मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ६९

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६९

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


धन्य सत्पुरुषांची स्थिति । तीर्थ क्षेत्रां पावन करिती । तयांचे दोष मळ क्षाळिती । समागमें आपुल्या ॥८१४॥
ते साक्षात परब्रह्मरूप । तीर्थे जड जळरूप । त्यांचिये संगति चैतन्यरूप । तयांमाजी संचरे ॥८१५॥
पातकी जन तीर्थी स्नान । करूनि तीर्थासी करिती मलिन । तो मळ प्रक्षाळावया कारण । तीर्थयात्रा संताची ॥८१६॥
संताचें झालिया दर्शन । तिहीं जळीं करितां निमज्जन । तीर्थे म्हणति आम्ही पावन । होऊं संगति तयांच्या ॥८१७॥
यालागीं प्रार्थिती । तीर्थयात्रे याहो म्हणति । शुध्द करा आम्हांप्रति । समागमें आपुल्या ॥८१८॥
आणिकही एक असे । सत्पुरुष जेथें वसे । ते स्थानचि ये तीर्थदशे । ऐसी योग्यता तयांची ॥८१९॥
ते जेथें वस्ती करिती । तेथील भूमीवरील माती । वंद्य म्हणोनि भाळीं लाविती । येर सकळ सामान्य जन ॥८२०॥
ते उदकीं जियें न्हाती । स्नान संध्यादि कर्में करिती । तेथील उदक भरोनि नेती । घरोघरीं आपुल्या ॥८२१॥
तयाचें वसतिस्थान । तेंच तीर्थक्षेत्र मानुन । यात्रे येती अवघे जन । पुनीत व्हावयाकारणें ॥८२२॥
त्या आवारीं वावरतां । तेथील वायुचा स्पर्श होतां । दुर्बुध्दि लोपोनि निश्चता । पुण्यसंस्कार उमटती ॥८२३॥
यालागीं तीर्थाचें तार्थाकरण । करू शकती आपण । कर्मासीही सुकर्मपण । कैसें आणिति तें ऐका ॥८२४॥
सत्पुरुष ज्यापरि वर्तति । तोचि धर्म मानुनि निश्चिति । सामान्य जन आचरण करिती ।स्वयें नेणुनि आपण ॥८२५॥
जनता तरी बुध्दिहीन । धर्माधर्म जाणे कोण । पुण्यपापाचें संशोधन । कदापि करूं न शकति ॥८२६॥
थोर पुरुष जें करिति । अथवा करावें म्हणोनि सांगति । तेणेंचि परि वागों लागति । फलही पावति तैसेचि ॥८२७॥
सर्व कर्माचें शुध्दिकरण । संत करूं शकती आपण । आचाराचें करून स्थापन । धर्माधर्म निवडिती ॥८२८॥
ते बोलति अथवा दाविति । तेचि सत्य म्हणोनि मानिति । संशय सांडोनि विश्वास ठेविती ।
हा अधिकार संतांचा ॥८२९॥
धर्मस्थापनेंचे कार्य । अथवा शुध्द आचाराचा निर्णय । सत्पुरुषांवांचून अन्य । कोण करूं शकेल ॥८३०॥
सत्पुरुषांचे शुध्द मनीं । ईश्वरप्रेरणा करोनि । आज्ञापितसे तयालागुनि । धर्मसंस्था रक्षणार्थ ॥८३१॥
मग देशकालानुसार । ते स्थापिति योग्य आचार । सर्वांसी मानूं लागे सत्वर । ऐसी योग्यता तयांची ॥८३२॥
येर सामान्य लौकिक जन । म्हणति धर्म स्थापूं आपण । तरी तें मान्य करील कोण । हसूं होय तयांचें ॥८३३॥
म्हणोनि ईश्वरावतारी संत । तयाचे आज्ञें कार्य करीत । तैचिं तें म्हणों ये प्रशस्थ । मान्य होय सकळांसी ॥८३४॥
तैसेचिं शास्त्रप्रामाण्य़ । स्थापणार तेचि धन्य । स्वयें शास्त्रशुध्द वर्तन । करून जना उपदेशिति ॥८३५॥
शास्त्रावरी दृढ विश्वास । असावा ऐसें जगदीश । सांगूनि गेले अर्जुनास । गीतेमाजी विख्यात ॥८३६॥
परी दिसों येतो अनादर । वाढों लागे अनाचार । तो घालवावया तत्पर । सत्पुरुष सर्वकाळ ॥८३७॥
ते तरी आचरोनि दाविती । सत्यता पटवोनि देती । स्वयें आपण तरले निश्चिति । सोदाहरण प्रत्यक्ष ॥८३८॥
शास्त्र न कळे जगासी । संतवचनीं विश्वासेंसी । निर्धार ठेवोनि आपणासी । कृत्यकृत्य मानिति ॥८३९॥
म्हणोनि शास्त्रांसीही मान्यता । सत्पुषवचनें ये तत्वतां । शास्त्रांसी सच्छास्त्रता । तयांचेनि लाभे संपूर्ण ॥८४०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP