मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार|
कुटुंबस्वामीची भयंकर सत्ता, गुलामगिरी, विक्रय

कुटुंबस्वामीची भयंकर सत्ता, गुलामगिरी, विक्रय

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


समाज कोणत्याही देशातला असो; त्यामध्ये सामान्यत: हेच उत्कान्तितत्त्व सर्वत्र आढळून येते. या तत्त्वाप्रमाणे एकदा कुटुंब बनले, की त्या कुटुंबाचे स्वामित्व ज्या पुरुषाकडे असेल, त्याच्या ताब्यात कुटुंबातील इतर प्रत्येक व्यक्तीने वागले पाहिजे, एवढेच नव्हे, तर लढायांमध्ये कैद केलेल्या अगर विकत घेतलेल्या गुलामांची जी योग्यता, तिजहून आपली निराळी योग्यता आहे असे कुटुंबाधिपतीस कोणीही केव्हाच वाटू देता उपयोगी नाही. कुटुंबाधिपती स्वत: राजकुळाचा ताबेदार खरा, तथापि कुटुंबातल्या कुटुंबात पाहिजे ती व्यवस्था करण्यास त्याचा तो पूर्णपणे मुखत्यार असतो. त्याने मन मानेल तसे स्वच्छंदी व क्रूरपणाचे वर्तन केले, फ़ार तर काय, प्रसंगी कुटुंबातल्या कोणाही व्यक्तीचा अगर आपल्या ताब्यातील दासदासींचा प्राणनाशही त्याने केला, तरीदेखील राजेलोक त्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष देत नाहीत, व घडलेला अनर्थाचा प्रकारही न्यायाचा मानितात.
लग्नाची बायको, पोटचे मुले, कुटुंबात राहणारी पाठची भावंडे अगर इतर माणसे कोणीही असोत, त्यांजवर रुष्ट होऊन कुटुंबाच्या मालकाने कसाही जुलुमाचा हुकूम केला तरी त्या हुकुमाचा अंमल तत्काळ होतो, व त्याबद्दल पुढे कोठेही दाद लागत नाही. त्रिशंकू राजास ( याचे मूळचे नाव सत्यव्रत असून तो सूर्यवंशीय क्षत्रिय होता. ) त्याच्या पित्याने ‘ तू जातीने चांडाळ हो ’ म्हटल्याबरोबर त्याला खरोखरी चांडाल स्थितीत जाऊन पडावे लागले, ही गोष्ट देवीभागवत स्कंध ७, व वाल्मिकिरामायण बालकांड येथे वर्णिली आहे. विश्वामित्राच्या पन्नास पुत्रांनी त्याची आज्ञा अमान्य केल्यामुळे त्यांनाही कायमचे चांडाल बनावे लागले. ही कथा ऐतरेय ब्राह्मणात अमान्य केल्यामुळे त्यांनाही कायमचे चांडाल बनावे लागेल. ही कथा ऐतरेय ब्राह्मणात व श्रीमद्भागवत स्कंध ११ येथे वर्णिली आहे. जमदग्नीने आपला पुत्र परशुराम यास प्रत्यक्ष मातेचा वध करण्याविषयी आज्ञा केली होती, व ती परशुरामास मान्य करावी लागली, ही गोष्ट सर्वत्र प्रसिद्धच आहे.
या प्रत्येक उदाहरणावरून प्राचीन काळी पितृसत्ता केवढी मोठी मानण्यात येत असे याचे अनुमान कोणासही सहज करिता येईल. या सत्तेचे स्वरूप पर्यायाने सांगावयाचे झाल्यास कुटुंबाचा मालक हा काय तो एकटा धनी, व बाकीची सर्व माणसे त्याचे दास अगर दासी असत. हरिश्चंद्र राजाने आपणास स्त्रीपुत्रांसह विकले होते; धर्मराजाने प्रत्यक्ष आपली स्त्री द्रौपदी पणास लाविली होती; मृच्छकटिकातील नायिका वसंतसेना हिला अलंकार देऊन तिच्या मदनिका नावाच्या दासीस दास्यातून सोडविण्याकरिता शर्विलक नावाचा एक गृहस्थ आला होता ( अंक ४ ); दुष्यंत राजाने शकुंतलेचा धिक्कार व त्याग केला, तेव्हा ती आपल्या पित्याच्या शिष्यांबरोबर परत जाऊ लागली, परंतु शिष्याने तिचा निषेध करून ‘ पतिगृहे तव दास्यमपि क्षमं ’ म्हणजे ‘ नवर्‍याच्या घरी तुला बटीकपणा करावा लागला तरी चिंता नाही, ’ इत्यादी प्रकारे बोलून तिला पतिगृहीच सोडले ( अ. शा. अं. ५ ); इत्यादी उदाहरनांवरून प्राचीन काळी गुलामगिरीची चाल आपल्या लोकांत होती, हे स्पष्टच आहे.
तथापि कुटुंबाच्या मालकाला आपल्या दासदासींचा अगर स्त्रीपुत्रांचा जीव घेण्यापर्यंतची सत्ता कशावरून होती असा कोणी प्रश्न करील, तर त्याने अजीगर्त व शुन:शेफ़ यांची कथा ऐतरेय ब्राह्मणात व महाभारतान्तर्गत अनुशासनवर्गात ( अ० ३ ), अगर देवीभागवत स्कंध ७ ( अ० १४ ते १७ ) येथे वर्णिली आहे ती पाहावी. या कथेत हरिश्चंद्रराजाच्या घरी यज्ञ व्हावयाचा असून त्यात प्रत्यक्ष त्याचाच पुत्र रोहित यास मारावयाचे होते; परंतु तसे करण्याचा राजाचा धीर झाला नाही. सबब अजीगर्त नावाच्या ब्राह्मणापासून त्याचा पुत्र राजपुत्राच्या ऐवजी बळी देण्याकरिता विकत घेतला होता, व त्यास मारण्यास शामिता उपऋत्विज ( = यज्ञात पशू मारण्याचे कम करणारा ब्राह्मण ) धजेना, तेव्हा प्रत्यक्ष अजीगरतानेच ही काम पत्करले इत्यादी स्पष्ट वर्णन केले आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP