मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय २३ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २३ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम:  ॥
गुरु म्हणे शिष्या सावधान । ऐके रेणुकाख्यान ।
राम आकाशवाणी ऐकून । कावड उतरून पाहतसे ॥१॥
तुलसी उदुंबराश्वत्थ । पलाश बिल्व शमी वट ।
यांहीं आश्रम घनदाट । फलपुष्पलतावेष्टित जो ॥२॥
तंव तेहतें आश्रमांत । देखिला एक अवधूत ।
तेज:पुंज मूर्तिमंत । वाटे साक्षात् अग्नी कीं ॥३॥
जटाजूट विराजमान । आजानुबाहु कमलनयन ।
प्रफुल्ल कमळसें दिसे वदन । वाटे सदन तें लक्ष्मीचें ॥४॥
ज्याचा गळा शंखापरी । छाती दिसे कपाटासरी ।
भोंवर्‍याप्रमाणें नाभीवरी । भक्तकैवारी श्रीदत्त जो ॥५॥
राम तया पाहून । अत्याश्चर्या पावून ।
तंव पुढें येवून । देखे मंडन अद्भुतसें ॥६॥
मांडीवरी स्त्रीरत्न । दिसतसे विराजमान ।
जिच्या नखाग्रावरून । अप्सरा कुर्वंडूनी टाकाव्या ॥७॥
जिचें मुख पाहून । लाजे तो मृगलांछन ।
जिचे  नेत्र देखून । मृगीगण चमकती ॥८॥
अधर बिंबा लाजविती । दांत हिरे चमकती ।
पाहुनी तिच्या नासिकेप्रती । शुक लपती लाजोनी ॥९॥
कंठें शंख लाजविला । स्तनीं गजघटांचा गर्व हरिला ।
गंभिरावर्ता तुच्छ केला । नाभिमंडळें जियेच्या ॥१०॥
जिची कटी पाहून । सिंह जाती लाजोन ।
जिचें देखून गमन  । गजाचें मन थक्क झालें ॥११॥
जिच्या कराग्रा पाहोनी । पल्लव जाती वाळूनी ।
जीच्या नितंबा पाहूनी । गौरव सांडूनी दे पर्वत ॥१२॥
वाटे कोटी कंदर्प गाळून । ओंतिलें कीं हें स्त्रीरत्न ।
वाटे पहिलेंच हें पूर्ण । सृष्टिमंडन विधात्याचें ॥१३॥
रोमरोमीं वसे कीं रवी । असीं तिची भासे छबी ।
मेघमंडळीं बिजली जेवी । तेवी देवी दत्तांकीं दिसे ॥१४॥
असी ललना अंकीं घेऊन । प्रेमें देई चुंबन ।
कंठी मिठी घालून । दृढ आलिंगन देतसे ॥१५॥
परस्पर हावभाव । दाविताती अभिनव ।
जेथें नाहीं भिन्नभाव । द्वैता वाव तेथें कैंचा ॥१६॥
असा हा मायेचा थाट । पाहतांही जो होईं धीट ।
मनीं मानेल वीट । तोची नीट जाई धामा ॥१७॥
असी होतां त्यांची क्रीडा ।  तव राम आला पुढा ।
त्याची न धरितां व्रीडा । राहे नागडा पुढें दत्त ॥१८॥
राम पुढें येऊन । साष्टांग नमन करून ।
दोनी हात जोडून । नम्र होवूनी बोलतसे ॥१९॥
माझा पिता पावला मरण । माता करिते सहगमन ।
आपण आचार्य होऊन । विधी सांगून द्यावा जी ॥२०॥
जमदग्नी माझा पिता । रेणुका माझी माता ।
माझें राम नाम तत्वता । आपण जाणतां सर्व हें ॥२१॥
माता कान्यकुब्जदेशांतून । करावया आली सहगमन ।
आकाशवचनेंकरून । आपलें दर्शन घडलें हें ॥२२॥
दत्त म्हणे मी नेणें विधी । अथवा ठावा नसे उपाधी ।
मी अस्पृश्य अभाष्य आधीं । न शिवें कधीं धर्मातें ॥२३॥
असें ऐकतां उत्तर । राम झाला निरुत्तर ।
तथापी बोले धीर । तूं योगेश्वर जगत्प्रभू ॥२४॥
तूं कर्ता हर्ता अनंत । सदानंद गुणातीत ।
धर्माधर्माची मात । तुजपाशीं ती वसेल कीं ॥२५॥
दत्त म्हणे तूं शहाणा । परी तुझा हा दिसे मूर्खपणा ।
नेणसी अपवित्राच्या ह्या खुणा । गुणावगुणा नेणसी कीं ॥२६॥
मी अबलासक्त अस्पृश्य । धर्माधर्मातीत अभाष्य ।
असें पराधीन अवश्य । पश्य पश्य योगें मे ॥२७॥
असें ऐकतां वचन । निवांत राहिला भृगुनंदन ।
मग तुलास्थ रेणुका ते परिसून  । बोले वंदून श्रीदत्ता ॥२८॥
म्हणें हें तुमचें वचन । गोड लागे अमृताहून ।
हे नारिकेलफलासमान । फोडून करीन विशद हें ॥२९॥
तीनी गुणां वाव जेथ । विधी निषेध राहती तेथ ।
तेथेंच सरसरती शास्त्रग्रंथ । नाना पंथ दावूनी ॥३०॥
तुह्मीं स्वयें असंग । अबलेशीं न घडे तुमचा संग ।
अबला म्हणजे माया चांग । शशशृंगतुल्य ती ॥३१॥
तुह्मीं तीन गुणातीत । नित्य उपाधीनिर्मुक्त ।
तीनी देही साक्षीभूत । पिंडीं ब्रह्मांडीं ख्यात तुह्मी ॥३२॥
शब्दस्पर्शादि विषय । होती इंद्रियाला ग्राह्य ।
तुम्ही तरी अविषय । अस्पृश्य अभाष्य सत्य हें ॥३३॥
जो मायागुणा मोहून । अध्यासानें घे अभिमान ।
त्याला धर्माधर्मनिरूपण । करी जाण श्रुति हे ॥३४॥
तुम्ही तरी वशमाय । तुह्मां अभिमान केवि होय ।
धर्म आधर्मरूपद्वय । दूर होय तुह्मांपासूनी ॥३५॥
तुह्मी स्वतंत्र ईश्वर । कार्य कारण करण पर ।
परि हा एक थोर । दिसे चमत्कार खरोखर ॥३६॥
स्वयें असूनी स्वाधीन । भक्तीनें भुकेजून ।
होतसां भक्तपराधीनं । वश्यपण सोडूनी ॥३७॥
भक्तकाजी जे दिसत । ते तुमचें रूप कल्पित ।
कल्पितानें देतां अकल्पित । तेव्हां अस्पृश्य अभाष्य हें सत्य ॥३८॥
जरी तुमच्या प्राप्तीला । वेद शाब्द प्रमाण बोलिला ।
तरी परोक्षपणें भला । त्या बोला मानित्यें ॥३९॥
श्रवणाचें जें मनन । त्याचें जें निदिध्यासन ।
त्याणें साक्षात्कार पूर्ण । होई आवरण भंगूनी ॥४०॥
तेव्हां अस्पृश्य अभाष्य । या शब्दाचें असेंची भाष्य ।
जें वर्तमान भूत भविष्य । त्याला अविषय रूप तुमचें ॥४१॥
तुम्हीं स्वसंवेद्य । स्वयंप्रकाश अभ्येद्य ।
कारणत्वें सर्ववंद्य । सर्व आद्य परब्रह्म ॥४२॥
असें रेणुकेचें वचन । श्रीदत्तानें ऐकून ।
प्रेमें हास्य करून । तिचें स्तवन आरंभिलें ॥४३॥
माते तूं विश्वाकारा । प्रणवरूपिणी परावरा ।
जो हा दिसतो पसारा । सारा हा तूंच होसी ॥४४॥
आदिमाया तूंचि होसी । ब्रह्मा विष्णु शिव रूपें घेसी ।
उत्पत्ति स्थिती संहार करिसी । परी अससी अलिप्त ॥४५॥
तूं एक असोनी । भाससी अनेक रूपांनीं ।
तुला नेणती अज्ञानी । चिद्रूपें सर्व व्यापितांही ॥४६॥
हें नाम रूपात्मक । तुझें दृश्य रूप एक ।
दुसरें अलक्ष्य रूप सच्चित्सुख । अज्ञ लोक केवी जाणें ॥४७॥
देहोंद्रिय मन: प्राण । बुद्धि अहंकार याहून ।
साक्षित्वें तूं विलक्षण । चिद्रूपत्वें अससी ॥४८॥
साक्षित्वही म्हणजे गौण । मुळींच साक्ष्य आहे म्हणे कोण ।
साक्ष्य नसतां साक्षिपण । कोण कसें सिद्ध करी ॥४९॥
ह्मणोनियां निराधारा । तुला ह्मणती एकवीरा ।
अध्यासन्यायें तूं सर्वाधारा । सर्वांतरा तूं एक ॥५०॥
असो आतां हे स्तुती । तुझा पती महामती ।
ज्याला मुनी वंदिती । ज्याची ख्याती त्रिभुवनीं ॥५१॥
नाम घेतां जयाचें । मन भिये काळाचें ।
काय वासाणूं वाचें । तयाचें तप तें ॥५२॥
अशा समर्थ मुनीसीं । मृत्यू कवणेपरी ग्रासी ।
याच्या मृत्यूसी । कारण काय घडलें वद ॥५३॥
असें वचन ऐकून । रेणुका धरी मौन ।
राम पुढें होऊन । म्हणे क्षत्रियांनीं मारिला ॥५४॥
अकस्मात आश्रमीं येवूनी । नसतां घाला घालूनी ।
बलात्कारें क्षत्रियांनीं । मुनीचें शिर तोडिलें ॥५५॥
असें रामाचें वचन । ऐकतां अत्रिनंदन ।
कोपायमान होऊन । शापवचन बोलत ॥५६॥
ह्मणे ब्रह्मद्वेषी हे क्षत्रिय । भूमिवरी करिती अपाय ।
यांचा होवो कुळक्षय । विशेष समय न लागतां ॥५७॥
मृग मीन ब्राह्मण । तृण जळ संतोष सेवून ।
राहतां लुब्धक धीवर दुर्जन । निष्कारण छळिती ॥५८॥
ब्राह्मणाची संतोषवृत्ति । धनमदें नृप मत्त होती ।
पापाची गणती न करिती । त्याला मृती शीघ्र येवो ॥५९॥
असें ऐकून शापवचन । रेणुकेनें खुणाविला नंदन ।
मग राम हात जोडून । नि:शंक होऊन बोलतसे ॥६०॥
राम म्हणे मी आश्रमीं येऊन । ऐकून पितृहनन ।
दु:खावेशें शापवचन । बोलिलों अवधारण करा तें ॥६१॥
एकवीस वेळ फिरून । करीन क्षत्रियांचे दळण ।
पांच रक्तडोह करून । पितृतर्पण करीन मी ॥६२॥
तेव्हांच मी होईन । पितृऋणापासूनी उत्तीर्ण ।
हें माझें शापवचन । भवच्चरण सिद्ध करतील ॥६३॥
श्रीदत्त म्हणे रामास । जी तूं प्रतिज्ञा केली खास ।
ती यथार्थ आम्हांस । मानिली खास निर्धारें ॥६४॥
तूं माझ्या तेजें होशी प्रबळ । संहारिसील क्षत्रियकुळ ।
जिंकिसील भूमंडळ । बहुकाळ न लागतां ॥६५॥
राम म्हणे अर्जुन । गेला आमुची धेनू घेऊन ।
त्याशीं मी युद्ध करून । केलें हनन तयाचें ॥६६॥
त्याचेच पुत्र येवून । सवें क्षत्रिय घेऊन ।
त्याचें केलें कंदन । कोपावेशें अविचारें ॥६७॥
अर्जुन हा ब्रह्मण्य । आपुला शिष्य वरेण्य ।
पुण्यश्लोक अग्रगण्य । महापुण्य योगनिष्ठ ॥६८॥
त्याचें केलें हनन । घडला अपराध मजकडून ।
याचें असावें क्षमापन । म्हणोनी चरण धरिले हे ॥६९॥
श्रीदत्त म्हणे रामासी । तसाची वर म्यां दिधला तयासी ।
निमित्तमात्र तूं झालासी । अपराध तुजपासीं नाहीं हा ॥७०॥
ही मनीं नको खंती । तूं साक्षात् मद्विभूती ।
तूं माझा सखा निश्चिती । करि क्षिती नि:क्षत्रिय ॥७१॥
राम म्हणे गुरू दत्ता । आतां विलंब न करावा सर्वथा ।
पितृसंस्कारा करितां । आचार्य आतां तुम्ही व्हा ॥७२॥
श्रीदत्त तथास्तु म्हणूनी । तिळ दर्भादिक घेवूनी ।
तयां ठेवूनी स्मशानीं । काष्ठें शेणी जमविलीं ॥७३॥
दत्त म्हणे रामा तूं समर्थ । बाण मारूनी सर्व तीर्थ ।
आणि येथें मातृस्नानार्थ । लोकहितार्थ होती जेणें ॥७॥
मग रामें बाण सोडून । भूमंडळ फोडून ।
पाताळापर्यंत जावून । सर्व तीर्थें आणिलीं ॥७५॥
श्रीदत्ताच्या आज्ञेनें । प्रथम स्नान केलें रामानें ।
तदनंतर मातेनें । यथाविधी स्नान केलें ॥७६॥
श्रीदत्त संकल्प सांगती । माता रेणुका स्नान करी ती  ।
मग त्या तीर्थाची झाली ख्याती । मातृतीर्थ म्हणती लोकांत ॥७७॥
मग प्रायश्चित्त करवून । त्रेताग्नी सिद्ध करून ।
करविती प्रेताधान । यथाविधान त्या वेळीं ॥७८॥
पीतांबर नेसून । सर्वाभरणें लेवून ।
हळदी कुंकुम लावून । माता सहगमना सिद्ध झाली ॥७९॥
डोळां काजळ भरून । भांगीं सिंदूर घालून ।
सूर्या नमस्कार करून । अग्निकुंडीं पातली ॥८०॥
देव विमानीं बैसोनी । आपल्या स्त्रिया घेवूनी ।
वेगें पातले तत्क्षणीं । सहगमन पहावया ॥८१॥
रेणुका जातां सती । तेथें उर्वशी अप्सरा येती ।
ओंट्या घेवूनी मुनीच्या सती । तेथें येती प्रेमानें ॥८२॥
सप्त ऋषि प्रमुख मुनी । येती स्त्रियांसी घेऊनी ।
रेणुकेशी विलोकूनी । सर्व मुनी आनंदती ॥८३॥
मग ऋषीच्या सती । रेणुकेसी वंदिती ।
हळदी कुंकुमें देती । ओट्या भरती प्रेमानें ॥८४॥
संकल्प करुनी रेणुकेनें । दंपतींस दिधलीं वाणें ।
सर्वा गौरविलें प्रसन्नमनें । धन वस्त्र भूषणें देऊनी ॥८५॥
श्रीदत्ताचार्या पूजून । अग्नीसी प्रदक्षिणा करून ।
म्हणे रामा ऐक वचन । दत्ताधीन राहे तूं ॥८६॥
गोब्राह्मणांचें करी पालन । प्रतिज्ञा सत्य करून ।
कश्यपा देई भूमिदान । चिरंजीव सुखी हो ॥८७॥
आम्हां आली बोळवणी । पतीसह जातें स्वस्थानीं ॥
दु:ख नको करूं मनीं । विवेक करूनी सुखी रहा ॥८८॥
दत्तात्रेया म्हणे माता । राम हा तुमचा आतां ॥
हात ठेवूनी त्याच्या माथां । करा याचा प्रतिपाळ ॥८९॥
असी रेणुका बोलून । श्रीदत्तातें वंदून ।
अग्नीसी प्रदक्षिणा करून । अग्निप्रवेश करी ती ॥९०॥
रमणी जैशा उत्सुक मनीं । जाती रतिसुखभुवनीं ।
तसी मनीं प्रसन्न होऊनी । रेणुका वन्हिप्रवेश करी ॥९१॥
पतिस्वरूप चिंतूनी । एकजीव एकमन होउनी ।
अग्निमाजी पतिशयनीं । राहे नंदिनी रेणूची ॥९२॥
देव ऋषी मुनीश्वर । करती जयजयकार ।
पुष्पें वर्षती सुरवर । वाद्यगजर करूनी ॥९३॥
सतीस्पर्शे अग्नि प्रकाशे । सहस्रसूर्यांपरी दिसे ।
दिड्मंडळ सतीच्या यशें । भासे श्वेतसें लोकांना ॥९४॥
रेणुका ही पतिव्रता । सहगमनीं पतीसवें चालतां ।
एक एक पाउलें अश्वमेधसुकृता । जोडी माता धन्य ती ॥९५॥
एका एका रोमाप्रती । पतिसह ऋषिमंडळी ती ।
कोटी कोटी वर्षें वस्ती । संपादिती झाली धर्में ॥९६॥
साडेतीन कोटी केश । धर्में दिधले अग्नीस ।
त्या पुण्याच्या संख्येस । जाण खास पार नाहीं ॥९७॥
मुनिपत्नी म्हणती हे माता । धन्य धन्य पतिव्रता ।
अंत नाहीं जिच्या सुकृता । इला असो नमस्कार ॥९८॥
एक आपुलें मातृकुळ । दुसरें तें पितृकुळ ।
तिसरें हें भर्तृकुळ । केलें विमल पावन इणें ॥९९॥
लक्षूनियां पतीतें । देह ओपिला अग्नीतें ।
परंधाम घेतलें तें । पुनरावृत्तीते न येईल ही ॥१००॥
असीच सर्व स्त्रियांप्रति । परमेश्वर देवो मती ।
पतीच स्त्रियांची गती । सर्वांची मती असीच होवो ॥१०१॥
जरी कां सतीचा पती । असेल पापी दुर्मती ।
तया घेउनी स्वर्गाप्रती । जाईल ती पतिव्रता ॥१०२॥
धिक्कार असो दुर्भगेला । जी तिनी कुळांला ।
पोंचवी अधोगतीला । यम तिला शिक्षा करी ॥१०३॥
सर्वपापप्राशमन । असें असे सहगमन ।
नाहीं याग यासमान । म्हणोनी नमन करिती त्या ॥१०४॥
सर्व जयजयकार करीत । जाती रेणुकेसी चिंतीत ।
रामाप्रती म्हणे दत्त । माता तुझी धन्य हे ॥१०५॥
असें म्हणतां तत्क्षण । आठवून मातेचे गुण ।
राम करी रुदन । देह टाकून धरणीवरी ॥१०६॥
दत्त म्हणे तयासी । जी पावली सद्गतीसी ।
व्यर्थ तिचा शोक करिसी । मोहित होसी कां व्यर्थ ॥१०७॥
ऐकून श्रीदत्तवचन । विवेकधैर्यें मन सांवरून ।
बोले दत्ताप्रती शोकसोडून । क्रियाचरण करावें आतां ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये त्रयोविंशोध्याय: ॥२३॥
श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP