मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|
विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार

विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


वरील कलमात लिहिलेल्या दोन्ही गोष्टींची इष्टता सिद्ध होण्यास उभयता वधूवरांची वयोमाने चांगली मोठी असून मनेही विद्येने चांगली सुसंस्कृत असली पाहिजेत हे स्पष्टच आहे. आजच्या स्थितीत दोन्ही गोष्टींत दोघांचेही पाऊल पडावे तितके पुढे पडलेले नाही, यामुळे तूर्त काही दिवस तरी सध्याचाच मार्ग चालू राहणे केवळ अपरिहार्य होय. अशा वेळी स्वत: मातापितरे अगर पालकवर्ग विचारी असतील, तर त्यांनी विवाह्य वरास अथवा वधूस केवळच स्वातंत्य न दिले, व त्यांचे मनोदय समजून घेऊन नंतर सारासार विचाराने स्वत:च्या हेतूप्रमाणे वर्तन केले, तरी ते गैर म्हणता येणार नाही. परंतु अशी मातापितरादी मंडळीदेखील सांप्रतच्या स्थितीत प्राय: दुर्मिलच आहे. कसेही असो, पुरुषवर्ग आणि स्त्रीवर्ग यांबद्दल निरनिराळा विचार करू गेल्या स्त्रियांपेक्षा पुरुषांस विवाहस्वातंत्र्य अधिक लवकर मिळू शकेल यात संशय नाही.
पुरुषांची लग्ने लौकर होतात ती केवळ आईबाप इत्यादिकांच्या नुसत्या हौसेखातर होतात. याहून वस्तुत: त्यात निराळा अर्थ असत नाही. परंतु स्त्रियांचा प्रकार याहून निराळा आहे. त्याचे मुळाशी धर्मशास्त्राने घालून दिलेल्या नियमांमुळे उत्पन्न झालेली अडचण असून त्या अडचणीचे प्रस्थही रूढीमुळे फ़ारच वाढले आहे. या रूढीचे अतिक्रमण केले असता पित्यास पातक लागते असे शास्त्रकारांनी सांगितले असल्याने जनसमुदाय त्याला भितो हे साहजिकच आहे. तथापि त्यातल्या तात समाधानाची गोष्ट आहे ती ही की, पित्याकडून रूढीचे अतिक्रमण झाले असता होणार्‍या पातकची निष्कृती थोड्याशा प्रायश्चित्ताने होण्यासारखी असल्याचे त्या शास्त्रकारांनीच सांगून ठेविले आहे. असा ज्या अर्थी प्रकार आहे, त्या अर्थी शास्त्रदृष्टीचा हा पातकदोष काही काळपर्यंत पत्करण्याचे धैर्य कन्यापित्याच्या अंगी पाहिजे, व तेवढे तो दाखवील तर अखेर शास्त्राची मर्यादा कायम राहून वरील कलमात सांगितलेला हेतू पार पडण्यास तितक्या अंशाने आपोआप साधन होण्याजोगे आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP