अंक चवथा - प्रवेश पहिला

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


( स्थळ - आश्विनशेटजीचें घर )

आश्विन - मनानं पुष्कळ ओढाताण केली; परंतु मीच खंबीर पडलो, म्हणून तें आवरंल गेलं; नाहीतर कांही धडगत नव्हती ! रेवतीच्या जहरी नेत्रभाल्यांच्या मार्‍यांतून मोठ्या - मोठ्या शर्थीनं बचावलो यांत संशय नाहीं ! बड्या - बड्या, मी - मी म्हणणारांची तारांबळ उडाली असती ! असो. झालं तें होऊन गेलं म्हणा ; पण ती जर आपल्या इमानाला जागली असती, तर माझ्या सौख्याला आणि चैनीला मर्यादा नव्हती ! ती एक लाखांत खुपसुरत पोरगी आहे वा: ! पण आतां हा विचार कशाला ? तिच्या खुपसुरतीशीं मला काय करायचं ? खुपसुरती म्हणजे एकंदर मुलामाच कीं नाहीं ? होता - बांधा चांगला होता !

पद ( बंधन वा बाधो. )
मृगनयना रसिक मोहिनी ॥ कामिनी होति ती मंजूळ मधुरा लपिनी ॥
नवयौवनसंपन्न रम्य गतिविलासिनी ॥धृ०॥
आल्हादक मुखचंद्रहि होता ॥ होती दृष्टि ती प्रेम - रस - वाहिनी ॥

पण हे वरचेच अलंकार कीं नाहीं ! जाऊं दे, तिचं नांव नको. तिच्या सदगुणांची आठवण नको पुन्हां ! एकदा संबंध तोडला तो तोडलां ! स्मरण नाहीं करायचा तिचं ! पण - तिचं स्मरण बुजायला काय कराव बरं ? रेवती, असा दगा दिलास अं-- ( आषाढ्या येतो. )
आषाढ्या - शेटसाहेब !
आश्विन - जाऊं द्या, जगांतच नाहीं म्हटलं, मोकळं झालं ! ( गुणगुणूं लागतो. ) "  गणिकेचा संग नको, बा रे ! "
आषाढ्या - ( मनाशीं ) गाण्याची लहर लागली आहे ( उघड ) शेटसाहेब ! शेटसाहेब, मला - जरा -
आश्विन - ( मनाशीं ) बस् , ठरला निश्चय ; त्याशिवाय भागायचं नाही. ( पाहून ) कोण आषाढ्या का रे ?
आषाढ्या - हें पत्र आलं आहे शेटसाहेब.
आश्विन - ( मनाशीं ) असं करील म्हणून कधीं ध्यानीं नाहीं. मनी नाहीं, स्वप्नीं नाही ! ( उघड ) आं ? हो, हो, काय म्हटलंस तूं ?
आषाढ्या - हें एक पत्र आलं आहे आपल्य नावांच.
आश्विन - आतां नको जा ! आणखीं केव्हांतरी दे ! ( मनाशीं ) तिचीं फळं ती भोगील, आपण मनाला कां उगीच ताप करुन घ्या ?
आषाढ्या - शेटसाहेब, बघा तरी अगोदर कोणाकडून आलं आहे तें ?
आश्विन - काय म्हटलंस ?
आषाढ्या - ( हळूचं ) मंगळवाड्याकडून आलं आहे, शेटसाहेब ! जरुर नाहीं त्याची ! ढुंकून नाहीं बघायचा मी त्या पत्राकडे ! चालता हो येथून ! तें फाडून टाक, तुकडे तुकडे कर, जाळून राख कर त्याची ! जा, जा !
आषाढ्या - ! ( मनाशीं ) हें लचांड निराळंच दिसतंय् ! हात दाखवला वाटतं त्या नायकिणीच्या पोरीनं, म्हणून अशी बिथरली आहे स्वारी ! ( उघड ) खरंच घेऊन जाऊं कां शेटसाहेब ? कां --
आश्विन - कां नाहीं कूं नाही ! तें पत्र पुन्हां दाखवलसं तर खबरदार ! आतां काय संबंध तिचा आणि तिच्या पत्राचा ?
आषाढ्या - म्हणजे शेटसाहेब, तिनं कांही --
आश्विन - पुन्हां तिनं -- तिचं नांव नको काढूस माझ्यासमोर ! ती म्हणजे अशी ( मनाशीं ) पण आपण कशाला तिच्याबद्दल वाईट बोला ? भेटलं नाही, बोललं नाही, पत्र वाचलं नाही किंवा निरोप ऐकला नाही म्हणजे झालं ! मग काय चालणार आहे तिच ? ( उघड )
आषाढ्या, आत्तांच्या आत्तां माझ्या मुशाफरीची तयारी करायला कारकुनाला जाऊण सांग ! आणखी माझी थोरली घोड्याची गाडी जोडून आण ! जा आधीं !
आषाढ्या - इतकी घाई ! मला वाटतं शेटसाहेब, आजचा बेत उद्या सकाळवर टाकला तर बरा, म्हणजे कदाचित् --
आश्विन - नाहीं , या घटकेला निघणार ! गाडी जोडून आण तूं !
आषाढ्या - मी म्हणतों शेटसाहेब, उद्यां सकाळी शिळोप्याचे वेळी त्रासहि नाहीं व्हायचा निघाल्यावर ! रात्रीच्या चांदण्यानं कदाचित् आपलं मग फिरलं म्हणजे पुन्हां अर्ध्या रस्त्यांतून परत यायची दगदग नको !
आश्विन - काय शहाणा आहे ! माझं मन म्हणे तिच्याबद्दल फिरणार ! अरे, धडधडीत नायकिणीची पोरगी ती ! तिची कशाला एवढी मिजास ! जा गाडी आण आधीं आणि तिलाहि एकदां पक्कं कळलं पाहिजे कीं, मी काही असा ढिला गडी नाहीं !
आषाढ्या - शेटसाहेब, याला इतकी मुशाफरीची तयारी कशाला पाहिजे ? आपली मर्जी खप्पा झाली आहे, हें तिला कळलं म्हणजे लोटंगण घालीत येईल पायांपर्यंत !
आश्विन - अशी ढ्कलून देईन आली तर - पण तुला काय त्याचं ? जा, सांगितलेलं काम तर मुकाट्यानं !
आषाढ्या - हुकूम शेटसाहेब, पण अगदीं सड्या स्वारीची एक मजलेची तयारी करायची ना ? कपडेबिपडे फार बरोबर नकोत ना ?
आश्विन - अगदीं सगळे पाहिजेत ! एक महिना बाहेर घालवायचा अशा बेतानें तयारी पाहिजे !
आषाढ्या - एक महिना कशाला शेटसाहेब ?
आश्विन - तुला काय त्याची पंचाईत ? मनांत आलं, ठरलं ! निश्चय केला तो नाहीं फिरायचा आतां ! हं जा ! ( जाऊं लागतो ) अश्शी मी तिची खोड मोडणार म्हणजे एक महिन्यांत तिचं दर्शन व्हायचं नाही आणि इतक्या अवधींत कदाचित विस्मरणही पडलं तर पडण्याचा संभव आहे. तिचं स्मरण झालं कीं भडका होतो अंगाचा ! आतां तसं जरा वाईट वाटतं अजून माझं मन तिच्याकडं ओढ घेतं. अजून वाटतं, कीं, पण छे, छे, छे, छे, छे, छे ! हा नेभळेपणा बिलकुल उपयोगी नाही ! तिचा आतां विचारच मनांत येऊं दिला नाही म्हणजे झालं ! पण ( मोठ्यानें ) आषाढ्या, अरे आषाढ्या, गेला नाहींस अजून ! समजलो मी. तें पत्र जाळून टाक म्हणून तुला सांगितलं तें कांहीं तुझ्या हातून व्हायचं नाही ! कुठें आहे तें पत्र ! दे फेंकून त्या कोपर्‍यांत, नाही तर आण इकडे ! मीच त्याची व्यवस्था करतों !
आषाढ्या - ( परत येऊन ) मला वाटलंच होतं मागाल म्हणून. हें घ्या शेटसाहेब ! जाऊं आतां गाडीं आणायला !
आश्विन - वरचेवर काय विचारतोस ? पांचशे आंकडे मोजीपर्यंत आली पाहिजे गाडी ! ( हुकूम म्हणून आषाढ्या जातो. ) फाडून टाकायचं तर ठरलंच, पण यांत त्यासंबंधानं काय मखलाशी केली आहे ती तरी पाहूं. ( पत्र उघडून वाचूं लागतो. ) " प्रिय वल्लभाच्या चरणीं नम्र रेवतीची विज्ञापना विशेष . काहीं वेळापूर्वी झालेल्या भेटींत मी आपली थट्टा केली त्याबद्दल मला फार वाईट वाटतं. त्या घटकेपासून माझ्या मनाला चटका लागला आहे. तरी या गरीब दासीची चुकी पोटांत घालून, एकवार भेट देण्याची कृपा करावी; म्हणजे आपल्या मनांत मजविषयी जो संशय आला आहे तो दूर करीन ! मूढ दासीनं अधिक काय लिहावं, हे विज्ञापना. " काय भ्रमिष्ट आहे पहा ! माझा संशय ही दूर करणार ! संशय उरला आहे कुणाला आधीं ? पुरी खात्री झाली आहे ! आतां अशा लाडीगोडीनं कांहीं व्हायचं नाही ! ( पत्र फाडीत ) मनाला चटका लागला आहे अं ! फार नाजूक मन ! ’ चुकी पोटांत घालून ’ काय लीनता ! पण मावली पाहिजे ना पोटांत ! ’ मूढ दासीनं अधिक काय लिहावं ?’ खरोखरचं मूढा ! नाही तर तिनं हे पत्रच लिहिल नसत. म्हणे ’ माझ्या प्रियवल्लभा ’ ! माझ्यासारखे आणखी किती प्रियवल्लभ असतील कोण जाणे ! लबाड, सोदी, कृतघ्न, विश्वासघातकी, गळाकापू कुठली ! ( पत्राचा चुरा फेंकून ) बरं झालं. माझं नशीब जोरावर म्हणून लौकर शुध्दीवर आलों ! तरी मला वैशाख सांगत होता-

पद ( ये गरज धाय धाय )
हा नाद सोड सोड ॥ अहिताचि न करि जोड ॥
मित्र करिति बोध गोड ॥धृ०॥
नायकिलें त्या बोधा ॥
होतों मी धुंद तदा ॥
अंध मंद मोडलि परी पुरति खोड ॥१॥

( पाहून ) अरे वा: ! वैशाख ! ( वैशाख येतो. )
वैशाख  - कां कसं काय ? कांहीं नवीन खबर ?
आश्विन - नवीन खबर हीच कीं, महिनाभर शहर सोडून आम्ही मुशाफरीला जाणार !
वैशाख - कधीं ? आणखी हा बेत केव्हां ठरला ?
आश्विन - आतां हा निघालोंच. आणखीं अर्ध्या घटकेनं - इतक्यांत येईल गाडी !
वैशाख - सडी स्वारी जाणार, कीं मिळून ?
आश्विन - ती ? आणि माझ्याबरोबर ? एकदां बोललांस तें बोललास, पुन्हां बोलूं नकोस !
वैशाख - खरंच आश्विनशेट ! राग आला तरी चिंता नाही, पण तुम्ही विनाकारण रेवतीवरती रागावलां आहांत. मी गेलों होतों तिच्या घरी. बरें. पण ती एक पत्र लिहिणार होती तुम्हाला !
आश्विन - तें पहा ! ते पहा तुकडे ! तिच्या पत्राचेच ते ! या खेपेला असा निर्धार केला आहे कीं, आपण काहीं हार जाणार नाही !
वैशाख - पण उगीच साप म्हणून दोरखंड झोडपण्यांत काय अर्थ आहे ? खरोखर तिच्याकडे कांहीं दोष नाही !
आश्विन - त्या दगाबाज, खोडसाळ बायकोबद्दल वैशाख, तूं माझ्या जवळ रतबदली करतोस ! मग काय म्हणायचं ?
वैशाख - तशी जर ती असती तर मी बोललों नसतों, पण सर्व बातमी मला लागली आहे. या प्रकरणांत बहुतेक दोष तुमच्यावर येतो.
आश्विन - अशी माझी खात्री केलीस तर तिच्याकडे जाऊन मी माझा दोष कबूल करायला एका पायावर तयार आहे. मग काय म्हणणं तुझं ?
वैशाख - चला तर तिच्याकडे जाऊं म्हणजे तीच तुमची खात्री करील.
आश्विन - ( रागानं ) तिच्याकडे जाऊं ! म्हणजे तूं माझी थट्टा करायला आलास वाटतं ? पुन्हां तिचं नांव घ्यायचं नाही; हा माझा संकल्प ; आणि म्हणतोस तिच्याकडे जाऊं ! भलतीच भीड घालायची ! बरं तिला भेटून आलों म्हणून सांगितलंस, तर घरीचं आहे वाटतं ती ?
वैशाख - हो, मग काय करते बिचारी ?
आश्विन - असे ना कां ? मला काय करायचं आहे तिच्याशीं ? पण या झालेल्या प्रकाराबद्दल तिला कांहीं तरी वाईट वाटतं का रे ?
वैशाख - वाईट ? तुम्हांला काय सांगूं आश्विनशेट ? मागं मी पुष्कळ वेळां तिच्याविरुध्द सल्ला दिला असेल पण माझी तर पूर्ण खात्रीं झाली कीं, ही नायकिण होऊन भलाईंत गरतीला लाजवील !  तुम्हीं तिच्यावर इतका वर्षाव केलात, पण तिच्या तोंडून एक वावगा शब्दहि  नाहीं ! मला तर धन्य वाटली तिची ! उलट ती तुमची तारीफच करीत होती !
आश्विन - नाहीं, तशी ती चांगली आहे हें मी कबूल करतो; पण नुसत्या तारफेला भाळणारा मी नव्हे ! तिच्या तोंडची तारीफ आणखी निंदा दोन्ही सारखीच. पण तुझ्याजवळ काय काय बोलली तें तरी ऐकूं दे !
वैशाख - तिनं इत्थंभुत हकीकत सांगितलीन ! सांगतांना डोळ्यांचं पाणी कांहीं खळलं नाही तिच्या  ! पहा म्हणजे झालं.
आश्विन - अरे, तीं सगळीं सोंग मला ठाऊक आहेत. जाऊं द्या मला कशाला आतां रिकामी उठाठेव ? पण खरंच रडत होती का ?
वैशाख - तुमच्या गळ्याशपथ ! तिची ती केविलवाणी मुद्रा पाहून मीसुध्दां एकदां डोळ्यांवरुन हात फिरविला. तिला रडविण्यांत तुम्हालां काय थोरपणा वाटत असेल तो असो !
आश्विन - मी तिला मुद्दाम रडवीन असं का तुला वाटतं ? त्या फाल्गुनरावाच्या बायकोनं मला सांगितलंन् तें ऐकलं असतंस तर असं खास म्हटलं नसतंस !
वैशाख - तेंसुध्दां कळलं आहे मला. आतां विचारतों त्याचीं मनोदेवतेला स्मरुन खरीं खरीं उत्तरं द्या ! तुमचं आणि तिचं ठरल्याप्रमाण, ती तुम्हालां रमाकांताच्या देवळांत भेटली. तुम्ही तसबीर दिलीत, देवासमोर आणाभाका झाल्या, इथपर्यंत सर्व ठीक झालं ! नंतर ती तेथून घरी जायला निघाली. ती म्हणजे एक नाजूक जाईचं फूल.  तिला कडक ऊन लागून वाटेंत जर घेरी आली तर हा तिचा दोष म्हणाल तुम्ही ?
आश्विन - मीं का वेडा आहे हा तिचा दोष म्हणायला ?
वैशाख - बरं, घेरी येऊन पडणार इतक्यांत सुदैवानं तिथं फाल्गुनराव होते. त्यांनी तिला सांवरुन धरलं, वारा घालून शुध्दीवर आणलं, यांत काहीं तिचा अपराध आहे ? न्यायाला स्मरुन मात्र उत्तर द्या हं !
आश्विन  - हा तिचा अपराध नाही, हें कुणीहि कबूल करील.
वैशाख - रास्त बोललांत ! बरं अगदीं भेदरुन, गेलेली, त्यांतून पुरी शुध्दीवर आली नव्हती; अशी स्थितींत हातांतून गळून पडलेल्या तसबिरीचं तिला भान राहिलं नाहीं, तर हा काय तिचा गुन्हा म्हणायचा ?
आश्विन - हा कसा तिचा गुन्हा होईल ? असं म्हणणारा शतमूर्ख असला पाहिजे !
वैशाख - अगदीं बरोबर बोललांत ! बरं, तिथं ती पडलेली तसबीर कुणाच्या हातीं लागली तर ?
आश्विन - तसबिरीसंबंधानं तिच्याकडे दोष नाही, हें केव्हांच माझ्या मनांत येऊन चुकलं आहे. पण फाल्गुनरावांच्या बायकोनं जो अप्रशस्त प्रकार पाहिलान् त्याबद्दल काय सांगणार तूं ?
वैशाख - तेंच सांगणार होतो.  अहो, धडधडीत अस्ताव्यस्त स्थितींत तिला फाल्गुनरावांनी पडतां  पडतां आपल्या अंगावर सांवरुन धरली होती, अशा प्रसंगी कृत्तिकाबाईंनी तिला आणि आपल्या नवर्‍याला पाहिलं, तेव्हां आधींच मत्सरानं जळणार्‍या तिच्या मनांत भलत्याच कल्पना आल्या, त्याला रेवतीनं काय करावं ? खरंच सांग, त्या स्थितींत तुम्ही काय केलं असतंत ?
आश्विन - ( चेहरा खुलत ) खरंच ! खरंच ! खरंच ! पण हें सगळं खरंच सांगतोस ना ? खराच असा प्रकार घडला ? माझ्या गळ्याशपथ !
वैशाख  - अगदीं तुमच्या गळ्याशपथ !
आश्विन - तर मग हा निघालों तिच्याकडे. तिला भेटेन, तिची क्षमा मागेन, तिची समजूत पाडीन, तिला हंसायला लावीन तरचं तुला फिरुन तोंड दाखवीन.
आषाढ्या - ( आंतून येत येत ) शेटसाहेब, गाडी तयार आहे !
आश्विन - जा, जरुर नाहीं गाडीची ! आमचा बेत फिरला !
आषाढ्या - हें मी आधींच सांगितलं होतं. सोडतों तर घोडे. ( जातो. )
आश्विन - शाबास वैशाख ! आज तूं होतास म्हणून थोडक्यात निभावलं. नाहीतर गोष्ट कोणत्या थराला गेली असती सांगवत नाहीं ! विनाकारण मी तिचा छळ केला ! तिला भेटलंच पाहिजे ! अरे आषाढ्या, गाडी - पण नको, पायींच जाऊं ! काय कृत्तिकाबाई मूर्ख पहा ! कारण काय तें क्षुल्लक आणखी संशय काय घेतलान् ! आतां आधीं फाल्गुनरावांकडून तसबीर घेतों आणि तीच पुन्हा रेवतीला नजर करतों. खरंच, यांत दुहेरी मौज होणार आहे. वैशाख तूं जा आतां ! मी आतां चाललो फाल्गुनरावांकडे. ( दोघे जातात. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP