प्रसंग सहावा - सद्‌गुरु

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


एक भेद सांगतां अनेक भेदांची हेरी । सद्‌गुरुकृपेनें दिसे नवल परी । ऐसाच कोणी होईल अधिकारी । तोंचि निज पद पावेल ॥१९॥
जैसें मेदिनीचें धैर्य थोर । उत्‍पत्ति प्रळय होय अनाचार । परी कोणालाच न दे प्रतिउत्तर । तदन्यायें असे सद्‌गुरु ॥२०॥
जैसे बावन कसी सुवर्णालागी । तोडून मूसेस घालिजे अग्‍नि । परी ते न संडीच कांहीं धगी । स्‍वयें तेजाकाराची ॥२१॥
निर्विकारपणें तो सद्‌गुरु । हृदयीं निर्मळ दर्पणाकारु । अष्‍टहि अंगें जैसी साखरु । गोडत्‍वपणें असे ॥२२॥
असो अंधार अथवा उजेड । परी साखर खातां लागे गोड । पवित्र अशुच दृढ मूढ । तैसा सद्‌गुरुसमान ॥२३॥
इक्षुदंडासी भक्षिती राजकुमर । अथवा चोरून नेती तस्‍कर । कांहीं न सांडीं गोडीचें घर । तदन्यायें सद्‌गुरु ॥२४॥
सोलितां गाळितां गळे पाणी । परी त्‍या गोडत्‍वाची तुटों नेदी खाणी । ऐसा परोपकारी इक्षुदंड जनीं । तैसा सद्‌गुरु स्‍वामी ॥२५॥
राब सांडूनि रायपुरी साखर नाबद । तैसी सद्‌गुरु स्‍वामीची अनेक मात । करावयालागीं विश्र्वाचें स्‍वहितं । अवतरणीं अवतरे ॥२६॥
शशि भानु गंगाजळीं बिंबला । अथवा थिल्‍लरीं कुंडीं देखिला । तो जरी चराचरीं व्यापिला । परि अलिप्त असे ॥२७॥
सर्वत्रीं झळके प्रळयानिळ । निवडीच ना शुच अथवा चांडाळ । तैसीच सद्‌गुरूची देहढाळ । सदा समत्‍वें असे ॥२८॥
सर्व पालाणून नभाकार जाण । तें चहूं खाणीचें असें पांघरूण । तैसें अगाध असें महिमान । सद्‌गुरु धर्मिष्‍ठांचें ॥२९॥
ऐरणीवरी ठेवूनियां हिरा । घणाघरी पिटिला तो अवधारा । परी तेणें सांडिलें नाहीं धीरा । सुतेजपणें मिरवे ॥३०॥
अमंगळ म्‍हणोनि बाहेर टाकिले । तें नांव उकरडा पावलें । खत म्‍हणोनि काळींत मेळविलें । नांव पावलें साखर ॥३१॥
स्‍वातिजळ सिंपल्‍यांत जन्मले । शुद्ध नांव मोती ऐसें पावलें । मागुतें जळीं नाहीं मिसळलें । जडत्‍वपणें असे ॥३२॥
ऐसा जो द्वैत अहंकारें जड जाला । तो जाणा ईश्र्वरीं नाहीं मिळाला । सद्‌गुरुकृपेविण अधोगतीस गेला । वेषधारी होऊनियां ॥३३॥
सामुद्रिक सिंधूंत निपजलें । जगीं हळवार मोलें विकलें । षड्रस पक्वान्नातें सरतें केलें । गळितार्थपणें ॥३४॥
ऐसें हें गळित्‍व बोळल्‍या अंगीं । तो कदा काळीं न वचे भंगीं । सहजामाजी खेळे सत्‍संगीं । सगुण गंभीरपणें ॥३५॥
कापूस वोटितां सरकीनें सांडवला । कमाईनें नांव लुगडें शेले पावला । मुंडासें ध्वज पताकीं मिरविला । आणि विश्र्व झांकिलें ॥३६॥
सरकी न्यायें सांडिला विकार । मग नांव पावला सद्‌गुरु उदार । धीरें जाला असे विश्र्वाचें माहेर । शिष्‍यत्‍व स्‍थापूनियां ॥३७॥
हीन यातीस सगुण गुण देखिले । ते सद्‌गुरु सन्मानानें मानून घेतले । संत श्रोत्‍यापें सांगेन ऐसे बोले । शेख महंमद ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP