अंक सहावा - न्यायसभा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.


शोधनक : न्यायाधिशांनी आज्ञा केल्याप्रमाणें न्यायसभेत बैठक तयार करुन ठेवली , पण आद्याप कोणीच आलें नाहीं हें कसें ? अरें , हे कोण आले ? ( पाहून ) काय राजशालक संस्थानक इकडे येत आहे ! तर या दुर्जनाची नजर चुकवून आपण दुर रहावें हें बरें .  ( जातो. )
शका० : ( प्रवेश करुन आपल्याशीं )
दिंडी
क्षणामध्यें केशांस दिली गांठ
क्षणामध्यें बांधिला जटाजूट
क्षणामध्यें मोकळे केश सारे
राजशालक मी दीसतों कसा रे ?॥१॥
-- विषाच्या किड्याप्रमाणे मी दुसर्‍यासाठी जागा करुन ठेविली आहे. त्यांत कोणाला बरें घालावे ? ( विचार करुन ) हो - हो ! त्या दरिद्री चारुदत्तावर ह्या कृत्याची स्थापना करावी म्हणजे शोभेल. तर आतां न्यायसभेत जावे आणि प्रथम फिर्याद करावी कीं , चारुदत्ताने द्रव्यलोभास्तव वसंतसेनेला बाहुपाश घालून मारली. ( चालून ) हीच न्यायसभा . ( पाहून ) हा कोण आला ?
शोध० : ( येऊन ) न्यायाधिशांनी मला कोणी फिर्यादी आहे काय हें
पाहण्यास सांगितले आहे, तर पाहूं कोणी आहे कीं काय . ( मोठ्याने ओरडून ) कोणी फिर्यादी आहे काय , फिर्यादी ?
शका० : अरे , हा तर अर्जदारालाच हांक मारतो. ( डौलानें ) अरें ए , शोधनका , न्यायाधिशाला कळिव कीं , राजशालक संस्थानक फिर्यादी आले आहेत.
शोध० : आज पहिल्यानेच हा राजशालक फिर्यादी आला आहे काय ?
महाराज , आपण अंमळ थांबा , आंत कळवून येतो. ( तसे करुन ) महाराज ,न्यायधिश म्हणतात कीं , तुम्हीं आज जा; तुमची फिर्याद पहायला आज अवकाश नाही.
शका० : काय , माझी फिर्याद न्यायाधिश पहात नाही काय ? कांही चिंता नाही ; जर तो पहात नाही तर माझा मेव्हणा भगिनीपति पालकराजा याची विनंती करुन व बहिणीची भीड घालून , दुसरा न्यायाधिश आणवितो.
( रागानें जाऊं लागतो. )  
शोध० : महाराज , घटकाभर थांबा . तुमचे बोलणे न्यायाधिशानां जाऊन कळवितो . ( जाऊन येतो. ) तुम्हांला न्यायाधिश बोलाविताहेत व तुमची फिर्याद आजच पाहातो असे म्हणतात. चला .
शका० : ( मनांत ) पहिल्यानें  म्हणाले  " पहात नाही , "  आणि मग म्हणतात  पाहतो " यावरुन न्यायाधिश मला भ्याले असे वाटते. तर आतां मी जें - जें सांगेन तें सर्व त्यांना खरें मानणे भाग आहे. असो . आंत जावें . ( न्यायाधिशा- जवळ बसतो. )
न्याया० : ( मनांत ) अहो , फिर्यादीचा हा किती तरी उध्दट्पणा ! ( उघड ) अहो , तुम्ही तेथे बसा. ( जागा दाखवितो. )
शका० : आं , काय म्हणतां ? ही सर्व भूमि माझीच आहे. मला पाहिजे तेथें मी बसेन. ( श्रेष्ठीस ) हा मी बसलो  पहा . ( शोधनकास ) अहो मी येथेंच बसेन . ( न्यायाधिशाच्या डोकीवर हात ठेवून ) हा मी येथे बसलो .
न्याया० : आपण फिर्यादी आहां काय ?
शका० : यांत काय संशय ?
न्याया० : काय फिर्याद ? बोला .
शका० : मी तुमच्या कानांत सांगेन , मी मोठ्या अगडबंब कुळात उत्पन्न झालो आहे. माझा बाप राजाचा सासरा आहे. माझ्या बापाचा राजा जावई आहे . मी राजाचा मेव्हणा आहें , समजलां ?
न्याया० : हें सर्व खरें आहे, परंतू --
श्लोक
कीं कुलेनोपदिष्टेन, शीलमेवात्रा कारणम् ॥
भवन्ति नितरां स्फीता सुक्षेत्रे कंटकद्रुमा : ॥
-- असो , तुमची फिर्याद काय आहे बोला .
शका० : मी असें म्हणतों कीं , जरी मी अपराध केला तरी माझे कोण काय करणार आहे ? माझ्या मेव्हण्याने सुप्रसन्न होऊन मला क्रिडायला म्हणा , रक्षायला म्हणा किंवा छेदायला म्हणा , सर्व उद्यानांमध्ये श्रेष्ठ असे जे पुष्पकरंडक नामक जीर्णोद्यान दिले आहे, ते उद्यान पहायला , पुष्ट करायला अथवा शुष्क करायला म्हणा , मी तेथे नेहमी जात असतो. तेथे पडलेले स्त्रीचे प्रेत मी दैवयोगाने पाहतो किंवा पाहात नाही ; हो हो मी काल पाहिले.
न्याया० : ती स्त्री कोणाची कोण हें तुम्हाला माहीत आहे काय ?
शका० : अहो ती ठाऊक कशी नाही असणार ? अहो ती या नगरीचें भूषण अशी अलंकारांनी भूषित वसंतसेना ! तिला कोणी कुपुत्रानें धनलोभास्तव बाहुपाशांनी मुद्दाम मारलें . मी नाही हो !
न्याया० : नगरांतील रखवालदारांनी फारच सुस्ती ही. असो ; अहो श्रेष्ठी कायस्थ, " मी नाही हो " हाच या खटल्याचा मुद्दा लिहून ठेवा .
( लिहून ठेवितो. )
श्रेष्ठी : आज्ञा.
शका० : ( मनांत ) काय हें आश्चर्य ! बोलण्याचे घाईनें मी भलतेच बोलून आपला नाश करुन घेतला . असो . आतां संपादणी केली पाहिजे . ( उघड ) अहो न्यायाधिश , मी बोललो तें तुम्ही समजलां नाही. मी पाहिली असें मी म्हणालो , उगीच असें काय करितां ? ( पायाने ती अक्षरे पुसून टाकतो. )
न्याया० : धनलोभास्तव बाहुपाशांनी मारली असें आपण कशावरुन म्हणतां ?
शका० : अहो , यांत काय कठीण ! अलंकार घालण्याची जितकीं स्थानें तितकीं सारी रिकामी आहेत , यावरुन मी असा तर्क केला.
न्याया० : हो हो ! असें असेल तर तुमचा तर्क खरा आहे.
शका० :  ( मनांत ) मी दैवाच्या बळानें वाचलों म्हणायचा !
श्रेष्ठी० : ( न्यायाधिश ) आतां हा खटला कोणावर जाईल बरें ?
न्याया० : खटल्याचे प्रकार दोन आहेत. एक वाक्यानुसारें निर्णय आणि एक अर्थानुसारें निर्णय. वाक्यानुसारें निर्णय हा वादीप्रतिवादी यांच्या बोलण्यावरुन केला पाहिजे ; आणि अर्थानुसारें निर्णय हा न्यायाधिशाच्या बुध्दिकौशल्यावर आहे.
श्रेष्ठी० : तर हा खटला वसंतसेनेच्या आईकडे जाईल .
न्याया० : यांत काय संशय ! अरे शोधनका , वसंतसेनेच्या आईकडे  जा आणि तिचे मन न दुखवितां तिला घेऊन ये. ( तो जातो. )
शका० : वसंतसेनेची आई कशाला पाहिजे मध्यें ?
न्याया० : अहो हे न्यायाचे काम आहे, पुराव्यावाचून कोणतीहि गोष्ट करितां येत नाही.
( शोधनक वसंतसेनेच्या आईला घेऊन येतो. )
म्हातारी : ( आपल्याशीं ) माझी मुलगी चारुदत्ताच्या घरी गेली आहे. आणखी हां म्हणतो कीं , तुम्हाला न्यायाधिशांनी बोलाविले आहे. तेव्हां काय असेल बरें हें ! माझ्या पोटात तर धस्स झालें आहे. कांही सुचत नाहीं . बाबारे , कोणत्या वाटेंने जाऊं ?
शोध० : बाई , अशी इकडून ये.
म्हाता० : ( न्यायाधिशांजवळ जाऊन ) बाबांनो , तुम्हाला उदंड आयुष्य असो !
न्याया० : म्हातारे ,आलीस , ये बैस.
शका० : आली का बुढ्ढी थेरडी कुंटीण ,आली .
न्याया० : म्हातारे , तूं वसंतसेनेची आई काय ?
म्हाता० : होय बाबा.
न्याया० : बरे , या वेळेस तुझी मुलगी कोठें आहे ?
म्हाता० : ती आपल्या मित्राच्या घरीं गेली आहे.
न्याया० : तिच्या मित्रांचे नाव काय ?
म्हाता० : ही तर लाजेची गोष्ट आहे. महाराज , हें लोकांनी विचारावे. आपल्यासारख्यांनी विचारु नये.
न्याया० : हरकत नाहीं . हे न्यायाचे काम आहे.
म्हाता० : तर मग सांगतें . वेणीदत्तशेटीचा नातू , सागरदत्तशेटीचा मुलगा ज्यांचे नाव श्रेष्ठ चारुदत्त , त्याच्याकडे माझी मुलगी यौवनसुखाचा अनुभव घेण्याकरितां गेली आहे.
शका० : ( आवेशानें उठून ) ऐकले कां ? ऐका , हीं अक्षरें लिहून ठेवा. आतां चारुदत्तावर माझी फिर्याद आहे.
श्रेष्ठी० : चारुदत्त तिचा मित्र आहे यांत कांही दोष नाही.
न्याया० : असो. हा खटला चारुदत्तावर जातो यांत कांही संशय नाही.
श्रेष्ठी० : होय . असेच वाटते खरें .
न्याया० : अहो ; वसंतसेना चारुदत्ताच्या घरीं गेली आहे हीं अक्षरें लिहून ठेवा. या खटल्याचा मुख्य मुद्दा हाच. आतां चारुदत्ताला बोलावून आणले पाहिजे. अथवा व्यवहार बोलवितो , आमच्याकडे काय आहे ! शोधनका , त्या श्रेष्ठ चारुदत्ताकडे जा आणि कांही कारणाकरितां न्यायाधीश आपल्या दर्शनाची इच्छा करिताहेत , तर तेथपर्यंत एकवार चलावें असें सांगून घाई न करितां , त्याच्याच छंदाप्रमाणे सत्कारपूर्वक त्याला घेऊन ये .
( शोधनक जातो व चारुदत्तास घेऊन येतां )
चारु० : ( संचित ) राजाला माझें कुलशील माहीत असून आज जेव्हां मला न्यायाधिशांनी बोलविलें आहे , तेव्हां काही ठीक लक्षण दिसत नाही. ( अपशकून झालासें दाखवून ) अरे --
पद -- ( चाल -- लावणीची )
आर्द्र नसुनि हा भूमिभाग कां स्खलन चालतां बहु होतें । वामबाहु कां कंप पावतो स्फुरण येत कां नयनांतें ॥१॥ शकुनि पक्षि हे
दु:शब्दानें भेदिति कां मम ह्र्दयातें ॥ कर्कश रव हा वायस करिती दुत दटाविति कां मातें ॥२॥ चाल ॥ हा भुजंग पडला मार्गावरि
येऊनि कां फुगवि उदर हा वक्र असा होउनि ॥ कां जिव्हा हलवी अशी मजला लक्षुनि ॥ पाहुनि हे अपशकुन यापरी माझ्या मनिं
येतें । कृतांत धांवुनि संनिध आला पसरुनियां निजवदनातें ॥३॥
-- असो . सर्व प्रकारें संरक्षण करणार ईश्चर समर्थ आहे.
शोध० : आर्या चारुदत्ता , असा इकडून ये.
न्याया० : हाच काय चारुदत्त ? वा: ; याची आकृति कशी आहे ? वाटोळे गरगरीत डोळे , उंच कपाळ , ह्या याच्या आकृतीवरुन याच्या ठिकाणी अपराध संभवत नाही. कारण --
श्लोक
नागेषु गोषु तुरगेषु तथा नरेषु ॥
नह्याकृति : सुसदृशं विजहाति वृत्तम् ॥१॥
चारु० : अधिकार्‍याचें कल्याण असो ! अहो , नियुक्त पुरुषांनो , तुमचें कुशल असो !
न्याया० : आर्या चारुदत्ता , तुझें स्वागत असो. अरे शोधनका , या श्रेष्ठाला बसायला आसन दे. ( चारुदत्त बसतो. )
शका० :  ( रागाने ) आलास काय रे , स्त्रीघातक्या, आलास ? ( गर्वानें ) वाहवा रे न्याय ! वाहवा रे व्यवहार ! काय अधर्म हा ! स्त्रीघातक्या अपराध्यांना आसन बसायल देतात. असो. देऊं द्या. पाहतों आतां .
न्याया० : आर्या चारुदत्ता , हिच्या लेकीबरोबर तुझ्री मैत्री आहे काय ?
चारु० : कोणाच्या ?
न्याया० : ह्या म्हातारीच्या ?
चारु० : आर्ये ,तुला अभिनंदन करितो.
म्हाता० : वत्सा , तुला उदंड आयुष्य असो ! हाच तो चारुदत्त. ह्यालाच माझ्या मुलींने नवयौवन अर्पण केले.
न्याया० : आर्या,ती गणिका तुझी मैत्रिण आहे काय ?
चारु० : ( लाजल्यासारखे करितो. )
शका० : लाजेंने किंवा भयानें आपलें दुष्कर्म छपवितोस काय ? द्र्व्यलोभास्तव वसंतसेनेचा घात करुन , आतां मुकाट्यानें बसतोस काय ? हा राजशालक तसें करणार नव्हें .
न्याया० : आर्या , हा न्याय आहे,लाज काय कामाची ? खरें सांग काय तें .
चारु० : अधिकार्‍यानो,ती गणिका माझी मित्र आहे असें मी कसे सांगूं ? अथवा हा दोष यौवनाकडे आहे, चारित्र्याकडे काय आहे ?
न्याया० : आर्या चारुदत्ता , येथे ब्राह्मण सभासद आहेत. अधर्म शंका मनांत आणूं नकोस.हा व्यवहार आहे. येथें लाज काय कामाची ?
चारु० : अहो , माझा कोणाबरोबर व्यवहार आणि माझ्यावर फिर्याद करणारा कोण ?
शका० : अरे , मी  - मी . ! माझ्याबरोबर आहे तुझा व्यवहार.
चारु० : तुझ्याबरोबर काय ? मग मात्र प्रसंग कठीण आहे.
शका० : अरे स्त्रीघातक्या ! सोन्यामोत्यांच्या अलंकारानीं भूषित अशी जी वसंतसेना तिला मारुन , आतां साधुपणाचा डौल मिरवतोस काय ?
चारु० : काय भलतेंच बोलतोस हे !
न्याया० : आर्या चारुदत्ता , तूं त्याच्याशीं कशाला बोलतोस ? आम्ही विचारतो तें सांग .ती गणिका तुझी मैत्रिण आहे कीं नाही ?
चारु० : होय , आहे खरी.
न्याया० : बरें , आतां ती वसंतसेना कोठें आहे ?
चारु० : ती आपल्या घरी गेली.
न्याया० : ती घरी कशी गेली , केव्हां गेली व बरोबर कोण होतें तें सांग .
चारु० : ( मनांत ) ती का लपून छापून गेली असें सांगूं ? ( विचार करितो. )
श्रेष्ठी : आर्या , सांग - सांग लौकर.
चारु० : घरी गेली इतकें मला माहीत आहे. याहून मला काहीं माहीत नाही.
शका० : अरे , माझ्या पुष्पकरंड्क जीर्णोद्यानांत नेऊन , धनलोभास्तव बाहुपाशांनी मारुन , आतां ती घरी गेली असें म्हणतोस काय ?
चारु० : अरे ,असे असंबध्द भाषण करणार्‍या , तुझ्या तोंडाकडे पाहून मला संशय येतो. कारण गुप्तपणें नीच कर्म करणार्‍याप्रमाणें तुझे ओठ काळे दिसतात , आणि हेमंत ऋतुंतल्या कमलाप्रमाणे तुझॆ तोंड निस्तेज दिसतें .
न्याया० : हा श्रेष्ठ चारुदत्त असें नीच कर्म कसे करील बरें ?
शका० : पक्षपाताने न्याय होत आहे बरें !
न्याया० : चल मूर्खा , चारुदत्तावर असा भलताच आरोप करितांना तुझी जिव्हा कशी झडली नाहीं ? तुझा देह कसा गळून पडला नाही ? अरे --
साकी
अगणित धनदानानें केले , जन बहु तुष्ट जयानें
धर्माचरणीं मग्न असे जो नम्र सदा विनयानें ॥
नरवर तो ऐसें ॥ पातक आचरील कैसें ? ॥१॥
शका० : पक्षपातानें होतो आहे बरें न्याय !
म्हाता० : अरे दुष्टा चांडाळा ! ठेव म्हणून ठेविलेले सुवर्णालंकार चोरानें नेले म्हणून त्याचा मोबदला ज्यांने पृथ्वीच्या मोलाची रत्नमाला दिली,तो धनलोभास्तव असें कार्य कसे करील ? कोणा मेल्याचें हें कर्म असेल ते असो. या बापड्यावर विनाकारण आरोप आला आहे. माझी बया मला टाकून कोठें गेली  ! ( रडूं लागते. )
न्याया० : आर्या , ती पायांनी कीं गाडींत गेली ?
चारु० : खरें विचाराल तर ती माझ्या देखत कांही गेली नाही ; मग ती कशी गेली हें मी काय सांगूं ?
( वीरक येऊन प्रणाम करितो. )
न्याया० : कोण हा ? नरभक्षक वीरक ? कां आलां बरें ?
वीर० : महाराज , सरकारांनी कैद करुन ठेवलेला आर्यक पळाला. त्याला मी शोधत असतां एक बुरख्याची गाडी जातांना माझ्या दृष्टीस पडली. ती कोणाची , काय वगैरे विचारपूस करीत असतां , " तूंच पाहणारा कोण ? ही गाडी मी पाहणारा, " असा तंटा करुन चंदनकाने मला लाथा मारल्या . तर सरकारांनी माझी दाद घ्यावी ही विनंति आहे.
न्याया० : बरें , गाडी कोणाची याची चौकशी तूं केलीस का ?
वीर० : होय महाराज, त्या गाडीवाल्याला विचारलें त्यावेळेस तो म्हणाला, " ही गाडी चारुदत्ताची असून आंत वसंतसेना बसली आहे व पुष्पकरंड्क जीर्णोद्यानांत क्रिडा करण्याकरितां चालली आहे. "
शका० : अहो , हें पुन: ऐकून घ्या . मुद्याची गोष्ट आहे, लिहून ठेवा. यावरुन मी म्हणतों हें खरें किंवा खोटें याविषयी तुमची खात्री झाली असेलच .
न्याया० : ( मनांत ) चारुदत्तरुपी चंद्राला ग्रासण्याकरितां , हा दुष्ट राहूच उत्पन्न झाला आहे कीं काय कोण जाणे . असो . वीरका ,तुझा न्याय मागाहून पाहूं. अगोदर बाहेर दरवाजापुढे घोडा तयार आहे त्यावर बसून पुष्पकरण्डक जीर्णोद्यानांत जा आणि तेथें एखादें स्त्रीचें प्रेत पडलें आहे कीं काय हें पाहून ये.
वीर० : ( जाऊन परत येऊन ) महाराज तेथें एक स्त्रीचें प्रेत पडलें आहे परंतू कोल्ह्याकुत्र्यांनी खाल्ल्यामुळें अमकीचेंच असें म्हणतां येत नाही.
न्याया० : बरें , पण तें प्रेत स्त्रीचेंच असें तूं कशावरुन म्हणतोस ?
वीर० : तिचे केश आणि हातपाय तुटून पडले आहेत यावरुन मी म्हणतों.
न्याया० : शिव ! शिव ! लोकांच्या दुर्वतनास धिक्कार असो ! जसजसा जास्त विचार करावा तसतसा अधिकच दोष दृष्टोत्पत्तीस येतो. एकंदरीत व्यवहारवृत्ती कांही चांगली नव्हें हेंच खरें .
चारु० : हा दुर्दैव ! काय दशा ही ?
पद
फुलतांचि कुसम ते येति मधुप धांवोनी ॥
मकरंद तयांतिल सेवाया लागोनी ॥
-- बरे उलटपक्षीं --
येतांचि दुर्दशा नरा छिद्र तें बघुनि ॥
बहु अनर्थ पडती तयावरी येवोनी ॥१॥
न्याया० : आर्या , हा राजशालक म्हणतो ही गोष्ट तुझ्याकडून घडली कीं नाही ?
चारु० : तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मला विचारतां कीं ही गोष्ट तुझ्याकडून घडली की नाही ? परंतू विचार करा कीं , जो दुष्ट ,घातकी , नेहमी असत्य बोलणारा , अशा मनुष्याचें भाषण कोणी तरी विचारी मनुष्य खरें मानील कां ? आणि दुसरें असे
ध्यानांत आणा कीं --
( पद-- ( असावरी . त्रिताल )
काय वधिन मी ती सुमती ॥ नवयुवती अबला , साश्रुलोचना धरुनि
कुरल कुंतल या हातीं ॥धृ०॥ कोमल कुसुमित लता कधींही ॥ लव -
वुनि कुसुमें खुडिलीं नाहीं ॥ आजवरी ती ॥१॥
शका० : काय हो , अद्यापि तुम्ही पक्षपातानें न्याय चालवितां ? हा चारुदत्त धडधडीत दोषी असून त्याला तुम्ही आसनावर बसूं देतां हें काय ?
न्याय० : शोधनका , तसें कां करीनास ?
शोध० : ( चारुदत्तास खाली उतरावयास सांगतो. )
चारु० : नीट विचार करा बरें ! ( खाली उतरतो. )
शका० : ( आनंदाने आपल्याशीं ) वाहवा ! मी केलेले पाप दुसर्‍याच्या डोकीवर कसें चढलें पहा ! आतां ज्या आसनावर चारुदत्त बसला होता , त्या आसनावर मी बसतो. ( तसे करुन ) चारुदत्ता , आतां बघ तर खरा माझ्याकडें आणि मीच मारली असें बोल.
चारु० : अहो अधिकार्‍यांनो , नीट विचार करा . या दुष्टाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. ( सुस्कारा टाकून ) --
पद --  ( चाल -- निज मज रक्षाया )
मजवरि हें आलें ॥ संकट कैसें ॥ मित्रा नच कळलें ॥धृ०॥ उत्तम कुलिं तूं झालिस कांते ॥ काय तुझी गति होइल विमले ॥१॥
बाळा सुकुमारा ॥ कुमारा ॥ ह्र्दयानंदकरा ॥ बाळपणीं या खेळ सुखानें ॥ सौख्य पुढे तुज काही न उरलें ॥२॥
-- ( चिंतन करुन ) वसंतसेनेकडील , वर्तमान घेऊन येण्याकरितां मैत्रेयाला तिकडे पाठविले आहे आणि मुलाला गाडी करण्याकरितां तिनें जे अलंकार दिले होते , ते नेऊन देण्याकरितां त्याला सांगितले आहे. तो अजून घरी आला कीं नाही ! आणि त्याला हें वर्तमान कळलें कीं नाहीं ? पण त्याला हें कळले असतें तर तो ताबडतोब इकडे आला असता.
( दागिन्यांची गांठोडी घेऊन मैत्रेय येतो. )
मैत्रे० : हे अलंकार वसंतसेनेला देऊन आपण लवकर माघारें परतावें . ( इकडे तिकडे फिरुन ) कोण रे हा ? रेभील ? रेभीला,तूं असा उव्दिग्न कां दिसतोस?( ऐकलेसें करुन ) काय म्हणतोस ? माझ्या मित्राला न्यायसभेत बोलावून नेले आहे ? असो. आधी तिकडे गेलें पाहिजे. वसंतसेनेकडें मग जाईन . ( इकडे तिकडे पाहून ) हीच ती न्यायसभा.तर आतां आंत जावे.( जाऊन )
अधिकार्‍यांनो , तुमचें कुशल असो. अहो पण माझा मित्र चारुदत्त कोठें आहे ?
न्याय० : तो आहे पहा. ( दाखवितो. )
मैत्रे० : मित्रा , कुशल आहे ना ?
चारु० : झालें तर होईल .
मैत्रे० : क्षेम तरी ?
चारु० : तेंहि तसेंच.
मैत्रे० : अरे, तूं असा उव्दिग्न कां दिसतोस ? तुला येथे कोणी बोलाविलें आणि हें आहे काय ?
चारु० : मित्रा , काय सांगू ! --
साकी
इहपरलोकांविषयी शंका सोडुनि म्यां दुष्टानें ॥
साक्षात दुसरी रतिच अशी स्त्री , पुढिल वदावें त्यानें ॥१॥
मैत्रे० : मित्रा , काय काय ?
चारु० : ( कानांत ) असें .
मैत्रे० : कोण , कोण असें म्हणतो ?
चारु० : ( शकारास दाखवून ) हे राजेश्री कृतांतस्वरुप अनुवाद्क होऊन असें म्हणताहेत आणि माझी अशी दशा होण्याला हेंच कारण.
मैत्रे० : अरे , पण ती आपल्या घरी गेली असें कां तूं सांगत नाहीस ?
चारु० : मित्रा , मी सर्व सांगितले. परंतु --
दिंडी
जेथ मित्रा तत्त्वार्थ पहायाला ॥
शक्ति नसते भूपाललोचनांला ॥
तिथें वक्त्याला दैन्य रोकडें तें ॥
समज अथवा बहु निंद्य मरण येतें ॥१॥
मैत्रे० : अहो अधिकार्‍यसानों , तुम्ही सुज्ञ आहां . मी बोलून दाखवावें असें नाही. अहो , ज्या पुरुषानें परोपकारार्थ  बागा ,देवालयें , तळी इत्यादि धर्मकृत्यें करुन ज्या उज्जयिनी नगरीला शोभा आणिली , तो हल्ली दरिद्री झाला म्हणून निंद्य कर्म करील काय ?
( शकारास ) अरे रांड्लेका ! राजशालका संस्थानका ! दुष्टा ! अंगावर सोन्यामोत्याचे दागिने घालून , माकडासारखा नटून मोठी प्रतिज्ञा मारतोस काय ? माझ्यापुढें बोलूं पाहूं ? अरे , हा माझा मित्र किती दयाळू , किती उदार , याची योग्यता तुला माकडाला काय सांगून  
उपयोग ! अरे , पान तुटेल या भितींने लता देखील वांकवीत नाही , तो उभय लोकांबद्दल असे दुष्ट कृत्य करील काय ? ( दोघांची मारामारी होते, मैत्रेयाच्या खांकेतून गाठोडे पडते. )
शका० : ( गांठोडी घेऊन ) पहा हो हा मुद्दा . हेच त्या बिचार्‍या गणिकेचे अलंकार याने आपल्या सोबत्यापाशी दिले होते.
चारु० : हर हर --
साकी
दुर्दैवाने वेळ साधिली , या समयिंच हा पडला ॥
अलंकारसमुदाय भूवरी पाडिल खचितचि मजला ॥
घोर अशा व्यसनीं ॥ उरली प्राणशा न मनीं ॥१॥
न्याया० : अरेरे ! फार वाईट गोष्ट झाली .
श्रेष्ठी० : म्हातारे , तुझें लक्ष इकडे आहेना ? हे दागिने कोणाचे ?
म्हाता० : तसें दिसतांत , पण हे ते नव्हेंत.
शकार० : डोळ्यानीं बोलतेस तसें वाचेने कां पहात नाहीस ?
म्हाता० : मोठा शहाणा आला आहे ! चल नीघ मेल्या !
न्याया० : बाई , नीट पहा , हे दागिने तेच की दुसरे आहेत ?
म्हाता० : महाराज , कारागिराची कुशलता पाहून भ्रांति पडते , पण ते हे नव्हेत.
न्याया० : तर मग हे दागिने कोणाचें हे तुझ्याने सांगवेल ?
म्हाता० : महाराज, मी सांगितले ना कीं ते हे नव्हेत . कारागिरांनी तसे घडविले असतील. कोणाचें तें मीं काय सांगू ?
न्याया० : हो असेहि असेल. वस्तुसारख्या वस्तू पुष्कळ असतात.
श्रेष्ठी० : चारुदत्ता , हे दागिने तुझे आहेत काय ?
चारु० : नाहीं , येथे जी म्हातारी बसली आहे तिच्या मुलीचे.
न्याय० : तर हे तुझ्याकडे कसे आले ?
चारु० : सांगतो, ऐकावें. ती माझ्या घरुन जातेवेळी तिनें माझ्या मुलाला गाडी करण्याकरितां हे दिले होते.
न्याय० : आर्या , खरें असेल तेच सांग .
शका० : तिला प्रथम पुष्पकरंडक जीर्णोद्यानांत नेऊन मारुन तिच्या अंगावरचे दागिने घेतलेस आणि आतां असें सांगतोस ?
न्याय० : आर्या चारुदत्ता , खरें सांग .जर तूं खरें न बोलशील तर निरुपायास्तव खोटें बोलण्याबद्दल तुला कडक शिक्षा करावी लागेल.
चारु० : महाराज , होणारापुढें इलाज नाही. मी तर पाप मुळीच केले नाही. आतां तुम्ही बलात्कारानें माझ्या अंगी लावतां , तर माझा काय उपाय आहे ? ( मनाशीं ) आतां वसंतसेनेशिवाय मला तरी वांचून काय करावयाचे आहे ( उघड ) --
( इह परलोकाविषयी इत्यादि साकी म्हणतो. )
शका० : मी म्हणतोच आहें " तूं मारलीस " म्हणून . अरे , तूं आपल्या तोंडाने बोल " मीं मारली "असे.
चारु० : ते तूंच बोल .
शका० : ऐका ऐका , अहो अधिकार्‍यानों , ऐका . याने मारली असे याच्याच बोलण्यावरुन सिध्द झालें. आतां याला दंड करणे तो करावा.
न्याय० : अरे शोधनका , राजशालक म्हणतो तसें केले पाहिजे . दुतांनो धरा या चारुदत्ताला आणि बांधा.
म्हाता० : अहो न्यायाधीशमहाराज, कृपा करा. वसंतसेनेची ठेव चोरांनी नेली असून ज्याने भरुन दिली , तो पुरुष असें अकार्य करील काय ? माझी मुलगी मेली ती मेली. तिचें आयुष्यच संपले. तिच्याकरितां या श्रेष्ठाला मारुं नये. दुसरे या वादात मी वादी आणि हा श्रेष्ठ प्रतिवादी आहे; तेव्हां मी सांगते की माझा आरोप या चारुदत्तावर मुळींच नाहीं ; यासाठी आपण याला सोडावे.
शका० : अगे ए गर्भदासी कुंटिणी , चल , नीघ येथून .ल याचा तुझा काय संबंध आहे ? याच्याशी तुला काय करायचे आहे ?
न्याया० : बाई , तुझें बोलणे कांही उपयोगी नाही. आतां तूं जा . कोण आहे रे तिकडे ? काढा याला बाहेर.
म्हाता० : बाळा , तुझा शेवट असा व्हावा काय ! ( जाते. )
शका० : मला जें करावयाचे होतें तें मी आपल्यासारखें केले.
न्याया० : आर्या चारुदत्ता , हा राजाच्या घरचा व्यवहार आहे. न्याय करणे आम्हाकडे आहे. तरी शोधनका, पालकराजाला असे सांग कीं , मनुच्या वचनाप्रमाणे वध्य असलाल तरी ब्राह्माण मारु नये. याकरितां आमच्या मतें याला हद्दपार करावे. ( शोधनक जाऊन येतो. )
शोध० : महाराज , आपल्या आज्ञेप्रमाणे कळविले; परंतु त्यांनी अशी आज्ञा केली कीं , द्रव्यलोभास्तव ज्यानें स्त्री मारली तो जरी ब्राह्मण असला तरी त्याची धिंड काढून , त्याने वसंतसेनेला ज्या ठिकाणी मारलें ; त्या ठिकाणी मार देऊन दक्षिण स्मशानात सुळी द्यावा अथवा त्याचा शिरच्छेद करावा. जो कोणी असा अपराध करील त्याला असे शासन होईल अशी ताकीद करावी.
चारु० : काय हो अविवेक हा ! पालकराजाला कांहीच विचार नाही ; अथवा त्याच्याकडे तरी काय दोष !
पद -- ( चाल -- कल्पतरु हे जिकडे तिकडे. )
ऐशा व्यवहाराग्निंत मंत्री लोटुनि ज्या देती ॥
तया नृपाच्या करीं सदा ते अविचारचि होती ॥१॥
दोष नव्हे हा भूपाळाचा ,मंत्रि कुटिल असती ॥
श्वेत काकसे राजशासना, दूषण ते आणिती ॥२॥
केवळ याच्या अन्यायानें , मृत्युमुखीं पडती ॥
निरपराधी जन किति निष्पापी नाही , तयां गणती ॥३॥
-- सख्या मैत्रेया, जा माझ्या मातेला माझा प्रणाम सांग आणि तिला पुत्रशोक न बाधेल असे कर. माझ्या स्त्रीला फार फार विचारलें म्हणून सांग आणि माझा पुत्र रोहसेन लहान आहे त्याचा प्रतिपाल कर .
मैत्रे० : मित्रा , मूळ तुटल्यावर वृक्षाचें पालन कसें होणार ?
चारु० : मित्रा , असे म्हणूं नको . पुत्र पित्याचा आत्मा अशी श्रुति आहे ,करितां माझ्यावर जसें प्रेम होतें तसेच त्याच्यावर कर.
मैत्रे० : मित्रा, तूं माझा प्रिय मित्र असतां तुझा अंत झाल्यावर मी जिवंत कसा राहीन बरें ?
चारु० : कसेंहि करुन माझ्या पुत्राची आणि माझी एकवार भेट करीव.
मैत्रे० : बरें , जातों .
न्याया० : शोधनका ,आरोपीस दुर ने आणि मांगांस आज्ञा दें कीं , याला घेऊन जाऊन राजाज्ञेप्रामाणे करा.
शोध० : श्रेष्ठा चारुदत्ता , ये असा इकडून --
चारु० :
पद -- ( झंपा )
अधम किति पालका अससि भूपा ॥ न्यायपथ सोडिसी पापकूपा
॥धृ०॥ सत्व घ्यावें असे चित्तिं होतें तरी, वह्नि , विष, जल , तुला
यांहिं अथवा ॥ कंठ माझा तुवां कापुनी करवतीं ॥शांतवाया मना
प्राण घ्यावा ॥१॥ टाकुनी मार्ग हा शत्रुवचने कसे , मारिसी मज
असें ब्राह्मणाला ॥ पुत्रपौत्रांसवें नरकिं जाशील रे, हाचि माझा असे
शाप तुजला ॥३॥
(सर्व जातात. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP