मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय २२ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २२ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे दीपकासी । रामें वधिलें रायासी ।
हें तयाच्या पुत्रांसी । कळतां त्यांसी दु:ख झालें ॥१॥
पुत्र म्हणती हाय हाय । हा ईश्वर कोपला काय ।
जो नित्य प्रतापसूर्य । तो अस्तमय झाला कसा ॥२॥
ज्याचा त्रिभुवनीं दरारा । जो दंडी सुरासुरां ।
काळाच्याही शरीरा । कंप ये थरथरा यत्स्मरणें ॥३॥
तो ऋषीच्या पोराचे करीं । कसा पडला धरणीवरी ।
हा भ्रम झाला कीं ये अवसरीं । किंवा स्वप्नांतरीं पाहिलें हें ॥४॥
खद्योतें सूर्य झांकळला । किंवा जंबूके ऐरावत गिळिला ।
किंवा गायंडोळे शेष गिळिला । कीं मेरू पाडिला मूषकें ॥५॥
कीं बिवडानें करूनी फडा । बळें झडपिलें गरुडा ।
किंवा बाळकें मारूनी खडा । उडविलें चंद्रमंडळ ॥६॥
हें कदाचित् घडेल । परी त्याहूनी मुष्कील ।
तें घडलें हा बोल । सत्य मानवेल कीं आम्हां  ॥७॥
असा शोक करून । सर्व पुत्र जमून ।
रणस्थानीं येऊन । पितृशव पाहून गहिंवरती ॥८॥
नानापरी शोक करिती । बापाचे गुण आठविती ।
सर्वही मूर्छित होती । शोकें विसरती देहभान ॥९॥
असा शोक करून । बोलती प्रतिज्ञावचन ।
पितृहंत्यासी मारून । टाकूं तेव्हां ऋणमुक्ती ॥१०॥
अशी प्रतिज्ञा करून । पितृदेहा नेऊन ।
यथाविधी संस्कारून । और्ध्वदेहिक करिते झाले ॥११॥
रामाचा शोध घेती । चहूंकडे धुंडती ।
तंव आश्रमाप्रती । राम आला हें कळलें ॥१२॥
सवें सैन्य घेऊन । अर्जुनाचे नंदन ।
जमदन्याश्रमा येऊन । वेढा देऊन राहिले ॥१३॥
तत्पूर्वीं बांधवासहित । राम गेला वनांत ।
तंव पश्चात् आश्रमांत । अर्जुनसुत प्रवेशले ॥१४॥
इकडे तिकडे फिरती । रामातें धुंडिती ।
येऊनी यज्ञशाळेप्रती । तेथें देखती मुनीतें ॥१५॥
जेवीं गाय देखूनी यवन । येती धांव घेऊन ।
तयांपरी ते दुर्जन । जाऊन धरिती मुनीतें ॥१६॥
अंतकाळीं यमदूत । तसे दिसती अर्जुनसुत ।
रेणुका होऊनी भयाभीत । म्हणे हे घात करितील कीं ॥१७॥
व्याघ्र धरी धेनूस । तसे ते धरती मुनीस ।
रेणुका पावूनी त्रास । प्रार्थी तयांस दीनपणें ॥१८॥
ऐका ऐका हो कारुणिक । कां करितां पातक ।
मनीं धारा विवेक । उभय लोक मिळतील ॥१९॥
तुम्ही दाते जाणून । मागतें पदर पसरून ।
मला द्यावें सौभाग्यदान । करा सन्मान आमुचा ॥२०॥
मी तुमची बहीण । तुम्हां घालतें आण ।
पतिप्राणरक्षण । तुम्ही करा आतां ॥२१॥
तुम्ही धनीक श्रीमंत । आम्ही तुमचे आश्रित  ।
एवढें दान मागत । पतिप्राण वांचवा ॥२२॥
माझा दूर करा दर । पसरितें मी पदर ।
सौभाग्यदान द्या सादर । न करा अनादर माझा ॥२३॥
पुत्रापराधाकरितां । जरी तुम्ही कोप करितां ।
तरी एकदां आतां । प्रसन्नता होऊं द्या ॥२४॥
असें नानापरी । रेणुका प्रार्थी जरी ।
ते दुर्बुद्धि वैरी । अंतरीं न द्रवती ॥२५॥
दीनवाणी होऊनी । बोले जमदग्नि मुनी ।
माझा आशीर्वाद घेऊनी । संतोषोनी मागें चला ॥२६॥
तुम्ही ऐका माझ्या बोला । स्वीकारूनी शांतीला ।
सुखें मागें चला । कुला राखा आपुल्या ॥२७॥
ब्रह्महत्यादोष । हा असे विशेष ।
जाळील कुल नि:शेष । तुम्हां रोष टाका तुम्ही ॥२८॥
आम्ही गुरु तुम्हांस । तुम्ही शिष्य खास ।
तरी अशा हिंसेस । शिवूं नका सर्वथा ॥२९॥
मुनी असा नानापरी । तयां उपदेश करी ।
दुर्मती ते वैरी । अंतरीं न धरिती ॥३०॥
करीं घेऊनी तरवारी । माराया उठतां वैरी ।
रेणुका मान पुढें करी । म्हणे आधीं मला मारा ॥३१॥
वांचवा पतिप्राण । किंवा आधीं तोडा माझी मान ।
असी रेणुका वदून । आक्रंदोन पडली ॥३२॥
जरी अशा गोष्टी । ऐकत असतां खाटी  ।
तरी द्रवूनी पोटीं । पाठी सरता ॥३३॥
त्याहूनी हे पामर । न द्रवती निष्ठुर ।
तिला झुगारूनी दूर । मुनीचें शिर छेदती ॥३४॥
(  पद ) हाय हाय हाय काय हा अपाय ये ॥
ह्या प्रंसंगिं कां न तनय नयविधेय ये ॥ध्रु०॥३५॥
भूपतनय त्यजुनि विनय अनय हा असा ।
करिति अदयहृदय काय प्रळय हा असा ।
येत नसे ओरडतसे मी बळें भयें ॥३६॥
रामा रामा रामा म्हणतां राम येईना ।
राम आजि लाज माझि कांहो राखिना ।
काय करूं काय धरूं धीर त्याविना ।
हरि हरि हे मारिती हे ह्यां दया न ये ॥३७॥
(  ओवी ) येणें परी ती सती । आक्रंदे करूनी खंती ।
तें मनीं न आणिती । नृपतीचे पुत्र दुष्ट ॥३८॥
पापा न भीतां ते वीर । तोडिती मुनीचें शिर  ।
पुरा जाती सत्वर । महाक्रूर पापिष्ठ ॥३९॥
म्हणती राम राहे लपोन । पुन: उद्यां येऊन ।
घेऊं रामाचा प्राण । ऋणमुक्त व्हावया ॥४०॥
असें म्हणोन दुष्ट ते । मनीं मानूनी आनंदातें ।
कृतार्थ मानूनी आपणांतें । नगरातें पातले ॥४१॥
इकडे रेणुका करी विलाप । म्हणे माझें कैचें पाप ।
उदेलें जें देई ताप । नाहीं माप जयाला ॥४२॥
हाय हाय मी करूं काय । म्हणूनी आपटे पाय  ।
उरा शिरावरी घाय । देई माय रामाची ॥४३॥
ऐकोनि तिचा शोक । तेथें आले तापस लोक ।
नानापरी सांगती विवेक । न शमे शोक तियेचा ॥४४॥
देती लोक आश्वासन । तरी तिचें खिन्न मन ।
म्हणे मी झालें दीन । अजूनी नंदन कां न ये ॥४५॥
रामा तूं अंतरलासी । हा संधी लाधला शत्रूंसी ।
त्वां यावें त्वरेंसी । कैची वांचूं सांग आतां ॥४६॥
शून्य झालें हें सदन । एकादां दावी तूं वदन ।
मी तुला अवलोकून । प्राण सोडूनी जाते रे ॥४७॥
दुष्टें सौभाग्य लुटलें । माझें कपाळ फुटलें ।
दैवें विपरीत केलें । गेलें माझें जीवन ॥४८॥
आतां कांसया वांचावें । कोणी विरहदु:ख अनुभवावें ।
म्यां पतीमागें न राहावें । सवें जावें हा निर्धार ॥४९॥
रामा ये रे ये त्वरें । किती बाहूं तुज बरें ।
माझें आयुष्य सरे । अंतीं गोजिरें रूप दावी ॥५०॥
मार्गीं वाट पाहे पती । आतां प्राण न राहती ।
यास्तव भेट देई अंतीं । विलापे ती सती असी ॥५१॥
इकडे राम वनीं । अपशकुन पाहूनी ।
भयभीत होवूनी । धरी मनीं नाना तर्क ॥५२॥
म्हणे हे मृग कां उलट जाती । ह्या दिशा धुंद दिसती ।
भालू कां हे पुढती । भुंकोन येती कां कळेना ॥५३॥
छिद्र दिसे सूर्यमंडळा । धडकी भरे काम ये वेळा ।
निमित्तावांचोनियां गळा । कां वाळला कळेना ॥५४॥
डावा भुज आणि नयन । कां पावतो स्फुरण ।
याचें काय कारण । दु:ख दारुण येईल वाटे ॥५५॥
असा विचार करून । मनीं खिन्न होऊन ।
परशू करीं धरून । त्वरा करून परतला ॥५६॥
राम वनांतून । त्वरें आश्रमीं येऊन ।
सर्व अनर्थ ऐकून । होऊनी दीन शोक करी ॥५७॥
राम म्हणे हा हा ताता । आम्हां वनीं टाकूनी आतां ।
कोठें गेलास नाथा । आम्हां अनाथां कां सोदिशी ॥५८॥
हा हा ताता मन्निमित्त । हा झाला तुझा घात ।
मी केवळ तुझा अहित । नोहे सुत निश्चयें ॥५९॥
आठवूनी मुनीचे गुण । रामा शोक होय दारुण ।
म्हणे आतां माझें कोण । बापा रक्षण करील ॥६०॥
गेला माझा आधार । आतां न धरवे धीर ।
म्हणूनी राम शरीर । भूमीवर टाकी तो ॥६१॥
अश्रुनें भरले डोळे । गडबडा धरेवरी लोळे ।
म्हणे आतां ये वेळे । तोंड काळें झालें हें ॥६२॥
मनीं अतिशय घाबरे । पितृशोक नावरे ।
म्हणे मरण येतां बरे । तरीच नुरे लोकापवाद ॥६३॥
असा शोक करूनी । मग नेत्र पुसोनी ।
म्हणे शत्रुपुरा जावूनी । तया मारूनी येईन ॥६४॥
त्याला जरी मारीन । तरी पितृऋणापासून ।
खास मी मुक्त होईन । अन्यथा पडेन नरकांत ॥६५॥
असें बोलून भृगुनंदन । हातीं परशु घेऊन ।
करावया शत्रूचें कदन । बाहेर निघोन चालला ॥६६॥
तसा त्याला पाहूनी । बंधू आणि जननी ।
निवारिती तयालागुनी । तें कानीं मनीं न घे तो ॥६७॥
राम धावें त्वरेनें । ब्रह्मांड गाजवी हाकेनें ।
इकडे तिकडे नेत्रानें । न पाहे जोरानें चालतां ॥६८॥
मनोवेगें करून । माहिष्मतीस येऊन ।
शत्रूंला बोलावून । म्हणे रण करा आतां ॥६९॥
मी नसतां आश्रमांत । तुम्ही येऊनी केला घात ।
व्यर्थ मारिला माझा तात । काय यांत मिळविलें ॥७०॥
तुमच्या पितयासी । म्यां मारिलें बळेंसी ।
जरी सूड घेणें तुम्हांसी । मजसीं युद्ध कां न केलें ॥७१॥
निरपराधी महामुनी । त्याचा वध करूनी ।
चोरापरी पळूनी । आलेंत म्हणूनी मी आलों ॥७२॥
जें बळ घेऊनी । तुम्ही वधिला मुनी ।
तें बळ पुढें करूनी । मजसीं रण करा आतां ॥७३॥
असें कठोर बोलून । हातीं परशू धरून ।
तो कोपें भृगुनंदन । करी कंदन शत्रूचें ॥७४॥
कित्येकांचे हात तोडी । कित्येकांचे डोळे फोडी ।
कित्येकांचीं पोटें फाडी । कित्येकां पाडी भूमीवर ॥७५॥
असा करून समर । सैन्याचा करून चूर ।
अर्जुनाचे सर्व पोर । शिर छेदूनी मारिले ॥७६॥
तटबंदी फोडून । राजवाडे मोडून ।
ध्वज पताका मोडून । टाकी झोकून रक्षकां ॥७७॥
सर्व वीरां मारून । पुर शून्य करून ।
पुन: मागें फिरून । निजसदना पातला ॥७८॥
राम सांगे मातेसी । ह्मणे ज्यांनीं पितयासी ।
मारिलें तयां दुष्टांसी । यमसदनासी धाडिलें ॥७९॥
सर्व बळ मारिलें । शत्रूंचें पुर फोडिलें ।
अजुनी मन न धालें । क्षत्रकुळ राहिलें म्हणूनी ॥८०॥
असें म्हणूनी त्या अवसरीं । तो राम प्रतिज्ञा करी ।
कोणाचें वचन कानावरी । न धरी क्रोधें व्याप्त जो ॥८१॥
ह्मणे एकवीस वेळ । फिरोनी हें भूमंडळ ।
नि:क्षत्रिय करीन सकळ । निजबळयोगानें ॥८२॥
क्षत्रियां निर्बीज करून । त्यांचे शोणितेंकरून ।
पांच तळीं भरून । तेथें तर्पण करीन मी ॥८३॥
तेव्हां पितृऋणापासून । मी मुक्त होईन ।
अशी प्रतिज्ञा करून । राम गर्जून बोलला ॥८४॥
ती प्रतिज्ञा ऐकून । रेणुका बोले वचन ।
साधु साधु तूं नंदन । बोलिलें वचन सत्य करी ॥८५॥
भर्तृमार्ग लक्षून । मी करूनी सहगमन ।
परलोकीं जाईन । हा धर्म जाण आमुचा ॥८६॥
सहगमन झालियावरी । अंत्येष्टी क्रिया करी ।
मग क्षत्रियांतें संहारी । सत्य करी प्रतिज्ञा तूं ॥८७॥
अर्जुन हा दत्तभक्त । त्याचा त्वां केला घात ।
जरी कोपेल श्रीदत्त । तुझा अंत करील ॥८८॥
तो असे महाबळ । त्यापुढें कोण जाईल ।
तो असे भक्तवत्सल । ऐक बोल माझा तूं ॥८९॥
श्रीदत्ताचा प्रसाद । झाल्याविना तुझा छंद ।
न पुरेल हा निर्विवाद । अर्थवाद नव्हे हा ॥९०॥
तरी मी युक्ती करून । रामा तुला करवीन ।
श्रीदत्ताचें दर्शन । पुरुषार्थसाधन देईन जें ॥९१॥
श्रीदत्तप्रसादेंकरून । तुला दत्ताचे पदरीं घालीन ।
मी करीन सहगमन । मग तूं वचन सत्य करी ॥९२॥
असें अंगिकारशील । तरी विघ्न न येईल ।
ना तरी फसशील । बालबुद्धी करूनी ॥९३॥
होतां प्रसाद दत्ताचा । गळा तोडशील काळाचा ।
मग ह्या निर्बळांचा । क्षत्रियांचा काय पाड ॥९४॥
त्वां कावड करूनी । एकीकडे मुनिदेह ठेवूनी ।
दुसरीकडे मला ठेवूनी । ती कावड घेउनी जाई तूं ॥९५॥
असें आह्मां घेऊनी । दक्षिणमार्ग लक्षूनी ।
जेथें ऐकसी आकाशध्वनी । तेथें उतरोनी क्रिया करी ॥९६॥
तेथें योगनिष्ठ ब्राह्मण । योग्य आचार्य मिळोन ।
यथासांग सहगमन । घडेल माझें निश्चयें  ॥९७॥
असें वचन ऐकून । राम तें मान्य करून ।
एक कावड करून । ठेवी तयां सादरें ॥९८॥
पितृशव तैलद्रोणींत । तो ठेवी एका पारड्यांत ।
दुसरेकडे बैसवीत । रेणुकेतें राम तो ॥९९॥
ती कावड उचलोन । खांद्यावरी घेऊन ।
कान्यकुब्ज देशांतून । चाले दक्षिण दिशेसी ॥१००॥
पाहूनी नानास्थानें । नानातीर्थें आयतनें ।
तापसाश्रम नानारण्यें । नानातीर्थें पाहे तो ॥१०१॥
धर्मज्ञ तो पितृभक्त । पितृवचनीं आसक्त ।
उल्लंघूनी अनेक पर्वत । सह्याचलीं पातला ॥१०२॥
तो तेथें अकस्मात । आकाशवाणी गर्जत ।
भो रामा त्वां येथ । पितृसंस्कार करावा ॥१०३॥
योग्य आचार्य मिळेल । इष्ट कार्य साधेल ।
तुज जय मिळेल । पूर्ण होईल मनोरथ ॥१०४॥
अशी आकाशवाणी । रामें ते ऐकूनी ।
म्हणे माते त्वां कानीं। ही ऐकिली असेल ॥१०५॥
तरी आतां येथें उतरून । तुझ्या वाक्याप्रमाणें करून ।
करितों जसें आज्ञापन । नाहीं अनुमान मच्चित्तीं ॥१०६॥
असें रामें बोलतां । रेणुका म्हणे तूं आतां ।
आम्हां उतरोनी खालतां । ब्रह्मनिष्ठा पाही बा ॥१०७॥
मग राम आश्रमासन्निधान । ती कावडी उतरोन ।
आश्रमीं तापस पाहून । परमानंद पावला ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये द्वाविंशोध्याय: ॥२२॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP