प्रसंग सहावा - सद्‌गुरु बडिवार

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


भोंपळा कोंवळा चिरून भक्षिला । निबर जाल्‍या पेटें सांगडी शोभला । जडातें तारून स्‍वयें असे तरला । विटाळाविरहित असे ॥५६॥
तैसा सद्‌गुरु स्‍थूळाकारी पवित्र । पक्व जालिया होय ईश्र्वर । विटाळाविरहित निर्विकार । जैसा दुध्या शुचिपणें ॥५७॥
हें जितुकें दृष्‍टांत घेतले । तितुके सद्‌गुरूच्या तुका नाहीं आले । पदी समजाविसीलागीं मांडिले । सभे श्रोत्‍यांच्या ॥५८॥
कोणी न कळतां बोलती उत्तर । म्‍हणती काय सद्‌गुरूचा उपकार । यानें हा वाढविला पसर । कवणिया गुणें ॥५९॥
आतां विनवुनी संतश्रोत्‍यांलागुन । सांगतो सद्‌गुरूचें महिमान । ते ऐकावें चित्त सावधान करून । भोळे भाविकपणें ॥६०॥
लक्ष चौर्‍यांशीचे बंदिखान । चुके सद्‌गुरू स्‍वामीचें कृपेनें । यावेगळी अनेक दुःख भ्रमणें । सांगों किती तुम्‍हांस ॥६१॥
सांगो जरी लक्ष्य चौर्‍यांशीचीं दुःखें । ती तुम्‍ही ऐकिली शुकदेवाचे मुखें । तुम्‍हां कुशळपुढें म्‍यां निज रंकें । काय जाणीव करावी ॥६२॥
चौर्‍यांशी लक्षीचीं मायबापें । तिहीं मज प्रसवेनि अनेक करविलीं पापें । परी भवसागरीं तरे ऐसें सोपें । सांगतीच ना कांहीं ॥६३॥
सभेसी कांट्या काढल्‍याचा उपकार । जन्मवरी आठवती उपचार । जीर्ण वस्त्रें दिधलया ठाकूर । देह तोंवरी वाणिती ॥६४॥
एक देही सुळीं देतां सोडविला । तरी तो जन्मावरी पाडाऊ जाला । देह सरल्‍या उपकारा नाहीं आला । सोडविलें त्‍याच्या ॥६५॥
जीहिं केलें सद्‌गुरूचें दास्‍यत्‍व । पुढलें सांगेन प्रसंगीं सिद्ध । त्‍यांची नांवें सांगतां तुटे अनुवाद । उन्मत्तपणाचा ॥६६॥
सद्‌गुरू सांडोन जें जें करी भजन । तितुका अनाचार घडे सत्‍य जाण । हें निबंध साक्ष वचन । शेख महंमद बोले ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP