संगीत विक्रमोर्वशीय - अंक तिसरा

सन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.


( दोन भरतमुनीचे शिष्य येतात. )
गालव : कायरे पल्लवा, गुरुजींनीं मला इथं अग्निसंरक्षणार्थ ठेवून तुला आसन देऊन बरोबर नेलं होतं, म्हणून मी तुला विचारतों, कीं आमच्या गुरुजींनीं जो इंद्रसभेतंत प्रयोग करून दाखविला, तो पाहून सर्व देवांना आनंद झाला कारे ?
पल्लव : अरे, त्यांना आनंद झाला कीं नाहीं, हें कांहीं मला समजलं नाहीं. पण सरस्वतीकृत जें लक्ष्मीस्वयंवर नाटक, त्याच्या भिन्नभिन्न रसांत ती उर्वशी अगदीं तल्लीन होऊन गेली. परंतु -
गालव : तुझ्या या परंतु शब्दावरून तिथं कांहीं तरी चूक झाली असावी असं वाटतं !
पल्लव : चूक तर ! उर्वशी बोलण्यांत चुकली.
गालव : काय चुकली रे ?
पल्लव : त्या प्रयोगांत उर्वशीनं लक्ष्मीचा वेष घेतला होता आणि मेनकेनं वारुणीचा वेष घेतला होता; तेव्हां, लक्ष्मीला वारुणीनं विचारलं कीं, या इंद्रसभेंत महाविष्णु, लोकपाल, तसेंच त्रैलोक्यांतील सर्व देव बसले आहेत. तर त्यांतून तुला कोण आवडतो ?
गालव : बरं मग पुढें ?
पल्लव : अरे पुढें काय ! पुरुषोत्तम म्हणायचं, तें न म्हणतां, पुरूरव असं म्हणाली.
गालव : अर अरे ! नशीबापुढें इंद्रियांचं काय चालणार ! बरं मग तिच्यावर आमचे गुरुजी रागावले असतील ?
पल्लव : अरे हो ! रागावले काय म्हणतोस ? त्यांनीं तर तिला एकदम शाप दिला.
गालव : तो कायरे ?
पल्लव : गुरुजींनीं असा शाप दिला, कीं ज्या अर्थीं तूं माझी आज्ञा मोडलीस, त्या अर्थीं तूं माझ्या शापानं मृत्यूलोकीं जाशील आणि तुला तुझ्या दिव्य ज्ञानाचा विसर पडेल. हा शाप ऐकल्याबरोबर उर्वशींच तोंड अगदीं उतरून गेलं. तें पाहून इंद्र तिला म्हणाला, कीं ज्या पुरूरव राजावर तुझं मन बसलं आहे, तो मोठमोठ्या युद्दांत माझं सहाय्य करीत असतो. याकरितां मलाही त्याचं प्रिय केलं पाहिजे. तर तूं त्याच्याजवळ जाऊन सुखानं रहा. मात्र, तुला पुत्र होऊन तो राजानं पाहिला, कीं तुला परत आलं पाहिजे.
गालव : इंद्र म्हणजे दुसर्‍याचं अंतरंग जाणणारा ! तेव्हा त्यानं केलं तें योग्यच केलं.
पल्लव : ( सूर्याकडे पाहून ) अरे पण या बोलण्याच्या नादांत दिवस पहा किती वर आला तो ! मला वाटातं गुरुजी स्नान करून गेले असतील. तर चल, आपणही जाऊं तिकडे.
( असें म्हणून दोघे जातात. )
( कंचुकी येतो. )
कंचुकी : सर्व लोकांची रीत अशी असते कीं

अंजनीगीत.
तरुणपणीं ते धन मिळवीती ॥ वृद्धपणीं निजपुत्रावर्ती ॥
ढेवुनि कुटुंबभर अनुभविती ॥ सुख विश्रांतीचें ॥२॥

दिंडी,
परी आम्हां वार्धक्य जसें येतें ॥ तशी अमुची योग्यता अधिक होते ॥ नाहिं आशा यांतून  सुटायाची ॥ दास्य करितां तनु अशिच झिजायाचे ॥१॥

तेव्हां आम्हांला आणि या अंत:पुरांतल्या दास्यत्वाला धि:कार असो ! ( फ़िरून ) आमच्या राणीसाहेब कांहीं व्र करीत आहे. त्याच्या संपूर्णतेला महागजांनीं जवळ असावं अस आहे. म्हणून राणीसाहेबानीं मला आज्ञा केली आहे की ‘हें जरी मीं निपुनीकेकडून महाराजांना कळविलं आहे, तरी तूंही माझी विनंत त्याणा विदित कर.’ आतां महाराजांची स्नानसंध्या आटपली असेल. तर आपण जाऊन बाईसाहेबांची विनंत कळवावी. ( जरा फ़िरून ) अहाहा !

पद ( मुलतानी. त्रिताल )
सायंकालीं नृपसदनाचा ॥ थाट खरा हा अति मौजेचा ॥धृ०॥
निद्राकुल हे मयूर बसती ॥ स्वस्थानीं जणुं चित्रें दिसती ॥
जाळ्यांतुनि हे सुधूप निघती ॥ पारावतगण कीं हा वरचा ॥१॥
अंत:पुरिंच्या वृद्धा दासी ॥ ठायिं ठायिं बलिगंधफ़ुलांसी ॥
अर्पुनि मग मंगल दीपांसी ॥ ठेविति तेथें, क्रम हा त्यांचा ॥२॥
( पडद्याकडे पाहून ) सरकारची स्वारी तर इकडेच आली.

पद ( रामराय राज्याचा० )
या दासींनीं हातीं धरिले असति दीप जे त्यांनीं ॥ वेष्टित हे नृपनाथ शोभती कैसे आगमनीं ॥१॥ पुष्पगुच्छयुत कर्णिकार तरु बाजूवरि डुलती ॥ सपक्ष ऐसा नगचि येतसे होय मना भ्रांती ॥२॥
तर आतां महाराजांची दृष्टि माझ्यावर पडेल अशा ठिकाणीं उभं रहावं.
( राजा व विदूषक येतात. )
राजा : ( आपल्याशीं )

पद ( मोको गडूवा भरण न हि देरे )
मज ताप मदन बहु देई ॥ मनिं चैन नसे ॥धृ०॥ कार्यामाजीं गुंतुनि जातां ॥ दिवस कसा तरि जाई ॥१॥ परि रजनी ती सरतां न सरे ॥ उलटी दीर्घचि होई ॥२॥ रंजन कैसें होय मनाचें ॥ मोठें संकट येई ॥३॥
कंचुकी : ( जवळ जाऊन ) महाराजांचा विजय असो ! राणीसाहेबांची अशी विनंती आहे कीं, राजवाड्याच्या गच्चीवरून चंद्राचं दर्शन चांगलं होईल. याकरितां चंद्राचा व रोहिणीचा योग आहे, तोंपर्यंत महाराजांनीं तिथें बसण्याची कृपा करावी.
राजा : ठीक आहे. तुझ्या इच्छेप्रमाणं करतों असं राणीला कळीव.
( आज्ञा म्हणून कंचुकी जातो )

32

32
राजा : मित्रा, हा राणीचा उद्योग केवळ व्रतासाठींच असेल ?
विदू० : मला वाटतं कीं, तूं तिच्या पायां पडलास, त्यावेळीं तिनं तुझ्याकडे लक्ष दिलं नाहीं. परंतु त्याचा आतां तिला पश्चाताप झाला असेल; आणि आपल्या अपराधांचं परिमार्जन व्हावं म्हणून तिनं व्रताच्या निमित्तानं हा उद्योग चालिवला असेल.
राजा : तुझा तर्क बरोबर आहे. कारण

साकी
मानी स्त्री जी लोटी पतिला, जरि तो पायां पडला ॥ तिजला त्याच्या आर्जववचनें पश्चात्तापहि घडला ॥ तरि तो गुप्तपणें ॥ ठेवी मनिंच्या मनिं जाणें ॥१॥
तर मित्रा, मला प्रासादावर जाण्या़चा मार्ग दाखीव.
विदू० : असं इकडून यावं महाराज. गंगेच्या तरंगाप्रमाणं शुद्ध स्फ़टिक मण्यांचा हा जिना आहे. यावरून प्रासादावर चढावं. ( दोघे वर चढतात ) प्रदोषकाळीं हें स्थान किती रम्य दिसतं ! अहाहा ! अंधकार जाऊन ही पूर्वदिशा पहा कशी आरक्त दिसूं लागली ती ! यावरून आतां चंद्रोदय लवकरच होईलसा वाटतो.
राजा : खरंच ! ही पहा मौज.

पद ( भूप त्रिताल )
वारी तिमिरासी ॥ स्वकरीं ॥ उदयगिरीच्या मागुनि तो शशि ॥धृ०॥ सांवरिलें कीं कच ज्यावरचे ॥ वदन असें हें पूर्ववधूचें ॥ आनंदवि या नयानंसी ॥१॥
विदू० : अहा ! मित्रा, हा चंद्र पहा कसा अर्ध्या मोदकासारखा दिसतो तो !
राजा : या खादाडाला तर खाण्याच्या पदार्थावांचून दुसरं कांहीं सुचतच नाहीं. ( हात जोडून ) हे भगवान् निशानाथा.

पद ( कानडा त्रिताल )
वंदन तुजला हें शशिराया ॥ शंकरचूडाभूषणकाया ॥धृ०॥
दर्शदिनीं सत्क्रिया घडाया ॥ रविच्या बिंबीं तूं जासी ॥
रात्रीं तिमिरा विलया नेसी ॥ देसि सुधा सुरपितरां प्याया ॥१॥
विदू० : मित्रा, माझ्या मुखानं तुझा पितामहच तुला आज्ञा करतो, असें समजून खालीं बैस एकदांचा; म्हणजे मीही थोडा स्वस्थ बसेन म्हणतों.
राजा : ( खालीं बसून परिजनांस ) या चांदण्यात दीपिकांचा कांहीं उपयोग नाहीं, तर तुम्हींहि विश्रांति घ्या जा.
( आज्ञा म्हणून जातात )
राजा : ( चंद्राकडे पाहून ) मित्रा, राणी यायला अजून दोन घटका अवकाश आहे. तर तोंपर्यंत माझी अवस्था काय झाली आहे, हें मी तुला सांगतों.
विदू० : सांगायला नको, दिसतेच आहे ती. आतां तिची ती प्रीति पाहूनच मनाला धीर दिला पाहिजे. दुसरा उपाय नाहीं.
राजा : मित्रा तूं म्हणतोस तें खरं. परंतु माझ्या मनाला फ़ार ताप होत आहे. कसा म्हणशील, तर ऐक.

दिंडी.
ओघ नदिचा पाषाण मधें येतां ॥ बळावे तो प्रतिबंध त्यास होतां ॥ येति विघ्नें संगमीं तिच्या मजला ॥ जोर आला शतगुणें मन्मथला ॥१॥
विदू० : मित्रा, तुझं शरीर इतकं म्लान झालं असूनहि जेव्हां तूं इतका सुंदर दिसतोस, तेव्हां तुझा आणि त्या अप्सरेचा संगम लवकर होणार, यांत संशय नाहीं.
राजा : मित्रा, तुझ्या भाषणाप्रमाणं माझाही दक्षिणबाहु स्फ़ुरून सुचिन्ह दाखवूं लागला आहे. यावरून तुझं भाषण खरं होईलसं वाटतं.
विदू० : असं वाटलंच पाहिजे. या ब्राह्मणाच्या तोंडचीं अक्षरं कधींच खोटीं व्हायचीं नाहींत. समजलास ?
( इतक्यात विमानांत बसून उर्वशी व चित्रलेखा येतात. )
उर्वशी : ( आपल्याकडे पाहून ) गडे, आज मी हा निळा शालू नेसलें आहे नि अंगावर दागिनेही फ़ार घातले नाहींत. तेव्हां हा माझा अभिसारिकेचा वेश मला कसा काय शोभतो ? सांग पाहूं.
चित्र० : सखे, कसा शोभतो हें सांगायला माझ्या वाणीला शक्तिच नाही. काय करूं ! असं मात्र वाटतं कीं, मी जर पुरूरवां असतें, तर मीच झाली असती. पण काय !
उर्वो० : गडे,

पद ( हजारा मोरा कानका मोती )
कामानें व्याकुळ झालें ॥धृ०॥ शक्ति नसे मज पद उचलाया ॥ मनमोहन तो कवण्या ठायां ॥ असेल तिकडे ने ही काया । मन माझें आधिंच गेलें ॥१॥
चित्र० : अग, दुसरं कैलासशिखच, असा या तुझ्या प्राणप्रियाच्या मंदिराजवळ आपण येऊन पोंचलों दिखील.
उर्व० : तर मग -

पद ( मानीनी मनी नोडो )
तो कोठें भूप ज्यानें ॥ मन माझें चोरिलें ॥धृ०॥ ध्यान करोनीं पाही त्याला ॥ काय करितसे तें वद मजला ॥ फ़ार गडे मी बावरलें ॥१॥
चित्र० : ( चिंतन करून मनाशीं ) आतां हिच्याशीं थोडा विनोद करावा. ( उघड ) सखे, मीं ध्यान करून पाहिलं, तों मला बाई असं दिसलं कीं, तो तुझा मनमोहन, आपल्या मनोराज्यांत प्राप्त झालेल्या प्रियेबरोबर आनंद करीत, एकांतीं बसला आहे. ( हें ऐकून उर्वशी खिन्न होते ) हा वेडे ! अग असं वाईट तोंड कां केलंस ? ती प्रिया म्हणजे तूंच बरं का ?
उर्व० : ( सुस्कारा टाकून ) तूं पाहिजे तें म्हण. पण माझं वेडं मन मेलं संशयात पडलं आहे.
चित्र० : ( पाहून ) अग, हा पहा तो राजा. या प्रासादावर आपल्या मित्रासमवर्तमान बसला आहे. तर आपण त्याच्या जवळ जाऊं.
( दोघी विमानांतून उतरतात. )
राजा : मित्रा, जशी जशी रात्र वाढत जाते, तसतशी मला मदनाची पीडा अधिक होऊं लागली, काय करूं रे ?
उर्व० : सखे, यांच्या बोलण्याचा अभिप्राय मला नीट समजला नाहीं, म्हणून बाई मला भीति वाटते. तर हे दोघे काय गुजगोष्टी करतात, हें आपण आड उभें राहून ऐकूं; म्हणजे मनांतली शंका दूर होईल.
चित्र० : बरं तर
विदू० : हं काढली तोड. या अमृतयुक्त चंद्रकिरणांचं सेवन कर म्हणजे झालं.
राजा० : माझी पीडा या अशा उपचारांनीं नाहींशी व्हायची नाहीं. कारण -

पद ( कांहीं दिसती हे मघ नभींचे )
भरला कामज्वर माझ्या देहीं ॥ पीडा बहु देई ॥धृ०॥ शय्या नवकुसुमांची आदरिली ॥ परि तापद झाली ॥ किरणें चंद्राचीं सेवन केलीं ॥ परि तापद झालीं ॥ अंगा शीतलशी उटि लावियली ॥ परि तापद झाली ॥ मणिमाला ही धारण केली ॥ तापद परि ती अधिकचि होई ॥१॥

अंजनीगीत.
समूळ हा ज्वर हरावयाला ॥ शक्ति एक त्या सुररमणीला ॥
कथा तिची वा तच्छमनाला ॥ करिल जरा कांहीं ॥१॥
उर्व० : मना, मला सोडून इकडे आल्याचं सार्थक झालं.
विदू० : आहा ! तिच्या गप्पा मारूनच समाधान करून घ्यायची युक्ति चांगली काढलीस ! कारण मला जेव्हां श्रीखंड किंवा साखरभात खायची वांछा होते, तेव्हां ती त्यांच्या गप्पाच मारून समाधान मानतों.
राजा : पण तुला ते पदार्थ मिळतात.
विदू० : मग तुलाही ती लवकरच मिळेल.
राजा : मित्रा, मलासुद्धां असंच वाटतं.
चित्र० : अजून नाहींना तुझ्या मनाची खात्री झाली ? ऐक तर !
राजा : मित्रा -

साकी.
वेगानें रथ खालीं येतां, सुंदरिच्या बाहूला ॥ लागुनियां हा बाहु एकला, लोकीं कृतार्थ झाला ॥ उरली ही काया ॥ भूवरि भार होय वाया ॥१॥
चित्र० : गडे, आतां कां बरं उशीर करतेस ? हो पुढें.
उर्व० : ( राजापुढें उभी राहून, पुन: परतून ) सखे, मीं महाराजांच्या पुढे गेलें, तरी त्यांनीं माझ्याकडे कां बरं पाहिलं नाहीं ?
चित्र० : ( हांसून ) अग, अंगावरला तिरस्करणी मंत्राचा बुरखा काढल्याशिवाय गडबडीनं पुढें गेलीस, म्हणून असं झालं, समजलीस ?
( पडद्यांत. असं इकडून यावं बाईसाहेब. )
विदू० : ( ऐकून ) अरे गप रे गप ! राणीसाहेब आल्या वाटतं.
राजा : तूं सुद्धां नीट संभाळून बैस.
उर्व० : गडे, आतां कसं करावं बरं ?
चित्र० : सखे, अशी घाबरूं नकोस. तिरस्करणी मंत्राच्या योगन तूं कांहीं तिच्या दृष्टीस पडायची नाहींस. आणखी राणीच्या वेशावरून ती व्रतस्थ आहेसं दिसतं, तेव्हां तीही इथें फ़ार वेळ राहायची नाहीं.
( राणी पूजाद्रव्य घेतलेल्या दासीसह येते. )
राणी : ( वर पाहून ) हा भगवान् चंद्रमा रोहिणीजवळ असल्यानं फ़ार शोभतो, नाहींग ?
निपु० : खरंच आहे. महाराजदिखील बाईसाहेबांजवळ असले म्हणजे असेच शोभतात !
विदू० : ( पाहून ) मित्रा, राणीसाहेबांच्या मनांतून मला काहीं वायन द्यायचं आहे म्हण, किंवा व्रताच्या मिषानं तुझ्या अवज्ञेच्या दोषाचं परिमार्जन करायचं असावं म्हण, कांहीं म्हण; परंतु राणीसाहेबांची मुद्रा आज सुप्रसन्न दिसते.  
राजा : ह्या दोन्ही गोष्टी संभवतात. पण तूं दुसर्‍यानं म्हटलंस तें खरं असावंसं वाटतं. कारण -

पद ( तों तननन वाजवि वेणू )
ही धवलवसन नेसोनी ॥ शिरिं दुर्वांकुर खोवोनी ॥ बघ मंगलमात्राभरणीं ॥ व्रतमिष तें करुनी ॥ सोडुनि सर्वहि गर्व मनींचा ॥ मज सुखवाया ये चालोनी ॥ मानी ॥१॥
राणी : ( पुढें होऊन ) महाराजांचा विजय असो !
निपु० : भटजीबुवा, नमस्कार करतें.
विदू० : कल्याण !
राजा : यावं देवी! ( हात धरून तीस बसवितो. )
उर्व० : सखे, महाराजांनीं राणीला देवी ही उपमा अगदीं योग्य दिली. कारण, ही रूपानं किंवा तेजानं इंद्रायणीपेक्षा कांहीं कमी नाहीं.
चित्र० : शाबास ! निष्कपटपणा म्हणतात तो हा.
राणी : महाराज !

पद ( सुखवि नयन किति )
जोडुनि कर ही दासी विनवी ॥ इच्छा माझी पूर्ण करावी ॥१॥ व्रत मी कांहीं करितें त्यासी ॥ भार्या पतिच्या जवळ असावी ॥२॥ ऐसें आहे, म्हणुनी क्षणभरि ॥ अडचण माझी ही सोसावी ॥३॥
राजा : छे छे ! प्रिये हें काय ! हा तर मला मोठा लाभच झाला. याला अडचण कोण म्हणेल बरं ?
विदू० : माझ्यासारख्या शांतिरस्तु  पुष्टिरस्तु करणार्‍या ब्राह्मणाला वायनाच्या अशाच अडचणी येवोत !
राजा : बरं पण प्रिये, या व्रताचं नांव काय ?
निपु० : ( राणीच्या खुणेवरून ) महाराज या व्रताचं नांव प्रियानुप्रसादन व्रत.
राजा : प्रिये !

पद ( मालकंद - त्रिताल )
कोमल ही काया ॥ व्रतनियमाचे कष्ट सोसुनी, सुकविसि कांगे वाया ॥धृ०॥ प्रसाद व्हावा या आशेनें ॥ लीन असे जो या पायां ॥ त्या तव दासा प्रार्थुनि इच्छिसि, सांग काय मिळवाया ॥१॥
उर्व० : महाराज हिला मोठाच मान देतात !
चित्र० : अग, मान कसला ? वेडीच आहेस तूं ! दुसर्‍या स्त्रीवर मन बसलं, म्हणजे धूर्त लोक असंच गोडगोड बोलून आपल्या बायकांना फ़शिवतात; समजलीस ?
राणी : या व्रताचा काय गुण असेल तो असो; आज महाराजांशीं इतकं तरी बोलायला मिळालं पण माझी विनंति.
विदू० : आतां मुकाट्यानं  राणीसाहेबांच्या विनंतीला मान दे.
राणी : अग, माझं पूजापात्र आण इकडे. मी या इथें पडलेल्या चंद्रकिरणांची पूजा करतें.
निपु० : हें पूजापात्र बाईसाहेब. गंध, फ़ूल सर्व आहे यांत.
राणी : ( पूजा करून ) निपुणिके, हें मोदकांचं वायन भटजींना दे.
निपु० : आज्ञा बाईसाहेब. भटजीबुवा, हें घ्या वायन.
विदू० : ( घेऊन ) स्वस्त्यस्तु ! इच्छितफ़लप्राप्तिरस्तु ! व्रत्साफ़ल्यं भवतु !
राणी : ( राजास ) अमंळ इकडे याचचं होतं.
राजा : हा मी जवळच आहें.
राणी : ( राजास पूजा व नमस्कार करून ) महाराज,

पद
करुनि साक्ष रोहिणिसह या निशाकरा ॥ प्रार्थितसें विनयानें आज नृपवरा ॥धृ०॥ आपण ज्या सुंदरिचा छंद घेतला ॥ ध्यास आपुलाहि जिला फ़ार लागला ॥ तिजसह सुख सेवाया ॥ भीति नच धरा ॥१॥
उर्व० : चांगलं झालं बाई ! आतां ही पुढें कांहीं कां म्हणेना. पण माझ्या मनाला धीर आला.
चित्र० : ही मोठी पतिव्रता आहे. तिची आज्ञा मिळाल्यावर तुला आतां कसलीच भीति उरली नाही.
विदू० : ( मनांत ) थोट्या कोळ्याच्या  हातांतून धरलेला मासा निसटून गेला म्हणजे तो म्हणतो, जा, तुला जीवदान दिलं. त्याप्रमाणं मला हा प्रकार दिसतो. ( उघड ) कां बाईसाहेब ! अशीच कां महाराजावर आपली प्रीति आहे ?
राणी : मला सुख नसलं तरी चालेल; परंतु महाराजांना सुख मिळावं अशी माझी इच्छा आहे. यावरून मूर्खा, तुला नाहीं कां समजत प्रीति कशी आहे ती ?
राजा : प्रिये,

पद ( गुल चमनमे बीचू० )
अधिकार तुला मज अन्याला द्यायाचा ॥ त्यापासुनि अथवा हरण करुनि घ्यायाचा ॥ संदेह तुला जो आला या दासाचा ॥ तो सर्वहि मिथ्या, त्याग करींगे त्याचा ॥१॥
राणी : तें कांहीं कां असेना. माझ्या मनांतून प्रियानुप्रसादनव्रत करायचं होतं, तें मीं यथासांग केलं. चल ग, आतां आपण जाऊं.
राजा : प्रिये, मला सोडून चाललीस, पण प्रसन्न नाहीं केलंस ?
राणी : आणखी काय प्रसन्न करायचं ? मी नाहीं आपल्या व्रताचा नियम कधीं मोडायची. ( दासीसह जाते )
उर्वशी : सखे,

पद ( एक क्षणभरि० )
देवी वरती या नृपतीची ॥ प्रीति मला गे दिसते साची ॥
परि मन्मानस परतायाची ॥ आशा नाहीं मजला बाई ॥१॥
चित्र० : गडे, पण तूं इतकी निराश कां होतेस ?
राजा : ( आसनावर येऊन ) राणी दूर गेली का पहा बरं, मित्रा.
विदू० : ( पाहून ) अरे, रोगी गचावतो वैद्यबुवांना वाटलं म्हणजे ते कसे त्याला सोडून जातात, तशी ती आपल्याला सोडून चालती झाली. आतां काय बोलायचं असेल तें खुशाल बोल.
राजा : मित्रा, उर्वशी असं करील कांरे ?

पद ( सांज समे घर )
सांग मधुर नृपुररव कानीं ॥ गजगमना ती पाडिल कां ॥धृ०॥ लपुनि छपुनि ती येउनि मागें ॥ नेत्रकरांनीं झांकिल कां ॥१॥ सोडुनि अंबर या प्रासादीं ॥ सुंदरि उतरुनि येईल कां ॥२॥ भीतिमुळें गति मंद बघोनी ॥ चतुर सखी तिज लोटिल कां ॥३॥ त्या भीरूला सन्निध माझ्या ॥ समजाउनि ती आणिल कां ॥४॥
उर्व० : सखे, तर मी असंच करून त्यांचे मनोरथ पूर्ण करतें. ( राजाच्या मागून येऊन त्याचे डोळे झांकते. चित्रलेखा विदोषकास गप्प बसण्याची खूण करते. )
राजा : ( हातास स्पर्श करीत ) मित्रा, नारायणमुनीच्या उरूपासून उत्पन्न झालेली तीच ही सुंदरी ! खास खास तीच !
विदू० : हें तुला रे कसं कळलं ?
राजा : कसं म्हणून काय विचारतोस ? अरे हें पहा.

दिंडी.
मदनपीडित तनुस या सौख्य देई ॥ अशी दुसरी कामिनी कोणि नाहीं ॥ विकासेना रविकरें कुमुदिनी ती ॥ परी तिजला शशिकरचि विकसवीती ॥१॥
उर्व० : ( हात काढून ) महाराजांचा विजय असो !
राजा : अहाहा ! प्रिये उर्वशी, बैस. ( आसनावर बसवितो. )
चित्र० : आतां मला पाहून महाराजांना आनंद होतो कां ?
राजा : हें काय विचारतेस ? झालाच पाहिजे.
उर्व० : अग, राणीसाहेबांनीं महाराज माझ्या स्वाधीन केले आहेत, म्हणून मी तिच्यावर प्रेम ठेवून यांच्या अंगाला स्पर्श केला. माझ्यांत मत्सरभाव इतका दिखील नाहीं, समजलीस ?
विदू० : ( आपल्याशीं ) राणीनं महाराज स्वाधीन केले ! म्हणजे ? अस्तमानापासून या इथेंच आहेत कीं काय !
राजा : प्रिये -

पद ( निर्मल कुल कसलें )
देवीनें दिधला ॥ म्हणुनि तूं आलिंगिसि मजला ॥धृ०॥ परि ज्या समयीं या हृदयातें ॥ हरिलें तेव्हां वद कवणातें ॥ सुंदरि अनुगत पुशिलें होतें ॥ आतां कां वळला ॥ त्वन्मुखशशि हा बाजूला ॥१॥
चित्र० : महाराज, या प्रश्नाचं तिनं काय उत्तर द्यावं बरं ? आतां आपण माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावं.
राजा : बोल. माझं लक्ष आहे.
चित्र० : हा वसंत ऋतु संपल्यावर मला सूर्यनारायणाच्या सेवेला गेलं पाहिजे. तेव्हां या माझ्या प्रियसखीला स्वर्गाची आठवण होणार नाहीं, अशी वागवावी एकढीच विनंति आहे.
विदू० : अहा ! स्वर्ग ! स्वर्ग ! काय डौल स्वर्गाचा ! मी तुला विचारतों, आठवण होण्यासारखं असें काय विशेष आहे स्वर्गांत ? ना खायला, ना प्यायला ! माशासारखं एकमेकांकडे नुसतं पाहायचं, हेंच कीं नाहीं ?
राजा : चित्रलेखे --

साकी.
स्वर्गींचें सुख अनुपम असतें ॥ कोण विसरविल त्यातें ॥ परि समजे हा होय पुरूरव ॥ दासाधिक तव सखेतें ॥ जो अन्य स्त्रीला ॥ आजवरी नच वश झाला ॥१॥
चित्र० : हा महाराजांचा माझ्यावर उपकारच झाला. सखे, आतां मला निरोप दे. अगदीं भिऊं नकोस.
उर्व० : ( तिला आलिंगून ) गडे, मला विसरायची नाहींस ना ?
चित्र० : अग, महाराजांच्या समागमसुखांत तूंच मला विसरूं नकोस म्हणजे झालं. येतें हं ( राजास नमस्कार करून जाते. )
विदू० : तुमचे दोघांचेही हेतु पूर्ण झाले. आतां उत्तरोत्तर आनंदाची वृद्धि होवो म्हणजे झालं !
राजा : --

पद ( कवणें तुज गांजियलें )
झालों मी आज धन्य धन्य भूवरीं ॥ सुखकर पददास्य हिचें लाभतां करीं ॥धृ०॥ आज्ञा मम सकल भूप धरिति मस्तकीं ॥ पृथ्वीचें सार्वभौम राज्य हस्तकीं ॥ यांतहि मज धन्यत्व न वाटतें तरी ॥१॥
उर्व : आतां यापुढें मी काय बोलावं !
राजा : ( उर्वशीचा हात धरून ) अहाहा ! काय चमत्कार आहे !

पद ( सोडोनीया मुकुसुम शयना )
पूर्वींचे हे कर चंद्राचे ॥ आतां होती शीतल साचे ॥ तैसे शर ही त्या मदनाचे ॥ देती सुख कीं माझ्या हृदया ॥१॥ पूर्वीं जें जें अप्रिय होतें ॥ आतां झालें तें आवडतें ॥ ऐसें व्हाया कारण कांते ॥ झाला संगम आज तुझा गे ॥२॥
उर्व० : मी लवकर न आल्यानं महाराजांना फ़ार त्रास झाला तर त्याची मला क्षमा --
राजा : छे छे ! भलतंच. हें पहा

साकी.
भोगुनि दु:खा सुख मिळतें जें अधिक गोड लाग तें ॥ प्रखर रवीच्या संतापानें त्रस्त अशा पांथाते ॥ छाया वृक्षाची ॥ वाटे फ़ारच सौख्याची ॥१॥
विदू० : महाराज, या प्रदोष काळच्या रमणीय चंद्रकिरणांचं आपण सुख घेतलंत. तर आतां मंदिरांत चलावं.
राजा : चल तर. तुझ्या वहिनीला वाट दाखीव.
विदू० : ठीक आहे. असं या वाटेनं यायचं.
राजा : आतां इच्छा इतकीच आहे,
उर्व० : ती काय ?
राजा : हीच कीं,

पद. ( फ़ूलवाले कंथ मैकी )
आजवरी जैसी मजला शतपट रजनी भासली गे ॥धृ०॥
तुझिया सुखकर संगीं आतां ॥ पूर्वींपरि ती सुदीर्घ होतां ॥
सुंदरि तनुची या सार्थकता ॥ मानिन झाली चांगली ॥१॥
( सर्व जातात. )

अंक ३ रा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP