अंक पहिला - भाग ११ वा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.


शका० : ( चेटास ) माझा मित्र विट खराच गेला काय रे ?
चेट : न्हइ, बसलाया जनु !
शका० : तर चल आपणहि जाऊं .
चेट : मग ही आपली तरवार सरकारांनीच घ्यावी.
शका० : नको नको , तुझ्यापाशीच असूं दे.
चेट : तसं न्हवं ,आपल्यावानी शिरिमंताची तरवार मला गरिबाला कशापाइ व्होवी ?
जकडल्या तकड असल म्हजी बर !
शका० : ( उलटी घेऊन ) काय रे चेटा , आतां मी कसा ऐटीत शोभतो नाही ?
चेट : त्ये काय इचारावं महाराज ! -
लावणी
कंगनिदार भर्जरी पिळाची पगडि शिरावर ॥
ऐटबाज पोषाक हातामंदि नंगी समशेर ॥
शिपाइबानिचा डौल मजेचा झोक नोकदार ॥
बगुन कामिना तुमा नगरच्या पडतिल बेमार ॥१॥
( शकार आणि चेट जातात . )
मैत्रे० : गेली एकदांची पीडा . रदनिके, आतां याने जी तुझ्याशी दांडगाई केली ती चारुदत्ताला कळवायची नाही बर . नाहीतर तो आहे बिचारा आधीच दु:खाने पीडलेला, त्याला हें ऐकून दुप्पट खेद मात्र होईल  !
रद० : मी नावाची रदनिका आहे ; माझ्या तोंडातून एक अक्षरहि निघायचे नाही. तुम्ही मात्र संभाळा.
मैत्रे० : बरें तर .
चारु० : ( वसंतसेनेस रदनिका समजून ) रदनिके, हा रोहसेन इकडे उघडयावर निजला आहे. संध्यकाळच्या थंड वार्‍यानें अगदी कांकडून गेला आहे. तर ह्याला तेवढा माजघरांत नेऊन निजीव आणि हा शेला त्याच्या अंगावर घाल . ( शेला तिच्या अंगावर फेकतो. )
वसंत० : ( शेला घेऊन ) हा मला आपली दासी समजला वाटतें ? असो. ( शेल्याचा वास घेऊन ) अगबाई -
पद - ( चाल -- आले वनमाळी रात्री. )
दासी ऐसें मानुनियां कार्य मला सांगतसे ॥
सुदिन काय उगवला आज मनीं वाटतसें ॥धृ॥
मधुर जातिसुमनांचा वास यास येत असे ॥
यौवनभर म्हणूनि याचा खास अजुनि पूर्ण असे ॥१॥
( शेला पांघरते . )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP