पृथ्वीखंड सावळा

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


मायमराठीच्या बाळपणापासून तुझ्या भक्तीनं भारलेल्या अशा असंख्य मराठी मनाच्या देवा, मी तुझ्याबद्दल आजवर खूप खूप ऐकलं होतं, पण परवा परवा मी तुझ्या नगरीला आले आणि तुझं दर्शन घेतलं तशी मीही भारावून गेले.
त्यामुळं तुझ्याकडे एकटक बघताना मी तुझ्या चरणाखालच्या विटेला विचारलं की, अग तू किती भाग्याची म्हणावीस कुंभाराच्या विटे ! माझ्या विठू दयाळाचे पाय तुला ग कुठं गवसले ?
पण तेवढ्यात काय गंमत झाली की, तुझ्या भांगतुर्‍याला लक्ष मोती गुंफ़ीत असलेली रखुमाई तिथं आली. त्या कारणानं विटेचं उत्तर तिथंच रेंगाळलं, न् मी रखुमाईच्या दर्शनानं दिपून गेले. तिच्या अंगावरचे रत्नजडित अलंकार, हिरकणीची चोळी, पायघोळ जरीपातळ, नाकातील सर्ज्याची नथ, इंद्रसभेच्या सोनारांनी घडण केलेला तिचा सौभाग्य चुडा, आणिक काय काय असं बघून मी भांबावूनच गेले. इतक्यात तुझ्या हाती जाईचा झुंबडा देऊन तिनं तुझं पागोटं, अंगरखा, उपरणं हे सारं अंगावरून उतरलं न् हाती टाळवीणा दिला. म्हणाली की, “ हरीनामाचा कल्लोळ झालाय तर तुम्ही पुढं व्हावं. वाखुर्‍या वड्यावरी दिंड्यापताकांचे जरी रुमाल भुईवर लोलताहेत तर आपण कथेसाठी वेळेला हजर रहावं. ” आनि देवा, तिचं ऐकून तू निघालास. रिंगण खेळायची ईर्षा मनी बाळगलीस. त्यासरशी मी तुम्हा दोघांच्यावरून माझी काया ओवाळीत लिंबलोण केलं ! गरुडखांबाला टेकून बसले आणि म्हटलं बघत रहावं काय काय होईल ते.
आणि देवा, हे काय तुझं कीर्तनाला जाणं झालं का ? उभ्या राउळात तुझ्या नावाचा केवढा बोभाटा झालेला न् तुझा पत्ताही कळू नये ! शोधायचं तरी किती माणसानं ? विसाव्यापासून दंडवत घालीत आलेल्या लोकांनी घाटाच्या पायर्‍या चढीत तुझ्या भेटीची अपेक्षा केली. पण कळलं की, तू जनीच्या मंदिरात उभा होतास म्हणून ! चांगलं आहे.
इतक्यात झणत्कार झाला. उभं राऊळ इकडे तिकडे बघू लागलं. आसं आलं तरी कोण ? आणि सांगायचं म्हणजे ज्ञानदेव आले म्हणून तू स्वत: अवचितच तिथं उभा ! जसा काय एखाद्या लखलखत्या चांदणीला तुझं हिर्‍यासारखं रूप बघून भ्रम पडावा असं मला तरी वाटलं हं तुला बघून ! शप्पथ !
इकडे लोकांनी कापराच्या न् हळदकुंकवाच्या पायघड्या घालून तुझी वाट पाहायचा बेत केलेला. तुझ्या रथात बसून यायची कल्पना मनी घोकलेली आणि सूर्यबाण देवाप्रमाणं तुझ्या पंक्तीची ओढ धरलेली. लोकांची म्हणजे ही झुम्मड उडालेली न् घाईगर्दीनं द्रौपदी तुझी वारंवार दृष्ट काढतेली ! त्यासरशी मग सगळ्याच जनलोकांनी आपल्या देहाचा देहपाट करून आणि बुद्धीच्या वाती लावून तुला आपल्या पंचप्राणांची आरती केली ! आणि अंगठीवरील खड्याप्रमाणं असलेली पंढरी नगरी वाजंत्रीतुर्‍यांनी दणाणून गेली. साधुसंतांचा घनदाट मेळा बसला.
इतक्यात कुणीतरी तुझी लेकबाळ महाद्वाराशी आली. तिनं नामदेवाच्या पायरीला नमस्कार घातला. त्यासरशी देवा, रुक्मिणीआईसकट तू तिला सामोरं गेलास ! आम्ही ऐकलेलं की, ज्ञानराजाला आपण सामोरं गेला होता. चोखामेळ्याला जाऊन भेटला होतात. पण हा चमत्कार आता आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला ! तुमचं सावळं रूप पृथ्वीखंडाचं कसं त्याचा आता क्षणभर उलगडा झाला !! खरंच, देवा, आषाढी कार्तिकीचा महिमा दाउल्यावर व गरुडावर चढून भक्तांच्या वाटेकडे कसा डोळे लावून बसत असशील त्याची जराशी तरी कल्पना आम्हांला आता येऊ शकली ! म्हणताना आपल्या हिरव्या मंदिलावरील ताज्या तुर्‍यावर मी मनोभावे अक्षता टाकल्या. आणि मग तुळशीमंजिरींची माळ गुंफ़ीत तिथंच घटकाभर टेकले.
पण तेवढ्यात एका बाईनं तुला दोन्ही नेत्र उघडून आपल्या काळजाचा ठाव घेत आपलं मन मोकळ करायला तू विश्वासाचा धनी हो म्हटलं. त्यासरशी देवा, आपलं सोन्याचं जानवं सावरीत तुझ्या शेजारी तिला तू गुजाला बसवून घेतलीस. त्या कारणानं तिनं आपल्या गुजाचा उल्हासानं झाडा केला. संगं आणलेली खिचडी तुला निवदाला दाखवली. आणि अवचितच राउळात पाचशी मृदंग न्  नऊशे टाळ वाजले ! त्यासरशी तू आपल्या रुंद भिवयांच्या मधी केशरी गंध लावलास. आणि टाळांच्या टोपणासारखे आपले देखणे डोळे उघडलेस. म्हणताना शेकडो हातांनी तुझ्या गळ्यात तुळशीमाळा घातल्या. हातात जाईजुईचे गजरे बांधले. जनाई आली नामदेव आले. साधुसंतांचा घनदाट मेळा जमला. आणि ज्ञानराजाला अभंग बोलायला सांगून तू स्वत: कीर्तनाला उभा राहिलास ! चंद्रभागेच्या तासात त्यासरशी एकच टाळी झाली आणि उभी पंढरी हरीनामाच्या गजरानं पावन झाली देवा ! त्या वेळी काय वाटलं कसं सांगावं राजा ? यदुनंदना, द्वारकाधीशा, केशीराजा, विठूदेवा, तुझ्या दर्शनानं मी धन्य झाले, आणि तुझ्या चरणी साता पडद्यात जिवापाड सांभाळून आणलेल्या भावभावनांच्या गोण्यांचे ढीग मी उपसले !


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP