अध्याय तिसरा - अभंग १ ते २०

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


पाहुनि राजसुतातें, बहु आशी, बहु करूनि गौरव, दे;
विस्मित होवुनि भेटे, ‘ भद्रं, ’ समस्त पौर वदे; ॥१॥
विस्मित होवुनि, वंदुनि, वृत्त पुसे कुवलयाश्व तातातें.
कथिति, गळां पडुनि, रडुनि, जें दारूण वृत्त, तातमाता तें. ॥२॥
चित्तीं नृपपुत्र म्हणे, ‘ मजकरितां त्यागिला स्वकाय जिणें,
तीच भलीं !, धिक् ! कठिना मातें हें श्लाघ्य होय काय जिणें ? ॥३॥
काय प्रत्युपकार प्राणत्यागें स्तियांस हें युक्त ?
त्या साध्वीच्या न रिणापासुनि होयिन, मरोनिही, मुक्त. ॥४॥
रिपु हर्षताल रडतां, माझा तत्काळ भंग करितील,
हरितील राज्यपद; मग बहु मातातात, ताप वरितील. ॥५॥
जीवित ताताधीन, त्यागावें म्यां कसें पराधीनें !’
यापरि विचार करिता झाला शोकांतही बरा धीनें. ॥६॥
उत्तरकार्य करी मग, नृपसुत डोळे करूनियां ओले;
‘म्यां स्त्री मदालसान्या न वरावी ’ निश्चयें असें बोले. ॥७॥
स्त्रीभोग त्यजुनि, असे शोकाग्नीच्या वहात आहेतें
बा ! कार्य करीसा क्षम कोणाचाही न हात आहे तें. ॥८॥
तो ‘ उर्वशीहि ’ म्हणतो ‘ न लगे, व्हावी मदालसा मातें. ’
ओसणतो प्रियसख हो ! किति कष्टा या वदाला सामातें. ॥९॥
व्हावी मदालसेची प्राप्ति पुन्हा, हेंचि एक तत्कार्य,
सत्करावा म्हणसी, तरि होयचि तो सुसाधुसत्कार्य. ॥१०॥
कार्य कुवलयाश्वाचें दुर्घट लोकेश्वरांसही बा ! हें,
मग कोण समर्थ जगीं त्यासि म्हणाया ‘ अभीष्ट तूं लाहें ’? ॥११॥
अश्वतर म्हणे, " सुत हो ! जरि जन जाणुनि अशक्य कर्मातें,
न करितिल अनुद्योगें, पावतिल न कार्यसिद्धिशर्मातें. ॥१२॥
पुरुषें आरंभावें कर्म, न पौरुष कदापि सोडावें;
कर्मफ़ळ, जसें दैवें, स्पष्ट तसें पौरुषेंहि जोडावें. ॥१३॥
यास्तव यत्न तसा मीं करिन, जसें सिद्ध होय हें कार्य;
म्हणती, ‘ सर्वार्थांची सिद्धि असे निश्चयीं, ’ असें आर्य. " ॥१४॥
ऐसें बोलुनि फ़णिवर जें सुयशस्कर, मनांत आणी तें,
प्लक्षावरणतीर्थीं तुहिननगीं जाय शरण वाणीतें. ॥१५॥
दुष्कर तप करुनि, करी अश्वतर श्रीसरस्वतीस्तवन,
जीचा प्रसाद वृद्धि ज्ञाना दे, पावका जसा पवन. ॥१६॥
‘ प्रणवादिजगन्मूर्ते ! कारुण्यनिवासमानसे ! वाणि !
माते ! तुज नत जो, त्या विधिविष्णुशिवासमा नसे वाणी. ’ ॥१७॥
देवी भेटोनि म्हणे, ‘ झाले जे भक्त शिष्टवर मागें,
अश्वतरा ! तदधिक तूं, घे देत्यें सर्व इष्ट, वर मागें. ’ ॥१८॥
अश्वतर म्हणे ‘ माते ! भ्राता कंबळ सहाय दे आधीं,
दोघांसि गानविद्या अतुळा देवूनि, कीर्तिला साधीं. ’ ॥१९॥
श्रीविष्णुप्रभुजिह्वा वाणी ‘ दिधलें, ’ असें मुखें वदली,
पदलीना बहु निववी ती चित्कर्पूरपूरिता कदली. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP