प्राचीन काळची स्थिती

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


वर ' कल्पान्तरी स्त्रियांची मुंज, व तिजबद्दल ग्रंथस्थ पुरावा ' येथे पराशरमाधव ग्रंथातील संस्कृत उतारा घेतला आहे, त्याचा विचार करिता स्त्रियांच्या उपनयनासंबंधाने व त्यांनी ऐच्छिक आजन्म अविवाहित राहण्यासंबंधाने ही समजूत पूर्वीच्या कल्पकाळी होती हे यमस्मृती, हारीतस्मृती व महाभारत या ग्रंथांवरून अगदी स्पष्ट आहे. तसेच त्यांनी वेदाध्ययन करावे, प्रसंगी दुसर्‍यास वेदही शिकवावा; त्यांना गायत्रीमंत्राचा अधिकार आहे; त्यांनी ब्रह्मचर्यनत खुशाल पाळावे; अग्नीची सेवा त्या आश्रमात अनुरूप अशी करावी; व यदाकदाचित विवाह करण्याचे त्यांनी मनात आणिले, तर पूर्वी उपनयन झाले असल्याशिवाय त्यांनी विवाहदीक्षा घेऊ नये, हे नियम हारीतस्मृतिकारास संमत होते हेही उघड आहे. यमस्मृतिकाराने स्त्रियांना वेदविद्या शिकवावयाची ती बाप, चुलता किंवा भाऊ यांनीच शिकवावी, इतरांनी शिकवू नये, असा विशेष नियम सांगितला आहे. उपनयनोत्तर स्त्रियांनी साङ्ग वेदाध्ययन करावयाचे म्हटले असता, स्त्रियांना वयोमानाने प्रौढ दशा यावयाचीच, तेव्हा या दृष्टीने पाहू जाता यमस्मृतिकाराने लिहिलेला हा नियम अयोग्य होता असेच केवळ म्हणता येणार नाही. तथापि प्रौढ स्त्रियांना पढविण्याचे काम वृद्ध ब्रह्मवादिनींनी करावयाचे म्हटल्यासही चालण्यासारखे होते; व उपनिषदग्रंथातील कित्येक संवादांवरून अशा संस्था पूर्वकाळी असाव्या असेही पण मानण्यास कारणे नाहीत असे नाही.
कसेही असो; आत्रेयी नावाची ब्रह्मवादिनी वाल्मीकी ऋषीच्या आश्रमात होती, व काही विशेष कारणाने तिच्या वेदाध्ययनास तेथे व्यत्यय येऊ लागला, तेव्हा ती तो आश्रम सोडून जनस्थानात अगस्त्यऋषीच्या आश्रमी वेदाध्ययन करण्याच्या हेतूने गेली, ही कथा भवभूतीने उत्तररामचरित नाटकात वर्णिली आहे. या कथेवरून स्त्रियांनी नातलगांशिवाय इतरांपासून वेदविद्या शिकू नये असा सार्वत्रिक नियम पूर्वकाळी होता असे वाटत नाही. स्त्री ब्रह्मचारिणी झाली असता ती अलीकडच्या गोसाविणी बायांप्रमाणे दिसत असेल असे कदाचित कोणाच्या मनात येईल; परंतु पूर्वकल्पातील ऋषिवर्य स्त्रियांसंबंधाने इतके निष्ठुर झाले नव्हते. पुरुष ब्रह्मचर्यव्रत पाळीत असता त्याने अंगावर कृष्णाजिन घ्यावे, वल्कलपरिधान करावे, व मस्तकावरील केशांच्या जटा वळाव्या, असा नियम असे; परंतु या नियमाचा अंमल त्यांनी स्त्रीयांवर केला नव्हता. अर्थात साधी वेणीफ़णी, साडी, चोळी, इत्यादिकांची स्त्रियांस मुभा असे, असे मानण्यास कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय नाही.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP