संगीत विक्रमोर्वशीय - अंक पाचवा

सन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.


विदू : ( आनंदानें ) माझा मित्र नंदनवनादि रम्य अशा देवतांच्या वनांत उर्वशीसह नानाप्रकारचे विलास करून परत आला. सांप्रत तो प्रजाजनांची प्रीती व बहुमान संपादन करून राज्य करीत आहे. खरोखर त्याला एक पुत्ररत्नावांचून कोणतीच न्यूनता नाहीं. आज कांहीं विशेष पर्वणी होती, म्हणून तो राणीसहवर्तमान गंगायमुनेच्या संगमांत स्नान करण्याकरितां गेला होता; तिथून नुकताच आपल्या पटगृहांत परत आला. आतां त्याच्या अंगाला कोणी सुवासिक चंदनाच्या उट्या लावीत असतील, कोणी त्याच्या गळ्यांत पुष्पमाळा घालीत असतील, कोणी त्याच्या अंगावर अलंकार चढवीत असतील. तर आपणही याच वेळेस तिकडे गेलों, म्हणजे आपल्यालाही त्या गंधफ़ुलांपैकीं कांहीं भाग मिळेल.
( पडद्यांत )
अरेरे ! उर्वशीबाईसाहेबांच्या मस्तकावर घालायाचा मणि मी ताडपत्रावर ठेवून नेत असतां, मांसखंडाच्या भ्रांतीनं, हा गृध्रपक्षि झडप मारून घेऊन चालला !
विदू : ( ऐकून ) अरेरे ! हा तर मोठाच अनर्थ झाला ! कारण तो संगमनीय मणि माझ्या मित्राच्या फ़ार आवडीचा आहे. म्हणूनच हें ऐकतांच माझा मित्र अंगावर पुरते अलंकारसुद्धां न घालतां, आसनावरून उठून इकडे आला वाटतं. चला तर तिकडेच -
( गोंधळलेल्या परिजनांसह राजा येतो. )
राजा -

प्रबंध.
कोठें गृध्र तो चोर कोठें ॥ मृत्युमुखिं धांव जो घेउं थाटे ॥धृ०॥ प्रथम चौर्या करी ॥ रक्षकाच्या घरीं ॥ हेंचि त्याचें दिसे धार्ष्ट्य मोठें ॥१॥
किराती : ओ, ओ देखीये सरकार ! आकसमेसे चला है.
राजा : खरंच, त्या मण्याचं हेमसूत्र मुखांत धरून पहा कसा वर्तुलाकार फ़िरवीत चालला आहे ! काय करावं बरं आतां !
विदू० : ( जवळ जाऊन ) करायचं काय ! अपराध्याला दया दाखवून उपयोगी नाहीं, शासनच केलं पाहिजे.
राजा : बरोबर आहे. माझं धनुष्य ! धनुष्य आण. ( किराती जाते ) पण मित्रा, तो पक्षी कुठें दिसत नाहीं !
विदू० : अरे, तो बेटा प्रेतभक्षक, या दक्षिण दिशेनं उडून गेला. तरी त्याला शासन झालंच पाहिजे.
( किराती धनुष्य घेऊन येते )
किरा० : महाराज ! ये धनुखबान् --
राजा : आतां याचा काय उपयोग ? तो पक्षी बाणाच्या अवसानाबाहेर निघून गेला.

दिंडी.
धरुनि वदनीं पक्षि ज्या दूर नेई ॥ नभीं मणि तो शोभतो कसा पाही ॥ मेघखंडासंयुक्त निशीं जैसा ॥ दिसे मंगल तो हाहि दिसे तैसा ॥१॥

( कंचुकीस ) आर्या लासव्या !
कंचु० : आर्या लासव्या !
राजा : नगररक्षकाकडे जाऊन, त्याला आमची अशी आज्ञा सांग, कीं संध्याकाळीं सर्व पक्षी झाडांवर जाऊन बसले, म्हणजे त्या चोरट्या पक्ष्याचा शोध करावा.
कंचु० : आज्ञेप्रमाणं सांगतों महाराज. ( जातो )
विदू० : मित्रा, आतां खालेअएं बैस. तो चोर कुठंही गेला, तरी तुझ्या शिक्षेंतून सुटणार आहे कीं काय ?
राजा : ( बसून ) मित्रा,

साकी.
रत्न असे तें म्हणुनि न माझी प्रीति तयावरि जडली ॥ परि त्यायोगें प्रियरमणीची, पुनरपि संगति घडली ॥ कारण खेदाचें ॥ मित्रा हेंच होय साचें ॥१॥
विदू० : हें तूं पूर्वीच मला सांगितलं होतंस.
( इतक्यांत एक बाण व मणी घेऊन कंचुकी येतो )
कचु० : महाराजांचा विजय असो ! सरकार --

पद. ( उरला भेद न )
नलगे खेद आतां कांहीं ॥ वार्ता सुखकर परिसा ही ॥धृ०॥ जो बहु कोप तुम्हां आला ॥ त्याचा खरशर जणु झाला ॥ गगनीं गांठुनि विहगाला ॥ त्याचा देह भिन्न केला ॥ चाल ॥ अपराध्याला शासन लावुनि घेउनि तो मणि ही ॥ आला भूवरि लवलाही ॥१॥
( सर्व विस्मित होतात. )
कंचु० : महाराज, हा मणी स्वच्छ धुवून आणिला आहे. आज्ञा होईल त्याच्या स्वाधीन करीन.
राजा : किराती, तो अग्नींत घालून शुद्ध करून पेटींत ठेव. ( जोहोकम म्हणून जाते ) लातव्या, तो बाण कुणाचा रे ?
कंचु० : महाराज, या बाणावर बाण मारणाराचं नांव आहे, परंतु माझ्या दृष्टीला तीं अक्षरं स्पष्ट दिसत नाहींत.
राजा : आण इकडे. मी वाचतों. ( कुंचकी बाण देतो. राजा नांव वाचून आनंदित होतो. )
कंचु० : महाराज, आज्ञा असेल तर मी आपल्या कामाला - ( आज्ञा मिळून जातो )
विदू० : मित्रा, विचार कसला चालला आहे ?
राजा : हा बाण कुणाचा समजलास का ?

पद. ( वायुनंदन रदन करकर )
उर्वशी ही ज्यास माता ॥ ऐल सुत जो चपाधरिता ॥ आयु बालक शत्रुहंता ॥ असे खरतर बाण त्याचा हा ॥१॥
विदू० : ( आनंदानें ) वा: फ़ार चांगलं झालं ! तुझ्या वंशवृक्षाला हा अंकुरच फ़ुटला.
राजा : पण हें झालं कसं ? कारण नैमिषारण्यांत यज्ञ चालत होता, त्यावेळीं मात्र कायती उर्वशी माझ्याजवळ नव्हती. त्यानंतर तिचा व माझा वियोग कधीच झाला नाहीं. किंवा तिच्या गरोदरपणाचीं चिन्हंही मला दिसलीं नव्हतीं; मग प्रसूतीची वार्ता कुठून बरं ? परंतु इतकं मात्र झालं होतं खरं, कीं

पद. ( पूर्वी अधरोष्ठवरि तूझ्या: )
सखिच्या गौरकुचाचीं अग्रें, श्यामलसीं तीं झालीं होतीं ॥ द्राक्षफ़लासम पांडुरता ही, पाहिलि मी त्या वदनावरतीं ॥धृ०॥ जात्या चचंल परि दिन कांहीं, दृष्टी तिची बहु मंद दिले ती ॥ चिन्हें इतुकीं आतां मजला, पूर्णपणें कीं आठवताती ॥१॥
विदू० : मग झालं तर. मानवी स्त्रियांचीं गरोदरपणाचीं सर्वच चिन्हं देवांगनांना असतात.
राजा : बरं, तूं म्हणतोस तसंच कां होईन. परंतु पुत्रजन्माचं वर्तमान माझ्या पासून गुप्त ठेवायचं तिला काय कारण ?
विदू० : अरे देवता त्या ! त्यांचं रहस्य कुणाला कळणार !
( इतक्यांत कंचुकी येतो. )
कंचु० : महाराजांचा जयजयकार. महाराज च्यवन ऋषींच्या आश्रमांतून एक तापसी बाई एका कुमाराला घेऊन आल्या आहेत. त्यांच्या मनांतून महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. जशी आज्ञा.
राजा : जा, त्या दोघांनाही लवकर घेऊन ये.
( आज्ञा म्हणून निघून जातो व कांहीं वेळानें दोघांस घेऊन येतो. )
कंचु : तापसी बाई, असं इकडून यायचं.
विदू० : ( पाहून ) मित्रा ! या बाणावर ज्याचं नांव आहे तोच हा राजपुत्र ! तो तोंडावळा, तें तेज, ती वीरश्री ! अगदीं तुझी प्रतिमा दिसते पहा. ती गतिसुद्धां केवळ -
राजा : म्हणूनच बरं -

पद. ( अशी सदा ही प्रीत )
पाहुनि या कुमरा ॥ गंभीरा ॥ नयनीं आलें नीर झरारा ॥धृ०॥
प्रसन्न झालें मानस माझें ॥ हृदयी वाढे स्नेह भरारा ॥१॥
धीर न धरवे मजला आतां ॥ अंगीं सुटला कंप थरारा ॥२॥
जाउनि वेगें आलिंगावें ॥ उत्कंठा ही हो अनिवारा ॥३॥
कंचु० : तापसी बाई, इथें उभं रहावं. ( मुलासह उभी राहते. )
राजा : मातोश्री, मी वंदन करतों.
तापसी : हे महाभाग राजा, सोमवंशाचा विस्तार करणारा हो. ( मनांत ) काय चमत्कार आहे पहा ! न सांगतां न सवरतां हा राजा आपला जनक हें मुलाला आपोआप समजलं. बाळा, जा पित्याला नमस्कार कर. ( मुलगा पित्यास वंदन करतो. राजा त्यास आयुष्यमान् हो ! असा आशीर्वाद देतो. )
मुलगा : ( मनांत )

पद. ( दादरा, भैरवी )
हे माझे तात, तसा पुत्र मी तयांचा ॥ परिसुनि हें जरि इतुका, हर्ष होता साचा ॥धृ०॥ मग जननीजनकांनीं अंकिं घेउनी ॥ वाढविलें बालक जें लाड लावुनी ॥ प्रेमा त्यांविषयिं किती बालकां मनीं ॥ नकळे मज लवहि नसे अनुभव कीं त्याचा ॥१॥
राजा : मातुश्री, मनांत काय हेतु धरून येणं केलं ?
ताप० : ऐक. हा दीर्घायु बालक जन्मला, त्याच वेळी उर्वशीनं कांहीं कारणानं ठेव म्हणून माझ्या स्वाधीन केला. पुढें भगवान् च्यवन ऋषींनीं क्षत्रियकुमारांप्रमाणें याचा जातकर्मादि सर्व विधि केला आणि सर्व विद्या झाल्यावर धनुर्वेदांतही याला प्रवीण केला.
राजा : तर मग हा खरोखर सनाथ झाला !
ताप० : परंतु आज ऋषिकुमाराबरोबर पुष्पसमिधा आणायला गेला होता, तिथें याच्या हातून आश्रमधर्माविरुद्ध असं कांहीं कृत्य झालं.
राजा : तें कोणतं ?
ताप० : तिथें एका झाडावर तोंडांत मांसाचा तुकडा धरून एक गृध्रपक्षी बसला होता, त्याला यानं बाण मारून खालीं पाडलं.
राजा : बरं मग ?
ताप० : मग ही गोष्ट च्यवन ऋषींना समजली; तेव्हां त्यांनीं मला सांगितलं, कीं आतां ही ठेव ज्याची त्याला नेऊन दे. म्हणून मी याला उर्वशीच्या स्वाधीन करायला आज इथें आलें.
राजा : तर मग या आसनावर बसावं. ( बसते ) लातव्या जा, उर्वशीला बोलावून आण. ( तो आज्ञा म्हणून जातो. राजा पुत्राकडे पाहून ) बाळा ये !

पद. ( असुनि तुझें मुख फ़ार )
आलिंगन मज देई कुमारा ॥ ये ये बा सकुमारा ॥धृ०॥ हिमकर सुखवी कांतमण्याला ॥ तैसें या जनकास ॥ भेटुनि दे आनंद, सौदैवें ॥ लाभ होय हा खास ॥१॥
ताप० : जा बाळा. तुझा पिता काय सांगतो तें ऐक.
( मुलगा राजाजवळ जाऊन त्याचे पाय धरितो. )
राजा : ( त्यास आलिंगन देऊन ) बाळा, हा ब्राह्मण तुझ्या पित्याचा प्रियमित्र आहे. तर त्यालाही नमस्कार कर. अरे जा, भिऊं नकोस.
विदू० : अरे, तो कां भिईळ ! त्यानं आश्रमांत माझ्यासारखी माकडं पुष्कळ पाहिलीं असतील !
मुलगा : ( हंसून ) काका, मी नमस्कार करतों.
विदू० : तुझं कल्याण असो बरं, बाळा !
( इतक्यांत उर्वशी व कंचुकी येतात. )
कंचु : बाईसाहेब, असं इकडून यावं.
उर्व० : ( मुलाकडॆ पहात. )

पद. ( कहाके पथक कहा )
चापधर कुमार हा बैसला कुणाचा ॥धृ०॥ घेउनिया कनकासनिं ॥ नाथ कसे स्वकरांनीं ॥ केशभार सावरुनी ॥ बांधिती तयाचा ॥१॥
( तापसीकडे पाहून ) अग बाई, या सत्यवतीबाई ! तर मग हा माझाच बाळ आयु ! बराच मोठा झाला आतां.
राजा : ( उर्वशीला पाहून ) बाळा -

साकी.
ही तच जननी उत्सुकतेनें तुज भेटाया आली ॥ पुत्रस्नेहें पान्हा फ़ुटला, काचोळी ही भिजली ॥ बाळा जावोनी ॥ सुखवीं तिजला भेटोनी ॥१॥
ताप : जा बाळा, आईला भेट जा. ( उर्वशी तापसीस नमस्कार करिते. ) मुली, नवर्‍याच्या प्रीतींतली हो बरं !
उर्वशी : ( आयूनें नमस्कार केल्यावर त्यास उचलून ) बाळा, वडिलांचा आज्ञाधारक हो. ( राजास वंदन करिते )
राजा : पुत्रवती ये ये ! या सिंहासनावर बैस.
( उर्वशी अर्धसिंहासनावर बसते )
ताप० : मुली. तुझा हा आयु बाळ विद्याभ्यास करून अंगावर कवच धारण करण्याजोगा मोठा झाला. तर आतां तुझ्या पतीच्या समक्ष ही तुझी ठेव मी तुला स्वाधीन करतें. येऊं तर आतां ? आश्रमधर्मांत अंतर पडेल म्हणून म्हणतें.
उर्वशी : सासूबाई,

पद. ( दई मारे )
फ़ार दिवशीं भेटलांत ॥ या म्हणूं कसे ॥धृ० ॥ मीं निरोप नाहिं दिला ॥ तरि व्यत्यय धर्माला ॥ या परंत हें कराच ॥ होय भेट फ़िरुनसें ॥
राजा : मातु:श्री, च्यवनऋषींना माझा प्राणिपात सांगावा.
ताप० : सांगेन बरं. येतें हं बाळा.
मुल० : आजी, तूं खरंच जाणार कां ?  तर मलाही घेऊन चल. मी नाहीं इथें राहायचा.
राजा : बाळा, इतके दिवस त्या आश्रमांत होतास. आतां मोठा झालास म्हणून गृहस्थाश्रमांत रहा. हें काय बरं ? ये.
ताप० : बाळा, वडील सांगतात तें ऐक.
मुल० : बरं तर. पण आजी,

पद. ( त्रिताल. भैरवी )  
मणिकंठक या नांवाचा ॥ माझा मोर मला धाडुन दे ॥
फ़ुटतांचि पिसारा त्याला ॥ माझा मोर मला धाडुन दे ॥
घेउनि अंकीं शीर खाजवितां ॥ निद्रा घेई जो आनंदें ॥१॥
आजी, देशील ना धाडून ?
ताप० : देईन बरं बाळा. तुमचं सर्वांचं कल्याण असो. ( जाते )
राजा : सुंदरी !

पद. ( कितिकपटि अससि तूं )
सुतवंत जगीं बहु असती ॥ परि त्यांमाजीं, धन्य एक मी, या तव कुमारें खचित सुदति ॥धृ०॥ इंद्राणीसुत जयंतलाभें, इंद्र जसा तो धन्य सुकृति ॥१॥
( उर्वशी कांहीं आठवून रडूं लागते )
विदू० : ( पाहून ) अरे ! पण आमची वइनी एकाएकीं रडूं कां लागली पहा !
राजा : ( घाबरून ) प्रिये, हें काय ?

पद. ( गत वैभव झालों ऐसा )
कां करिसि शोक आतां हा ॥धृ०॥ पीनकुचावरि बहु तेजाची ॥ लोळे एकसरी मोत्यांची ॥ त्यावरि सखये जलबिंदूंची ॥ होय दुजी ही माळ पहा ॥१॥
उर्व० : --

पद. ( सोच समज नादान )
बाळ पुन्हा हा मजला भेटे ॥ या आनंदें अंतर दाटे ॥धृ० ॥ परि इंद्राच्या नामासरसी ॥ नियम आठवे कांहीं मजसी ॥ दु:ख मनाला त्याचें वाटे ॥१॥
राजा : तो कोणता नियम ?
उर्व० : पूर्वी माझं मन आपल्यावर आसक्त झालं असं पाहून इंद्रानं मला आज्ञा केली कीं, जेव्हा माझा प्रिय मित्र तुझ्या पुत्राचं मुख पाहिल तेव्हा तूं परत ये. या इंद्राच्या आज्ञेप्रमाणं आपला वियोग न व्हावा म्हणून,

पद. ( राग जोगी दादरा )
च्यवनाश्रमिं या मुलास सत्यवतीपाशीं ॥ जन्मतांचि ठेवियला वेद शिकायासी ॥धृ०॥ साह्य तुम्हा द्यावयासि योग्य जाणुनी ॥ आज तिनें मजसि दिला बाळ आणुनी ॥ आतां सहवाससुखा मुकली ही दासी ॥१॥
राजा : हर हर !

पद. ( कांते फ़ार तुला )
कैसी विधिनें निष्ठुरता ही मजवरती केली ॥ सौख्याची ती आशा माझी एकाएकीं लोपुनि गेली ॥धृ०॥ मेघजलानें जैसा तरुचा ॥ शांत चि होतां तांप रवीचा ॥ अवचित त्यावरि वीज पडावी ॥ गति तैशी कीं माझी झाली ॥१॥ पाहुनि सुंदर पुत्रमुखाला ॥ झाला फ़ारचि तोष मनाला ॥ इतुक्यांतचि ही तव विरहाची दु:सहवार्ता कानीं आली ॥२॥
विदू० : काय पहा, सुखाची गोष्ट तीच दु:खाचं कारण झाली ! आतां मात्र आमचे महाराज वल्कलं परिधान करून तपोवनांत जातील असं वाटतं.
उर्व० :

पद. ( सखये अनुसूये )
दैवा हा माझा भोगचि आला ॥ देऊं मी दोष कुणाला ॥१॥
आतां बालक हा मोठा झाला ॥ सर्वहि तो विद्या शिकला ॥२॥
अपुला कार्यभाग अवघा सरला ॥ जाणुनि हें सुरलोकाला ॥३॥
जाते टाकुनि हीं येथें मजला ॥ वाटेलचि खचित तुम्हांला ॥४॥
राजा : छे छे ! असं म्हणूं नकोस. कारण.

पद ( कालंगडा. दादरा )
दोष तुझा कांहि नसे ॥ यांत सखे गे ॥धृ०॥ सोडुनि मजला स्वर्गीं नच जा ॥ हें मी सांगु कसें ॥३॥
मुल० :

अंजनीगीत.
मोठे मोठे गंधगजाचा छावा, तरि अन्य गजांना भारी ॥ जरि भुजंगशिशु तो नांवा, तरि असतो नावा, तरि असतिओ तीव्र विषारी॥ न्तृपतनय तेवि समजावा, योग्य भू वराया सारी ॥ चाल ॥ जरि अल्प वयानें असला ॥ तरि जात्या गुण जो ठसला ॥ तो लपे कधिं व अंधारीं ॥ हें मनीं सत्य अवधारी ॥१॥
लातव्या, मंत्रिमंडळास माझा निरोप सांग कीं, आयूच्या राज्याभिषेकाची तयारी करावी. ( आज्ञा म्हणून कंचुकी दु:खानेंच जातो )
( एकाएकीं सर्वांच्या दृष्टी चकित होतात )
राजा : हें आकाश निरभ्र असून विद्युल्लता कशी बरं चमकूं लागली ?
उर्व० : अग बाई ! हे भगवान् नारदमुनी आले !
राजा : सखे, खरंच !

पद ( बहुनीप तरू फ़ुलुनी )
मुनि नारद हे येति वरुनि भूतलावरी ॥धृ०॥ कांचन रुचिपिंगजटा शिरिं विराजती ॥ यज्ञसूत्र धवल जशी, चंद्रकोर ती ॥ मुक्ताफ़ळ माळ गळां, शोभते किती ॥ वाटे, कनकांकुर सुरतरु हा त्रिभुवनसंचारी ॥१॥
अर्व्योदक आण आधीं.
उर्व० : ( आणून ) हें आणलं अर्ध्योदक महाराज.
नार० : ( प्रवेश करून ) मध्यलोकपाळाचा विजय असो.
राजा : ( अर्ध्योदक सोडून ) भगवान् ! मी प्रणिपात करितों.
उर्व० : मी नमस्कार करतें.
नार० : तुम्हां उभयतांचा वियोग नसो.
राजा० : ( मनांत ) असं होईल तर मग काय ! ( उघड मुलास आलिंगून ) बाळा, नारदमुनींना नमस्कार कर.
मुल : भगवान्, हा उर्वशीपुत्र आयु प्रणाम करतो.
नार० : वत्सा, दीर्घायु हो.
राजा० : सांगावा महाराज कोणता तो. माझं लक्ष आहे.
नार० : संपूर्ण राज्यकारभार पुत्रावर टाकून, तूं वनांत जाण्याचा निश्चय केलास, हें वर्तमान देवेंद्राला स्वप्रभावानं कळलं; म्हणून त्यानं तुला असं सांगितलं आहे कीं

साकी.
कांहीं कालें असुरसुरांचें होईल रण त्या कालीं ॥ पुरूरवा नृप जिंकिल असुरां, ऐसी वाणी वदली ॥ त्रिकालविन्मुनिची ॥ कथिली तुजला ती साची ॥१॥
याकरितां तूं शस्त्रत्याग करूं नकोस. ही उर्वशी तुझं जीवमान आहे तोंपर्यंत तुझी सहधर्मचारिणी होऊन राहील.
उर्व० : ( मनांत ) या आशिर्वादानं माझ्या मनांतलं शल्यच काढलं तर !
राजा : मुनिवर्य, देवेंद्राचा दासच आहें मी !
नार० : ठीकच आहे ! कारण -

दिंडी.
करी मघवा तव कार्य भूमिपाला ॥
तूंहि करिसी साह्य त्या वासवाला ॥
देइ अग्निस रवि तेज अस्तमानीं ॥
प्रभातीं तो सूर्यास दे फ़िरोनी ॥१॥
( आकाशाकडे पाहून ) रंभे, प्रत्यक्ष इंद्रानं आयूला राज्याभिषेक करण्याची सर्व सामग्री तयार केली आहे, ती घेऊन ये.
रंभा० : ( प्रवेश करून ) भगवन् ! ही आणली.
नार० : ( मुलाच्या मस्तकावर कलश ओतून ) रंभे, बाकीचा सर्व विधि तूं कर.
रंभा : ( सर्व करून ) बाळा, नारदमुनींना नमस्कार कर. ( तो तसें करतो. त्यास नारद ‘ कल्याण होवो ’ असा आशीर्वाद देतात. ) बाळा, आतां पित्याला आणि आईला नमस्कार कर. ( तो तसें करतो. राजा त्यास “कुलधुरंधर हो ” असा आशीर्वाद देतो व उर्वशी ‘ पित्याचा लाडका हो ’ असा आशीर्वाद देऊन त्यास ‘ रंभेला नमस्कार कर ’ असें सांगते. तो तसें करतो. )
नार० : रंभे, वत्साला सिंहासनावर बशीव. ( ती बसविते. )
[ पडद्यांत ]
पहिला वैतालिक : युवराजांचा जयजयकार.

प्रबंध.
ब्रम्हसुत अत्रिमुनि ॥ अत्रिसुत चंद्र तो ॥
चंद्रसुत बुध, तया ॥ नाथ अमुचे ॥
एकमेकांपरी ॥ ते जसे, तूंहि हो ॥
जनकस्म, घेउनी ॥ सुगुण त्याचे ॥
दुजीं सर्व आशिर्वचें राजकुलिंया ॥
असति आधींच तीं भूपतनया ॥१॥
दुसरा : युवराजांचा जयजयकार.
जान्हवी ती जशी ॥ हिमनगीं सागरीं ॥ राज्यलक्ष्मी तशी ॥ तात तनयीं ॥ भागिली, परि तुला ॥ अधिक ही शोभते ॥ अससि तूं अचलधी परम विनयी ॥ जसा पर्वतीं हिमनग श्रेष्ठ, तव जनकही ॥ धीरलोकीं तसा श्रेष्ठ पाही ॥२॥
रंभा : सखे, पुत्राला युवराजपद मिळालं, आणि तुला पतीच्या चिरसमागमाचा लाभ झाला, या दोन्ही गोष्टी चांगल्याच झाल्या.
उर्व० : हा आनंद दोघींनाही सारखाच आहे. ( मुलास हातीं धरून ) बाळा, ज्येष्ठ मातेला नमस्कार कर जा.
राजा : थांब जरा. सर्वच मिळून जाऊं तिकडे.
नार० : राजा,

साकी.
सेनानायकपदीं स्थापिला महासेन इंद्रानें ॥
स्मरलें मज तें, युवराजपदीं याच्या अभिषेकानें ॥
शोभा त्या कालीं ॥ तैसी आज पहा दिसली ॥१॥
राजा : आपला अनुग्रह झाल्यावर काय होणार नाहीं !
नार० : राजा, इंद्रानं तुझं आणखी काय प्रिय करावं ?
राजा : महाराज, आणखी काय प्रिय करायचं ! परंतु

पद ( हा उत्सुक तव संगमा )
तो प्रसन्न जरि मजवरी ॥ हाचि वर देवो ॥ विद्या - श्रीचा एका घरीं ॥ वास तो होवो ॥ त्या दोघींचें यावरी ॥ वैर तें जावो ॥ लाभो सौख्य सदां सज्जनां ॥ त्यांची सफ़ल असो कामना ॥ राहो सत्कर्मीं वासना ॥ दुरित लय पावो ॥१॥
( सर्व जातात )

अंक ५ वा समाप्त.

-------------------------

प्रार्थना.
पद
( तन धि त्रोम् तनन या चा० )
चिन्मया, सकलहृदया ॥ सदया, दे, या गोविंदा, वर वरदा, कलिमलविलया ॥धृ०॥
विषयपिपासापीडितसा ॥ नि:सारा, संसारा, मृगनीरा - सम, भुललों, मी, परि फ़सलों, विस्मरलों तव भजनीं, लागाया ॥१
कामधनाशा, ही विवशा ॥ मन्नाशा, सरसावे, तत्पाशी, सांपडलों, ये धावोनी, यांतोनी, सोडवुनी, मज घ्याया ॥२॥
सौख्य सदा नव ज्या ठायीं ॥ तापाचा, पापाचा, लेश नसे शांति वसे, ने येवोनी, त्या स्थानीं, सुखभुवनीं, शिवराया ॥३॥

: समाप्त :

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP