मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
स्वभावपरीक्षा

स्वभावपरीक्षा

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


नुसती कुलपरीक्षा पुरी नाही, स्वभावपरीक्षाही झाली पाहिजे; यांची ‘ जाती तशी पुती, ब खाण तशी माती ’ अशी मराठीत म्हण प्रसिद्ध आहे; तीस अनुसरून विचार करू गेल्यास कुलपरीक्षा चांगली झाली असता तदनुरूप स्वभावाचे परीक्षा झालीच असे साधारणत: मानण्यास हरकत नाही. निबंधग्रंथांतून “ कुलानुरूपा: प्रजा: संभवंति ” हे हारीतवचन लिहिले आहे, त्याचे तात्पर्य तरी हेच आहे. परंतु या नियमासही अपवादाची अशी उदाहरणे केव्हा केव्हा दृष्टीस पडतात, व याकरिता नुसत्या कुलपरीक्षेवरच सर्वस्वी भिस्त न ठेविता स्वभावाची म्हणून निराळी परीक्षा करणे हे चांगले यात संशय नाही. पुराणादी ग्रंथांतून कुलाचे गुण एक प्रकारचे, व संततीचे गुण त्याहून निराळ्या प्रकारचे अशी अनेक उदाहरणे लिहिलेली आढळतात. सूर्यापोटी शनैश्वर, हे चांगल्या गुणाच्या पित्यापासून वाईट संतती झाल्याचे पौराणिक उदाहरण प्रसिद्ध आहे. तसेच हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हाद, अथवा वालीनामक वानरराजाच्या पोटी अंगदासारखा, रामभक्त पुत्र, ही उदाहरणे उलट्या प्रकाराची दर्श्क आहेत. म्हणजे पिता वाईट चालीचा असूनही त्यापासून सद्गुणी संतती झाली हे सांगण्याचे या उदाहरणांचे तात्पर्य आहे.
केव्हा केव्हा चांगल्या अगर वाईट गुणांच्या मातापितरांच्या पोटी चांगल्या गुणाची व वाईट गुणाची अशी उभयविध संतती झाल्याचीही उदाहरणे जगात अनुभवास येतात. पुलस्त्यऋषी चांगला सदाचारसंपन्न ब्राह्मण असता त्याजपासून रावण व कुंभकर्ण ही वाईट गुणांची, व बिभीषण आणि कुबेर ही चांगल्या गुणांची संतती झाली; त्याचप्रमाणे हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र महान राज्यलोभी व अन्यायी असून त्याच्या शंभर पुत्रांपैकी दुर्योधन, दु:शासन इत्यादी नव्याण्णव पुत्र त्याच्या गुणांचे, व विकर्ण नावाचा एकच पुत्र मात्र राज्यतृष्णाहीन व न्यायाने वागणारा; याप्रमाणे स्थिती असल्याची उदाहरने अनुक्रमे रामायण व महाभारत या ग्रंथांत वर्णिली आहेत. अशी उदाहरणे वेदग्रंथांतही कोठे कोठे आढळून येतात. विश्वामित्रऋषीस शंभर पुत्र होते, त्यांपैकी पन्नासांनी पित्याची आज्ञा पाळिली, व इतरांनी तिचे उल्लंघन केले व त्या योगे ते चांडाळ झाले, इत्यादी वर्णन ऐतरेय ब्राह्मणात केले आहे हे प्रसिद्धच आहे. अस्तु !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP