मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ५६

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५६

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


गौणी भक्तिचेही प्रकार । आतां निरूपिति साचार । ते श्रवण करा सादर । आत्महिताकारणें ॥५७८॥
गौणी म्हणावयासी कारण । गुणसंबधें वर्ते जाण । सहेतुकपणा दावून । अज्ञान मूल वाढवी ॥५७९॥
मूळ अज्ञानासी छेदक । ते मुख्य भक्ति एक । सहेतुक आणि भेदप्रवर्तक । त्रिविधा गौणी म्हणितलीं ॥५८०॥
उपजे गुणांचिया मेळे । म्हणोनि गौणी म्हणितले । सत्व रज तम प्रकार झाले । स्वाभाविकपणें तियेचे ॥५८१॥
आर्त जिज्ञासू अर्थार्थीं । हेही प्रकार आहेति । सविस्तरपणें निरूपिजति । ते प्रसंगें अवधारा ॥५८२॥
एथ भक्ति बोलिली सामान्य । ईश्वराकडे धावें मन । आपलें इष्ट हेतूचें साधन । तेंचि कारण तियेसी ॥५८३॥
आसुरी प्रकृति तमोगुण । ज्ञानाचें तेथ पडलें शून्य । इतरांचा घातपात करून । सुख भोगूं पाहाति ॥५८४॥
ऐसें चार जार दरोडेखोर । त्यांच्या सुखासी पडतां अंतर । ईश्वरावरी घालिती भार । अघोर तप साधनें ॥५८५॥
मंत्र यंत्र विधानें । अमंगल करिती अनुष्ठानें । मद्यमांसादि अर्पण करणें । घात करणें जीवांचा ॥५८६॥
भूत प्रेत पिशाच्चसाधन । विपरीत सर्व करणी करून । मेळवूं पाहती सुख संपूर्ण । ऐसी भक्ति तयांची ॥५८७॥
परि तेचिं त्यांसी होय बाधक । दुष्टकर्माचा होऊन परिपाक । भोगवी अंधतम नरक । प्रलयकालपर्यंत ॥५८८॥
आतां राजसांची भक्ति । विषयभोगावरी आसक्ति । भोगार्थ ईश्वराराधना करिती । तेही पडती अपायीं ॥५८९॥
भोगार्थ सकाम अनुष्ठान । क्वचित फलरूपही होय जाण । परि ते केवळ तुषकाडंण । कांहीं हातां नये तेथ ॥५९०॥
विषयभोग तो क्षणिक । भोगतांचि वाढे भूक । भोग भोगिल्याही आराणुक । नव्हे समाधान कल्पांतीं ॥५९१॥
जन्मवरी विषय भोगिले । परि ते अतृप्तचि होऊनि राहिले । छायेपुढा धावों लागले । तैसें झालें तयांसी ॥५९२॥
ईश्वर सकरुण दयाधन । मनोरथही पुरवी जाण । परि त्याची योग्यता जाणून । याचना केली पाहिजे ॥५९३॥
राजा प्रसन्न झाला । आणि तमाखूसी चुना मागितला । तरी तो काय न दे वाहिला । अज्ञानाची करी कींव ॥५९४॥
म्हणे कोण्या एका निमित्तें । मजकडे याचें लक्ष लागतें । म्हणोनि पुरवी इच्छेतें । परि तें अमान्य तयासी ॥५९५॥
क्षणिक भोग सुखासाठीं । ईश्वरासी पडे तुटी । हे काय म्हणवि भक्ति गोमटी । परीं हें न कळे तयासी ॥५९६॥
आतां सात्विक हे भक्ति । तेथ अंतरीं द्वैत भ्रांति । आपणाहून देव निश्चिती । वेगळेपणें देखती ॥५९७॥
अंतरीं भेदाची कल्पना । तेचि प्रतिबंधक होय जाणा । करितांही नाना उपासना । भेद राहिला कायम ॥५९८॥
ईश्वर सर्वाचे अंतरीं । भरोनि राहिला बाहेरी । त्यासी कदापि न होतां दुरी । काय करणें तें करावे ॥५९९॥
भेद धरिलिया ऐसें होईल । जवळीचा दूर जाईल । भावनेमुळे अंतर पडेल । नये कशानें सांधितां ॥६००॥
अंतर राखूनि भक्त करणें । हे शुध्द भक्ति मी न म्हणें । जवळी असोनि त्या विसरणें । तेंचि मूळ अज्ञान ॥६०१॥
त्यांची भक्ति जरी थोर । तरी भेदें भरलें अंतर । कर्मठ उपासक ज्ञानी साचार । परी नाडिले अज्ञानें ॥६०२॥
अज्ञान कायम राहिलें । म्हणोनि गौणी ऐसें म्हणितलें । जवळीं जाऊन दूर राहिले । प्रकृतिगुणें आपल्या ॥६०३॥
नाभीमाजी कस्तुरी । परि मृग हिंडे वनांतरीं । तैसीच त्यांसी झाली परी । आपआपणा नेणता ॥६०४॥
मार्जार नासिकेस लागलें घृत । तें तयासी कळों न येत । सर्व पदार्थामाजी धुंडित । हिंडे वास तयाचा ॥६०५॥
तैसी जाणा सात्विक भक्ति । आपणांसीचि जे नेणती । अज्ञान गेलिया निश्चिति । पूर्ण पदासी पाववी ॥६०६॥
आत्तां आर्त जिज्ञासू अर्थार्थी । यांची ही ओळखण व्हावयाप्रति । प्रथम अर्थार्थीं याची स्थिति ।
बोलों सम्यक अवधारा ॥६०७॥
कांही एक मनीं इच्छा धरून । आपुले उपायीं कुंठीत होऊन । मार्ग सांपडाया लागून । लागे ईश्वरभजनासी ॥६०८॥
म्हणें हें कार्य साधेलातरीच । देव खरा म्हणों येईल । माझे मनोरथ पुरवील । तरीच समर्थ म्हणावा ॥६०९॥
ईश्वर प्रसन्न झाला । मनोरथ सिध्दि गेला । मनीं थोर आनंद पावला । लाचावला सेवेसी ॥६१०॥
पुन्हां काहीं प्रसंग पडला । देवाकडे धावोनि गेला । तोही मनींचा नवस पुरला । दृढावला भक्तिभावें ॥६११॥
ऐसा दिवसेंदिवस प्रत्यय । येवों लागतां होय निश्चय । ईश्वरसेवेचें सर्व कार्य । करूं लागे विश्वासें ॥६१२॥
क्वचित एखादिये प्रसंगी । जरी अपयश आलें भागी । तरी तेणें न डगमगीं । म्हणे चूक आपली ॥६१३॥
ईश्वराचरी नाहीं बोल । माझी भावना जरी झाली विफल । तरी तो दीनदयाघन केवळ । निजभक्तांचा आधारू ॥६१४॥
माझेचि काहीं असेल चुकलें । म्हणोनि कृपेसी अंतर पडलें । त्यावरी कोप करणें भलें । नव्हें पूर्ण विचारितां ॥६१५॥
जो सर्वकाळ मज रक्षी । तो कैसेनि मज उपेक्षी । उपेक्षिलियाही सर्व पक्षीं । तयांतचि हित माझें ॥६१६॥
ऐसा अर्थार्थी जो भक्त । तो ईश्वरभजनीं सदा रत । सहेतुकपणें आचरत । भक्तिमार्ग निष्टंक ॥६१७॥
परी ऐसें होत जातां । कांही मागणें नुरे तत्वतां । ईश्वरकृपा कृतज्ञता । पूर्ण अंगीं बाणली ॥६१८॥
म्हणे अदृश्यपणें राहून । सकल मनोरथ पुरवून । कृपा करी मजवरी पूर्ण । कोण तो मियां जाणावा ॥६१९॥
त्याचें ज्ञान झाल्याविण । नव्हे आतां समाधान । तो जगदीश दिसो मजलागोन । आस लागली तयाची ॥६२०॥
ऐसिया अवस्थे पातला । तो जिज्ञासू म्हणवितां भला । ज्ञानार्थ जो लाचावला । ईश्वरभक्ति करीतसे ॥६२१॥
जिज्ञासा थोर वाढली । परी भोगेच्छा नाहीं सुटली । ऐसीं जन्मजन्मांतरें गेली । तळमळ करीत राहिला ॥६२२॥
तयाचा होता परिपाक । कवणे तरी जन्मीं एक । वैराग्य पूर्ण बाणे देख । आन काहीं सुचेना ॥६२३॥
अहर्निश तेंचि ध्यान । तेंचि चिंतन आणि मनन । अवस्था लागोनि राहिली पूर्ण । भेटीलागीं देवाच्या ॥६२४॥
प्रारब्ध भोगोनि सारावें । क्रियमाण ईश्वरीं अर्पावें । चिंतने चिंतने निष्क्रिय व्हावें । आपण न करावें कांहिचि ॥६२५॥
सर्व कर्ता जगदीश्वर । त्यानें निर्मिलें चराचर । त्याचें स्मरणीं तत्पर । सदा होऊन रहावें ॥६२६॥
संचित जें वासनात्मक । तेंही हारपलें । नि:शेख । ईश्वरावांचून कांही एक । न व्हावें ऐसें जाहालें ॥६२७॥
त्यावाचून न रुचे कांही । डोळ्यांपुढे न दिसे काहीं । देहेद्रियांचे व्यापार पाहीं । तन्मयपणें हारपले ॥६२८॥
ऐसीये दशे पातला । तोचि आर्त म्हणतां भला । परी जोंवरी संशय नाहीं फिटला । तोंवरी तो अलिकडे ॥६२९॥
परी भक्तांमाजी परमश्रेष्ठ । सर्वाहून जाणावा वरिष्ठ । भक्तिभावें अति निकट । ईश्वराजवळीं पातला ॥६३०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP