आकाशवाणी । पडतां मुनीच्या कानीं ।
तया अश्वा घेऊनी । राजसदनीं पातला ॥२७॥
म्हणे राजा मी गालव । करी रेवातीरीं याग उत्सव ।
विघ्न करी दैत्यपुंगव । आजी देव प्रसन्न झाला ॥२८॥
अश्व उतरला अकस्मात । तंव आकाशवाणी बोलत ।
ऋतुध्वजा हा अश्व देतां । दितिजसुता तो मारील ॥२९॥
असी आकाशवाणी ऐकून । आलों अश्व घेऊन ।
आतां दे पुत्रदान । तुझें कल्याण होईल ॥३०॥
क्षत म्हणे दु:ख जाण । त्यापासूनी करी त्राण ।
म्हणोनी क्षत्रिय हें नाम तुम्हां जाण । करा रक्षण आमुचें ॥३१॥
मुनीचें वचन ऐकून । राजा प्रसन्न होऊन ।
म्हणे पुत्रा अश्वारूढ होऊन । करी हनन दैत्यांचें ॥३२॥
असतां मुनीचा अनुग्रह । अनुकूल होती सर्व ग्रह ।
मग यासीं कोण करील विग्रह । तया मोहन पडेल ॥३३॥
असें ताताचें वचन । तो ऋतुध्वज मानून ।
मायबापां वंदून । आशीर्वचन घेतसे ॥३४॥
अश्वा घेऊनी राजसुत । ऋषीश्वरा समवेत ।
येऊनी त्याच्या आश्रमांत । म्हणे आतां यज्ञ करी ॥३५॥
दावी कोठें असे असुर । मी करीन त्याचा संहार ।
मग म्हणे मुनीश्वर । आतां अध्वर आरंभितों ॥३६॥
होमधूम पाहून । दैत्य येईल धांवून ।
मग दावीन तत्क्षण । रूपें पालटी नवीं नवीं ।
नानापरी माया दावी । करी हनन तयाचें ॥३७॥
दैत्य असे मायावी । रूपें पालटी नवीं नवीं ।
नानापरी माया दावी । ठेवी बरवी हुशारी ॥३८॥
तया म्हणे राजपुत्र । तुम्ही आम्हां छत्र ।
आम्ही भवद्दर्शनें पवित्र । दितिपुत्र आम्हां कायसे ॥३९॥
होतां तुमची कृपा मात्र । आम्हीं होऊं जयपात्र ।
साधूं आम्ही इहपरत्र । नाहीं अत्र संशय ॥४०॥
असें ऐकतां त्याचें वचन । गालव आरंभी यज्ञ ।
कर्मसंकल्प करून । अन्वाधान करितां झाला ॥४१॥
तंव होमधूम उठला । तो दैत्यानें पाहिली ।
दैत्य धांवत आला । वराहरूप धरूनियां ॥४२॥
दंष्ट्रा बाहेर दिसत । घुरु घुरु शब्द करित ।
केश उभारून अकस्मात । त्या आश्रमांत पातला ॥४३॥
मुनी सांगे राजसुता । हा दैत्य पातला आतां ।
तूं ठेवी सावधानता । घे विजयता सत्वर ॥४४॥
मुनीवचन ऐकून । त्या वराहा पाहून ।
अश्वावरी बसून । नृपनंदन त्या वेळीं ॥४५॥
वराहहृदय लक्षून । सोडी अति तीक्ष्ण बाण ।
हृदयीं गेला तो भेदून । परी तो मरण न पावला ॥४६॥
जोंवरी आयुष्य असे । तंववरी कोण मारितसे ।
आयु मर्में रक्षितसे । म्हणोनी वांचतसे संकटीं ॥४७॥
विद्ध केला तरी । वराह पळे त्वरें दुरी ।
ऋतुध्वज अश्वावरी । बसोनी लागे पाठीस ॥४८॥
डुकर जाउनी वनीं । गुहेमध्यें राही लपोनी ।
ऋतुध्वज पाहूनी । गुहेमधूनी चालतसे ॥४९॥
अश्वाची गती विलक्षण । जेथें अन्धकार गहन ।
तेथें प्रवेश करून । पाताळीं जाऊन राहिला ॥५०॥
तेथें रत्नजडीत सदन । राजपुत्र पाहून ।
अश्व तेथें बांधून । म्हणे सदन पाहूं हें ॥५१॥
रत्नजडित गोपुरें । दिसती लखलखीत द्वारें ।
सुवर्णाचीं शिखरें । गगनचुंबित दिसताती ॥५२॥
रत्नांचीं सोपानें । सभोंवती उपवनें ।
जेथें सूर्यकिरणें । न करिती प्रवेश ॥५३॥
तोरणें मोतियांचीं । भिंत दिसे इंद्रनीलाची ।
पाहतां राजपुत्राची । बुद्धि थक्क झाली ॥५४॥
तंव तेथें पाहे कुमारी । देवीसमान सुंदरी ।
कंदुक घेऊन करीं । बैसली द्वारीं एकटी ॥५५॥
राजा ये तिचे समोर । ते तेथून उठे सत्वर ।
चढोनी जाई माडीवर । राजकुमार मागे चाले ॥५६॥
राजा हें पाहे अंतरीं । रत्नखचित पलंगावरी ।
बैसली एक सुकुमारी । चिंता अंतरीं करीत ॥५७॥
तंव अकस्मात रायासीं । पाहतां मूर्च्छा आली तियेसी ।
खालीं पडे तत्क्षणेंसी । सखी तिसी सांवरी ॥५८॥
निर्जीव होऊनी घटिकाभरी । निचेष्टित पडली नारी ।
मान टेंकी भूमीवरी । राजा अन्तरीं खिन्न झाला ॥५९॥
म्हणे हे मज पाहून । कां पडली पलंगावरून ।
असा विस्मित होऊन । उभा राहून पाहे तो ॥६०॥
म्हणे हें घर सुंदर । दिसतसे मनोहर ।
परी येथें न दिसे कोणी नर । असती सुंदर स्त्रिया दोघी ॥६१॥
एकांतीं स्त्रिया बसती । तेथें जाता दोष लागती ।  
तेव्हां फिरावें मागुती । हेच नीती यथार्थ ॥६२॥
म्हणोनी तो मागें मुरडत । तंव ती उठोनी रडत ।
पुन: नृपा पाहूनी पडत । सखी म्हणतसे नृपासी ॥६३॥
तुम्ही कोण आलां कोठून । कां जातां फिरून ।
क्षणभरी बसून । समाधान पावावें ॥६४॥
राजपुत्र म्हणे तियेसी । नरवर्जित स्थळीं कसी ।
करावी विश्रांतीसी । मूर्च्छा इसी कां आली ॥६५॥
तुम्ही कोणाच्या कोण । कां धरिलें शून्य स्थान ।
हें सांगा विस्तारून । मग समाधान वाटेल ॥६६॥
असें नृपाचें वचन । त्या कन्येनें ऐकून ।
सुचवी सखीस तत्क्षण । माझें वर्तमान सांग म्हणूनी ॥६७॥
असें म्हणोनी कासावीस । होऊनी सोडी तीक्ष्ण श्वास ।
पुन: पाहूनी नृपास । मूर्च्छा विशेष पावतसे ॥६८॥
सखी तिला सावरून । मंद मंद वारा घालून ।
सावधान करून । राजनन्दनाप्रती बोले ॥६९॥
आपण सुखरूप असून । येथें आपोआप येऊन ।
इला दिधलें दर्शन । तुम्हां भुलोन हे पडे ॥७०॥
इच्या मोहासी कारण । खचित झालां तुम्ही जाण ।
दर्शनें कामक्षोभ होऊन । मूर्च्छा येऊन पडली ॥७१॥
विश्वावसू गंधर्व थोर । त्याची ही कन्या सुंदर ।
पातालकेतू असुर । पळवून आणि इयेतें ॥७२॥
मदालसा इचें नम । केवळ लावण्याचें धाम ।
दैवयोगें आपुला आगम । होऊनी संगम झाला येथें ॥७३॥
दैत्य वरूं इच्छी इसी । इची इच्छा नाहीं तसी ।
येथें आणितांच इसी । भोगायासी प्रवर्त झाला ॥७४॥
तो वेळ टाळावयासी । इणें सांगितलें त्यासी ।
विवाह न होतां आमुचे वंशीं । पुरुषासी न भोगिती ॥७५॥
विवाह न होतां जरी । तूं स्पर्श करसील तरी ।
मी प्राण त्यजीन निर्धारीं । हें अंतरीं साच मान ॥७६॥
मग इचें वचन मानून । विवाह करावा म्हणून ।
शुक्राचार्या बोलावून । लग्नशोधन पैं केलें ॥७७॥
उदयीक त्रयोदशीला । मुहूर्त असे जो योजिला ।
दैत्य वर नावडे इला । म्हणूनी प्राणाला त्यजूं पाहे ॥७८॥
कालचे दिनीं येथून । दैत्य गेला निघून ।
तो संधी पाहून । ही प्राण सोडाया उठली ॥७९॥
तंव कामधेनू येऊन । म्हणे मदालसे न सोडी प्राण ।
एक वीर दैत्या भेदून । उद्यां येऊन भेटेल ॥८०॥
तो असे सुंदर । तो तुला योग्य वर ।
त्याचा धरी तूं कर । नको शरीर टाकूं हें ॥८१॥
गोलोकापासून । मी आल्यें दया करून ।
कामधेनू असें सांगून । गुप्त होऊन जाती झाली ॥८२॥
आज तसेंही घडलें । दैत्यें वराहरूप धरिलें ।
त्याला कोनी वेधिलें । दु:ख झालें फार त्याला ॥८३॥
तो पातालीं गेला लपून । आपुलें पश्चात् झालें आगमन ।
तेव्हां निश्चयें माझें मन । समाधान पावलें ॥८४॥
तुम्हींच वेधिला असुर । असा झाला माझा निर्धार ।
वाटे तुम्ही अमर । दिधला धीर या समयीं ॥८५॥
कुंडला नाम माझें असे । मी तापसाची कन्या असें ।
हिमाचळीं बसतसें । योगाभ्यासें करूनी ॥८६॥
जेथें गंधर्वकन्या क्रीडती । तेथें इसी घडली दोस्ती ।
ज्या वेळीं दैत्यपति । आकाशपंथीं इला नेई ॥८७॥
तो आर्तस्वर ओळखून । म्यां इचें हित करावें म्हणून ।
त्या दैत्या प्रार्थून । सांगितलें तें ऐक ॥८८॥
ही असे माझी सखी । माझ्याविरहित होईल दु:खी ।
तरी मलाही ने तुझ्या लोकीं । मग ही सुखी होईल ॥८९॥
हें दैत्यें अंगीकारिलें । मलाही बरोबर आणिलें ।
तें सख्य आजी फळलें । मज कळलें भवद्दर्शनीं ॥९०॥
हें म्यां सर्वं कथिलें । आपुलेंही दर्शन झालें ।
आम्हां कृतार्थत्व आलें । आपुलें नाम सांगा ॥९१॥
असें सखीचें वचन । ऐकून बोले नृपनंदन ।
मी अमर नोहें जाण । असें राजन्य भूतळींचा ॥९२॥
सोमवंशी राजा शत्रुजित । त्याचा असे मी सुत ।
ऋतुध्वज नामें ख्यात । पितृभक्त असें मी ॥९३॥
गालवयज्ञरक्षणार्थ । मजला योजी तात ।
येऊनी मुनीच्या आश्रमांत । वेधिला दैत्य वराहरूपी ॥९४॥
तो न मरतां पळाला । म्यां पाठलाग केला ।
तों या दरींत घुसला । मी आलों त्याला शोधावया ॥९५॥
त्या मारावा म्हणून । ऋषीचें असे आज्ञापन ।
येथें तुमचें झालें दर्शन । सर्व कळोन येईल आतां ॥९६॥
कुंडला म्हणे ऐक तूं । श्रेष्ठ बंधू पातालकेतू ।
कनिष्ठ बंधू तालकेतू । लोकदु:खहेतु दोघे दैत्य ॥९७॥
ते येथें वास करिती । आज ते घेऊन भीती ।
पाताळीं लपले असती । ते तुझ्या हातीं येतील ॥९८॥
एक असे विनंती । हे कन्या पवित्र निश्चिती ।
इला धरावी हातीं । तुझी कीर्ती वाढवील ही ॥९९॥
हे गंधर्वाची कन्या । आहे ही योगिमान्या ।
इच्या समान न मिळे अन्या । ही होईल धन्या तुम्ही वरितां ॥१००॥
क्षत म्हणजे दु:ख । त्या वारूनी रक्षी लोक ।
म्हणूनी क्षत्रिय नाम चोख । तुम्हां लोक देतात ॥१०१॥
तेव्हां इचें दु:ख वारितां । सार्थकता होईल क्षत्रता ।
रक्षावें शरणागता । तुमचा हा मुख्य धर्म ॥१०२॥
तुम्ही मर्त्य असतां । देवकन्या तुम्हां मिळतां ।
जगीं येईल श्लाघ्यता । तेव्हां आतां वरा इला ॥१०३॥
हा सिंहाचा भाग जाणावा । हा कोल्ह्यानें न पळवावा ।
तरीच होईल वाहवा । हें चित्तीं ठेवा यथार्थ ॥१०४॥
इला हें असें दु:ख झालें । तें सर्व तुम्हां निवेदिलें ।
ही धरिते तुमचीं पाउलें । आतां अव्हेरिलें न पाहिजे ॥१०५॥
मी इची सोय करून । माझा मार्ग धरून ।
पुन: हिमाचळीं जाऊन । तप करीन निश्चित ॥१०६॥
जरी तुम्ही न वराल । तरी तो मिथ्या जाईल ।
कामधेनूचा बोल । मग ही सोडील प्राणातें ॥१०७॥
यत्नें देह टाकील । दैत्याधीन न होईल ।
हा इचा निश्चय निश्चल । पुरे बोल आतां हा ॥१०८॥
असी कुंडला होऊन दीन । म्हणे इला न्या वरून ।
दैवें तुम्हां हें दिल्हें दान । म्हणून चरण धरी त्याचे ॥१०९॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये पंचविंशोsध्याय: ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP